हेमाद्रिपंत या नावाचे गूढ? (Who Was Hemadripant)

2
66
हेमाद्रीपंडिताचे नाव ऐतिहासिक संदर्भात वारंवार येते. तो हेमाडपंत म्हणूनही ओळखला जातो. हेमाद्री पंडिताचे नाव बांधकाम शैलीमोडी लिपी या संदर्भात विशेष घेतले जाते. त्याने बांधलेली मंदिरेहेमाडपंतीया नावाने प्रसिद्ध आहेत. तो मोडी लिपीचा जनक होय असे समजले जाते. त्याने सुमारे आठशे वर्षांपूर्वी विकसित केलेली मोडी लिपी महाराष्ट्रात व दक्षिणेत विशेष प्रचारात होती. हेमाद्री पंडिताच्या जन्मकाळाविषयी व अंतकालाविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. हेमाद्रिपंतांच्या उल्लेखाबाबतीतील मराठीमधील बेशिस्त व भोंगळपणा मुद्दाम सांगण्यासारखा आहे. त्याचे नाव हेमाडपंत/पंथ असे काहीही छापले जाते. त्याचा काळ तर पुराणकाळापासून ब्रिटिश काळापर्यंत कोणताही, विचार न करता नमूद केला जातो. त्याच्या वास्तुरचनेची वैशिष्ट्ये वगैरे फार विचारात घेतली जात नाहीत.

हेमाद्री पंडिताने यादवांच्या राजवटीत कर्णाधिपाच्या हुद्यावर असताना राजाश्रयाच्या जोरावर महाराष्ट्रात, विदर्भात; तद्वत, दक्षिण भारतात शेकडो मंदिरे निर्माण केली. त्याने देवगिरीच्या राजदरबारात प्रथम प्रवेश करण्याचे श्रेय संपादले. दगडी बांधणी मंदिराच्या पद्धतीसहेमाडपंती मंदिरेअसे म्हणतात. त्या मंदिरांच्या बांधणीची पद्धत विशिष्ट आहे. ती मंदिरे दगडाचे भौमितीय आकार कापून, ते चुन्याशिवाय एकमेकांत फसवले जातात आणि मंदिरे उभी राहतात. ती पद्धत हेमाद्री

अथवा हेमाडपंत यांनी शोधून काढली, म्हणून त्या पद्धतीस हेमाडपंती म्हणण्याचा प्रघात पडला. त्या पद्धतीत एका दगडाला ओळंबा व दुसऱ्याला खाच ठेवली जाते व नंतर ते दगड एकात एक पक्के बसवले जातात. त्यामुळे मंदिराची बांधणी भक्कम होते. ती कल्पकता त्या काळी अपूर्वच होय.

विदर्भातील वर्धा नदी वर्धा जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्याच्या पश्चिम काठावरून उत्तरदक्षिण वाहते. वढा (जुगाद) हे गाव वर्धा नदीच्या पूर्व किनाऱ्यास आहे. ते वर्धा व पैनगंगा नद्यांच्या संगमावर येते. ते गाव वाकाटककालीन आहे. हेमाद्री पंडित हा विदर्भातील वर्धानदीच्या तीरावरील वेदपद नामक गावाचा राहणारा होता. वेदपद म्हणजेच वढा हे गाव होय. त्यास वैजयिक असेही म्हणतात. वैजयिक याचा अपभ्रंश वैजावजावझावर्धावेद असा होऊन त्यास पुढेपदहे उपपद जोडण्यात आले. त्यावरून वेदपद हे गावाचे नाव तयार झाले. वाकाटक राजे हे विष्णुवृद्ध गोत्रीय असून,भगवान विष्णूचे उपासक होते. ते वढा येथे दर्शनास मधून मधून येत. पुढे चालुक्य, परमार यांच्या पावेतोते उपपद गळून वेदवदवधावढा या प्रकारे अपभ्रंश होऊनवढाहे गावाचे नाव रूढ होऊन गेले.
          वाकाटकांच्या ज्येष्ठ शाखेने दिलेल्या एकूण बावीस ताम्रपटांपैकी चौदा ताम्रपटांतवैजयिक धर्मस्थाने उदकपूर्व मतिसृष्टःअसा उल्लेख येतो. त्यावरून असे दिसते, की पाचव्यासहाव्या शतकांतील वाकाटकराजे एखाद्या धर्मस्थानी अथवा तीर्थक्षेत्री (बहुधा त्यांच्या राज्यातील) जात. तेथे उदक सोडून दानसंकल्प करत आणि राजधानीत परत आल्यावर अथवा राज्यात एकाद्या ठिकाणी मुक्काम असताना तेथून ते दान ताम्रपटाद्वारे जाहीर करत. वढा या गावी पुरातन मंदिर आहे. त्या मंदिरात विठोबाची मूर्ती आहे. त्यांनी तेथे दानसंकल्प सोडला असावा.
          वैदर्भीय पंडित बोपदेव हा हेमाद्रिपंताचा उजवा हात होता. बोपदेव हा त्याचा बालपणापासून स्नेही होता. हेमाद्री व बोपदेव हे त्या काळातील वराडचे (विदर्भाचे) विद्वान समजले जात. बोपदेवाने त्याच्या एका ग्रंथात त्याचे जन्मस्थान वेदपद हे गाव होते असे म्हटलेले आहे. त्यावरून ते दोघे वढा गावातील असावेत. पां.वा. काणे यांनी विविधज्ञान विस्तारया त्यांच्या पुस्तकात विदर्भ व महाराष्ट्र या संबंधाने हेमाद्री हा विदर्भ अर्थात दक्षिणात्य होता असे म्हटलेले आहे (वरील वाक्य केशव आप्पा पाध्ये यांनी हेमाद्री ऊर्फ हेमाडपंत यांचे चरित्रया त्यांच्या पुस्तकात संदर्भासाठी घेतले आहे). तो महाराष्ट्रीय होता, म्हणून त्याचे मराठी भाषेवर प्रेम होते.
हेमाद्री हा शुक्ल यजुर्वेदी शाखेचा वत्सगोत्री, पंचप्रवरी ब्राह्मण होता. त्याने स्वतः रचलेल्या चतुर्वर्गचिंतामणी या ग्रंथावरून त्याची वंशावळ वासुदेवकामदेवहेमाद्रिपंत याप्रमाणे असल्याची माहिती मिळते. हेमाद्री पंडिताचे मूळ गाव सोडवी हे असावे असे केशव आप्पा पाध्ये यांनी म्हटलेले आहे. ते गाव कर्नाटकात असून, हेमाद्रीची मूळ भाषा कानडी नाही हे विशेष. त्यावरून हेमाद्रिपंत हा सोडवीचा परंतु कन्नड भाषिक नसावा.
हेमाद्री हा खानदेशच्या धुळे जिल्ह्यातील रहिवासी होता असा दावा करणारा एक लेख वाचनात आला, परंतु त्यास पोषक अशा तऱ्हेचे लेखन उपलब्ध झाले नाही.  
– दत्ताजी तन्नीरवार 9922089301
( सहाय्य गोपाल शिरपूरकर 7972715904 gshirpurkar@gmail.com)
दत्ता तन्नीरवार हे चंद्रपूर येथे राहतात. ते इतिहासाचे अभ्यासक व लेखक आहेत. त्यांचे शिक्षण फारसे नाही, पण त्यांना इतिहासाची आवड निर्माण झाली. त्यांनी तोच ध्यास घेतला. त्यांनी नामांकित नियतकालिके, वर्तमानपत्रे, मासिके व त्रैमासिके यांत दीडशेच्यावर लेख लिहिले आहेत. ते सारे ऐतिहासिक संशोधनपर आहेत.
—————————————————————————————————–

About Post Author

2 COMMENTS

  1. खुपच नवी माहिती मिळाली.हेमाद्री पंडितांच्या चत्रृवर्ग चिंतामणी या ग्रंथाविषयी काही सविस्तर माहिती दिली तर बरे होईल.

  2. खुपच नवी माहिती मिळाली.हेमाद्री पंडितांच्या चत्रृवर्ग चिंतामणी या ग्रंथाविषयी काही सविस्तर माहिती दिली तर बरे होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here