उद्योगातील अभिनवतेची कास

प्रतिनिधी 30/11/2011

 मनीषा राजन आठवलेरोह्याच्या मनीषा राजन आठवले यांचे जीवन म्हणजे कर्तबगारी आणि ‘इनोव्हेशन्स’ची आच या, प्रचलित शब्दप्रयोगांचे उत्तम उदाहरण होय. त्यांनी स्वत: मायक्रोबायॉलॉजी मध्ये पदवीशिक्षण घेतले, पुण्यात पॅथॉलॉजी प्रयोगशाळेत काही महिने काम केले. त्या ‘डी.एम.एल.टी’ हा त्याच क्षेत्रातला अभ्यासक्रम करणार; त्याआधीच त्या रोह्याच्या डॉ.राजन मनोहर आठवले यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. कोणत्याही मुलीची लग्नानंतरची दहा वर्षे जशी जातात, तशीच मनीषा यांचीही गेली. त्या काळात अनिष व अनुज यांचा जन्म झाला. कोणीही गृहिणी करील त्याप्रमाणे त्या ‘बर्थ डे केक’ वगैरे बनवत व घरच्या, कुटुंबाच्या आनंदात भर घालत, पण त्यांची दृष्टी असे ती पती -राजनच्या दवाखान्यात. राजन आयुर्वेदिक डॉक्टर. ते स्वत: औषधे बनवून रुग्णांना देतात. मनीषा यांनी त्यांना मदत करणे आरंभले आणि त्यातून त्यांची स्वत:ची औषधनिर्मिती सुरू झाली.

‘शतावरी कल्प’ हे त्यांचे पहिले उत्पादन. त्यानंतर त्यांनी च्यवनप्राश, तेले, चूर्णे असेही प्रयोग केले. मायक्रोबायॉलॉजीच्या अभ्यासामुळे निर्जुंतुकीकरण किती महत्त्वाचे आहे हे त्यांना ठाऊक होतेच. त्यामुळे त्या सर्व कामगिरी कटाक्षाने पार पाडत. तशात त्यांना अभिनव, प्रभावी, आयुर्वेदाचा आधार असलेल्या ‘आयड्रॉप्स’चा शोध लागला. संगणकामुळे डोळ्यांना जो ताण जाणवतो त्यावरचा तो उतारा होता. चाचण्यांमध्ये तो प्रभावीदेखील वाटला. परंतु अन्न आणि औषध पुरवठा विभागाकडून त्यांना त्याच्या उत्पादनासाठी परवाना मात्र मिळू शकला नाही. योग असा, की त्याच बेताला चेहर्‍यावरील मुरूमांसाठी त्यांनी एक क्रीम बनवले. त्याकरता मात्र त्यांना परवाना मिळू शकला.

मनीषा आठवले अभिनवता साधणार्‍या उद्योजक म्हणून स्थिरावणार असे वाटत असतानाच त्यांच्या आपल्या उत्पादनांचे मार्केटिंग करणे किती अवघड आहे हे ध्यानी आले. त्यामुळे मोठ्या उद्योगाची स्वप्ने एका बाजूला खुणावत आहेत, अशा वेळी दुसर्‍या बाजूला त्यांनी प्रयोग सुरू ठेवले. त्यामधून तयार झाली नाचणीची बिस्किटे. त्यामध्ये नाचणी, सोयाबीन, अश्वगंधा, गोखरू ही औषधे उपयोगात आणली जातात. बिस्किटांचे तीन-चार प्रकार आहेत. मधुमेहाच्या रोग्यांसाठी स्वतंत्र बिस्किटे बनवली जातात. नाचणीची नाविन्यपूर्ण बिस्किटे पुण्याच्या दीनानाथ रुग्णालया सारख्या नामवंत संस्थेपासून आणखी काही महत्त्वाच्या ठिकाणी वितरित होतात. औषधे निर्माण करून त्या उद्योगात स्थिरावायची स्वप्ने पाहणार्‍या मनीषा आठवले आता बेकरी उद्योगात झकास जम बसवून आहेत. त्या रोज साठ-सत्तर किलो बिस्किटांचे उत्पादन करतात. त्यासाठी आवश्यक ती यंत्रसामुग्रीदेखील त्यांनी घेतली आहे. कारखान्यात पाच-सात मुली काम करतात. मनीषा आठवले म्हणतात, ‘या उद्योगामधून नफा किती होईल याचा विचार डोक्यात नसतो. परंतु या पाच-सात मुलींची संख्या वाढत जाऊन अनेक महिला कामाला कशा लागतील हाच एक नवा विचार डोक्यात घोळत राहतो.’ अशा या, बुद्धिकल्पकतेने आणि शरीरानेही स्वस्थ बसणार्‍या बाई नाहीत.

मनीषा आठवले यांचे माहेर रोह्याजवळच माणगावला. ललिता व शंकर हरी भाटे यांच्या त्या कन्या. शंकरराव हवाईदलात होते. त्यामुळे मनीषा यांचा जन्म लोहोगाव येथे झाला. त्यांचे बालपण आग्रा येथे गेले. प्राथमिक व कॉलेज शिक्षण पुण्यात झाले. मध्ये माणगावलाही काही वर्षे त्यांचे वास्तव्य होते. त्यांना स्वत:ला वाचनाची आवड आहे. पण सध्या ध्यास आहे उद्योग वाढवण्याचा.

- ना.रा.पराडकर - मु.पो. मेढे, ता. रोहा, जिल्हा रायगड, भ्रमणध्वनी : 9272677916

- मनीषा आठवले – भ्रमणध्वनी : 9421167906, दूरध्वनी : (02194) 235639 इमेल : herbalarms@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.