तुळशीचे लग्न


तुळशीचे लग्न दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीस लावले जाते. त्या संबंधातील कथा पद्मपुराणा आहे. ती अशी, की जालंधर नावाचा महाप्रतापी व असाधारण योध्दा राक्षस होऊन गेला. त्याने आपल्या पराक्रमाने देवांना जिंकून वैभव प्राप्त केले आणि आपल्या भाईबंद दैत्यांस सुखी केले. त्याची वृंदा नावाची पत्नी महापतिव्रता होती. तिच्या पुण्याईमुळे जालंधर त्रिभुवनात अजिंक्य ठरला होता. त्याने इंद्रपुरीवर चाल करून इंद्राची खोड मोडण्यासाठी कडेकोट तयारी चालवली होती. पुढे, देव व दैत्य यांच्यांत युध्द होऊन अनेक देवांस गतायू व्हावे लागले. तेव्हा विष्णूने जालंधरास युद्धात हरवण्यासाठी कपटकारस्थान रचले. त्याने जालंधराची पत्नी वृंदा हिच्या जाज्वल्य पातिव्रत्यामुळेच जालंधरास सामर्थ्य प्राप्त झाले आहे हे जाणून, ते नष्ट करण्यासाठी युक्ती योजली.

विष्णूने दोन वानरांकडून जालंधर हा रणभूमीवर मारला गेला आहे अशी बतावणी करून, आपले शीर व धड तंतोतंत जालंधराप्रमाणे बनवून ते दोन अवयव वृंदेपुढे टाकले. तेव्हा वृंदा शोक करू लागली. इतक्यात, एका कपटी साधूने संजीवनी मंत्राने कपटवेषधारी जालंधरास म्हणजेच विष्णूस जिवंत केले! वृंदेने आपला पती जिवंत झालेला पाहून आनंदातिशयाने त्याला मिठी मारली. अशा प्रकारे, विष्णूने वृंदेसमवेत राहून तिचे पातिव्रत्य भंग केले. अज्ञानात का होईना पण वृंदेच्या पातिव्रत्यभंगामुळे जालंधर बलहीन होऊन लढाईत मारला गेला. काही काळानंतर, वृंदेस खरा प्रकार कळताच तिने क्रोधित होऊन विष्णूस शाप दिला, की त्याला पत्नीचा वियोग घडून दोन मर्कटांचे सहाय्य घेण्याची पाळी त्याच्यावर येईल. त्याप्रमाणे पुढे रामावतारी तसे घडले!

त्यानंतर लगेच वृंदेने अविकाष्ठ भक्षण केले. विष्णूलाही आपण कपटाने एका महासाध्वीचा नाहक नाश केला हे पाहून वाईट वाटले; इतकेच नव्हे तर तो वृंदेच्या रक्षेजवळ वेड्यासारखा बसून राहिला. विष्णूचे वेड घालवण्यासाठी पार्वतीने तेथे, वृंदेच्या रक्षेवर तुळस, आवळा व मालती यांचे बी पेरले. त्यातून तेथे तीन झाडे उत्पन्न झाली. त्यांतील तुळस ही आपल्या सर्वगुणसंपन्न वृंदेप्रमाणे आहे असे वाटून विष्णूस ती प्रिय झाली. श्रीविष्णूस तुळस अतिप्रिय म्हणून तिला हरिप्रिया म्हणतात. पुढे वृंदा हिनेही द्वापार युगात रुक्मिणीच्या रूपाने अवतरून विष्णूचा अवतार जो श्रीकृष्ण त्यास कार्तिक शुध्द द्वादशीच्या दिवशी वरले. अशा प्रकारे, हिंदू लोक रुक्मिणी-कृष्ण विवाह तुळशी विवाहविधीच्या रूपाने त्या दिवशी दरसाल साजरा करतात. तुळशीचे लग्‍न हा पूजोत्‍सव आहे. त्यात तुळस ही वधू, बाळकृष्ण हा वर, तर ऊस हा मामा समजला जातो. सोहळ्यासाठी तुळशी वृंदावन सारवून, सुशोभित केले जाते. तुळशीभोवती रांगोळी काढली जाते. वृंदावनात ऊस पुरून आवळे व चिंचा टाकतात. तुळशीच्या चारी बाजूंनी ऊसाचा मंडप उभारला जातो. मग विष्णुस्वरूप श्रीबाळकृष्णाची षोडशोपचारे पूजा केली जाते. बाळकृष्णाला आवाहन करून त्यास स्नान, अभिषेक, नवीन वस्त्र, नवीन साज, तसेच नैवेद्य अर्पण करून त्याची आळवणी करतात. त्यानंतर तुळशीमातेचीही षोडशोपचारांनी पूजा करून, तिला सौभाग्यलेणे, नवीन साज, नवीन वस्त्र देऊन सालंकृत सजवतात. तुळस आणि श्रीकृष्ण विवाहासमयी चौरंगाच्या एका बाजूस श्रीकृष्ण तर दुस-या बाजूस तुळशीचे रोप ठेवून दोघांमध्येे अंतरपाट धरला जातो. मग सर्वांना अक्षता वाटल्या जातात. त्यानंतर मंगलाष्टके म्हटली जातात आणि गोरज मुहूर्तावर (सायंकाळी) श्रीकृष्ण-तुळशीचा विवाह सोहळा पार पडतो. प्रहर रात्रीच्या आत पूजा आटोपल्यावर वृंदावनाभोवती ऊस रचून केलेल्‍या मांडवाभोवती आरती, दीपाराधना उरकण्यात येते. त्‍यावेळी तुळशीच्या मुळात चिंचा व आवळे ठेवतात. जमलेल्या लोकांस लाह्या, कुरमुरे, ऊसाच्या गंडे-या देण्यात येतात.

हा विवाह केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फळ मिळते असे सांगितले जाते. ते व्रत तुलसीवनात करणे हे विशेष पुण्यप्रद मानले आहे. या व्रताने सौभाग्य, संतती, संपत्ती, विद्या इत्यादी गोष्टींची प्राप्ती होते. तसेच रोगनिवारणही होते, अशी समजूत आहे. तुळशी विवाहाच्‍या व्रतासंबंधात दंतकथाही ऐकवली जाते.

तुलसीविवाहाचे अनेक काल सांगितले आहेत. परंतु बहुधा तो कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी करतात. काही ठिकाणी तुळशीचे कन्यादान केल्यावर यथाविधी विवाहहोम करण्याचाही प्रघात आहे. पूर्वी कार्तिक शुद्ध द्वादशीस तुलसीविवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील, त्या सर्वांची समाप्ती करून व चातुर्मास्यात जे पदार्थ वर्ज्य केले असतील ते पदार्थ ब्राह्मणाला दान देऊन मग स्वत: सेवन करण्‍याची पद्धत होती.

श्रीविष्णू आषाढ शुद्ध एकादशीला शयन करतो व कार्तिक शुद्ध एकादशीला जागा होतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात, त्याला प्रबोधोत्सव असे नाव आहे. हा प्रबोधोत्सव आणि तुलसीविवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे.

तुळशीच्‍या लग्‍नानंतर हिंदू लोकांच्या विवाहासंबंधी कार्यास सुरूवात होते. 'या सुमारास वधुपिते घराबाहेर पडतात व मुलीचे लग्न जुळवण्यासाठी चपला झिजवू लागतात’ असे पूर्वी म्हणत.

हिंदू परंपरेनुसार तुळशीच्या केवळ दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य लाभते, तिच्या पानावरचे उदक मस्तकावर धारण केले तर गंगास्नानाचे पुण्य लाभते आणि मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्ती वैकुंठास जाते. इतके हिंदू धर्मातील धारणेमध्‍ये तुळशीला महत्त्व आहे.

"तुळसीचे पान. एक त्रैलोक्य समान |
उठोनिया प्रातःकाळी, वंदी तुळसी माऊली |
नाही आणिक साधन, एक पूजन तुळसीचे
न लगे तीर्थाधना जाणे, नित्य पूजने तुळसीसी
योगायोग न लगे काही, तुळसीवाचुनी देव नाही"

अशा शब्दांत संत एकनाथांनी तुळशीचे श्रेष्ठत्व सांगितले आहे. तुळशीमध्ये कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन वायू सोडण्याचा गुणधर्म जास्त असल्यामुळे शरीर निरोगी राखण्यास तिचा उपयोग होतो. दारात वा घरात तुळशीचे झाड असल्यास घरात पिसवा, हिवतापाचे जंतू शिरकाव करत नाहीत. तुळस प्रदूषणनाशक आहे. ताप, सर्दी, खोकला दूर करणे, हवा शुद्ध करणे हे तिचे महत्त्वाचे गुणधर्म आहेत.

हिंदूंच्या अंत:करणात तुळशीसंबंधात पूज्यभाव आहेच; पण इतर धर्मीयदेखील तुळशीबद्दल आदर दाखवतात. इंग्रजी शब्दकोशात तुळशीला ‘पवित्र झाड’ असे म्हटले आहे. ग्रीक भाषेतील बेंझिलिकॉन हा तुळशीसंबंधीचा शब्द राजयोग या अर्थाचा आहे. तुळशीला फ्रेंच व जर्मन भाषांतही ग्रीक शब्दांप्रमाणे बहुमानाचे अर्थ लाभलेले आहेत. इटाली व ग्रीस देशांत प्राचीन काळी तुळशीच्या अंगी विशिष्ट शक्ती आहे असे मानत असत.

- सुरेश वाघे
 

संदर्भ: आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास- लेखक ऋग्वेदी, प्रथमावृती 1916
 

(ऋग्वेदी : वामन मंगेश दुभाषी यांनी हे टोपणनाव धारण केलेले होते. पु.ल.देशपांडे हे त्यांचे नातू होते.)

लेखी अभिप्राय

tulsi vivahavishyi mahiti milvinyachi far utsukta hoti pan agdi sahajasahji ani uttam ashi mahiti milali.

sachin madke25/11/2013

फार सुंदर पण मला असलेली माहिती मिळालेली नाही

जगदिश रुंधे नागपुर13/11/2016

थिंक महाराष्ट्र सुंदर आहे
यामधून विविध माहीती मिळेल

नामदेव विष्णूप…14/11/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.