कृतिशील समाजचिंतक फादर फ्रान्सिस दिब्रिटो


फादर दिब्रिटो हे कॅथलिक पंथीय ख्रिस्ती धर्मगुरू आहेत. त्यांचा जन्म वसईतील मराठी भाषिक ख्रिस्ती कुटुंबातील. विरार-आगाशी परिसरातील नंदाखाल हे त्यांचे जन्मगाव. मराठी साहित्यातील एक सिध्दहस्त लेखक, संपादक, पर्यावरण रक्षणार्थ झटणारा व दहशतवादाविरुध्द आवाज उठवणारा सजग कार्यकर्ता म्हणून त्यांची ख्याती आहे. फ्रान्सिस दिब्रिटो यांनी 1972 मध्ये धर्मगुरूची दीक्षा घेतली. दीक्षित धर्मगुरुपदासाठी आवश्यक शिक्षण घेताना फादर दिब्रिटो यांनी ख्रिस्ती धर्माचे तत्त्वज्ञान व चर्चच्या इतिहासाचा अभ्यास केला. तसेच, त्यांनी इतर धर्मांचाही अभ्यास केला. त्यामुळे त्यांच्या विचारांना चौरस बैठक लाभली. ते निष्ठावंत कॅथलिक असले तरी त्यांची धर्मनिष्ठा आंधळी किंवा भाबडी नाही. तेव्हापासून त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक व धार्मिक स्वरूपाच्या कार्याला गती मिळाली. त्या आधीपासून त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीची सुरुवात झालेली आहे; ती चालूच आहे.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी वसईतील काही जागृत नागरिकांच्या सहकार्याने 'हरित वसई संरक्षण समिती'ची स्थापना 1988 या वर्षी केली. तेव्हापासून त्यांचे पर्यावरणविषयक जागृतीचे सत्र चालू झाले. यात विहिरी, बावखले वाचवणे, विहिरींतील पाण्याचा उपसा करून पाणी पुरवणा-या टँकरवर बंदी घालणे, जमिनविक्री थांबवणे अशा बाबी अग्रस्थानी होत्या. वसईत कायद्याचे राज्य संपुष्टात आले असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यावर आणि कोणातही त्याविरूध्द ब्र काढायची हिंमत राहिलेली नसताना त्यांनी एकट्याने पोलिसकचेरीत जाऊन निषेधयात्रेची सुरुवात केली. मात्र, हजारोंचा लोकसमुदाय त्यांच्या पाठीशी धिटाईने उभा राहिला. त्यांनी या समितीच्या माध्यमातून वाचक चळवळ उभारली, वाचक मेळावे घेतले.

'सुवार्ता' हे कॅथलिक समाजाचे मुखपत्र 1955 मध्ये फादर डॉमनिक आब्रियो यांच्या संपादकत्वाखाली उदयास आले. फादर दिब्रिटो यांनी 'सुवार्ता' चे संपादक म्हणून जबाबदारी 1983- मध्ये स्वीकारली आणि 2007 पर्यंत संपादनाचे असिधाराव्रत अव्याहतपणे चालवले. मराठी भाषिक ख्रिस्ती समाजाचे मुखपत्र असलेल्या 'सुवार्ता' या मासिकाचा आशय आणि आविष्कार ह्या दृष्टीने अंतर्बाह्य कायापालट करण्यात फादर दिब्रिटोंचा महत्त्वाचा सहभाग आहे. सामाजिक प्रबोधनविषयक विचारांच्या स्पर्शाने 'सुवार्ता' मासिक ख्रिस्ती समाजापलीकडे जाऊन पोचले. दिब्रिटोंनी ख्रिस्ती लेखकांव्यतिरिक्त अन्य समाजातील लेखकांनाही सहभागी करून घेतले. स्वदेश, स्वभाषा, स्वसंकृती या मूल्यांवर घाला घातला जात असताना त्या मूल्यांचे रक्षण करणे हेच त्यांनी आपले कर्तव्य मानले. 'मायमराठी'चे पांग फेडण्याची आपली प्रतिज्ञा त्यांनी 'सुवार्ता' च्या संपादनाने पूर्णत्वास नेली आहे. त्यातून अनेक साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक उपक्रम राबवले गेले.

त्यांच्या संपादनातील चौफेर दृष्टी विविध परिमाणे घेऊन येते. ती अन्यायाविरुध्द रणरागिणी होऊन गरजते. 'सुवार्ता' तील त्यांच्या संपादकीय लेखांतील भाषा, वैचारिक मांडणी, आवेशयुक्त वक्त्तृत्वगुण, त्यातील निकोप स्पष्टपणा, समाजहितासंबंधीची व्यापक कळकळ या वैशिष्ट्यांमुळे त्यांची लेखणी लक्षवेधी ठरते. त्यांच्या सखोल विचारांनी परिप्लुत लेखनशैलीत साधेपणा आणि प्रसाद आहे. 'सुवार्ता' च्या शेवटच्या पानावरील चिंतने हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्यांत मानवी मूल्यांची जपणूक आहे.

फादर दिब्रिटो यांनी 1992 मध्ये पुणे येथे झालेल्या पंधराव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषवले होते. विश्वात्मक साहित्य, पृथगात्म साहित्य, ख्रिस्तींची जीवनमूल्ये, 'बायबल' मधील साहित्यमूल्ये, साहित्यातील प्रवाह, अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक यांचे आदान-प्रदान, साहित्य आणि समाजमुक्तीचे तत्त्वज्ञान, मराठी भाषेच्या अस्तित्वाचा लढा, मातृभाषेतील शिक्षण इत्यादी विषयांचा परामर्श त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात घेतलेला आहे. बायबल चे सर्वसामान्यांना समजेल असे मराठी भाषांतर करण्याची त्यांची मनीषा आहे. ते सर्वधर्मसमभाव संमेलनेही योजत असतात.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सामाजिकतेचे भान ठेवून कार्य करणा-या संस्थांच्या लोकमंगलाच्या कार्याला नेहमी प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या कार्यात आपला सहभाग दिला. त्यांनी नर्मदा बचाव आंदोलनात मेधा पाटकरांना, भ्रष्टाचारविरोधी अभियानात अण्णा हजारेंना आणि सामाजिक शुश्रूषेच्या कार्यात साथ बाबा आमटेंना दिलेली आहे.

फादर दिब्रिटोंचा पिंड समाजचिंतकाचा आहे, तद्वतच तरल संवेदनशीलतेचे प्रत्यंतर त्यांच्या ललितरम्य लेखनातून घडते. त्यांनी प्रवासवर्णनांतून सामाजिक समस्यांचा वेध घेणारी निरीक्षणे मांडली. सृजनशील निसर्गाचा मोहोर आणि तेजाची पावले त्यांच्या संवेदनशीलतेला भुरळ घालत राहिली. ती त्यांनी नेमक्या शब्दांत टिपली. निसर्गरम्य युरोपातील प्रेमापासून वंचित झालेल्या, रखरखीत बनलेल्या माणसांच्या जीवनातून ओअॅसिसचा शोध घेत राहिले. तर संघर्षयात्रेने माखलेल्या, मरू मरू झालेल्या ख्रिस्तिभूमीत करुणेने पाझरणारा ख्रिस्त त्यांना दिसला. त्यांनी कुष्ठरोग्यांच्या जखमा साफ करणा-या मदर तेरेसांच्या सुरकुतलेल्या चेह-यावर आनंदाचे अंतरंग वाचले, त्यांचा जीवनाकडे सकारात्मक बघण्याचा दृष्टिकोन आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांना प्रसन्न व परिपुष्ट बनवत गेलेला आहे. इंग्लंडमधून आलेले येशुसंघीय कॅथलिक धर्मगुरू, फादर थॉमस स्टिफन यांनी 'पुष्पामाजि पुस्प मोगरी' म्हणत मराठीचा महिमा गाईला आणि मोगरीच्या परिसरातील वसईतील, मराठी भाषिक कॅथलिक धर्मगुरू असलेल्या फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी मराठीच्या मोग-याचा सुवास सर्वदूर पोचवलेला आहे.

साहित्याच्या मुख्य प्रवाहाबाबत विश्लेषण करताना फादर म्हणतात, साहित्यात विविध प्रवाह निर्माण होऊन ते मुख्य प्रवाहाला मिळायला हवेत. साहित्यिकांनी स्वत:च्या जगण्याला कुंपण घालून घेऊ नये. त्यामुळे साहित्याच्या पालखीत राज्यघटना असल्यास काहीच हरकत नाही, कारण धर्मग्रंथ हे संस्कृतीचे संचित आहेत. धर्मग्रंथांत काही गोष्टी कालसापेक्ष तर काही कालविसंगत असतात. त्यामुळे वैज्ञानिक व मानवतेच्या दृष्टीने त्याची चिकित्सा होणे गरजेचे आहे. भारतीय संविधानामुळे सर्व समाजघटकांना समानता प्राप्त झाली आहे. म्हणूनच साहित्याच्या पालखीला आता व्यापक रूप येणे आवश्यक आहे.

प्रा.डॉ.सिसिलिया कार्व्हालो
drceciliacar@gmail.com

--------------------------------------------------------------

फ्रान्सिस दिब्रिटो यांचे साहित्य:-

 • परिवर्तनासाठी धर्म प.स.दिब्रिटो फ्रा. थ 90 105656
 • ख्रिस्ताची गोष्ट ( बालड.मय) 0 द : 31 दिब्रिटो फ्रा थ 91
 • ख्रिस्ती सण आणि उत्सव पद्द: 457 दिब्रिटो फ्रा.थ 98 123423
 • संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची ल 463: 25 दिब्रिटो फ्रा न 04 135487
 • अध्यक्षीय भाषण, सहावे बंधुता संमेलन, अहमदनगर द: 5 दिब्रिटो फ्रा न 05 137769
 • पोप दुसरे जॉन पॉल जीवनगाथा
 • तरंग

कार्य:-

 • संपादक- 'सुवार्ता' - (1983-2007)
 • संस्थापक- हरित वसई संरक्षण समिती. 1988
 • अध्यक्ष- मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन, 10,11,12,जाने1982, पुणे
 • प्रकाशित साहित्य:-
 • तेजाची पाऊले (ललित), अक्षर प्रकाशन, मुंबई फेब्रु. 1995
 • ओअॅसिसच्या शोधात (प्रवासवर्णन), राजहंस प्रकाशन , पुणे, फेब्रु. 1996 (1979 पासून फादरनी आखाती देशांपासून युरोपातील अनेक देशांत प्रवास केला. या भ्रमंतीतून, विशेषत: तेथील समाजजीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे.)
 • सृजनाचा मोहोर (ललित), नीळकंठ प्रकाशन, पुणे, मे 2002
 • संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची, राजहंस प्रकाशन
 • याव्यतिरिक्त आणखी दहा पुस्तके प्रकाशित

पुरस्कार:-

 • पत्रकारितेसाठी- 'लोकमत' - नागपूर. प्रथम पुरस्कार- 1993
 • दर्पण पत्रकारिता पुरस्कार, सातारा- 1994
 • ललित लेखनासाठी- 'ओअॅसिसच्या शोधात'साठी भैरुरतन दमाणी पुरस्कार, सोलापूर,1986
 • अनंत काणेकर, पुरस्कार,  'ओअॅसिसच्या शोधात'साठी
 • कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार, सन 1997.2003,2005
 • समाजसेवेसाठी- रेव्हरेड नारायण टिळक पुरस्कार, पुणे- 1996
 • महात्मा गांधी पुरस्कार, पुणे 2003 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

 • No HTML tags allowed.
 • Lines and paragraphs break automatically.
 • Web page addresses and email addresses turn into links automatically.