सांगोल्‍यातील रूपनर बंधू – कर्तबगारीची रूपे

16
42
carasole

मेडशिंगी हे छोटेसे गाव सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यात अप्रुबा नदीच्या काठावर आहे. गाव सुसंस्कृत आहे. गावाला सांस्कृतिक आणि राजकीय वारसा लाभला आहे. कै. केशवराव राऊतमामा हे गावातील पहिले आमदार. त्यांच्या पश्चात कै. संभाजीराव शेंडे हे पंचायत समितीचे आदर्श सभापती ठरले. त्यांनी तालुक्याला आणि गावाला वैभव मिळवून दिले.

मेडशिंगी गावात वाढलेली रूपनर भावंडे – बिरा, राजू आणि थोरले बंधू भाऊसाहेब हे तिघे कर्तबगार निघाले. भाऊसाहेब हे पहिल्या पिढीतील अभियंता. त्यांनी पहिल्या पिढीतील उद्योजक म्हणूनही नाव कमावले. रूपनर बंधूंचा उत्कर्ष सुरू झाला, तो बिरा यांनी पुण्यात फॅबटेक नावाचा उद्योग सुरू केला तेव्हा. बिरा व त्यांचे धाकटे बंधू राजू यांनी पुण्याच्या उद्योगाचे काम नेटाने पाहिले – वाढवले, तेव्हा थोरले भानुदास मेडशिंगीची शेतीवाडी पाहत होते. दुसरे भाऊसाहेब यांचे दोन्हीकडे लक्ष होते. त्यांना शेतीइतकेच उद्योगाचे अवधान होते, पण त्याहून त्यांची नजर सांगोला परिसराच्या प्रगतीवर होती. प्रगतीची किल्ली शिक्षण व उद्योग हीच आहे याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे ते दोन्हीकडे सजग राहत. त्यांना गणपतराव देशमुख यांचे मार्गदर्शनही होते. रूपनर बंधूंपैकी पाचवे संजयनाना. त्यांनी मेडशिंगीचे संरपंचपद स्वीकारले व त्या माध्यमातून गावच्या प्रगतीमध्ये लक्ष घातले आहे. बिरा यांनी पुण्यात १९९१ मध्ये ‘फॅबटेक’ उद्योगसमुहाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी उद्योग भोसरीतील दहा बाय बाराच्या छोट्या शेडमध्ये सुरू केला. त्यांनी स्वप्ने मात्र आभाळाला गवसणी घालण्याची पाहिली. अल्पावधीतच, त्यांचे ‘फॅबटेक प्रोजेक्ट्स अँड इंजिनीयर्स’ नावारूपाला येऊ लागले. भाऊसाहेबांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाल्याचे बघण्याचे भाग्य आणि समाधान त्यांच्या वाट्याला आले.

पण त्यांना त्यांनी स्वत: शिक्षणासाठी उपसलेले कष्ट आठवत होते आणि त्यांना त्यांच्या मातृभूमीचे ऋण फेडण्याची ओढ होती, म्हणूनच त्यांनी भरभराटीला येत असलेल्या पुण्यातील उद्योगावर समाधान न मानता सांगोल्यासारख्या मागास आणि दुष्काळी भागात २००७ मध्ये रेडिमेड गारमेंट्सचा ‘स्पारकॉन’ कारखाना काढला. भाऊसाहेबांना ते प्रतिकूल परिस्थितीशी झगडून मोठे झाल्यामुळे सामाजिक भान होते. त्यामुळे कारखान्यात काम करणाऱ्या पाचशे स्त्रिया आणि पर्यायाने पाचशे कुटुंबे त्यांच्या स्वत:च्या पायावर उभी राहतील असे पाहिले. दुष्काळी भागातील शेतीवरील अवलंबिता थोडी कमी झाली. सोबतच, २०१० मध्ये ‘फॅबटेक जिनिंग आणि ऑइल मिल’, तसेच ‘स्पिनिंग मिल’ यांमुळे रोजगार निर्मितीचा नवीन उत्साह त्या परिसरात निर्माण झाला.

भाऊसाहेबांचे धाकटे बंधू पुण्यातील कारभार सांभाळू लागले, भाऊसाहेबांनी सांगोला व परिसर येथील उद्योगसमुहांची जबाबदारी घेतली. २००९ मध्ये ‘फॅबटेक’च्या ‘स्पिनिंग मिल’चा उद्योग आकाराला आला. अद्यावत यंत्रसामुग्रीने सुसज्ज असलेला तो कारखाना परिसरातील पहिल्या टप्प्यातच दोन हजारांपेक्षाही जास्त युवकांना रोजगार देऊ लागला. दुसऱ्या टप्प्यात (२०११ मध्ये) यंत्रसामुग्री विदेशातून आयात करून कारखान्याचे आधुनिकीकरण केले गेले. कारखान्यातील उत्पादनांना विदेशातूनही मागणी येऊ लागली. सांगोला परिसरातील निसर्गनिर्मित दुष्काळ जरी हटला नाही तरी तेथे समृद्धीची गंगा वाहू शकते हा विश्वास सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला.

भाऊसाहेबांची दृष्टी इतकी व्यापक व सखोल अशी, की ते पुढील पन्नास वर्षांत निर्माण होणाऱ्या संभाव्य स्पर्धेचा विचार करतात. त्यांची सामाजिक बांधिलकी अशी, की त्यांनी त्यांना पुण्यात जागा व इतर संसाधने उपलब्ध असताना सांगोला हे त्यांचे कार्यक्षेत्र बनवले. त्यांनी तेथील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची गरज लक्षात घेऊन २०११-१२ मध्ये तेथे अत्याधुनिक अभियांत्रिकी महाविद्यालय उभे केले आहे. त्यांनी हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे अभियांत्रिकी शिक्षणाच्या विकासगंगेपासून वंचित राहायला लागू नये या हेतूने गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना शासकीय सोयीसवलतींसोबत महाविद्यालयाच्या स्वत:च्या सवलती देऊ केल्या आहेत. त्यांची भूमिका महाविद्यालयातील गुणवत्तेशी तडजोड करण्याची नाही व अभियांत्रिकी महाविद्यालय पुण्यामुंबईच्या तोडीचे अद्यावत उभे करायचे ही आहे. अल्पावधीतच, त्यांच्या प्रयत्नांना यश लाभले. त्यांच्या महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठातील पाच अग्रगण्य अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये विराजमान होण्याचा बहुमान मिळाला आहे.

‘फॅबटेक शुगर्स’चा पाच हजार टन गाळपक्षमतेचा आणि साखरेबरोबर वीजनिर्मिती करणारा आधुनिक असा प्रकल्प २०१३ मध्ये मंगळवेढा तालुक्यातील महाराष्ट्र-कर्नाटक, सीमेवरील बालाजीनगर येथे उभा झाला आहे. तेथे पासष्ट हजार केपीडीएल क्षमतेची डिस्टिलरी पूर्ण शक्तीनिशी कार्यरत आहे. त्या प्रकल्पानेही मागास भागातील शेतकरी बंधूंना मदतीचा मोठा हात दिला आहे आणि हे सर्व प्रसिद्धीच्या झोताबाहेर राहून! भाऊसाहेबांच्याच प्रेरणेने लोकांना माफक दरात रोगनिदानाची उत्तम व्यवस्था मिळावी म्हणून ‘फॅबटेक डायग्नोस्टिक सेंटर’ची स्थापना पंढरपूरमध्ये झाली आहे. भाऊसाहेबांनी २०१४ मध्ये ‘फॅबटेक मल्टिस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी’देखील सुरू केली आहे.

सांगोल्यात गरीब जनतेसाठी भव्य हॉस्पिटल उभे करून तालुक्यातील जनतेला स्वस्त दरात महागडा उपचार मिळावा ही रूपनर बंधूंची मनीषा आहे.

– नितीन लोळे ८४०८८८८६२३
– अभय उत्पात ९४२१०२२९७२

About Post Author

16 COMMENTS

 1. Really, These people are
  Really, These people are dedicated for development of common people. I really very appreciated. These brothers are true inspiration to everyone. Salute to their work.
  Nagesh Kokare, Solapur
  9403876613
  nageshkokare@gmail.com

 2. जबरदस्त प्रगती

  जबरदस्त प्रगती. आपण समाजापुढे व्यावसाहिक आदर्श निर्माण केला. समाजाने इथून पुढे आपले अनुकरण करावे. – गोविंद देवकाते, अध्यक्ष – धनगर प्रबोधन संघ महाराष्ट्र

 3. आदरनिय रुपनर भावंडाचे कर्तत्व
  आदरणीय रुपनर भावंडाचे कर्तत्व ऐकून होतो आणि आज त्यांचा जीवनपट प्रत्यक्ष वाचला. खूप खूप आनंद झाला. त्‍यांच्‍यातार्फत सांगोला तालुक्याच्या सर्वांगिण विकासाठी नक्‍कीच बहुमोलाचे महान कार्य होईल. त्यांच्या महान कार्यास शुभेच्‍छा!

 4. मला आपल्या समजाचा अभिमान आहे.
  मला आपल्या समाजाचा अभिमान आहे आणि तुमच्यासारखे समाजसेवक, उद्योजक आपल्या समाजात आहेत हे तर आमच्यासारख्‍यांचे आणि समाजाचे भाग्य आहे याचा मला खुपच अभिमान आहे. तुम्‍ही यापेक्षाही जास्त प्रगती करावी अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. इतरांनी या गोष्टींचा आदर्श घ्यावा ही विनंती.

 5. मला मेडशिंगीकर असल्याचा
  मला मेडशिंगीकर असल्याचा अभिमान आहे.

 6. उपेक्षितांना अनपेक्षित संधी
  उपेक्षितांना अनपेक्षित संधी देऊन समाजाला सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न करत आहात. अभिनंदन.

 7. सोलापुर जिल्ह्यासाठी एक आदर्श
  सोलापुर जिल्ह्यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व. सलाम त्यांच्या कार्याला…

 8. ईश्वर चरणी प्रार्थना करतो
  ईश्वर चरणी प्रार्थना करतो इतरांनी या गोष्टीचां आदर्श घ्यावा आणि त्यांच्या महान कार्यास शुभेच्छा

Comments are closed.