बळीराजाचा जागल्या

प्रतिनिधी 29/06/2011

 कोल्हापूर  जिल्ह्यात तमदलगेसारख्या छोट्या खेड्यात राहणार्‍या शेतकर्‍याचा मुलगा रावसाहेब बाळू पुजारी यांनी कृषिमासिक व कृषिविषयक पुस्तक प्रकाशन व्यवसाय सुरू केला, त्यालाही सहा वर्षे झाली. त्यांचे ‘शेतीप्रगती’ हे मासिक नावारूपाला आले आहे. त्यांनी शेती विषयातील अनेक तज्ज्ञांना लिहिते केले आहे. मासिक स्वरूपातील ज्ञानाचा उपयोग शेतकर्‍यांना सतत व केव्हाही व्हावा यासाठी त्यांनी त्या मजकुराची पुस्तके प्रसिध्द केली आहेत. त्यांनी कोल्हापूर शहरातील ट्रेड सेंटर इमारतीत कृषिविषयक पुस्तकांचे दालनही सुरू केले आहे. त्यांनी तिथे स्वत:ची तसेच अन्य प्रकाशनांची पुस्तकेदेखील उपलब्ध करून ठेवली आहेत. या तीन उपक्रमांद्वारे ते शेतकर्‍यांना शेतीबाबत व शेतीशी संबधित अनेक प्रश्नांबाबत सतत जागते ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

रावसाहेब पुजारी  शेतीच्या अभ्यासातून त्यांच्या असे लक्षात आले, की शेतीमध्ये जे नवीन तंत्रज्ञान येत आहे ते आपल्या शेतकर्‍यांनी आत्मसात केले पाहिजे. शेतकरी शेतीबाबत खर्‍या अर्थाने शिक्षित झाल्याशिवाय शेतीची व त्याची स्थिती सुधारणार नाही. नव्या तंत्राशिवाय शेती फायदेशीर होणे शक्यच नाही. त्यांनी शेतकर्‍यांमध्ये जागृती व जे शेतीमध्ये यशस्वी झाले आहेत त्या नामवंत शेतकर्‍यांचे अनुभव सांगून त्यांना प्रोत्साहन असे दोन प्रकारचे काम सुरू केले. त्यातून त्यांच्या ‘समृध्द शेतीच्या पायवाटा’, ‘कायापालट क्षारपड जमिनीचा’ आणि ‘शेतकर्‍यांचे सोबती’ या तीन पुस्तकांचा जन्म झाला. त्यांनी जानेवारी 2005पासून शेतीला वाहिलेले ‘शेतीप्रगती’ हे मासिक सुरू केले.

 रावसाहेब पुजारी यांनी कष्टात शिक्षण पूर्ण केले. वडील मेंढपाळ व शेतकरी. त्यामुळे त्यांनी शेतीच्या कामात मदत करत व लहानसहान नोकर्‍या करत एम.ए.पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांनी सुरुवातीला गावोगावी फिरून वृत्तपत्रविक्रीचा व्यवसाय सुरू केला. नंतर सोळा वर्षे, त्यांनी ‘सकाळ ’चे बातमीदार, उपसंपादक म्हणून काम पाहिले. त्या काळात त्यांनी शेती पुरवणीचे संपादन केले; तेथेच त्यांनी अनेक लेखमाला लिहिल्या.

 एका टप्प्यावर, त्यांनी नोकरी सोडून चक्क शेती केली. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’सारखे प्रयोग केले. त्यांची दहा एकर शेती आहे. त्यामध्ये ते ऊस, भाजीपाला, फुले, केळी ही पिके घेत असत. त्यांची पेरूची बागही आहे. ऊस सोडला तर बाकी शेतमालाची विक्री त्यांचे कुटुंबीय स्वत: बाजारात करत असतात. त्यामुळे त्यांची शेती सतत फायद्यात आहे असा त्यांचा दावा असतो.

 त्यांना क्षारपीडित जमिनीच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी नवी दिल्लीच्या ‘सेंटर फ़ॉर सायन्स अॅण्ड एण्व्हायरन्मेंट (सीएसई)’ या संस्थेची फेलोशिप मिळाली. त्यातून त्यांनी सांगली , सातारा, कोल्हापूर भागातील क्षारपड जमिनीचा अभ्यास केला. त्यांनी त्यावर आधारित ‘कायापालट- क्षारपड जमिनीचा’ हे पुस्तक प्रसिध्द केले.

 दैनिकात नोकरी केल्याने त्यांना संपादन, जाहिरात व वितरण या तिन्ही अंगांची चांगली जाण होती. त्यांनी चिकाटीने मासिकाची तिन्ही अंगे फुलवली व मासिक नावारूपास आणले. ते नवे तंत्रज्ञान, नवे प्रयोग, यशस्वी शेतकर्‍यांच्या गाथा, शेतीविषयक नवीन माहिती, शेतीविषयक वृत्त, चर्चेतील विषय असे महत्त्वाचे अनेक विषय नेहमीच हाताळतात. त्याचा शेतकर्‍यांना चांगला उपयोग होतो. तांत्रिक अंगाने म्हणजे कागद, छपाई, सजावट, बांधणी या बाजूंनीदेखील हे मासिक सरस आहे. या बळावर स्थानिकबरोबर कॉर्पोरेट जाहिराती त्यांना मिळत आहेत.समृद्ध शेतीच्या पायवाटा

 त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला. मासिक सहा वर्ष खंड न पडता सुरू आहे. त्यांनी प्रसिध्द केलेले दिवाळी अंक हेदेखील या मासिकाचे वेगळेपण आहे. त्यांनी पाणीप्रश्न, ग्लोबल वॉर्मिंग, मातीचा कस असे विषय घेऊन एकेका विषयाबाबत जागृती करणारे दर्जेदार अंक दिले. त्याशिवाय केळी, ऊस, रोपवाटिका, बी-बियाणे, दुग्ध व्यवसाय आदी विषयांवरती प्रासंगिक खास अंक असतात. ते अर्थसंकल्पातील शेती या विषयावर दरवर्षी नेटका अंक प्रसिध्द करतात.

कमी खर्चाची ऊस शेती  मासिकासोबत त्यांनी प्रकाशन व्यवसाय चालू केला. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरील सोळा पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यामध्ये उद्यानपंडित पी.व्ही.जाधव यांचे ‘शेतकरी आजोबाचा बटवा’ हे पॉकेट आकाराचे पुस्तक चांगले विकले गेले. शेतकर्‍याला आपल्या शेतावर उपलब्ध साधनांचा वापर करून खते, औषधे, बिय़ाणे कशी करावीत यांचे मार्गदर्शन त्यात आहे.

 त्यांच्या पुस्तकांना चांगला शेतकरी वाचक मिळाला. रावसाहेब म्हणतात, नव्या तरुण शेतकर्‍यांमध्ये माहिती मिळवण्याची तहान आहे. द्राक्ष, ऊस, केळी, हळद आदी पिकांवर जे परिसंवाद किंवा चर्चासत्रे होतात त्याला ही तरूणाई उपस्थित असते; त्यात गांभीर्याने सहभागी होते, शंकानिरसन करून घेते. जी कृषी प्रदर्शने होतात त्यामध्येदेखील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.

संपर्क – रावसाहेब पुजारी, संपादक–प्रकाशक, शेतीप्रगती मासिक, तेजस प्रकाशन, कोल्हापूर, एफ- 3, ट्रेड् सेंटर, स्टेशन रोड, कोल्हापूर

भ्रमणध्वनी - 9881747325, ई मेल - sheti.pragati@gmail.com , tejasprakashan@gmail.com

सुधीर श्रीधर कुलकर्णी, सांगली, भ्रमणध्वनी :- 9420676543

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.