समांतर संवेदना

0
90

गर्द गंभीर खर्ज किंवा पातळ गोलाईदार आवाज अशा पद्धतीच्या संगीत समीक्षेतील संज्ञा कधीकधी वाचनात येतात. आपण वर्णनं अशी, पारिभाषिक संज्ञा वापरून जरी केली नसली आणि त्यांचा नक्की अर्थ आणे-पैंच्या हिशेबात मांडता आला नाही, तरी आपल्याला साधारण काय म्हणायचं आहे, हे सर्वांना चटकन समजतं.

     ‘किणकिणतं आंबट ताक’ आणि जूनमधल्या पावसाला येणारा ‘कोर्‍या पुस्तकांचा वास’ आपण सर्वांनी अनुभवलेला आहे. त्यांत ते कधी – कुठे ऐकलं – वाचलं असण्याची दाट शक्यता असते. अशा स्वानुभवाशिवायच्या अनेक आठवणी अनुभवसिद्ध आठवणींच्या जोडीला आपल्या मेंदूत ठाण मांडून बसलेल्या असतात. काही माणसं अशी असतात, की ती निसर्गतःच लिखित किंवा उच्चारित ध्वनिचिन्हांची सांगड विशिष्ट रंगच्छटांशी घालतात. त्यांच्यासाठी शब्द, अर्थ आणि रंगजाणीव अशी त्रिदल प्रक्रिया अपरिहार्य असते.

     आदल्या शतकामध्ये युरोपात ह्या त्रिदल प्रक्रियेचा ऊहापोह तत्कालीन निकषांनुसार बराच झाला. त्या सर्व प्रकाराला Synaesthesia  असं ग्रीक आधाराचं नाव देऊन त्याला वैज्ञानिक पद्धतीनं तपासायची पात्रता बहाल केली गेली. आपण त्याला समांतर संवेदना म्हणुया. तेव्हाच्या युरोपीयन समजानुसार अशी समांतर संवेदना असणारी माणसं जास्त प्रतिभावान, निर्मितीक्षम, बुद्धिमान वगैरे असतात. अशा ह्या वलयामुळे लवकरच समांतर संवेदनांचा दावा हव्या त्या संदर्भात हव्या त्या लोकांकडून क्षुल्लक लाभासाठीसुद्धा व्हायला लागून तो सर्व प्रकार वैज्ञानिक विश्लेषणाच्या पटलावरून जो लुप्त झाला तो गेल्या काही वर्षांपर्यंत ! मेंदूची संरचना, आत्मभान, मनोव्यापारांचं मोजमाप करणा-या हल्लीच्या संशोधनात समांतर संवेदनांचा अभ्यास पुनरागमन करत आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या प्रायोगिक मानसशास्त्र विभागातल्या क्रिसिनेल आणि स्पेन्स ह्यांच्या संशोधन गटाने प्रकाशित केलेल्या शोधनिबंधाचा मुख्य विषय हाच आहे. त्यांनी ध्वनी, चव, आस्वाद अशा वेगवेगळ्या संवेदनांची सांगड सर्वसाधारण लोकांच्या मेंदूत कशी घातली जाते, ते उलगडण्याचा प्रयत्न वस्तुनिष्ठ पद्धतीनं केला आहे. संशोधकांनी प्रयोगात सहभागी होणा-या तीस उमेदवारांना बाटलीतून हुंगायला दिलेल्या गंधच्छटेनुसार कोणता नाद किंवा कोणतं वाद्य मनात येतं असा प्रश्न विचारला. त्याचप्रमाणे हुंगायला दिलेल्या वीस गंधच्छटांशी बावन्न निवडक स्वरांची सांगड घालायची असा त्यातील अजून एक भाग होता. त्यांनी त्यांची उत्तरे तपासून काही निष्कर्ष काढले.  ते Chemical senses ह्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. वर उल्लेखले ते बावन्न स्वर तार वाद्यांचे, बासरीसारख्या वाद्यांचे, वेगवेगळ्या पट्ट्यांतले आणि तीव्रतेचे होते, आणि उमेदवारांचा काही समांतर संवेदनांबद्दल खास असा दावाही नव्हता.

     आढळून आलेल्या गोष्टींतली सर्वांत महत्त्वाची बाब अशी की अशा त-हेची सांगड घालणं कोणालाही चमत्कारिक वाटलं नाही. आंबट आणि गोडसर वासांना लोक बव्हंशी उंच आणि आर्त स्वर लावतात तर धुरकट-कडसर वासांना खोल खर्जातले. ही एकवाक्यता नक्की कशामुळे होत असावी हे समजलेलं नाही. ब्लॅक बेरीज् आणि रास्पबेरीजना फक्त पियानोचे सूर चालतात, पण वनिलाशी पियानो आणि बासरीसदृश स्वर अगदी सर्वसाधारण जोडले जातात ते कशामुळे ?  एक मतप्रवाह असा, की आपण जगतो ते सतत सर्व ज्ञानेंद्रियांवर होणा-या वास्तवाच्या भडिमारामधे. मेंदू मग अथकपणे सर्व बाजूंनी आलेली अशी माहिती एकत्रितपणे स्विकारून बाहेरच्या संयुक्त वास्तवाचा थांग लावायचा प्रयत्न करतो. दोन किंवा अधिक ज्ञानसंवेदना एकाच संदर्भबिंदूशी जोडल्या जाणं अशाचमुळे शक्य होत असेल.

     जिभेच्या चवीशीही असाच स्वरसंप्रदाय जोडता येतो, नव्हे जोडला जातो. ह्याच संशोधकांच्या प्राथमिक पाहणीनुसार त्याच त्या उमेदवारांना वेगवेगळ्या स्वरांच्या पार्श्वभूमीवर त्याच त्या पदार्थांची चव वेगवेगळी लागते. पाठी आमिरखांचा खर्ज असताना फेसलेल्या मोहोरीचं आवळ्याचं लोणचं परवीन सुलताना ऐकताना वेगळं लागतं का ते आपणही बघायला हरकत नाही !

–    ऋचा गोडबोले

{jcomments on}

About Post Author