सुभाष चुत्तर – आभाळाचं हृदय असलेला उद्योजक (Subhash Chuttar)

_Subhash_Chuttar_1.jpg

“कुलकर्णी, तुम्ही आमचा चाकणचा कारखाना बघायला या, तिथे आपण बोलू.” मी गेलो. सुभाष चुत्तर यांच्या कारखान्यात मुख्यत: Automobile Pressed Components बनवले जातात. धाड-धाड आवाज करणाऱ्या जवळ जवळ तीस-पस्तीस मोठ्या प्रेस ओळीने मांडलेल्या होत्या. मिनिटाला शेकडो components बनवणारी ती मशीन्स आज्ञाधारकपणे कामे करत होती. सगळीकडे आखीव रेखीव मांडणी. हॉस्पिटलसदृश पराकोटीची स्वच्छता. यांत्रिकी कारखान्यात अपवादाने दिसणारा नीटनेटकेपणा तेथे दिसत होता. जागोजागी गुणवत्ता, सुरक्षा आणि उत्पादकता यांचे महत्त्व सांगणारे फलक लावलेले होते. व्यवस्थापक मोठ्या उत्साहाने सर्व दाखवत होते. प्रत्येक मशीनजवळ एक कामगार होता. जाता जाता, एका कामगाराकडे लक्ष गेले. जरा वेगळा दिसणारा तो कामगार मतिमंद आहे हे लगेच जाणवले. आम्ही त्याच्या जवळ गेलो तरी त्याला आमच्या येण्याचे काही अप्रूप नव्हते. तो त्याच्या कामात मश्गुल होता. आम्ही जसजसे पुढे जाऊ लागलो तसे अनेक कामगार दिसू लागले.

आम्ही म्हणजे ‘तळवलकर ट्र्स्ट’ची विश्वस्त मंडळी. आम्ही कारखाना पाहण्यास वेळ ठरवून आलो होतो. व्यवस्थापक आम्हाला कारखाना दाखवत होते. व्यवस्थापक एका कामगारापाशी थांबले. त्यांनी आम्हाला सांगितले, की तो त्यांच्या कारखान्यातील पहिला मतिमंद कामगार. तो गेली पंचवीस वर्षें त्यांच्याकडे नोकरी करतो. त्याने त्याच्या हिंमतीवर वन बीएचके फ्लॅट घेतला आहे. आई-वडील आणि तो एकत्र राहतात. आई-वडील म्हातारे झाले आहेत. तो त्यांची म्हातारपणाची काठी बनून राहिला आहे. आता तोच रिटायर व्हायला आलाय! पण रिटायर होणार नाही म्हणतोय.

आम्ही सर्व उद्योजक आहोत. आम्ही अशी अनेक मशीन्स बघितली आहेत. तेथे गेलो होतो ,त्याला कारण म्हणजे त्या कारखान्याचे वेगळेपण पाहायचे होते. कारण तेथे एकंदर सव्वादोनशे कामगारांपैकी जवळजवळ पासष्ट कामगार गतिमंद होते. त्यांतील काही तर मतिमंद म्हणता येतील असे होते आणि तेच सुभाष चुत्तर यांच्या कारखान्याचे वैशिष्ट्य होते. व्यवस्थापकांनी आम्हाला असेम्ब्ली सेक्शन दाखवला. तेथे ‘फोर्ब्ज’ मोटरच्या गाड्यांच्या दरवाज्यांसाठी हिंजेस (बिजागरी) असेम्बल केली जात होती. तेथे तर सर्वच कामगार मतिमंद होते, इतके की काही त्यांचे नावदेखील नीट सांगू शकत नाहीत. एक-दोन नॉर्मल माणसाप्रमाणे दिसत होते, पण मतिमंद होते. जुळणी करणाऱ्यांत काही मुलीही होत्या.

व्यवस्थापक सांगत होते, “या विभागाचे रिजेक्शनचे प्रमाण ‘Zero PPM’ म्हणजे दहा लाखांत शून्य एवढे आहे. याची उत्पादकता एकशेदहा टक्के आहे. ह्या मंडळींना एकदा काम कसे करावे आणि चांगले काम म्हणजे काय हे शिकवले, की ते काम बिनचूक झालेच म्हणून समजा. तडजोड त्यांना मान्य नाही. काम करणे त्यांच्या इतके सवयीचे होते, की त्यांना दर आठवड्याला साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी घरी राहायचे असते हे पटवणे त्यांच्या आई-वडिलांना अवघड जाते. त्यांना कामावर असताना कोणतीही गोष्ट विचलित करू शकत नाही. मुख्य म्हणजे त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागत नाही. त्यामुळे त्या विभागात सुपरवायझरची गरज लागत नाही. अपघाताचे प्रमाणदेखील शून्य आहे.” आम्ही आश्चर्य पाहत होतो!

“ह्यांना पगार किती आणि कसा देता?” मी शंका विचारून घेतली.

“आम्ही ह्यांना नॉर्मल कामगारांसारखा सरकारी नियमाप्रमाणे पगार देतो. ESI आणि PF देखील देतो. शिवाय, कंपनीतर्फे त्यांना नेण्या-आणण्यासाठी बस आहे. बसचा खर्च कंपनी करते. पालक बसस्टॉपपर्यंत सोडतात. त्यांना पैसे कळत नाहीत. पगार बँकेत जमा करतो. आम्ही पूर्वी पगार रोख द्यायचो, तेव्हाची गंमत सांगतो. पूर्वी शंभरच्या नोटा द्यायचो. त्यांना नोटांची किंमत कळत नसली तरी किती नोटा ते कळायचे. एकदा पगारात पाचशेच्या नोटा द्याव्या लागल्या. नोटा कमी भरल्या म्हणून कोणी घेईनात. त्यांची अस्वस्थता ध्यानी आली. त्यावेळी चूक सुधारली. पण मग पगार बँकेत जमा करू लागलो.”

व्यवस्थापकांनी पंचविशीच्या एका मुलाची ओळख करून दिली. थोडासा बुटका, गोरा रंग, व्यवस्थित, रुबाबदार पोशाख केलेला अजय. तो सुभाषसरांचा मुलगा. तो क्वालिटी कंट्रोल मॅनेजर आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे देखील वेगळेपण नजरेस भरले. होय, चुत्तर यांच्या अजयची अभ्यासातील गती कमीच होती. तो जेमतेम आठवीपर्यंत शिक्षण घेऊ शकला. तो वडिलांच्याच कंपनीत काम करू लागला. त्याच्या जबाबदारीची चमक त्याच्या चेहऱ्यावर आलेली दिसत होती. त्याच्याशी बोलताना क्वालिटी विभागात मुरलेल्या अधिकाऱ्याशी बोलतोय असेच जाणवत होते. अजय आमच्याशी पाच मिनिटे बोलून कंपनीची ‘गुणवत्ता मीटिंग कंडक्ट’ करण्यासाठी निघून गेला.

जे बघत होतो ते अनाकलनीय होते. गुणवत्ता असलेले उत्पादन मतिमंद करू शकतात हेच आश्चर्य होते. चेहऱ्यावर कोणतेही भाव नसलेले ते दुर्दैवी चेहरे. त्यांच्या जाणिवा उत्कट होत्या आणि कहाण्या खूपच प्रेरक होत्या. प्रश्न होता तो त्या जाणिवांचा, प्रज्ञेचा शोध घेण्याचा आणि तो घेतला होता सुभाष चुत्तर यांनी. मी फार पूर्वी, कदाचित वीस वर्षांपूर्वी पुण्यातील एका entrepreneur clubच्या मीटिंगला माझ्या मित्राबरोबर गेलो होतो. तेथे मित्राने एका गृहस्थांकडे बोट दाखवून सांगितले, की ते समोर बसले आहेत ते सुभाष चुत्तर. त्यांच्या वर्कशॉपमध्ये ते मतिमंद मुले नोकरीस ठेवतात. ती गोष्ट मनात खोलवर लक्षात राहिली. आम्ही २००७ पासून ‘तळवलकर ट्रस्ट’तर्फे ‘अनुकरणीय उद्योजक’ हा पुरस्कार देऊ लागलो, तेव्हा त्या गृहस्थांची परत आठवण आली. त्यांच्या भेटीचा योग शेवटी २०१५ मध्ये आला.

संपूर्ण कारखाना बघून झाला. सुभाषसरांची भेटण्याची वेळ घेतली. आम्ही ‘मतिमंदांसाठीच काम निर्माण करावेसे का वाटले?’ हा स्वाभाविक प्रश्न विचारला.

सरांनी सुरवात केली :

“मी मुळचा नगर जिल्ह्यातील नेवाशाचा. मारवाडी कुटुंबातील. लहानपणी खोडकर, अभ्यासात लक्ष नसलेला उनाड मुलगा होतो. परीक्षेत कॉपी करून जेमतेम पास होत असे. दहावी नापास ही पायरी कशीबशी गाठली आणि एका गुरूने तारले. कॉपी करताना नवाथे सरांनी पकडले आणि ते एवढेच म्हणाले, की “तुला काय वाटते, तू आम्हाला फसवतोस? नाही. बाळ, तू तुला स्वत:लाच फसवत आहेस, हे लक्षात ठेव.” हे वाक्य मनात आत लागले आणि अंतर्मनात स्पार्क पडला. मी प्रतिज्ञा घेतली आयुष्यात खोटेपणा करायचा नाही. शाळा अर्धवट सोडली, तसे घरही सोडले. तडक पुण्याला येऊन राहिलो. पुण्यात बी. यु. भंडारी यांच्या गॅरेजमध्ये पडेल ते काम करू लागलो. तेथे असताना विसाव्या वर्षी एका गुजराथी मित्राच्या बहिणीच्या प्रेमात पडलो. तिचे लग्नाचे वय सरले होते. तिच्या आईने सांगितले, की ‘तिला हृदयविकार आहे व ती थोड्याच दिवसांची सोबतीण आहे, तरी लग्न करशील?’ मी ‘होय’ म्हणालो आणि लग्न केले. नंतर मी बजाज टेम्पोत नोकरीस लागलो. तेथे अजून दोन मित्र मिळाले. आम्ही काही वर्षे नोकरी केली. मग व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. अभय फिरोदियासरांनी चाळीस हजार रुपयांची मदत केली. एक लेथ मशीन घेऊन उद्योग सुरू केला. सचोटी हेच ब्रीद ठेवले. व्यवसाय वाढू लागला. पत्नीचे लग्नानंतर नऊ वर्षांनी निधन झाले. मी तिच्या विरहाने उद्विग्न झालो. विष घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पण मृत्यू आला नाही. मग ओशो भेटले. ओशोंना गुरू मानले. मी त्यांच्यासमोर बसून त्यांचे प्रवचन रेकॉर्ड करत असे. त्यांच्या अगदी जवळचा एक झालो.

“दुसरे लग्न ज्योत्स्नाशी केले. एक मुलगा झाला, पण तो मतिमंद निघाला. त्याची जाणीव तो तीन वर्षांचा असताना झाली. ओशोंना मनाची व्यथा सांगितली. ते म्हणाले, ‘तू कर्तबगार आहेस. उत्तम कारखाना चालव आणि परोपकार करत राहा. त्यातच तुला समाधान मिळेल.’ समोर अजय दिसत होता. त्याचे शिक्षण ज्योत्स्नाच्या अथक प्रयत्नांनी जेमतेम आठवीपर्यंत होऊ शकले. ज्योत्स्नाने मुलासाठी खूप खस्ता काढल्या. माझा कारखाना उत्तम चालला होता. दिवसेंदिवस भरभराट होत होती. पण मी कायम अजयचा विचार करत होतो. त्याचे आमच्या पश्चात कसे होणार? हा विचार मनात सलत असायचा. मी त्याला कारखान्यात नेऊ लागलो. तो एकेक गोष्ट शिकू लागला. मनात आले, पैसा असताना माझी ही अवस्था तर अशा इतरांचे काय होत असेल? अशा मुलांना रोजगार देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करता येईल का? हा विचार मनात आला आणि पहिल्या मतिमंद मुलाला पंचवीस वर्षांपूर्वी नोकरीवर घेतला. त्याच्यावर सहा महिने मेहनत घेतली. होता होता, तो तयार झाला. मग एकाचे दोन झाले. असे वाढत वाढत संख्या साठ-पासष्ट झाली. प्रत्येक मुलावर अपार मेहनत घेतली. माझा स्टाफदेखील बदलला. त्यांनी मला साथ देण्यास सुरुवात केली. एक मुलगा तर आई-वडिलांनी येथे सोडला. मी त्याच्यावर दोन वर्षें मेहनत घेतली. तो माझ्या केबिनमध्ये येई. मी खुर्चीवर बसलेले त्याला आवडत नसे. तो मला खुर्चीवरून उठवे आणि फिरत्या खुर्चीवर बसून फिरत बसे. मला म्हणे, ‘मी तुझा बॉस आहे.’ मी त्याच्यासमोर बसून काम करत असे. असे दोन वर्षें चालले. एके दिवशी मी त्याला रागावलो आणि खाली काम करण्यास नेले, तर त्याने उत्तम drilling करून दाखवले. मी खुर्चीवर नसताना तो drilling बघत बसे. त्याने ते पाहून पाहून drilling आत्मसात केले होते. तो पंधरा वर्षें येथे काम करत आहे. येथील प्रत्येक मुलगा व मुलगी यांची एकेक कहाणी आहे. रानडे आडनावाची मुलगी. तिला नाव सांगता यायचे नाही, पण ती शास्त्रीय गाणे उत्तम गाते. तर दुसऱ्या एका मुलीचा अपघात झाला. वाहनाने धडक दिली. पाय फ्रॅक्चर झाला. तिला दवाखान्यात नेली तर ती डॉक्टरला हात लावू देईना. सरांना भेटायचे म्हणू लागली. मला बोलावले. मी गेलो. तिने मला विचारले, की ‘सर मला नोकरीवरून काढणार नाही ना?’ मी तिला जवळ घेतले. समजावले. तेव्हा तिने डॉक्टरांना माझ्या समोर प्लास्टर घालू दिले.”

चुत्तर यांचे डोळे पाणावले होते आणि आम्ही सुन्न होत होतो.

ज्योत्स्ना तेथेच आमच्यासाठी चहा-फराळाचे घेऊन उभ्या होत्या. चुत्तर म्हणाले, ‘माझी पत्नी ही माझी प्रेरणा आहे.’ ज्योत्स्ना यांच्याकडे बघून जाणवले, की त्या मूर्तिमंत करुणामूर्ती आहेत. “मी नवाथे गुरुजी, भगवान ओशो आणि माझी पत्नी यांच्यामुळे येथे पोचलो. नाहीतर दहावी नापास मुलाला काय भविष्य असणार? आमचे दोन कारखाने आहेत. पुण्यात अडीचशे आणि पिथमपुरला तीनशे कामगार आहेत. तेथे अडुसष्ट मतिमंद काम करतात. एकदा जर्मन बॉश कंपनीचे लोक कारखाना बघण्यास आले. अशा मुलांना काम देता येणार नाही असे त्यांचे म्हणणे. त्यांना सुरक्षितता आणि गुणवत्ता मिळणार नाही अशी त्यांना भीती वाटली. मी आमचे track रेकॉर्ड दाखवले. त्यांना पटवले, की ही मुले ‘ZERO PPM’ काम करतात. त्यांनाही ते पटले. काम मिळाले. ते असा प्रयोग बॉश कंपनीत करणार आहेत.”

चुत्तर यांनी त्यांचा दहा हजार स्क्वेअर फुटांचा बंगला रसिकतेने सजवला आहे. ‘ह्या माझ्या बंगल्याचा मीच आर्किटेक्ट आणि मीच इंटिरियर डेकोरेटर.’ देखणे उंची फर्निचर, किचनमध्ये गृहिणीला लागणाऱ्या स्वयंपाकातील प्रत्येक गोष्टीचा बारकाईने केलेला विचार, हॉलमधील सोफे, शोकेस आणि बेडरूम्स – सगळेच प्रेक्षणीय होते. जोत्स्ना यांची आवड आणि सुभाष यांची सौंदर्यदृष्टी यांचा उत्तम मिलाप झालेले त्यांचे घर हे एक कलेचे लेणे आहे.

“मी जवळ जवळ निवृत्त झालोय. उरलो उपकारापुरता अशी मनाची भावना झाली आहे. अभय फिरोदिया चारशे खाटांचे एक हॉस्पिटल बांधतायत. मी त्याचा आराखडा आणि बांधकाम बघणार आहे. मंगेशकर हॉस्पिटलचे धनंजय केळकर यांनी सातव्या मजल्यावरच्या बांधकामाची आणि नव्या बिल्डिंगची जबाबदारी मला दिली आहे. मला एकच सुचवावेसे वाटते. पुण्यातील प्रत्येक मोठ्या कंपनीने दोन-तीन मतिमंद कामावर घेतले तरी पुण्यातील पंधरा-वीस हजार मतिमंद मुलांचे प्रश्न चुटकीसरशी सुटतील.”

सुभाष यांना कै. कृ. ब. तळवलकर यांच्या स्मरणार्थ ‘अनुकरणीय उद्योजक’ पुरस्कार देण्यात आला. पारितोषिक वितरण सोहळ्यात सरांच्या कारखान्याची व्हिडिओ आणि त्यांचे हृद्य मनोगत ऐकून प्रेक्षक हेलावले, प्रत्येकाचे डोळे पाणावले. त्यांनी मतिमंदांविषयी असलेल्या सामाजिक अनास्थेविषयी खंत व्यक्त केली. सुभाष यांनी पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराची रक्कम तेथेच त्यांच्या सह-पारितोषिक विजेत्या श्रीमती नीता देवळलकर (सेवाव्रती पुरस्कार) यांच्या ‘स्वयम्’ या संस्थेस दिली. ‘स्वयम्’ ही संस्था ठाण्यात स्पॅस्टिक मुलांसाठी काम करते. सुभाष यांनी, नीतातार्इंचे काम फार अवघड आहे आणि ते फक्त एक आई करू शकते असे नम्रपणे नमूद केले!

दहावी नापास असा शिक्का बसलेला हा उद्योजक माणुसकीचा चेहरा असलेला उद्योग उभारतो काय, हजारो कोटींचा व्यवहार करतो काय – सगळेच अनाकलनीय. अर्थात यामागे त्यांचे किती कष्ट आणि त्यांनी किती ज्ञान मिळवले असेल त्याचा उल्लेख या लेखात मला करताच आलेला नाही. सुभाष चुत्तर यांचा प्रवास केवळ मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निश्चित अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे.

श्रीकांत कुलकर्णी, whatsapp: ९८५००३५०३७

About Post Author

Previous articleशेपटावर निभावलं
Next articleशेतकऱ्यांच्‍या विकासासाठी झटणारे ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र
श्रीकांत नारायण कुलकर्णी गेली चाळीस वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. 'प्रजावाणी', 'तरुण भारत', 'लोकसत्ता' अशा विविध वृत्तपत्रांमध्ये संपादकीय विभागात काम करून ते निवृत्त झाले. ते सध्या मुक्त पत्रकार म्हणून पुण्यात काम करतात. त्यांनी आतापर्यंत विविध वृत्तपत्रे, दिवाळी अंक आणि इतर नियतकालिकांमधून विविध विषयांवर लेख लिहिले आहेत. त्‍यांना साहित्याची - विशेषता: बालसाहित्याची आवड असून कविता, कथा, विनोदी लेख, चित्रपट परिक्षण अशा विविध पद्धतीचे लेखन त्‍यांनी केले आहे. आजपर्यंत त्यांची बारा पुस्तके प्रसिद्ध झाली असून छांदिष्‍ट व्‍यक्‍तींवर लिहिलेल्या 'असे छन्द असे छांदिष्ट ' आणि 'जगावेगळे छांदिष्ट' या दोन पुस्तकांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. कुलकर्णी स्वत: 'छांदिष्ट' असून ते दगडांमधून पशुपक्ष्‍यांच्‍या आकारांचा शोध घेतात. ते 'निर्मळ रानवारा' या 'वंचित विकास' संचलित बालमासिकाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत. त्यांनी विविध दिवाळी अंक, विशेषांक, आणि निवडक पुस्तकांचे संपादन केले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9422319143

10 COMMENTS

 1. Mahan ani anukaran karnya…
  Mahan ani anukaran karnya yogya.. Subhash chuttar he aajchya pidhisathi ek role model aahet. Simply great.

 2. कदाचित साहेबांच्या कंपनीतील…
  कदाचित साहेबांच्या कंपनीतील कामगार स्टाफ हा जगातील एकमेव प्रयोग असावा.छोटी मोठी पेंटीगची कामे करत मि साहेबांच्या सानिध्यात असल्याचा आनंद होतो.

 3. या. सुभाष सर यांची महानता…
  या. सुभाष सर यांची महानता शब्दातीत आहे.आभाळासारखे विशाल हृदय आणि आभाळमाया प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची किमया त्यांना साधली आहे.दिव्यांगांना कृतीशील बनवून त्यांचे जीवन समृद्ध आणि अर्थपूर्ण करण्याचे महान कार्य करून समाजाला आदर्श घालून दिला आहे.त्यांना मन:पूर्वक प्रणाम व शुभेच्छा

 4. आभाळाचे हृदय आणि आभाळमाया…
  आभाळाचे हृदय आणि आभाळमाया प्रत्यक्षात उतरविणारे महान आदर्शवत् व्यक्तिमत्व. सुभाष जी..दिव्यांगांना कृतीशील बनवून त्यांचे जीवन अर्थपूर्ण बनवून समृद्ध करण्याचे महान कार्य करीत आहेत.त्यांना प्रणाम.शुभकामना

 5. Khup sunder kam kele aahe…
  Khup sunder kam kele aahe. sagalya udyogani subhash chuttar yancha aadarsha ghetla pahije. phar mahan karya aahe, Aamhala khup abhiman aahe ki ase karya maharashtat zale aahe.

 6. सर तुम्ही सुभाष चुत्तर…
  सर तुम्ही सुभाष चुत्तर यांच्या महान कार्याची आमच्यासारख्या सामान्य लोकांना ओळख करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. माझा भाचा असाच थोडा गतिमंद आहे तेव्हा या मुलांना वाढवणं आणि सतत कशात तरी गुंतवून ठेवणं हे एक जिकिरीचं काम आहे हे मी त्याच्या लहानपणापासून पहाते आहे. म्हणून च मला सुभाष सरांचं कौतुक वाटतं. त्यांच्या कार्याला शुभेच्छा …!!

 7. सर.खूप ग्रेट आहात…कोटी…
  सर.खूप ग्रेट आहात…कोटी कोटी प्रणाम तुम्हाला आणि तुमच्या कार्याला. यासारखी सेवा दुसरी कोणती नाही.अध्यात्मात असणारा व्यक्ती हे नक्की करू शकतो.

 8. अतिशय अशक्य अशी गोष्ट सुभाष…
  अतिशय अशक्य अशी गोष्ट सुभाष साहेबानी करून दाखविली तीही फार माणुसकी जपून, आणि त्यामुळे इतरही उद्योजकांना यापासून प्रेरणा घेऊन जर कमीत कमी 1 ते 2 स्पेशल चाईल्ड ला काम देण्यास सुरुवात केल्यास , या मुलांच्या आई वडिलांना देखील भविष्यात त्यांच्या मुलांची चिंता राहणार नाही….खूपच प्रेरणादायी अस काम करून सुभाष सरानी माणुसकीचा एक उत्तम आदर्श जगासमोर ठेवला आहे, सुभाष सरांना माझा प्रणाम.

Comments are closed.