बंगला

प्रतिनिधी 30/11/2011

स्वर्गीय कुंदनलाल सहगल यांच्या स्वर्णिम आवाजातील ‘एक बंगला बने न्यारा’ हे गीत अमर आहे. ‘बंगला’ या शब्दाविषयी मनात लहानपणापासून कुतूहल आहे. हा शब्द कसा आला असावा? जवळजवळ सर्व शब्दकोश असे नोंदवतात की इंग्रज लोक भारतात आले, त्यांच्या पहिल्यावहिल्या वसती बंगाल प्रांतात झाल्या, म्हणून त्यांच्या घरविशेषाला बंगला हे नाव पडले. (त्यांच्या राजापूर वा मुंबई येथील घरांना मराठा नाव का बरे नाही पडले?) ही नोंद जवळजवळ सर्वमान्य झाली आहे, पण ह्याला छेद देणारे तीन पुरावे नोंदवतो.

अ. भक्त शिरोमणी मीराबाईने आपल्या एका पदात ‘बंगला’ हा शब्द वापरला आहे. त्या पदाचा आरंभ असा:

करना फकिरी तो क्या दिलगिरी सदा मगन मन रहना रे ll

कोई दिन बाडी तो कोई दिन बंगला कोई दिन जंगल रहना रे ll

(मीरा बृहत्पदसंग्रह, संपा. पदमावती शबनम, लोकसेवा प्रकाशन, बुढानाला, बनारस, संवत 2009, पृष्ठ 314, पदसंख्या 570)

आ. महात्मा कबीरांच्या पदातही हा शब्द आढळतो.

रामनाम तू भज ले प्यारे काहे को मगरूरी करता है

कच्ची माटी का बंगलातेरा पावपलक मे गिरता है llधृ ll

(लोकसत्ता, रविवार, 4 नोव्हेंबर 2007 मध्ये डॉ.सुभाष रामचंद्र सोनंदकर यांनी पाठवलेले पद)

इ. हुमनाबाद (जिल्हा बीदर, कर्नाटक) येथील संत माणिकप्रभू यांचे पद

बंगल्याखालून येतो जातोlकिती अकडबाज नाजुक मुखडा llधृ ll

(संस्थान माणिकप्रभू, पद्यमाला, प्रकाशक ज्ञानराज, आवृत्ती चौथी, शके 1907)

अर्थात बंगला हा शब्द इंग्रज भारतात येण्याच्या पूर्वीचा आहे. आमच्या मते त्याची व्युत्पत्ती वंक अथवा बंक – ग या शब्दापासून असावी. वंक, बँक, बंक, बग हे यक्ष या देवतेचे पर्यायवाची म्हणून पाईसद्दमहण्णवो, अभिधान चिंतामणि आदी कोश देतात. शिव हा यक्ष, राक्षस, भूत, प्रेत आदींचा स्वामी असल्यामुळे त्याला बंकनाथ म्हटले जाते. (पिशाचरक्ष: पशुभूतयक्ष वेतालराजं त्वथ शूलपाणिम) शिकाच्या बंकनाथ या नावाचा उल्लेख विज्ञानेश्वराचे आपेगाव (तालुका अंबड, जिल्हा जालना) येथील शिलालेखात येतो. (शं. गो. तुळपुळे, प्राचीन मराठी कोरीव लेख, पृष्ठ 376-378) तर शिवाचे बंकेश्वर हे नाव कंधार (तालुका कंधार, जिल्हा नांदेड ) येथील राष्ट्रकूट नृपती कृष्णराज (तृतीय) याच्या शिलालेखात येते. (Epigraphia Indica, xxxv, pp.110ff). लीळाचरित्र आणि स्थानपोथीतही बंकनाथ आहे.

प्राचीन काळी नगरद्वारावर यक्षमूर्ती असत. त्या अजिंठा लेणी समूहातील लेणे क्रमांक एकोणीसच्या प्रवेशद्वारावर आहेत. अशा दरवाजांना यक्षद्वार म्हणत. कंधार शिलालेखात (‘सिद्धिविनायक मंडित – यक्षद्वारे’)असा उल्लेख आला आहे. यक्षाला वक, बंक म्हणत असल्यामुळे अशा दरवाजांना वंकद्वार म्हणू लागले. बंकद्वार हा शब्द लीळाचरित्रात येतो. हरपाळ देवाने रामयात्रेसाठी प्रस्थान ठेवले तेव्हा माता माल्हणदेवी ‘तीनिबांकद्वरेवीर बोलवीत आली’ (लीळाचरित्र, संपादक वि.भि.कोलते, तिसरी आवृत्ती, पूर्वार्ध लीळा, क्रमांक 20). नरींद्रानेही ‘रुक्मिणीस्वयंवर ’ या काव्यात हा शब्द उपयोजला आहे. तो असा :

निगता वंकद्वाराबाहेर : येती भेटली मंगळार्ति करी

मग सकुणफळे होणे दिधले सुंदरी : मग वारु नमस्कारिलाll(ओवी क्रमांक 692)

टीपकाराने या शब्दाचा अर्थ देवडी असा दिला आहे. मधु मंगेश कर्णिक यांच्या कोकणातील वाड्याच्या दर्शनी दरवाजाला वाघ दरवाजा असे म्हणत. तेथे वाघ येऊन ओरडून जात असे हे कृत्रिम स्पष्टीकरण. (दैनिक सकाळ, दिवाळी अंक 2002). रायगडाला वाघ दरवाजा आहे. वंकद्वार > बंगद्वार > बंगदा > बंगला हा सरळ अपभ्रंशक्रम. देवडी (हिंदी ड्यौढी) हा शब्द जसा दरवाजासाठी आणि महालासाठी वापरतात तसा बंगला हा शब्द संपूर्ण घरासाठी वापरण्यात आला. रघुनाथपंडिताने देवडीवरच्या पहारेकर्‍यासाठी बंकी, दौलतबंकी हे शब्द दिले आहेत ( राज्यव्यवहार कोश, संपादक रा. गो. काटे, पृष्ठ 18). मध्यप्रदेशचे गोंड आपल्या घराच्या दर्शनी भागास बंगला म्हणतात (गढा मंडला के गोंड राजा, लेखक रामभरोस अग्रवाल, प्रकाशक गोंडी पब्लिक ट्रस्ट मंडला, संवत 2042, पृष्ठ 164.). तेव्हा बंगला इंग्रजांचा नव्हे.
 

ब्रह्मानंद देशपांडे – ‘ऐतिहासिक’, 14, अनुपम वसाहत, औरंगाबाद 431 005,

(0240) 233 6606, 09923390614

Last Updated On - 16th Nov 2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.