१८५७ चा उठाव – ब्रिटिश रोजनिशीतील झलक

0
26
-heading

ग्रेट ब्रिटनच्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या कारभाराविरुद्ध भारतात अंसतोष उफाळला; तो दिवस 10 मे 1857. पहिला उठाव मीरत येथे झाला आणि भडका उत्तर हिंदुस्थानात सर्वत्र उडाला. ते यादवी युद्ध दीड वर्षें चालले. ते ब्रिटिशांनी जिंकले व त्यानंतर, हिंदुस्थानचा कारभार ब्रिटिश सम्राज्ञी व्हिक्टोरिया हिने तिच्या हाती घेतला.

अनेक पुस्तके 1857च्या त्या उठावावर लिहिली गेली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्या उठावाला ‘स्वातंत्र्यसमर’ असे संबोधले आणि त्यात मरण पावलेल्यांना हुतात्मा असे बिरूद दिले. न.र. फाटक यांनी त्या ‘बंडा’च्या मर्यादा दाखवल्या, तो उठाव कोणत्याही योजनाबद्ध रीतीने झाला नव्हता, ती ‘भाऊगर्दी’ होती असा त्यांच्या विवेचनाचा सूर होता. त्यांच्या त्या प्रतिपादनाचा बराच राग तत्कालिन मराठी समाजाला आला व फाटक यांना जनअसंतोषाला सामोरे जावे लागले.

परंतु एका प्रत्यक्षदर्शी इंग्रज महिलेने त्या लढ्याची, उठावाची हकिगत लिहिली आहे, ती वाचण्यात आली – लखनौ येथे ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या फौजेला बंडखोरांचा जो सामना करावा लागला, तेथील लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीने ती हकिगत लिहिली आहे. The Siege of Lucknow – by the Honorable Lady Inglis या नावाचे पुस्तक उस्मानिया विद्यापीठाच्या डिजिटल लायब्ररीवर उपलब्ध आहे. ते पुस्तक 1892 साली प्रकाशित झाले. लेखिका लेडी ज्युलिया इंग्लीस. तिचा पती ब्रिगेडियर जॉन इंग्लीस हा त्या उठावाच्या वेळी फौजेत कार्यरत होता. फौजेला वेढा लखनौ येथे पडला. त्यावेळी कंपनीची फौज कमी होती. बंडखोर मात्र खूप होते. ब्रिगेडियर जॉन इंग्लिस यांनी तो वेढा कौशल्य व धीर दाखवून यशस्वीपणे हाताळला. लेडी इंग्लीस प्रस्तावनेत सांगतात, “मात्र त्या वेढ्याच्या बाबतीत बऱ्याच समजुती/गैरसमजुती आहेत. त्या दूर करण्याच्या उद्देशाने युद्ध संपल्यानंतर तेहतीस वर्षांनी मी हे लेखन प्रसिद्ध करत आहे.”

ते लेखन करण्यासाठी त्यांनी त्यांच्या स्वत:च्या रोजनिशीबरोबर, लढाईत भाग घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विस्तृत टिपणांची मदतही घेतली आहे. त्यांच्या रोजनिशीतील काही दिवसांच्या नोंदी (अनुवाद रूपाने) प्रस्तुत करत आहे-

रविवार 3 मे – आम्ही चर्चकडे संध्याकाळी पाचच्या सुमारास चाललो असताना आम्हाला मिस्टर बार्बर भेटले. ते म्हणाले, की त्यांच्या रेजिमेंटला मुख्यालयाकडे ताबडतोब जाण्याचा हुकूम काही वेळापूर्वी मिळाला आहे. आम्ही पुढे गेलो. काही मिनिटांतच सर हेनरी लॉरेन्स यांचे सेक्रेटरी कॅप्टन हेस सामोरे आले. “ तुम्ही व तुमची रेजिमेंट ताबडतोब मागे फिरा. सरांनी बोलावले आहे.”  आम्ही घोडे वळवले. वाटेत आमच्या रेजिमेंटचे जे कोणी भेटले त्या सर्वांना तोच निरोप दिला. कॅप्टन हेस म्हणाले, की शत्रूपक्ष आज आपल्या शहरातून पास होईल अशी वदंता आहे. त्यामुळे साऱ्यांनी त्यांच्या हाती शस्त्रे सज्ज ठेवावी…

आम्ही तोफांच्या आवाजाने संध्याकाळी काहीसे घाबरलो. पण तो आवाज लढाईचा वाटत नव्हता. आम्ही रात्री बारा वाजता लढाईच्या बातमीच्या उत्सुकतेने बागेत आलो, तेवढ्यात मेजर बँक्स घोड्यावरून आले. ते म्हणाले, “सारे ठीक आहे.”

पुढील दोन आठवडे काहीच घडले नाही. परंतु आम्ही15 मे 1857 ला कर्नल आणि मिसेस केस यांच्याबरोबर जात होतो, तेव्हा फादर हॅरिस जॉन यांच्यासाठी निरोप घेऊन आले, की त्याने सर हेन्री लॉरेन्स यांना ताबडतोब भेटावे. आम्ही लॉरेन्स यांच्याकडे पोचलो तेव्हा ते आमची वाटच पाहत होते. आम्हाला जाणवले, की काहीतरी विपरीत घडले होते. परंतु आम्ही जी वाईट बातमी ऐकली त्याची कल्पना आम्ही स्वप्नातही केली नव्हती. -lady-julia-inglisदेशी शिपायांनी बंड मीरत येथे केले होते! ते अनेक अधिकारी व रहिवासी यांची हत्या केल्यावर दिल्लीकडे वळले होते. बंडाचा जोर तेथे वाढेल असा अंदाज होता.

अधिकच वाईट बातमी दुसऱ्या दिवशी (16मे) कानावर आली. दिल्लीचा ताबा बंडखोरांनी घेतला होता. लष्करी आणि मुलकी अधिकारी चर्चा करत होते, की काय खबरदारी घ्यावी? परिणामस्वरूप त्याच दिवशी संध्याकाळी सर्व स्त्रिया व मुले यांची रवानगी सिटी रेसिडेन्सीत करण्यात आली. आमची आख्खी दुपार बांधाबांध करण्यात गेली. त्याच्या दुसऱ्या दिवशी (रविवार, 17मे) बत्तीसाव्या रेजिमेंटला एक सूचना मिळाली. त्यात मजकूर होता – छावणीत शिरताच आमच्यावर हल्ला होण्याची शक्यता होती. आमच्या कूच करण्याला काही अनाकलनीय कारणाने विलंब झाला. अखेर, आम्ही सर हेन्री यांच्या अधिकृत निवासस्थानी पोचलो. तो दिवस मला सर्वात लांबलचक व कंटाळवाणा वाटला.

21/05/1857 – हेरांच्या खबरीप्रमाणे आज आमच्यावर हल्ला होण्याची शक्यता होती. संध्याकाळपर्यंत काहीच घडले नाही. संध्याकाळी एकाएकी आगीचा लोळ दिसला. सगळेजण दरवाज्याबाहेर धावले. दृश्य खरोखरच थरकाप उडवणारे होते. आम्हाला तेथून हलवावे असा प्रस्ताव आला. कारण आग आमच्या दिशेने सरकत होती. पण तेथे फादर पोलेम्टन आले. ते म्हणाले, “शांत राहा. दैवाच्या कृपेने वारा पडला आहे आणि आग नियंत्रणाखाली आली.”

22/051857 – आजही हल्ला होण्याची भीती वर्तवली जात होती. मी घोड्यावरून छावणीकडे गेले. जॉनला भेटता फार थोडा वेळ आले. मध्यरात्री, मी एका मोठ्या आवाजाने जागी झाले – म्हणत होते, ‘पहारेकऱ्याला हटवा’, पाठोपाठ शस्त्रांचा खणखणाट. मी घरावर हल्ला झाला अशी भीती वाटून, घाबरून ताडकन उठले. इतक्यात काय झाले ते बघण्यास कॅप्टन मॅन्सफिल्ड खाली आले. मग समजले, की ती केवळ हूल होती.

24/05/1857 – रविवार. शांत दिवस. सकाळी मी छावणीत गेले. संध्याकाळी तेथील चर्चमध्ये सर्व्हिस चालू असताना बंदुकीच्या एक-दोन फैरी ऐकू आल्या. अगदी जवळून आवाज आला. मी दचकले. पण लगेच लक्षात आले, की मुसलमान लोकांचा मोठा उपास – रमझान – त्या दिवशी संपला होता. त्या दिवशी नव्या चंद्रोदयाबरोबर उत्सवाला सुरुवात होते. त्या उत्सवाला वंदन म्हणून बंदुकीचे ते आवाज होते.

30/05/1857 – आम्ही दुपारी, काही काळ छावणीत घालवला. परतताना, जॉन आणि कर्नल केम्स आमच्याबरोबर थोडा वेळ सोबतीला आले. पण आमच्यासमोर काय वाढून ठेवले आहे याची आम्हाला कल्पना नव्हती. मी झोपण्याच्या खोलीत नेहमीपेक्षा लवकर आले आणि मिस्टर गुबिन्स यांनी दार ठोठावले. “तुम्ही आणि मुले ताबडतोब गच्चीवर चला.” मी वर गेले तो घरातील सर्वजण तेथे जमा झाले होते. सारे छावणीच्या दिशेने बघत होते. आगीचे लोळ तेथे उठले होते. तोफांचे आवाज स्पष्ट ऐकू येत होते. फादर पोलेम्टन यांनी लढाईत अडकलेल्या जवानांसाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली. सर्वांनी प्रतिकाराची तयारी केली. शस्त्रे व दारुगोळा पुरेसा होता. आम्ही सुरक्षित होतो. एक स्वार बातमी घेऊन आला, की शिपायांनी बंड केले आहे. ते जाळपोळ आणि लुटालूट करत हिंडत आहेत. जॉनची चिठ्ठी बारा वाजता आली –सारे आता पुरते शमले आहे. माझा जीव जॉनचे हस्ताक्षर पाहून भांड्यात पडला. 

03/06/1857 – आज आम्हाला अत्यंत वाईट बातमी मिळाली. कॅप्टन हेन्स, मिस्टर बार्बर आणि डॉ. फ्रेथर यांचे भाऊ – मिस्टर फ्रेथर या तिघांना त्यांच्याच रक्षकांनी मैनपुरीजवळ ठार केले. मिसेस बार्बरला बराच वेळ ती बातमी समजली नाही. मी ती सांगण्याचे काम फादर पोलेम्टन यांच्यावर सोपवले. बिचारीच्या लग्नाला जेमतेम तीन महिने झाले होते!

07/06/1857 –रेसिडेन्सी चर्चमध्ये फादर पोलेम्टन यांनी सर्व्हिस केली. ते प्रार्थना सकाळी-संध्याकाळी नेहमीच करतात. त्यांच्या प्रार्थनेने आम्हाला खूप शांत वाटते.

15/06/1857 – एक अतिशय वाईट घटना घडली. सातव्या कॅन्हल येथे सार्जंट मेजर यांची राईडिंग मास्टर एल्डरिज यांच्याशी बोलाचाली झाली, अगदी क्षुल्लक गोष्टीवरून. सार्जंट मेजर कीऔध यांनी त्यांचे पिस्तुल बाहेर काढले आणि एल्डरिज यांच्यावर गोळी झाडली.

17/06/1857 – बातमी आली, की बंडखोर आमच्यापासून केवळ चौदा मैलांवर पोचले आहेत.

25/06/1857 –  मिसेस ऑद यांची आभाट रेसिडेन्सीत आली. ती सांगत होती, की ती नवाबगंजपर्यंत बंडखोरांसोबत आली आहे. ते तेथे एकत्र होत होते आणि त्यांचा इरादा आणखी कुमक आली, की आमच्यावर हल्ला करण्याचा होता.

कॅप्टन बर्च यांचे टिपण 

अवधच्या राजाच्या मालमत्तेचे काय करायचे हा प्रश्न होता. तो एकनिष्ठ असला तर आमच्या संरक्षक छत्राला पात्र होता. तेव्हा त्याच्या संपत्तीचे रक्षण करणे गरजेचे होते. उलट, तो बंडखोरांना सामील झाला तर त्याची संपत्ती ताब्यात घेऊन आमच्या शिपायांना मिळणाऱ्या रकमेत घसघशीत वाढ करणे जरूरीचे होते.

मुकुंद वझे 9820946547 
vazemukund@yahoo.com
 

About Post Author