सुसंस्कृत होण्यासाठी केलेली गुंतवणूक!

0
40

समाजातील छोट्यात छोट्या समुदायाची संस्कृतीसुद्धा महत्त्वाची असते. आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असणाऱ्या मध्यमवर्गाने ती संस्कृती त्याच्या पदराला खार लावून घेऊन टिकवण्याची गरज आहे. तो काही स्वार्थत्याग नाही; ती असते सुसंस्कृत होण्यासाठी त्या मध्यमवर्गानेच केलेली गुंतवणूक…

‘सत्यकथे’ने ज्या संस्कृतीच्या आठवणी जिवंत ठेवल्या, ती समाजाच्या एका छोट्या वर्गाची संस्कृती होती असे सहज म्हणता येईल; पण या ठरावीक अभिप्रायाने त्या संस्कृतीचे मोठेपण-लहानपण काहीच सिद्ध होत नाही. आदिवासी-वारल्यांच्या संस्कृतीसारखी अगदी छोट्या समुदायाची संस्कृतीसुद्धा महत्त्वाची असते. ज्या वर्गाने साहित्य, संगीत, चित्र, नृत्य अशा अनेक कला त्याच्या जीवनाचा भाग बनवल्या, तो मध्यमवर्ग युद्धोत्तर काळापासून सतत वाढता आहे. त्यात अनेक जातींचे, वर्गांचे समूह सामील होत आहेत. त्यामुळे संस्कृतीला मिळणारा सर्वसामान्यांचा आश्रय अधिक वाढता असण्यास हवा. पूर्वी राजे-महाराजे आणि सरंजामदार यांच्या आश्रयाने कलावंत राहिले आणि कलाही वाढत गेली. लोकशाही आल्यानंतर कलांना आश्रय देणे ही राजकीय दृष्ट्या फारच कमी महत्त्वाची गरज झाली. दुसरे म्हणजे राजकीय सत्तेला कलेतील चांगले-वाईट ठरवण्याचा अधिकार दिला आणि ती खरोखरच उदार नसेल तर काय होऊ शकते यांचा अंदाज करता येईल. लोकशाहीमध्ये राजाला किंवा जहागीरदाराला पर्याय शोधणे निरुपयोगी असते. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, त्या मध्यमवर्गाने ती संस्कृती त्याच्या पदराला खार लावून घेऊन टिकवण्याची असते. तो काही स्वार्थत्याग नसतो; ती असते सुसंस्कृत होण्यासाठी त्या मध्यमवर्गानेच केलेली गुंतवणूक!

नरेंद्र चपळगावकर nanajudgenpc@gmail.com

(महा अनुभव, जानेवारी 2021 वरून)

——————————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here