सांस्कृतिक जग कोठे हरवले?

1
135

महाराष्ट्राचे संस्थाजीवन औपचारिक झाले आहे काजुन्या संस्थांचे नित्याचे कार्यक्रम नियमित होत असतात. प्रकाशन समारंभांसारखे प्रासंगिक कार्यक्रम मोजक्याच श्रोत्यांच्या उपस्थितीत कौटुंबिक हौस-मौज वाटावी अशा तऱ्हेने घडून जातात. कौतुकाच्या समारंभांत उपचार अधिक असतो आणि वाद-टीकाउलटसुलट वार-प्रतिवार असे काहीच सार्वजनिक जीवनात घडताना दिसत नाही. माणसा माणसांतील स्नेहजिव्हाळा ओलाव्याने व्यक्त होतानाही जाणवत नाही. ज्या बातम्या समोर येतात त्या अत्याचारादी विकृतीच्या आणि राजकारणातील गुन्हेगारीच्या. त्यांतील कट-कारस्थाने पाहिली की दीपक करंजीकरांच्या कादंबऱ्यांची आठवण येते. समाजातील चैतन्य हरपले कोठे आहे?

सहजवर्तमान जाणावे म्हणून गेल्या 26/27 फेब्रुवारीच्या आसपास मुंबई परिसरात घडलेल्या कार्यक्रमांचा वेध घेतला, तर मला पुढील नोंदी करता आल्या  :

एक – पेरीप्लस ऑफ हिंदुस्थान या द्विखंडात्मक पुस्तकाचे एशियाटिक सोसायटीत प्रकाशन झाले. महत्त्वाचा रोचक असा ऐतिहासिक दस्तावेज आहे तो. दोनशे माणसे उपस्थित होती. ती सारी मनात खुशी घेऊन गेली. 

दोन – विद्याधर पुंडलिक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कथांचे वाचन व एकांकिकेचा प्रयोग असा चार तास कार्यक्रम दीनानाथमध्ये झाला. तेथेही दोनतीनशे प्रेक्षक भारावून बाहेर पडले. सेच कार्यक्रम त्या पाठोपाठच्या दोन दिवसांत जयवंत दळवी व गंगाधर गाडगीळ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त योजले गेले होते.

तीन – चित्रकार गायतोंडे यांच्यासंबंधीच्या मराठी पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर शांता गोखले यांनी केले आहे. तो समारंभ शिवाजी वस्तुसंग्रहालयात वेगवेगळ्या क्षेत्रांतील आठ-दहा नामवंतांच्या उपस्थितीत झाला. त्याला उत्म संख्येने जाणकार कलारसिक हजर होते.

चार – पद्मश्री वैज्ञानिक शरद काळे शाळाशाळांत वैज्ञानिक दृष्टिकोन फैलावण्यासाठी स्पर्धा व खेळ घेत असतात. त्यांची अंतिम स्पर्धा नव्या मुंबईत उत्साहात घडून आली.

पाच – सतीश आळेकर यांच्या ‘ठकीशी संवाद’ या नव्या नाटकाचा प्रयोग यशवंत नाट्य मंदिरात झाला. तेथे चार-पाचशे प्रेक्षक असतील. सतीश आळेकरचा जब्बार पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एकूण वातावरण थिएटर ॲकॅमीच्या जुन्या काळातल्या प्रयोगांसारखे वाटले.

सहा- मराठी भाषा दिनाचा सरकारी कार्यक्रम गेटवेवर दिमाखदार पद्धतीने झालामान्यवरांना मोठे पुरस्कार दिले गेले.

सात – मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यापासून सर्वत्र उत्सवाचे वातावरण आहे. त्यामुळे गल्लोगल्ली तशा प्रकारचे मराठीच्या उत्थापनाचे कार्यक्रम घडून आले व येत आहेत. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीलादेखील अभिजाततेबद्दलच्या औत्सुक्याची चुणूक जाणवून गेली आहे. त्यात देखावा असतो, पण मुळाशी आस्था असतेच !

मी त्यांतील चार कार्यक्रमांना उपस्थित होतो. बाकीच्या तीन कार्यक्रमांचा प्रथमदर्शी वृत्तांत मिळवू शकलो. माझ्या असे लक्षात आलेकी अशा कार्यक्रमांचा वृत्तांत माध्यमांतून प्रसृत झाला तर त्यामध्ये महाराष्ट्रभरातील दोनपाच लाख लोकांना तरी स्वारस्य वाटेल. ते त्या घटनांचा कदाचित पाठपुरावा करतील आणि तो भला भाव त्यांच्या स्नेही-नातलग मंडळींत पसरवतील. त्यामुळे विकृत बातम्यांनी येणाऱ्या खिन्नतेलाउदासीनतेला आळा बसेल. यालाच सोशल मीडिया म्हणतात नामला डिजिटल सोशल मीडिया गावगप्पांसारखा वाटतो. पूर्वी खेड्यात पारावर गावकरी जमत. मुख्यतः टवाळगप्पा चालत. त्यात गॉसिप असे. पण एखाददोन विधायक सूचनाही येत. त्याआधारे गाव पुढे जाई. गावातील वातावरण विधायक घटनांनी भरलेले सात्त्विक राही. सध्या बहुसंख्य समाजव्यवहार निकोप पद्धतीनेच होत आहेत, बीड, पुण्याचे स्वारगेट यांना जेवणातील चटणी-लोणच्यापुरतेच लोकांच्या अभिरूचीत स्थान आहे.

डिजिटल सोशल मीडियाला जोडून आणखी एक शब्द येतो. तो म्हणजे व्हायरल. त्या शब्दाची गंमत तो शब्द उच्चारणाऱ्या व्यक्तीपुरतीच असते. कारण बारा-तेरा वर्षांपूर्वीच्या कोलावरीसारखे गाणे अवघ्या जगाला दोन दिवस व्यापून टाकते आणि तिसऱ्या दिवशी नाहीसे होते ! डिजिटल सोशल मीडियावरील सर्व पोस्ट्सचे असेच होत असते. त्या लगेच विसरल्या जातात. मात्र विधायक घटनांचे वृत्तांत जनमानसात अधिक काळ रेंगाळण्याची शक्यता असते. जुन्या प्रिंट मीडियातील ‘माणूस’, सोबत’ या साप्ताहिकांनी व अन्य नियतकालिकांनी त्याच पद्धतीने तर महाराष्ट्रातील सांस्कृतिक व सामाजिक वातावरण जागते ठेवले होते. प्रिंट मीडिया कालबाह्य होत आहेहे खरे. परंतु त्यांच्या काळातील तो नियम डिजिटल माध्यमाला लागू पडणार नाही का? समाजातील विधायक व्यक्ती चोखंदळपणे सोशल मीडिया वापरत असता की ! मात्र त्यांचा प्रभाव एकूण जगावर उमटत नाही. कारण मीडियातील माणसे लोकरूची अशी धरून चालतातकी कुत्रा माणसाला चावला तर बातमी होत नाहीमाणूस कुत्र्याला चावला तर त्याची बातमी होते ! म्हणजे वेड विकृती. म्हणून पुण्याच्या आहुजाची लघुशंकादेखील दिवसरात्र चघळली जाते !

व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनमध्ये आम्ही महाराष्ट्राचा चांगुलपणा व विधायक वृत्ती नेटवर्क करू पाहत आहोत. फाउंडेशनची स्थापना ग्रंथालीचा पुढील टप्पा म्हणून पंधरा वर्षांपूर्वी झाली, तेव्हापासून हाच विचार आहे. ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनच्या ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेब पोर्टलवर त्याच बेताने महाराष्ट्रीय जीवनाचे माहिती संकलन केले जाते. तशा लेखांची संख्या आठ हजारांपर्यंत जाऊन पोचली आहे. माहितीचा एकूण साठा पाहता ती संख्या अल्प आहे. परंतु त्यातून महाराष्ट्राच्या तालुक्या तालुक्यात चालू असलेल्या नवजागरणाची झलक कळते. त्यामधून महाराष्ट्राचे संस्कृतिसंचितही दृगोचर होत असते. पोर्टल नियमितपणे एक लाख लोक पाहत असतात आणि पन्नास उत्सुक लोक तरी त्या संबंधातील वेगवेगळ्या विचारणा कळवत असतात.

असा प्रत्यय येत असल्यामुळे मनात प्रश्न निर्माण झालाकी या नव्या तंत्रज्ञानभारित जगतात हरवलेले सांस्कृतिक जग पुन्हा आणता येईल काते सत्तरऐंशीच्या दशकातील सांस्कृतिक जग होते नवचित्रपटांचेछबिलदास-थिएटर कॅडमी अशा संस्थांच्या प्रायोगिक नाटकांचेपुलं ते तेंडुलकर अशा वेगवेगळ्या प्रकृतीच्या लहानमोठ्या साहित्यिकांच्या विविधरंगी साहित्याचेसत्यकथेपासून ललिपर्यंतच्या तर्‍हतऱ्हेच्या मासिकांचे आणि अर्थातच ‘ग्रंथाली ‘स्त्रीमुक्तीविज्ञान परिषद’ अशा चळवळींचे. मला आठवते, सत्यकथेचे वर्गणीदार असतील अडीचतीन हजार. काही तालुक्यांत तर ते प्रत्येकी एकदोनच असतील. परंतु फिरतीवर असणारे नोकरदार साहित्यप्रेमी त्यांचा शोध घेत जात- त्यांना भेटत- मनसोक्त गप्पा मारत. त्यातील हार्दिक सद्भाव हळुहळू सर्वत्र पसरत असे. तो द्विगुणित-त्रिगुणित होत जाई. तेच सर्व साहित्यकलांबाबत घडत असे. त्यातून साऱ्या महाराष्ट्राला व्यापणारा सांस्कृतिक स्वरूपाचा सुहृदभाव तयार होई.

सतीश आळेकरच एकदा म्हणाला होताकी पूर्वी वृत्तपत्राची एक एडिशन असे. त्यामुळे आमचे प्रयोग बातम्यांतून व जाहिरातींतून साऱ्या महाराष्ट्रभर ठाऊक होत. आता वृत्तपत्रांच्या आवृत्ती शहरागणिक प्रसिद्ध होतात. त्यामुळे प्रत्येक गावचे प्रयोग त्या गावापुरतेच मर्यादित राहतात. हे दुष्टचक्र सोशल मीडियाच्या प्रभावी उपयोगाने सहज भेदता येईल आणि पुणे आवृत्तीत प्रसिद्ध झालेली बातमी अवघ्या महाराष्ट्रातील जागृत, संवेदनाशील कलारसिकांपर्यंत पोचलेली असेल. कणकवलीच्या ‘रंगवाचा’ नियतकालिकाचे संपादक वामन पंडित या प्रकारे सर्व नाट्यप्रेमींपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचे फलित त्यांना मिळत असते. ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने तोच चर्चाविषय ठेवून जुन्यानव्या मातब्बरांना बोलावले आहे. फाउंडेशनचा सद्भावना दिवस 22 मार्चला ठाण्याच्या ठाकरे संकुलात होणार आहे. त्यावेळी नाटककार सतीश आळेकरकवयत्री नीरजाअंतर्नादचे संपादक अनिल जोशीपत्रकार मिलिंद बल्लाळ हे नव्या सांस्कृतिक जगाच्या आशयाचा वेध घेणार आहेत. तर तरुण कवी/लेखक आदित्य दवणे आजचे सांस्कृतिक वास्तव मांडणार आहे. त्याचवेळी चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या नावाच्या गिरीश घाटे रचित संकेतस्थळाचे उद्घाटन नाट्य-चित्रपट अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते होणार आहे. किरण शांताराम उपस्थित राहणार आहेत. संस्कृतिकारण ही महाराष्ट्राची ताकद राहिली आहे. तोच उद्गार पुन्हा जागवायचा आहे !

– दिनकर गांगल 9867118517 
(‘महाराष्ट्र टाईम्स’वरून उद्धृत)

About Post Author

Previous article व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन चा सद्भावना दिवस
Next articleएकावन्नावे साहित्य संमेलन (Fifty First Literary Meet 1975)
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

1 COMMENT

  1. महाराष्ट्रात वाचन चळवळ आणि सांस्कृतिक विकास यावर सातत्याने भर देणारे लेखक, पत्रकार म्हणून दिनकर गांगल हे परिचित आहेत. त्यांचा हा लेख या सांस्कृतिक आस्था घेऊन वाचकांना सामोरा जात आहे.
    माणसाचा विकास हा एकात्मिक पध्दतीने झाला तर सामाजिक समतोल टिकतो. गेल्या तीस एक वर्षांत आर्थिक विकास म्हणजेच प्रगती हे समीकरण प्रस्थापित झाले आहे. यात सांस्कृतिक विकास हा नगण्य राहिला आहे. तो वाढवत नेणे, आपले सर्वांचे सांस्कृतिक कर्तव्य आहे. ऐंशीच्या दशकात ही जाण प्रगल्भ होती. म्हणून काही चांगले उपक्रम पाहता आले. पुन्हा एकदा याच वातावरणाकडे आग्रहपूर्वक जाण्याची तयारी ठेवू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here