सतीश भावसार यांचा सेप्टिक टँक

_Satish_Bhawsar_1.jpg

सतीश भावसार यांनी शौचालयांच्या संदर्भातील भारतीय मानसिकता आणि भारतीयांची गरज ओळखून विशिष्ट प्रकारचा ‘सेप्टिक टँक’ विकसित केला आहे. तो अडचणीच्या अपु-या जागेतही बसवता येतो. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, भारतात अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भीक्ष्य आहे. भावसार यांच्या सेप्टिक टँकची रचना अशी आहे, की त्याला पाणी कमी लागते. पाण्याशिवाय त्यात मलविघटनाची उत्तम सोय आहे. त्याची किंमत सर्वसामान्यांना परवडेल अशी आहे. भावसार यांनी विकसित केलेले सेप्टिक टँक शंभराहून अधिक ठिकाणी उभे राहिले आहेत आणि ते वापरणा-यांना अडचण जाणवलेली नाही. 

भावसार हे मूळ जळगावचे. ते पंप ऑपरेटर म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून निवृत्त झाले आहेत. त्यांनी त्यांच्यासमोर उभ्या राहिलेल्या अडचणीस उत्तर म्हणून ‘सेप्टिक टँक’चा विचार 1994 मध्ये प्रथम केला. ते त्यानंतर आजतागायत सेप्टिक टँकच्या प्रचार-प्रसारासाठी प्रयत्न करत आहेत. जळगावच्या नगरपालिकेने घराबाहेरचे सार्वजनिक टोपली संडास पाडण्याचा अध्यादेश 1994 मध्ये जारी केला. भावसार यांच्या घरातील जागा अपुरी होती. त्यामुळे शौचालय बांधायचे कसे ही त्यांच्यापुढे समस्या उभी राहिली. त्यातून त्यांच्या सेप्टिक टँक मॉडेलचा जन्म झाला. भावसार सांगतात, “मला सिव्हील इंजिनीयरिंग विषयात आवड होती. त्यामुळे थोडाफार अभ्यास, थोडंफार ज्ञान होतं. मी अनेक पुस्तकं चाळली, विचारमंथन केलं. त्यातून मग दोनशे लिटरची सिमेंटची टाकी तयार केली. त्याला आउटलेट दिलं. टाकी कमी जागेत खड्डा करून त्यात सोडणं शक्य होतं. मी त्यावर गरजेनुसार कमी खर्चातील बांधकाम करून शौचालय बांधलं. मी स्वत:च्या घरचा प्रश्न सोडवला होता. माझा तो किफायतशीर उपाय पाहून काही परिचितांनी तशा स्वरूपाच्या टाकी बनवून मागितल्या. त्या मी तशा बनवून दिल्या, पण सिमेंटच्या टाक्या खड्ड्यात सोडण्यास अवघड जायच्या. त्यासाठी मनुष्यबळ अधिक लागायचे. खर्च वाढायचा. मी त्यावर उपाय म्हणून फायबरमध्ये टाक्या बनवण्यास सुरुवात केली. सिंटेक्सच्या पाण्याच्या टाक्या वापरल्याने खर्च अजून कमी करता आला.”

_Satish_Bhawsar_2.jpgसेप्टिक टँकसाठी कमी जागा आणि कमी पाणी लागण्यामागचे नेमके सूत्र काय असेल? भावसार सांगतात, सेप्टिक टँक उभट आकाराचा (सिलेंड्रिकल) बनवला आहे. त्यामुळे शौचालयातून येणारी विष्टा टाकीत येते आणि मधल्या उभ्या पाईपमधून केवळ पाणी बाहेर पडते. टाक्या खड्ड्यात पुरल्या जातात. त्यांना ऊन-वारा लागत नाही. त्यात हवाबंद असे वातावरण तयार होते. मलविघटनासाठी जंतूंना हवेतून ऑक्सिजन आवश्यक असतो. मात्र हवा बंद असल्याने जंतू पाण्यातील ऑक्सिजन वापरून विघटनाची प्रक्रिया सुरू करतात. जंतूंची पैदासही मोठ्या प्रमाणात होत असल्याने विघटनाच्या प्रक्रियेला वेग असतो. म्हणूनच बहुतांश मलविघटन होते. मुळात टँकची रचना अशी केलेली आहे, की विष्टा बाहेर पडूच नये. विघटनासाठी पाण्याचा वापर कमी होत असल्याने सांडपाण्याचा प्रश्न कमीत कमी निर्माण होतो. टाक्यांना बाहेरून आऊटलेट काढून वाहत्या गटारांमध्ये पाणी सोडता येते. घर, कारखाना यांभोवती जागा मोकळी असल्यास ते सांडपाणी जमिनीत मुरवता येते. टाक्या जमिनीखाली असल्याने वरची मोकळी जागाही वापरता येते. 

विशेष म्हणजे सेप्टिक टँक उभट असल्याने ते ब्लॉक होत नाहीत. सेप्टिक टँक पसरट असल्यास पाणी वाहून जाते आणि विष्ठा पाईपला चिकटून राहू शकते. पाणी वाहून गेल्यानंतर गाळ आहे त्या जागी सुकून जातो. त्यावर पुन्हा थर जमा होतो आणि टँक ब्लॉक होतात. मात्र उभट आणि मध्यवर्ती पाईपमध्ये विष्ठा विघटनशील अवस्थेत ठेवली जाते. त्यामुळे टँक ब्लॉक होण्याची शक्यता कमी असते.

साधारण आठ-दहा माणसांच्या कुटुंबासाठी दोनशे लिटरची टाकी पुरेशी ठरते. एका टाकीचा खर्च दहा हजार रुपयांपर्यंत येतो. ती किंमत बाजारात मिळणा-या टँकपेक्षा दहा पटींनी कमी आहे.

भावसार सांगतात, “खेड्यात शौचालये बांधण्यातील अडचण सांडपाणी निच-याची सोय नाही ही असते. ते वाहत्या गटारांत सोडता येत नाही. परंतु जर त्यांना सोक पिट बसवून दिले तर पाणी जागच्या जागी मुरवता येऊ शकते. ती सोय या सेप्टिक टँकसाठी योग्य आहे. ग्रामीण-शहरी भागात बहुतांश वर्ग भाड्याच्या घरात राहतात. मालक शौचालय बांधण्यास उत्सुक नसतो, पण भाडेकरू स्वत:ही हा टँक घराची रचना न बदला बसवू शकतो.”

भावसार यांच्या सेप्टिक टँकचा अहमदाबाद येथील ‘नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन’शी संलग्न असलेल्या ‘सृष्टी’ या संस्थेने पुरस्कार देऊन गौरव केला आहे. त्यांनी पेटंटसाठी केलेल्या अर्जावर अद्याप विचार झालेला नाही. लोकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद हाच भावसार यांना पुरस्कार वाटतो.
सतीश भावसार – 9822911846
– हिनाकौसर खान-पिंजार

About Post Author

Previous articleनाशिकरोडची लोकनाट्य-मेळा संस्कृती
Next articleसमाजमाध्यमे आणि मी
हिनाकौसर खान-पिंजार या पुण्‍याच्‍या पत्रकार. त्‍यांनी दैनिक 'लोकमत'मध्‍ये अाठ वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी 'युनिक फिचर्स'च्‍या 'अनुभव' मासिकासाठी उपसंपादक पदावर काम केले. त्या सध्या 'डायमंड प्रकाशना'मध्ये कार्यरत अाहेत. हिना वार्तांकन करताना रिपोर्ताज शैलीचा चांगला वापर करतात. कथालेखन हा हिना यांच्‍या व्‍यक्‍तीमत्त्वाचा महत्‍त्‍वाचा घटक आहे. त्‍या प्रामुख्‍याने स्‍त्रीकेंद्री कथांचे लेखन करतात. हिना 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'च्‍या 'नाशिक जिल्‍हा संस्‍कृतिवेध' 2016 मध्‍ये सहभागी होत्या. हिना यांनी तीन तलाक प्रथेविरोधात याचिका दाखल करणाऱ्या पाच महिलांना भेटून लेखन केले. त्यावर अाधारीत 'तीन तलाक विरूद्ध पाच महिला' हे पुस्तक 'साधना'कडून प्रकाशित करण्यात अाले अाहे. हिना 'बुकशेल्फ' नावाच्या अॉनलाईन उपक्रमाच्या संस्थापक सदस्य अाहेत. लेखकाचा दूरध्वनी 98503 08200