गावात, शहरात चौक असतात. पण एखाद्या गावात चौकटीत किंवा चौकाच्या व्याख्येत न बसणारा असा; तरीही तो चौकच असतो, हे वाचून अचंबा वाटेल. असा चौक आहे दापोली तालुक्यात मुरुड या गावी. मुरुड हे टिंबाएवढे गाव. नकाशात त्याचे अस्तित्व ते काय दिसून येणार ! परंतु त्या गावाची ख्याती ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वेगळेपणामुळे सर्वदूर पोचली आहे. गावाची रचना विचारपूर्वक करण्यात आली असल्याचे जाणवते. दोन्ही बाजूंना घरे आणि मधोमध रस्ता. सुमारे चारशे वर्षांपूर्वीची ही रचना स्वत:चे रूप अजूनही टिकवून आहे...