मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेले नट विवेक यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने ‘अभिनेता विवेक’ या नावाचे एक पुस्तक भारती मोरे यांनी पुढाकार घेऊन संकलित केले आहे. त्या कामी त्यांना प्रभाकर भिडे, रविप्रकाश कुळकर्णी व प्रकाश चांदे या मंडळींचे संपादकीय साहाय्य लाभले. त्यांनी अनेक मंडळींच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या आठवणींतून; तसेच, तत्कालिन वर्तमानपत्रांच्या कात्रणांतून विवेक यांचा आयुष्यक्रम रेखाटला आहे. विवेक यांनी १९४४ पासून १९८१ पर्यंत शहात्तर चित्रपटांत काम केले. त्यांचे १९५३ साली आलेले ‘देवबाप्पा’ (दिग्दर्शक राम गबाले) आणि ‘वहिनींच्या बांगड्या’ (दिग्दर्शक शांताराम आठवले) हे चित्रपट खूपच गाजले...