सुंदरतेचा अभाव

गुरूदेव रवींद्रनाथ टागोर
गुरूदेव रवींद्रनाथ टागोर

     महाराष्ट्राला पन्नास वर्षं पूर्ण होतायत. या सुवर्णमहोत्सवी वर्षात राज्यासमोरच्या अनेक प्रश्नांवर चर्चा होतायत. महत्त्वाच्या प्रश्नांचं विश्लेषण अगत्याचंच आहे.

गुरूदेव रवींद्रनाथ टागोर      मी एका दुर्लक्षित अभावाकडे लक्ष वेधू इच्छिते. आपल्या जगण्यातून क्रमश: नाहीशा होणार्‍या सुंदरतेचा अभाव मला अस्वस्थ करतो. माणसा-माणसातली, निसर्ग आणि माणसातली, शासन आणि नागरिकांमधली असुंदर नाती अंगावर काटा आणतात. वास्तवाच्या या कुरूप दर्शनानं अस्वस्थ होण्याचं एक महत्त्वाचं कारण किंवा या अभावाची प्रकर्षानं जाणीव होण्याचं कारण म्हणजे ७ मे रोजी येणारी रविंद्रनाथ टागोरांची जयंती. रविंद्रनाथांच्या जन्माला यावर्षी दीडशे वर्षं पूर्ण झाली. त्या सौंदर्यपूजकाची आठवण काढताना, जगण्यातल्या सौंदर्यांच्या अभावाची आठवण होणं अपरिहार्य! एकेकाळी अभिजात कलेच्या क्षेत्रात नावाजलेल्या महाराष्ट्रात सध्या ज्या प्रकारचं राजकारण, समाजकारण संस्कृतिकारण, भाषाकारण चालू आहे ते बघता सौंदर्यांची, सुंदरतेच्या मूल्याची साधी आठवणही कोणाला राहिली आहे असं वाटत नाही आणि हा सुमारपणा आमच्या धोरणांपासून ते संस्कृतीच्या नावावर चाललेल्या अत्यंत भंपक अस्मिताकारणातूनही दिसतोय.

     पण, रविंद्रनाथांना आठवताना, मूळ मुद्दा केवळ राजकीय नाही; तर तो त्या पलीकडचा आहे. एक कारण मला असं जाणवतंय, की सामाजिक नेतृत्व हे गांधीवादी, समाजवादी, डाव्या चळवळींशी निगडित असल्यानं अनेकांना 'सत्यासाठी लढा' हे मूल्य महत्त्वाचं वाटतं. ते लढाऊ मूल्य मराठी मातीत रुजलेलं आहे. नरेंद्र दाभोळकर, मेधा पाटकर, डॉ. अभय बंग… कित्येक जण लढयात दिसतात. मात्र कलात्मक विचार केंद्रस्थानी मानणार्‍यांचा ठार अभाव प्रत्ययाला येतो.

     कलेला केंद्रस्थानी मानणारा सौंदर्यविचार हा 'एलिटिस्ट' म्हणून जणू काही नाकारण्यायोग्य आहे अशी चुकीची समजूत सार्वत्रिक पसरलेली दिसतीय. यामागे अज्ञान आणि राजकारण, दोन्ही आहे. कलेचं क्षेत्र कार्यकर्त्यांनी एकीकडून नाकारायचं आणि दुसरीकडून ती फक्त एक अतिश्रीमंत वर्गाची मक्तेदारी बनायची, या दोन्ही प्रक्रिया महाराष्ट्रात घडताना दिसतायत.

     एकीकडे मराठी चित्रकारांना, आर्किटेक्टस्ना, डिजायनर्सना उत्तम दिवस आलेत, तर दुसरीकडे भंपक दिवाळी अंक, सुमार साहित्य आणि 'सारेगमप'प्रणित संगीत मराठी संस्कृतीच्या केंद्रस्थानी आलंय. आपल्या आयुष्यातल्या असमतोलाचा आणि निसर्गातून, कलेतून आपलं वजा होणं यांचा संबंध आहे का? ते आपण तपासायला हवे. मात्र अनेकांना प्रश्न असा पडतो, की जगणं एवढे बकाल आणि भकास बनत जाताना, जीवनमरणाचे प्रश्न समोर असताना सौंदर्याचा विचार कसा सुचणार? तो तर पोट भरल्यानंतरच सुचतो. परवा कनरिसा पिंकारेन इस्टेस या लेखिकेचं 'वूमन हू रन विथ वुल्वज्' नावाचं अतिशय प्रभावी पुस्तक वाचताना याच विचारांचा पुन्हा प्रत्यय आला  (बाय द वे अरुण कोलटकरांच्या 'भिजकी वही'तली 'हाडम्मा' याच पुस्तकातून आली) इस्टेस ही सायकोथेरपिस्ट आहे. आत्महत्येच्या टोकाला गेलेल्या रुग्णानं, तिला आपण आत्महत्या करायचं का नाकारलं? हे एकदा सांगितलं. ती म्हणाली, 'त्या उदास दिवशी मी एक कोळी अतिशय सुंदर जाळं विणताना बघितला, त्या सौंदर्यानं मी भारावले. जगण्याकडं पुन्हा वळले.'

महात्मा  गांधीं समवेत रवींद्रनाथ टागोर     इस्टेस म्हणते, मनातले अनंत कल्लोळ निवळवण्याचं सामर्थ्य निसर्गाच्या, सौंदर्याच्या क्षणकाळ दर्शनातही असतं. तरतरून बहरलेलं झाड, पावसानंतरचं इंद्रधनुष्य, सुंदरशी कविता, देखणं जगलेलं आयुष्य, एखादी कलाकृती, पहाटेच्या एकांतातला झाडांचा सहवास- निसर्गाच्या कलेच्या सौंदर्यकेंद्री जादूनं कित्येक मनं पुन्हा उभी राहताना तिनं बघितली. इस्टेस म्हणते, की अनंत न्युरॉसिस निवळवू शकेल असं मनाचं शांतवन करण्याचं सामर्थ्य सौंदर्यमूल्यात आहे.

     त्या मूल्याचा अभाव म्हणून तर आपण बकाल आणि भकास, तोल हरवलेलं जगणं पदरात बांधून घेत नाही आहोत ना? रविंद्रनाथांच्या शब्दांत सांगायचं तर खरा सौंदर्यपूजकच खरा अहिंसक होऊ शकतो. हिंसेतली अपुरी कुरूपता तो जाणू शकतो. स्वत: रविंद्रनाथांनी अशी जातिव्यवस्थेतली कुरूपता जाणून तिला विरोधही केला होता.

     सत्य आणि सौंदर्य ही म्युच्युअली एक्सक्लुझिव- म्हणजे एक असेल तर दुसरं नसेल अशा पर्यायी पठडीतली मूल्यं नाहीत. सत्यात साधेपणा, सरळपणा आहे. तो सुंदरच आहे आणि सौंदर्याचा आग्रहदेखील आपल्याला सत्यापर्यंत पोचवतो हे जाणणं, याचं भान पुन्हा एकदा येणं आवश्यक आहे.

     गौतम बुध्दाचं अंतिम प्रवचन फक्त मौनात आणि एक अकारण सुंदर कमळाच्या दर्शनानं साजरं झालं. त्या देखण्या क्षणाचा अन्वय फक्त महाकश्यपाला लागला होता. अशा क्षणामधलं इन्टेन्स सौंदर्य आपल्याला समजावून सांगावं लागत नाही. ते कळतं, ते जाणवतं, ते आपल्याला माणूस बनवतं. मात्र त्याच्या अभावानं आताशा आपला जीव खंतावत नाही, घशात आवंढा येत नाही. आपण 'वो सब नही परवडता' म्हणून निमूट निघण्याची तयारी करतो.

     रविंद्रनाथांच्या जयंतीच्या निमित्तानं, ज्यानं गांधींना 'महात्मा' म्हणून ओळखलं आणि ज्याला गांधींनी 'गुरुदेव' म्हणून जाणलं अशा कवीला पुन्हा आठवणं आणि त्याच्या 'सुंदरतेच्या साक्षात्कारा'चा परिचय तरी करून घेणं आवश्यक आहे. मराठी आणि माणूस दोन्ही बनवण्यासाठी!

ज्ञानदा देशपांडे

भ्रमणध्वनी : ९३२०२३३४६७
dnyanada_d@yahoo.com

About Post Author