सुशांत करंदीकर- डोंगर माथ्यावर सायकलने!

3
59
_SushantKarandikar_DongarMathyavrCyclene_1.jpg

सुशांत करंदीकर हे कल्याणमधील रहिवासी. ते माउंटन बायकिंग (सायकलिंग) आणि ट्रेकिंग यांद्वारे सह्याद्रीत भ्रमंती सत्तावीस वर्षें करत आहेत. त्यांना लहानपणापासून ट्रेकिंग व सायकलिंग यांची आवड. त्यांनी पहिला ट्रेक 1989 साली दहावीच्या परीक्षेनंतर त्यांच्या मित्रांसमवेत भिमाशंकर अभयारण्यात केला. तेव्हापासून ते माउंटन ट्रेकिंग आणि बायकिंग यांमध्ये जे रमले ते रमलेच. त्यांनी सुरुवातीला माहुली गड सर केला. मग त्यांनी माहुली किल्ला कल्याणपासून जवळ असल्याकारणाने ठरावीक दिवसांत येऊन-जाऊन असा शंभर वेळा पायाखाली घातला! डोक्यात खूळ, गडसफाईचे. ते त्याला म्हणतात, गडसेवा!

गिर्यारोहकांचे पंढरपूर म्हणजे हरिश्चंद्रगड. तो गड चढण्यास अतिशय अवघड. त्या कोकणकड्यावर सायकल चालवणे म्हणजे तर अधिकच जोखमीचे काम! सुशांत हरिश्चंद्रगड चाळीसएक वेळा सहज चढून गेले असतील, पण त्यांनी एका मित्रासह सायकलिंगद्वारे गड सर 2001 मध्ये केला आणि तेथून सुशांत करंदीकर यांची ट्रेकिंगच्या जोडीला माउंट बायकिंगची सुरुवात झाली. त्यांनी कल्याण ते कन्याकुमारीपर्यंत चार हजार चारशे किलोमीटर सायकलिंग 1997 साली केले. त्यांनी अद्वितीय असा पराक्रम 1998 साली केला, तो म्हणजे सायकलवर पूर्ण भारत भ्रमंती! त्यांनी एकशेअठरा दिवसांत तेरा हजार एकशेपासष्ट किलोमीटर भटकंती सव्वीस राज्यांत केली. त्या पराक्रमासाठी पंच्याऐंशी हजार रुपये खर्च लागणार होता, परंतु त्यांनी हाताशी जमा झालेले पंचवीस हजार रुपये घेऊन राजेश खांडेकर या मित्रासह कल्याणहून भारत भ्रंमतीला सुरुवात केली.

_SushantKarandikar_DongarMathyavrCyclene_2.jpgभ्रमंतीचा उद्देश सायकलवरून एड्सविषयक जनजागृती करणे हा होता. त्यांनी स्वतः जेवण करणे, मंदिरात राहणे अशा प्रकारे दीड महिना ढकलला. कल्याण पोलिस स्टेशनहून घेतलेल्या पत्रानुसार सर्वत्र मदत मागून दिवस काढले. त्यांना वेगवेगळ्या राज्यांत भाषेचे अडथळे येत होते, परंतु ते ज्या ठिकाणी मुक्काम असायचा, त्या ठिकाणी त्या लोकांच्या जाहिरातीचे पोस्टर घेऊन फिरत, मात्र त्यांचा एड्सविषयक जनजागृतीचा उद्देश मागे ठेवत नसत. त्या दरम्यान, एक चित्तथरारक प्रसंग घडला. ते भ्रमंती करत आसामच्या प्रदेशात जाऊन पोचले. त्यावेळी तेथे अतिरेक्यांचे प्रमाण वाढले होते. सुशांत करंदीकर लघुशंकेला गेले असताना सैनिकांनी त्यांच्या मित्राला चार मशिनगन अंगावर चारही बाजूला लावून घेरले. परंतु सैनिकांनी सुशांत व त्याचा मित्र यांची कागदपत्रे पाहिल्यानंतर शुभेच्छा देऊन सुटका केली. परंतु तो अर्धा-पाऊण तास त्यांच्या अंगावर काटा उभा करून गेला!

_SushantKarandikar_DongarMathyavrCyclene_4.jpgडोंबिवलीमध्ये दहा गटांनी मिळून सायकलिंगद्वारे महाराष्ट्र भ्रमंतीची योजना 2003 साली आखली. एका गटाने सहा जिल्हे फिरायचे असे ठरवले होते. परंतु गोंदिया विभागात नक्षलवादी हल्ले वाढल्यामुळे पूर्व महाराष्ट्रात जाण्यास कोणी तयार होईना. सुशांत यांनी तेथील मित्रांसह एक हजार किलोमीटरचा पूर्व महाराष्ट्र सायकलदौरा पार केला.

त्यांनी 2001 साली हरिश्चंद्रगड सायकलद्वारे सर केला त्याचवेळी संकल्प केला, की 31 डिसेंबर-1 जानेवारी असे दोन वर्षाखेर व वर्षारंभ दिवस दरवर्षी गड फिरायचे! सुशांत करंदीकर यांनी त्या संकल्पानुसार 2001 ते 2016 पर्यंत त्र्याहत्तर गड सर केले आहेत. त्यांनी 2017 च्या वर्षाखेर कर्जत-पाली पट्ट्यातील आणखी चार किल्ले भटकंतीकरता निवडले होते. किल्ल्यांवर सायकलिंग करणे, गडसफाई करणे, बचाव कार्य करणे अशी त्यांची कामे त्या काळात चालतात. त्या उपक्रमाला ‘सह्याद्री सायकल एक्स्पेरिमेंट’ असे नाव देण्यात आले आहे. गिरिमित्र संमेलनाने सुशांत यांच्या ‘महाराष्ट्र ट्रेकिंगचा इतिहास’मध्ये या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची नोंद ‘माउंटन बायकिंग करणारा एकमेव ग्रूप’ अशी केली आहे.
सुशांत करंदीकर यांनी कल्याण ते अरुणाचल प्रदेश 2005 साली, तर कल्याण ते लेह-लडाखपर्यंत 2011 साली सात जणांसोबत सायकलिंग केले आहे. त्या गटात दोन महिलांचाही समावेश होता. त्यांनी मुंबई- पुणे अशी सायकलिंग रेसही केली आहे.

सुशांत करंदीकर यांनी 1997 ते 2010 पर्यंत कल्याणमध्ये सर्पमित्र म्हणून काम केले आहे. वनस्पतींची भारतीय, सांस्कृतिक नावे काय असावी? त्यांचा उपयोग काय? असा प्रश्न त्यांना पडे. म्हणून त्यांनी प्रसाद वेलणकर या मित्रासोबत दोनशे झाडांची चित्रे, फोटो जमा केले, त्यांची सांस्कृतिक- भारतीय नावे शोधली व त्यांचे प्रदर्शन भरवण्यास सुरुवात केली. प्रदर्शन गेली आठ वर्षें ठिकठिकाणी भरवले जाते.

_SushantKarandikar_DongarMathyavrCyclene_3.jpgसुशांत यांनी त्यांच्या ट्रेकिंगच्या वेडास वळण देण्यासाठी ‘वाईल्ड व्हिजन’ नावाची स्वतःची कंपनी 2011 साली सुरू केली. ते ‘निसर्ग गिरिभ्रमण’ ह्या संस्थेसोबत 1993 साली जोडले गेले. त्यांनी ‘निसर्ग गिर्यारोहण’ या संस्थेमध्ये कमिटीवर काम अठरा वर्षें केले. ‘वाईल्ड व्हिजन’ कंपनी ट्रेकिंग, सायकलिंग, कॅम्पिंग या उद्दिष्टांसाठी सुरू करण्यात आली. ‘वाईल्ड व्हिजन’मध्ये ट्रेकिंग प्लॅन केले जातात. त्यामध्ये वेगवेगळे साहसी खेळ व अन्य उपक्रम यांद्वारे संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास या गुणांची जोपासना केली जाते. कंपनीतर्फे लहान मुलांसाठी देखील वेगवेगळे कॅम्प योजले जातात. त्यामध्ये शाळेतील मुलांना विविध साहसी खेळांची ओळख करून देणे अभिप्रेत असते. त्यात एकेका शाळेतील पाचशे-सहाशे मुले सामील होतात. त्याखेरीज लेह-लडाखची बाइक-सायकल-जीपने सहल, वॉटरफॉल रॅपलिंग असे साहसी उपक्रम प्रौढांसाठी योजले जातात. कॉर्पोरेट सेक्टरसाठी आउटबाउंड प्रोग्राम हीदेखील ‘वाईल्ड व्हिजन’ची खासीयत आहे.

ट्रेकिंग करताना गडकिल्ल्यांवर सामानासकट सायकलही खांद्यावर घेऊन जावी लागते. त्यामुळे अनेक लोकांनी त्यांना वेडे ठरवले, परंतु त्यांनी तो वेडेपणा स्वीकारला. सुशांत करंदीकर यांनी दोन सीट सायकल व तीन सीट सायकल यांवरूनही मोठमोठ्या सफरी केल्या  आहेत. सुशांत यांची पत्नी सुवर्णा याही सुशांत यांच्या साहसी उपक्रमांत सहभागी असतात. त्या मूळ कमर्शियल आर्टिस्ट. सुशांत ट्रेकिंग हौसेने जवळजवळ दहा वर्षें करत होते. त्यांनी कंपनी निर्माण केल्यावर सुवर्णा त्यांना सामील झाल्या. मुलांचे कँप वगैरे कामात त्यांचा विशेष सहभाग असतो. सुशांत यांचे कल्याणात एकत्र कुटुंब आहे. ते आईवडील, भाऊ-बहीण असे एकत्र राहतात.

सुशांत करंदीकर यांना ‘सर्पमित्र’, ‘कामशेत प्राईम’ यांसारखे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या पराक्रमांच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये वेळोवेळी येत असतात.

सुशांत करंदीकर 7738010990, 8451827990
sushant@wildvision.co

– नेहा जाधव

About Post Author

3 COMMENTS

 1. संजय उर्फ सुशांत करंदीकर हा…
  संजय उर्फ सुशांत करंदीकर हा शहरात राहणारा पण कायम निसर्गाच्या सानिध्यात राहणारा आमचा आवडता मित्र. 1990 ते 2000 च्या दशकात अनेक गडकिल्ले आम्ही बरोबर सर केले. हौशी ट्रेकर च्या भूमिकेतून
  संजयने पुर्ण वेळ निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचे
  ठरवून कंपनी काढली व अबाल वृद्धांना सोबत घेऊन सतत गडफेरी, मुलांचे कॅम्प, साहस शिबीर ई. आगळे कार्यक्रम केले. त्याच्या कार्यात पत्नी चीही सक्षम साथ मिळते हे विशेष. दोघांनाही
  भरपुर शुभेच्छा अनिल भोंगळे

 2. कित्येक जणांना ट्रेकिंग ,…
  कित्येक जणांना ट्रेकिंग , सायकलिंग ची आवड लावणारा दिलखुलास सुशांत

 3. नमस्कार. सुशांत व माझी ओळख…
  नमस्कार. सुशांत व माझी ओळख गेल्या दोन वर्षांतील. गाढ मैत्रीत रुपांतर झाले. त्यांनी संस्थेसाठी आयोजित करण्यात आलेल्या सहलीमध्ये जे काही इव्हेंट सादर केले किंवा आमच्याकडून करुन घेतले‌. रविवार कसा गेला हे कळलेच नाही. त्याच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. अजून 100 वर्षांपर्यंत त्याच्यासह अशा आयोजित सहली/कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी मी उत्सुक आहे.

Comments are closed.