साने गुरुजींच्या आईची स्मृतिदिन शताब्दी

1
64
carasole

साने गुरुजींच्या आई यशोदा सदाशिव साने यांचे स्मृतिदिन शताब्दी वर्ष २ नोव्हेंबर २०१६ या दिवशी सुरू झाले. साने गुरुजींनी त्यांच्या आईच्या स्मृती ‘श्यामची आई’मध्ये शब्दबद्ध केल्या आहेत. ‘श्यामची आई’मधील श्याम म्हणजे स्वत: सानेगुरुजी.

महाराष्ट्रातील विसाव्या शतकातील एका पिढीवर साने गुरुजींचा फार मोठा प्रभाव आहे. त्यांचे ‘श्यामची आई’, ‘सुंदर पत्रे’, ‘भारतीय संस्कृती’ यांसारखे ग्रंथ, ‘साधना’ मासिक आणि ‘राष्ट्रसेवा दल’ यांमधून महाराष्ट्रात एक पिढी घडवली गेली. स्वत: सानेगुरुजींना घडवण्याचे कार्य त्यांच्या आईने केले. त्याबद्दल ‘श्यामची आई’मध्ये सानेगुरुजी लिहितात :

‘आई देह देते व मनही देते, जन्मास घालणारी ती व ज्ञान देणारीही तीच. लहानपणी मुलावर जे परिणाम होतात, ते दृढतम असतात. लहानपणी मुलाचे मन रिकामे असते. भिकाऱ्याला, चार दिवसांच्या उपाश्याला, ज्याप्रमाणे मिळते तो बरावाईट घास घेण्याची धडपड करावीशी वाटते, त्याप्रमाणेच बालकाचे रिकामे मन जे जे आजुबाजूला असेल, त्याची निवडानिवड न करता अधाश्यासारखे भराभर त्याचा संग्रह करत असते…

‘माझ्यात जे काही चांगले आहे, ते माझ्या आईचे आहे. आई माझा गुरू, आई माझा कल्पतरू, तिने मला काय काय दिले! तिने मला काय दिले नाही? सारे काही दिले! प्रेमळपणे बघावयास, प्रेमळपणे बोलावयास तिनेच मला शिकवले. मनुष्यावरच नव्हे तर गाईगुरांवर, फुलपाखरांवर, झाडाझाडांवर प्रेम करण्यास शिकवले. अत्यंत कष्ट असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्य तो आपले काम उत्कृष्टपणे करत राहणे, हे मला तिनेच शिकवले. कोंड्याचा मांडा करून कसा खावा व दारिद्र्यातही स्वत्व न गमावता कसे राहवे, हे तिनेच मला शिकवले. आईने जे शिकवले, त्याचा पराधीशही माझ्या जीवनात मला प्रकट करता आला नाही. अजून माझ्या मनोभूमीत बीज फुगत आहे. त्यातून भरदार, जोमदार अंकुर केव्हा बाहेर येईल तो येवो. माझ्या आईनेच माझ्या जीवनात अत्तर ओतले.’

साने गुरुजींची आई कोकणातील दापोलीमधील एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात एका ब्राह्मण कुटुंबात जन्मास येऊन विसाव्या शतकाचा पूर्वार्ध पाहिलेली मध्यमवर्गीय गृहिणी.

साने गुरुजींच्या आईचे निधन त्यांचे शिक्षण चालू असताना झाले. सानेगुरुजी लेखन करू लागल्यानंतर त्यांनी त्यांच्या आईच्या आठवणी लिहून काढल्या. त्यांनी त्या ‘श्यामची आई’ या नावाने प्रथम १९३५ साली प्रकाशित केल्या. पुढे, आचार्य अत्रे यांनी त्यावर आधारित त्याच नावाने चित्रपट काढला.

महात्मा गांधी म्हणत, ‘आई हे मुलाचे पहिले विद्यापीठ आहे.’ सानेगुरुजींची आई ही एक शाळा आहे. मूल शाळेत असते सहा तास आणि ते घरातच उरलेले अठरा तास असते. त्याच्या आयुष्यात शाळा खूप उशिरा येते. सुरुवातीची महत्त्वाची वर्षे आईच्या विद्यापीठात तर जातात. तेव्हा शाळा जीवनात काय करते, याचे मूल्यमापन करताना ‘आई नावाच्या शाळेत’ मूल काय शिकते आणि त्यापेक्षा काय शिकायला पाहिजे, याचा या स्मृतिशताब्दीच्या प्रकाशात विचार करायला हवा.

‘श्यामच्या आई’ची वैशिष्ट्ये कोणती? ती महाराष्ट्राला एवढी का भावली? ‘श्यामची आई’ कोणतेच तत्त्वज्ञान सांगत नाही. ती एक सोशिक भारतीय महिला आहे. तिचे आयुष्य अविरत कष्टांत गेले. पुरुषप्रधान व्यवस्था ज्या प्रकारे कुटुंबात स्त्रीला दुय्यम स्थान देते, तेच तिचे स्थान आहे. त्यामुळे ती स्वातंत्र्यवादी म्हणून नव्या पिढीच्या महिलांना आदर्श वाटणार नाही. पण तिच्या त्या समर्पणाकडे केवळ गुलामी म्हणूनही पाहता येणार नाही! ती हलाखीच्या परिस्थितीत, अत्यंत दारिद्र्यात कमालीची स्वाभिमानी आहे. ती स्वत:च्या वडिलांनाही ‘दारिद्र्यात आम्ही आमचे बघून घेऊ’ असे सुनावते. सावकाराचा माणूस घरावर जप्ती आणू शकतो, हे माहीत असूनही त्याने स्त्री म्हणून तिच्यावर शेरेबाजी करताच, परिणामाची पर्वा न करता ती त्याच्या अंगावर नागिणीसारखी धावून जाते. तो तिचा दारिद्र्यातील स्वाभिमान कोणाला थक्क करणार नाही? श्याम कोठे तरी जेवण्यास गेलेला असताना तेथे त्याला दक्षिणा मिळते. त्याने ती दक्षिणा घरी आणलेली पाहताच ‘ते पैसे मंदिरात नेऊन दे’ असे ती त्याला त्या गरिबीतही सांगते. तिला गरिबीतही असलेले हे ‘मूल्यसंस्काराचे भान’ महत्त्वाचे आहे. ती स्वत: तिच्या समर्पणातून मुलांना आदर्श घालून देते. गुरुजींची आई ‘एक शिक्षिका’ म्हणून खूप भावते. ठरवलेच तर कुटुंबव्यवस्थेत किती प्रकारचे अनुभव दिले जाऊ शकतात? ती छोट्या छोट्या प्रसंगांमधून जाणिवा विकसित करते. त्यासाठी ती मला भावते. ती पर्यावरण, जातीयताविरोध, गरिबांविषयी कणव, समर्पण हे सगळे सगळे शिकवते. श्यामने मुक्या कळ्या खुडल्यावर किंवा झाडांची जास्त पाने तोडली तरी आई त्याला पर्यावरणाची, झाडाच्या भावनांची जाणीव करून देते. ती तिचा मुलगा भित्रा बनू नये म्हणून त्याला सक्तीने पोहण्यास पाठवते. ती श्यामला दलित वृद्धेला मोळी उचलता येऊ शकत नसल्याचे पाहून तिला मदत करण्याविषयी बजावते.

ती या सगळ्या गोष्टींमधून जे संस्कार श्यामवर करते, ते त्या काळाच्या कितीतरी पुढील आहेत. ती जे तत्त्वज्ञान सोप्या सोप्या प्रसंगांमधून सांगते ते खूप विलक्षण होय. श्याम डोक्यावरील केस वाढवतो, वडील रागावतात, तेव्हा श्याम वैतागून म्हणतो, ‘आई, केसात कसला गं आलाय धर्म?’ तेव्हा ती त्याला म्हणते, ‘तुला केस राखण्याचा मोह झाला ना? मग मोह टाळणे म्हणजे धर्म.’ धर्माची इतकी सोपी व्याख्या क्वचितच कधी सांगितली गेली असेल. ती लाडघरच्या समुद्रात समुद्राला पैसे वाहते, तेव्हा श्याम म्हणतो, “ज्याच्या पोटात रत्ने आहेत त्याला पैसे कशाला?” तेव्हा ती म्हणते, “सूर्यालाही लोक काडवातींनी ओवाळतातच ना? प्रश्न त्या कृतज्ञतेचा आहे!”

श्यामला केवळ उपदेश न करता तिचे हे संवादी राहणे फार मोलाचे आहे. जे विचारील, त्याला ती प्रतिसाद देते आणि तिच्या समजुतीनुसार समजून सांगत राहते. ‘श्यामची आई’ मला नव्या पिढीच्या मातांसाठी म्हणूनच महत्त्वाची वाटते. आज एकतर मुलांशी बोललेच जात नाही व जे बोलले जाते, ते मुलाच्या करिअरच्या भाषेत आणि मुलाला त्याचे दोष सतत सांगत! मात्र ‘श्यामच्या आई’ श्यामने इतक्या गंभीर चुका करूनही करूणेने ओथंबलेली राहते, अशा प्रकारचा संवाद आणि मुलांशी त्यांच्या पातळीवर जाऊन व्यक्त होणे कमी झाले आहे. असलाच तर ‘श्यामच्या आई’चा हा धागा महत्त्वाचा आहे. ती मुलांना अभावातील आनंद आणि समर्पणातील आनंद शिकवते. तिला स्वत:ला सणाच्या दिवशी नेसण्यासाठी नवी साडी नसते. पतीचे धोतरही फाटलेले असते. तेव्हा ती आलेल्या भाऊबीजेतून पतीसाठी नवे धोतर आणते. एकमेकांसाठी काय करायचे असते, याचे भान मुलांना अशा प्रसंगांमधून येते. ‘श्यामच्या आई’चे औचित्य आजच्या पिढीच्या मातांसाठी काय आहे? अनेक जण म्हणतील, ‘आज काळ बदलला आहे. आजचे प्रश्न वेगळे आहेत. मुले श्यामइतकी भाबडी राहिलेली नाहीत. ती पिढी मोबाईल आणि संगणक वापरत खूप पुढे गेली आहे.’ ते जरी खरे असले तरी मुलांमधील बालपण जागवण्यास, मुलांना संवेदनशील आणि सामाजिक बनवण्यास ‘श्यामच्या आई’चीच पद्धत वापरावी लागेल. मध्यमवर्ग/उच्च मध्यमवर्ग यांत, मुलांवर सुखांचा मारा होतो. त्यातून त्याच्या संवेदना तरल राहत नाहीत. त्यांना अभाव वाट्याला न आल्याने गरिबी, वंचितपणा यांची वेदना कळत नाही किंवा आजुबाजूचे जगही सुखवस्तू असल्याने गरिबांच्या जगण्याचा परिघच त्यांच्या परिचयाचा होत नाही. त्यातही पुन्हा वाचन-संगीत-निसर्ग आदींबाबतचे अनुभव अनेक घरांत न दिले गेल्याने मुले टीव्ही-मोबाईल-कार्टुन-दंगामस्ती असले ‘आनंदाचे स्वस्त मार्ग’ शोधत राहतात व त्यातून त्यांची विचारशक्ती व संवेदना विकसित होत नाही.

आजची मुले एकमेकांशी ज्या विषयांवर गप्पा मारत असतात ते पाहता आणि ज्या वेगाने ती आत्मकेंद्रिततेकडे चाललेली आहेत ते पाहता, त्यांना समाजातील वंचितांविषयीची वेदना हलवत नाही. ‘मुलांचं कोलमडणारं भावविश्व’ ही चिंतेची बाब सध्या बनू पाहत आहे. हीच मुले उद्या अधिकाराच्या वेगवेगळ्या पदांवर काम करणार… निर्णयप्रक्रियेत सहभागी होणार… पण मग त्यांना गरिबांचे, पर्यावरणाचे, भोवतालचे प्रश्न कळतील तरी का? त्यांचा अहंकारही चुकीच्या पद्धतीने विकसित होत आहे व ती सुद्धा काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. थोडे काही बोलले तरी मुलांनी आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत. पालकांची स्वयंव्यग्रता ही एक समस्या बनलेली आहे. पालक बाहेर दिवसभर कामात व्यग्र आणि घरी आल्यावर टीव्ही-मोबाईल-सोशल मीडिया यांत रमून गेलेले! ‘मुलांची आई’सुद्धा त्याला अपवाद नसते. त्यातून मुलांशी संवाद बंद झालेला आहे. घरात पाहिजे त्या वस्तू मिळत आहेत; पण प्रेम आणि संवाद मिळत नाही! त्यातून मुले प्रेम दुसरीकडून मिळवतात आणि संवादही चुकीचा करू लागतात. तेथेच नेमकी ‘श्यामची आई’ महत्त्वाची वाटते. ती मुलाशी सतत बोलत राहते. ती न चिडता त्याला समजून घेते. त्याला छोट्या छोट्या मूल्यांचा परिचय करून देते. ती केवळ शब्दांनी संस्कार करण्यापेक्षा  तिच्या अपरिमित कष्टांनी आणि मायेने संस्कार करते. मुलांशी बोलावे कसे एवढे शिकण्यासाठी या स्मृतिवर्षात ‘श्यामची आई’ प्रत्येक पालकाने वाचायला हवी. त्यांचे ‘पालक असणे’ हे त्यांना त्या आरशात तपासून बघता येईल!

आईविना भिकारी –
सानेगुरुजींच्या आईसारखी मुलांना घडवणारी, त्यांच्यावर चांगले मूल्य संस्कार करणारी आई नसेल तर तशा आईविना भिकारी, पोरक्या मुलांची काय अवस्था होते त्याचे विदारक चित्र वृत्तपत्रांमधून अधुनमधून पाहण्यास मिळते.

(जनपिरवार – नाताळ विशेषांकावरून पुन:प्रसिद्ध)

About Post Author

1 COMMENT

  1. Sane Guruji n chya Aaiche
    Sane Guruji n chya Aaiche mahatva lekha madhye parinamkarak ritine madale aahe. Aajachya kalat palakanhi tyacha avlamba kela pahije.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here