हापूस, पुरातत्त्व, वेद आणि इतर बरेच काही…

1
45

     ऊस, राजगिरा, साबुदाणा, बटाटा, मिरची ही यादी वाचता वाचता एकदम आठवण झाली, ती आंब्याची. कलमी आंबा पोर्तुगीजांनी भारतात आणला. त्यापूर्वी भारतात आंब्याची झाडे नव्हती असे नाही, पण ती गावठी-रायवळ आंब्याची होती. शिवाजी महाराजांच्या काळामधे सर्व लोक फक्त गावठी आंबे खात होते. पोर्तुगीजांनी आंब्याची कलमे आणून ती भारतातल्या गावठी आंब्याच्या झाडांवर लावल्यानंतर कलमी आंबे मिळू लागले आणि मग अल्फान्सो या नावाचे ‘हापूस’ असे मराठीकरण झाले, इतकेच.

 

     सत्यनारायणाच्या प्रसादातला गव्हाचा रवा आणि त्यापासून बनवलेला शिरा हे पदार्थसुद्धा मूळचे भारतातले नाहीत. इतकेच काय, पण रवा आणि शिरा हे शब्ददेखील अरबी भाषेमधून मराठीमधे आलेले आहेत. गहू इराणमार्गे प्रथम पंजाबात आला व मग भारतभर पसरला. काही दशकांपूर्वीपर्यंत दक्षिणेत गहू फारसा परिचयाचा नव्हता. सत्यनारायणाच्या पोथीमध्ये म्हटल्याप्रमाणे ‘सव्वा वाटी गव्हाचा रवा घ्यावा, तो सव्वा वाटी तूप घालून शिजवावा’ वगैरे आज्ञांचा मूळ स्रोत वाचकांच्या ध्यानी येईल.

 

     सत्यनारायणाच्या पूजेचा विषय निघाला म्हणून सांगतो, की मूर्तिपूजादेखील मूळ भारतातली नाही.

 

     महाराष्ट्रामधे राजवाडे या एकाच नावाचे दोन विद्वान होऊन गेले. पहिले इतिहासाचार्य वि.का.राजवाडे आणि दुसरे अहिताग्नी राजवाडे. अहिताग्नी राजवाडे पुण्यातल्या वैदिक संशोधन मंडळाचे प्रमुख होते. त्यांचे मत असे होते, की मूर्तिपूजा ही प्राचीन काळच्या मेसोपोटेमिया म्हणजे सध्याच्या इराक देशामधून भारतात आली. रामायण आणि महाभारत या दोन्हींमधे मूर्तिपूजेचा उल्लेख नाही. वेदवाड.मयामधेही मूर्तिपूजेचा मागमूस सापडत नाही. मग मूर्तिपूजा प्राचीन मेसोपोटेमियामधून भारतात कोणी आणली?

 

     भारतातल्या सर्व लोकांचे पूर्वज भारताबाहेरून भारतात आले आहेत. मूळचे भारतीय म्हणावे असे कुणीही नाहीत. अगदी आदिवासी लोकांचे पूर्वजदेखील भारताबाहेरून भारतात आले. गेली हजारो वर्षे भारतात बाहेरच्या लोकांची आवक सुरू आहे असे पुरावे पुरातत्त्वसंशोधनात सापडतात. पण त्यापूर्वी भारतात माणसे होती याचे पुरावे मात्र सापडत नाहीत. पुरातत्त्वसंशोधनाच्या व्यतिरिक्त ‘जेनोम’ प्रकल्पातल्या जनुकीय संशोधनाचे पुरावेदेखील तीच गोष्ट अधोरेखित करतात.

 

     याउलट भारतातून कुणी बाहेर गेल्याचा पुरावा पुरातत्त्वसंशोधनामधे सापडलेला नाही. सर्व पुरावे ‘इन्कमिंग’वालेच आहेत, ‘आऊटगोइंग’वाले नाहीत.

 

     ‘इण्डस सिव्हिलायझेशन’करता सिंधू असा जो मराठी प्रतिशब्द वापरला जातो, तो चुकीचा आहे. संस्कृती हा शब्द ‘कल्चर’ या इंग्रजी शब्दाकरता वापरणे योग्य आहे. पण सिव्हिलायझेशन म्हणजे कल्चर नव्हे. एकाच सिव्हिलायझेशनमधे अनेक कल्चर्स अस्तित्वात असू शकतात आणि इण्डस सिव्हिलायझेशनच्या बाबतीत तर ते कमालीच्या प्रकर्षाने दिसते. इण्डस सिव्हिलायझेशनच्या एकूण दोन हजार साइटस आहेत. त्यांपैकी फक्त सुमारे पंच्याहत्तर जागी उत्खनन झाले आहे, पण तेसुद्धा मर्यादित व अपूर्ण असे आहे. त्या सर्व ठिकाणी एकच एक अशी संस्कृती नाही. त्यांतल्या उकरल्या गेलेल्या विविध ठिकाणी किमान डझनभर वेगवेगळ्या संस्कृती सापडल्या आहेत. त्यांतल्या प्रत्येक संस्कृतीचे स्वरूप वेगवेगळे आहे. तेव्हा सिंधू संस्कृती असा एकच प्रतिशब्द संपूर्ण सिव्हिलायझेशनकरता वापरणे चूक आहे.

 

     दोन हजारांपैकी बहुतेक सर्व मोठ्या व महत्त्वाच्या साइटस पाकिस्तानात आहेत. फक्त पन्नास-साठ भारतात आहेत.

 

     पाकिस्तानात मोहेनजोदारोपासून (शब्दाचा मूळ अर्थ- ‘मेलेल्यांची टेकडी’) वायव्य दिशेला सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर गाझीशाह नावाची आर्किओलॉजिकल साइट आहे. ती साइट गेली अठ्ठावीस वर्षे प्रा.डॉ.लुइस फ्लॅम यांना पाकिस्तान सरकारच्या ‘आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ पाकिस्तान’तर्फे बहाल करण्यात आली आहे. त्यांच्याखेरीज दुसरा कुणीही त्या साइटवर जाऊन उत्खनन करू शकत नाही. डिसेंबर ते फेब्रुवारी असे तीन महिने उत्खनन करण्याचा सीझन असतो. लुइस फ्लॅम दरवर्षी त्या सीझनमधे पाकिस्तानात जाऊन साईटवर उत्खनन करतात. त्यांनी खणून काढलेल्या सर्व माहितीचे संगणकीय पृथक्करण, अॅनालिसिस व इण्टरप्रिटेशन मी करतो. लुईस आणि मी अशी आमची टीम आहे.

 

     उत्तम दर्जाचे म्हणावे असे सगळे उत्खनन व संशोधन पाश्चात्य संशोधकांनी केले आहे. त्यात पाकिस्तानातले किंवा अफगाणिस्तानातले ‘लोकल’ पुरातत्त्वशास्त्रज्ञ फारसे कुणी नाहीत. अपवाद प्रा. डॉ.रफिक मोगल यांचा. ते पूर्वी आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ पाकिस्तानचे डायरेक्टर जनरल होते. ते निवृत्त झाल्यावर गेली काही वर्षे अमेरिकेत असतात व बॉस्टन विद्यापीठामधे पुरातत्त्वशास्त्र शिकवतात. त्यांनी पूर्वी चोलिस्तानमधल्या चारशे साइटचा सर्व्हे केला होता. तो गाजला, पण ते फक्त ‘सरफेस अॅनालिसिस’ आहे. भारतातल्या राजस्थानच्या पश्चिमेकडचा पाकिस्तानातला प्रदेश म्हणजे चोलिस्तान, त्यातल्या चारशेपैकी कुठल्याच साइटवर अजून प्रत्यक्ष उत्खनन झालेले नाही.

 

     अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठातील जागतिक कीर्तीचे पुरातत्त्वशास्त्रज्ञ प्रा.डॉ.रिचर्ड मेडो यांनी हराप्पा येथे उत्खनन केले. त्यांच्या टीममधे अमेरिकेतल्या विस्कॉन्सिस विद्यापीठातले प्रा.डॉ.मार्क केनोयेर आणि न्यू यॉर्क विद्यापीठातल्या प्राध्यापक डॉ. रिटा राइटदेखील होत्या. त्यानंतर पुढे काहीच उत्खनन झाले नाही. मोहेनजोदारो येथे उत्खनन करण्यास पाकिस्तान सरकारने बंदी घातली आहे. कारण सिंधू नदीचे पात्र बदलल्याने जमिनीखालचे वॉटर टेबल उंचावले गेले आहे. उत्खनन करायला खड्डा खणला, की तो थोड्याच वेळात पाण्याने भरतो.

 

     अमेरिकेतल्या पेनसिल्व्हानिया विद्यापीठातले कै.प्रा.डॉ.ग्रेगरी पोस्सेहल कच्छ-सौराष्ट्रमधल्या रोजदी नावाच्या साईटवर उत्खनन करत होते. ते नुकतेच वारले. दुसरे, ओहायो प्रांतांमधल्या कैसा वेस्टर्न रिझर्व विद्यापीठातले प्रा.डो.जिम शेफर दक्षिण भारतामधे गेली सव्वीस वर्षे सातत्याने उत्खनन करत आले आहेत. जिम शेफर यांनी इण्डस सिव्हिलायझेशनची सर्वांगसुंदर अशी क्रोनॉलॉजी सर्वप्रथम दिली. ती जगभर सर्वमान्य व आधारभूत मानली जाते.

 

     इंग्लंडमधल्या केम्ब्रिज विद्यापीठामधले जागतिक कीर्तीचे पुरातत्त्वशास्त्रज्ञ प्रा.डॉ.कॉलिन रेनफ्रयू यांनी ‘आर्यन इन्व्हॅजन’ झाले नाही असे मत काही वर्षांपूर्वी व्यक्त केले होते. त्यामुळे भारतीयांना एकदम सुरसुरी आली आणि त्यांनी आर्य लोक मूळचे भारतातलेच असा दावा सुरू केला. प्रा.डॉ.कॉलिन रेनफ्रयू यांनी ‘इन्व्हॅजन झाले नाही’ एवढेच म्हटले होते. आर्य भारताबाहेरून आलेच नाहीत असे म्हटले नव्हते. पण त्याकडे दुर्लक्ष करून वेगवेगळ्या लोकांनी आपापल्या भन्नाट ‘थिअरीज’ मांडायला सुरुवात केली. मात्र प्रत्यक्ष उत्खननातून काढलेल्या, प्रायमरी सोर्सच्या पुराव्याचा या संबंधात कोणत्याच बाजूने पत्ता नाही!

 

     वेदांची रचना भारतात झाली असे जे अलिकडे सांगितले जाते, तेदेखील चुकीचे आहे. वेदवाड.मयाची अनेक रिसेन्शन्स (संस्करणे) आणि अनेक रिडक्शन्स (आवृत्त्या) अतिप्राचीन काळी झाल्या होत्या असे उल्लेख खुद्द वेदवाड.मयामधे आहेत. त्यांतल्या शेवटच्या रिसेन्सनमधले शेवटचे रिडक्शन व्यासमुनींनी केले. ते मात्र भारतात झाले. त्यापूर्वी वेद एकच होता आणि तो आर्य लोकांनी भारतात येताना आपल्याबरोबर आणला. त्यातला अर्ध्याहून अधिक भाग काळाच्या उदरात नष्ट झाला. व्यासमुनींनी उरलेल्या एका वेदाचे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे चार भाग केले.

 

     वेदवाड.मयामधे वर्णन केलेल्या कित्येक घटना भारतात घडलेल्या नाहीत. उदाहरणार्थ, ऋग्वेदातले दाशराज्ञ युद्ध सध्याच्या इराणमधे झाले आणि वेदांमधे वर्णन केलेल्या अनेक नद्या व अनेक भूभाग यांची वर्णने अफगाणिस्तानातल्या नद्यांशी व भूभागांशी जुळतात. आपण ग्राम या शब्दाचा अर्थ गाव असा गृहित धरतो, पण वेदातल्या ग्राम या शब्दाचा अर्थ गाव असा नसून ‘स्थलांतरामधला एक टप्पा’ असा आहे. हे स्थलांतर होत असताना काही लोक पुढे गेले, तर काही लोक भारताच्या बाहेरून भारतात आले हे त्यातल्या अनेक संदर्भांवरून स्पष्ट दिसते.

 

     इतकेच काय, पण द्राविडियन म्हणजे दक्षिण भारतीय अशी जी समजूत आहे, तीदेखील चुकीची मानली जात आहे. द्राविडियन हा शब्द मुळातच मानववंश दाखवणारा नाही. तो भाषाशास्त्रीय आहे. द्राविडियन हे फक्त भाषासमूहाचे नाव आहे. त्याचा माणसांच्या ‘एथ्निसिटी’शी संबंध नाही.

 

     द्राविडियन भाषासमूह दक्षिण भारतातला होता हेदेखील बरोबर मानले जात नाही. इण्डोयुरोपीयन, सेमिटिक, द्राविडियन असे अनेक वेगवेगळे भाषासमूह अतिप्राचीन काळी अस्तित्वात होते. अतिप्राचीन काळी सध्याच्या इराक व इराण देशांच्या सीमेलगतच्या प्रदेशामधे इलामाइट नावाची भाषा बोलली जात होती. इलामाइट भाषा द्राविडियन भाषाकुटुंबातली होती हे भाषाशास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेले आणि जागतिक पातळीवर सर्वमान्य सत्य आहे.

 

     या भाषांमधला मजकूर प्राचीन मेसोपोटेमिया म्हणजे सध्याच्या इराक देशामधे पाश्चात्य संशोधकांनी उत्खननामधे खणून काढलेल्या ‘मृत्तिकालेखा’मधे (क्ले-टॅबलेटस) कुनाईफॉर्म लिपीमधे लिहिलेला सापडला आहे.

 

     जगामध्ये सदासर्वकाळात असे आदानप्रदान होत आलेले आहे!

 

अनिलकुमार भाटेनिवृत्त प्राध्यापक, विद्युत अभियांत्रिकी, संगणक विज्ञान, माहिती तंत्रविज्ञान आणि मॅनेजमेण्ट, एडिसन शहर, न्यू जर्सी राज्य, अमेरिका, ईमेल : anilbhate1@hotmail.com

 

संबंधित लेख –

 

गणेशभक्ती आली कोठून?

 

‘थिंक महाराष्ट्र’: भविष्यकाळातल्या पत्रकारितेची ‘नवी तुतारी’!

 

उपवासाचे राजकारण

‘गॉड’ हा शब्द कुठून आला?
{jcomments on}

About Post Author

1 COMMENT

  1. for one minute we can
    for one minute we can consider that ary people invaded India and their is lot of ‘import’ in India. But it is no more relevant as over last few years we have developed our own culture. people are just wasting time in proving that people came from outside.

Comments are closed.