साडेसात लाख पाने तय्यार!

1
21
भास्कराचार्यांनी सातव्या शतकात लिहिलेला 'लीलावती' हा गणितावरील ग्रंथातील डिजिटाईझ केलेले पान.
भास्कराचार्यांनी सातव्या शतकात लिहिलेला 'लीलावती' हा गणितावरील ग्रंथातील डिजिटाईझ केलेले पान.

दिनेश वैद्य नाशिकमधील दिनेश वैद्य यांचे नाव सलग नवव्‍या वेळी ‘लिम्‍का बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्ड’मध्‍ये नोंदवले गेले आहे. जुन्‍या पोथ्‍यांच्‍या छायांकनासाठी त्यांनी हा विक्रम केला.

दिनेश वैद्य यांच्‍या नावाचा समावेश ‘लिम्‍का बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्ड’मध्‍ये एक लाख साठ हजार पानांचे डिजिटायजेशन केल्‍याबद्दल २०१० साली प्रथम करण्‍यात आला. त्यानंतरच्या वर्षी दिनेशच्‍या पानांचा आकडा दोन लाख एकोणीस हजारांवर पोहोचला आणि ‘लिम्‍का’ने त्‍याची नोंद घेतली. दिनेशचे नाव २०१२ साली दोन लाख नव्‍वद हजार पानांसह ‘लिम्‍का बुक’मध्‍ये पुन्‍हा झळकले आणि २०१३ साली दिनेशने तीन लाख साठ हजार पानांचे डिजिटायजेशन पूर्ण करून स्‍वतःच स्‍वतःचा विक्रम मोडीत काढला. गंमत म्‍हणजे, ती बातमी प्रसिद्ध होईपर्यंत दिनेश पोथ्‍यांच्‍या चार लाख पानांचे स्‍कॅनिंग करून मोकळाही झाला होता! आता दिनेशने सलग नवव्‍यांदा ‘लिम्‍का बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्डस्’मध्‍ये स्‍थान मिळवण्‍याचा विक्रम केला आहे.

भास्कराचार्यांनी सातव्या शतकात लिहिलेला 'लीलावती' हा गणितावरील ग्रंथातील डिजिटाईझ केलेले पान. दिनेश वैद्य यांना २०१३ साली 'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’कडून मिळालेले प्रमाणपत्र.दिनेश सांगतो, की पोथ्‍यांच्‍या चार लाख पानांचे स्‍कॅनिंग पूर्ण झाले असून ते वाचता येईल अशा अवस्‍थेला आणण्‍यासाठी त्‍यावर हळूहळू प्रक्रिया सुरू आहेत. तसेच स्‍कॅन केलेली पाने पीडीएफ स्‍वरूपात रूपांतरित केली जात आहे. दिनेशने १९९७ साली पोथ्‍यांच्‍या डिजिटायजेशनचे काम सुरू केले. त्‍याने त्‍यासाठी वेळोवेळी सुधारित तंत्रज्ञान वापरण्‍याचा प्रयत्‍न केला. या कामास विशेष वेग २००५ पासून प्राप्‍त झाला.

दिनेश हा उपक्रम स्‍वतःच्‍या पैशांनी चालवतो. काही व्‍यक्‍ती त्‍याला मदत करू इच्छितात. दिनेश त्‍यांना पैशांऐवजी वस्‍तूंची मदत करायला सुचवतो. त्‍याप्रमाणे काही व्‍यक्‍तींनी त्‍याला डाटा साठवून ठेवण्‍यासाठी हार्ड ड्राइव्‍ह दिल्‍या, तर ठाण्‍यातील एका व्‍यक्‍तीने त्‍याला कॅमेरा दिला. दिनेशने त्याचे काम अधिक प्रभावीपणे राबवण्‍यास सुरुवात केली आहे. दिनेश सांगतो, की निकॉन ११० या मॉडेलच्‍या कॅमे-यामुळे डिजिटायझेशनचे काम अधिक वेगाने होऊ लागले आहे. त्यापूर्वी एक पान स्‍कॅन करण्‍यासाठी चाळीस सेकंद लागत. तेच काम कॅमे-याच्‍या साह्याने तीन ते पाच सेकंदात पूर्ण होते. मात्र, एखाद्या कॅमे-याने वीस हजार फोटोंची संख्‍या ओलांडली, की तो आवश्‍यक त्या क्षमतेनुसार काम करण्‍यास असमर्थ ठरू लागतो. त्‍यानंतर कॅमेरा बदलावा लागतो. दिनेशने आतापर्यंत सत्तावीस कॅमेरे वापरले आहेत.

दिनेशला पोथ्‍या नाशिक परिसरातून मिळतात. तो म्‍हणतो, की नाशिकबाहेर मोठ्या संख्‍येने पोथ्‍या आहेत. मी त्‍यापैकी काही मालकांशी संपर्कही केलेला आहे. मात्र, कामाच्‍या व्‍यग्रतेमुळे तिकडे जाऊन पोथ्‍या आणणे शक्‍य होत नाही. अनेक पोथ्‍या फार जीर्णावस्थेत आहेत. त्या नष्‍ट होऊन जाण्‍याची चिंता त्‍याच्‍या बोलण्‍यातून जाणवते. दिनेश जमेल तसे त्‍या पोथ्‍यांचे ‘ज्ञान’, ‘काळ’ आणि ‘लेखक’ या तीन गटांत वर्गीकरण करत असतो. सध्‍या त्‍याने हाती आलेल्या पोथ्‍या लवकरात लवकर डिजिटलाइज करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. दिनेश गंमतीत म्‍हणतो, की ‘आज आहे तेवढे खाऊन घेऊ, उद्या रवंथ करता येईल!’

दिनेश पोथ्यांचा ठेवा हार्ड ड्राईव्‍ह आणि डिव्‍हीडींवर साठवून ठेवत आहे. त्‍यातच नव्‍याने आलेले ‘ब्‍ल्‍यू-रे’ हे तंत्रज्ञान त्‍याला खुणावत आहे. पोथ्‍यांमधील ज्ञान साठवण्याच्‍या दृष्‍टीने ते नवे तंत्र महत्‍त्वाचे असावे, असा त्‍याचा अंदाज आहे.

– किरण क्षीरसागर

About Post Author

1 COMMENT

  1. The most important work..
    The most important work…this how we can discover who we are and what we should be in future..Hats off Dinesh Vaidya

Comments are closed.