संगमनेरची सार्वजनिक दिवाबत्ती व्यवस्था (आठ कंदील ते एलइडी लाईट)

0
217

संगमनेरच्या नगरपालिकेने कामकाज 1860 मध्ये सुरू केले आणि सार्वजनिक सोयीसुविधांच्या बाबतीत एकेक प्रगती सुरू झाली. गाव अगदी छोटे असल्याने गावात आठ महत्त्वाच्या सार्वजनिक जागा निश्चित करून, तेथे लाकडी खांब 1860 साली रोवले गेले. त्या खांबांवर आठ कंदील लावण्यात आले. रोज संध्याकाळी अंधार पडण्याच्या वेळी नगरपालिकेचा एक कर्मचारी येऊन, त्या कंदिलाची काच पुसून तेलपाणी करी आणि कंदील पेटवून जात असे. लोकांना त्या गोष्टीचे मोठे अप्रूप वाटे. यापूर्वी केवळ श्रीमंत मंडळी त्यांच्या वाड्याबाहेर कंदील लावत असत.

नगरपालिकेची स्थापना होऊन दहा वर्षे झाली आणि गावात दोन सार्वजनिक कंदील वाढले. 1890 मध्ये चाळीस, 1900 मध्ये बहात्तर, 1910 मध्ये एकशेपंच्याऐंशी, 1920 मध्ये दोनशे तर 1930 मध्ये दोनशेदहा सार्वजनिक ठिकाणी कंदील होते.

गंमत म्हणजे ते कंदील रोज रात्री न लावता पालिकेचा खर्च वाचावा म्हणून जास्त अंधाऱ्या रात्रीच लावले जात. पौर्णिमेच्या अलिकडे-पलीकडे चंद्राचा उजेड असतो म्हणून कंदील बंद ठेवले जाई.

ते काम काँट्रॅक्ट पद्धतीने 1905- 06 पर्यंत दिले जात होते. त्यावेळी एका कंदिलाचा वार्षिक खर्च आठ ते दहा रुपये येई. 1906 पासून ते काम पालिकेचे कर्मचारी बघू लागले. त्याच वर्षांपासून बर्नरचे दिवे लावले जाऊ लागले.

सगळीकडे प्रगतीचे वारे वाहत होते. मोठ्या शहरांत वीज आली होती. संगमनेरलाही वीज आणावी असा प्रयत्न सुरू झाला. त्यावेळी राज्याचे विद्युत मंडळ वगैरे कल्पनाही अस्तित्वात नव्हती. कोयनेची किंवा कोळशापासून तयार होणारी वीज असा काही प्रकार नव्हता. खासगी उद्योजक त्या त्या गावापुरता छोटासा विद्युतनिर्मिती प्रकल्प टाकत आणि गावाची वीजेची गरज भागवली जाई. आज जनरेटरद्वारे वीज तयार केली जाते त्याप्रमाणे त्यावेळी क्रूड तेलाचा वापर करून वीज तयार केली जाई. क्रूड तेलाचे दर जसे बदलत, तसे विजेचे दर बदलत असत. असा संगमनेर पालिकेने 1930 -31 साली करार केला की त्यानंतर गावात महत्त्वाच्या ठिकाणी विजेचे दिवे लावण्यासाठी नव्याने तयारी सुरू झाली. ज्यांना घरी अशी वीज परवडणार होती अशा लोकांनी घरीही इलेक्ट्रिक कंपनीची वीज घ्यायची तयारी सुरू केली.  ते काम 1935 साली पूर्ण झाले. सध्याच्या वीज मंडळाच्या कार्यालयातच त्यावेळी पेंटा कंपनीने वीज निर्मितीचा प्रकल्प टाकला होता. त्यासाठी भलीमोठी शेड उभारण्यात आली. गावातील रस्त्यांवर एकशेदोन विजेचे दिवे 1935 साली लावण्यात आले. ज्या दिवशी हे दिवे लागले त्या रात्री ती रोषणाई अनेक लोक वेगवेगळ्या चौकात जाऊन मोठ्या कौतुकाने बघत होते.

पालिकेने काही महत्त्वाच्या ठिकाणी मर्क्युरी व्हेपरचे दिवे लावण्याचे 1956 साली ठरवले, त्यानुसार गावातील चोवीस प्रमुख ठिकाणी ते दिवे लावले गेले. वीज पुरवठा डी. सी. करंटचा 1960 पर्यंत होई, पण त्याचा उपयोग केवळ दिव्यासाठी असे. त्याचा उपयोग मशिनरीसाठी नव्हता. म्हणून ए. सी. करंटची वीज 28 जुलै 1960 पासून पुरवली जाऊ लागली. त्यावर्षी गावातील विजेची पालिका एकोणीस हजार रुपयांचा वार्षिक खर्च करत होती.

पुढे, काळाच्या ओघात यांत्रिकीकरण वाढले. महाराष्ट्रात कोयनेची वीज आली, चंद्रपूर औष्णिक प्रकल्पासारख्या इतर काही प्रकल्पांची वीज आली आणि मग गावातच वीज तयार होणारी पेंटा कंपनी मागे पडत गेली. वीज हा विषय राज्य शासनाच्या अखत्यारीत आला. आणि पेंटा कंपनी बंद झाली.

शहरातील रस्त्यांवर ट्यूब लाईट, मर्क्युरी, सोडियम व्हेपर, एल इ डी आदी प्रकारचे लाईट्स लागत गेले. आठ कंदिलांपासून सुरू झालेला सार्वजनिक दिवाबत्तीचा प्रवास  2024 मध्ये, एकोणनव्वद वर्षांनी एका दिमाखदार टप्प्यावर पोचला आहे.

– संतोष खेडलेकर 9822097809 skhedlekar15@yahoo.co.in

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here