श्रीधर लेले – शास्त्रीय काचमालाच्या संशोधनाची कास !

0
473

श्रीधर रघुनाथ लेले यांनी महाविद्यालयीन जीवनात प्रयोगशाळेत काम करत असताना, काचेच्या उपकरणांवर परदेशी बनावटीचा शिक्का पाहिला आणि ‘अशा प्रकारची काच व उपकरणे माझ्या देशात का बनू शकत नाहीत’ ही बोच त्यांच्या मनात निर्माण झाली. त्या अस्वस्थ उर्मीतून त्यांनी, स्वातंत्र्यपूर्व काळातच (1940 च्या दशकाच्या सुरूवातीला) योग्य शिक्षणाद्वारे, ‘बोरोसिलिकेट ग्लास’ निर्माण केली. प्रखर उष्णतेला टिकणारी आणि कोणत्याही रसायनांचा परिणाम न होणारी ती काच विज्ञानक्षेत्राला वरदान ठरली ! आठ दशके झाली, तीच बोरोसिलिकेट काच वैज्ञानिक प्रयोगशाळा व हॉस्पिटल्स यांमधील उपकरणांसाठी वापरली जाते. असे ‘बोरोसिलिकेट ग्लास’चे ते निर्माणकर्ते म्हणजे माझे बाबा.

बाबांचा जन्म 1 मार्च 1909 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याच्या मुटाट या गावी झाला. त्यांचे वडील, म्हणजेच माझे आजोबा मॅट्रिक होते,पण ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे घरीच असत, तरी बसल्या बसल्या ते आजूबाजूच्या मुलांना इंग्रजी शिकवत. बाबांचे प्राथमिक शिक्षण गावी झाले. ते राजापूर हायस्कूलमधून मॅट्रिक झाले. शिकता शिकताच, बाबांनी भिक्षुकीचा व्यवसायदेखील करावा असे त्यांच्या घरच्या वडिलधाऱ्यांचे मत होते. बाबांनी तो तसा काही काळ केलादेखील. त्यावरून नातेवाईकांपैकी कोणीतरी त्यांची टरदेखील उडवली. तेव्हा ते शांत राहिले, पण त्या अपमानाला त्यांनी स्वकष्ट, जिद्द आणि तल्लख बुद्धिसामर्थ्य ह्या बळावर, कृतीतून चोख उत्तर दिले !

बाबांचे काका बडोदा संस्थानचे दिवाण होते. त्यामुळे त्यांनी, बडोदा कॉलेजला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. तेथे ते बी एससी उत्तीर्ण झाले. बाबा विद्यार्थिदशेत मित्रांच्या साथीने मौजमजा, चेष्टा-मस्करी, धमाल करणे, हॉस्टेलवर राहत असताना एखाद्याच्या अपरोक्ष त्याच्या घरून आलेला फराळ फस्त करणे ह्या बाबतींतही अग्रेसर होते, पण तशी मजा करत असतानाही, त्यांनी अभ्यासावरील लक्ष विचलित होऊ दिले नाही. पुढे, ते मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून एम एससी झाले, तेव्हा मुंबई विद्यापीठात पहिले आले ! त्यांनी अध्यापनाचे काम 1934 ते 1936 या दरम्यान केले. त्या काळी, सगळ्यांचीच परिस्थिती बेताची असे, त्यामुळे चांगल्या कपड्यांच्या एकदोन सामायिक जोड्या बाजूला ठेवल्या जात आणि ज्याला लेक्चरला जायचे असेल, त्याला ते खास कपडे वापरण्यास दिले जात. बाबांनी जीवनशैलीतील तो साधेपणा आर्थिक सुबत्ता आल्यानंतरही, जपला.

त्याच सुमारास, 1936 मध्ये त्यांना लिमये टेक्निकल स्कॉलरशिप मिळाली आणि त्यांनी पीएच डीसाठी लंडनला जाण्याचे ठरवले. त्यांनी परदेशातील अभ्यास चालू असतानाच, तेथील निरनिराळी वर्कशॉप्स पाहिली. काही काच कारखान्यांत प्रत्यक्ष काम करून अनुभवही मिळवला. त्याचबरोबर, नवीन कारखाना काढण्यासाठी काय पूर्वतयारी आवश्यक आहे ते समजावे म्हणून अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार करून सर्व औपचारिक बाबींची माहिती मिळवली. बाबांनी प्रबंधलेखनादरम्यान, दुपारी 12 ते 4  या वेळात कॉलेजला जाऊन, बीई (टेक्निकल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल) ही पदवी सुवर्ण पदकासह मिळवली ! त्यांनी सिटी ऑफ गिल्ड इन्स्टिट्यूटची रेडिओ कम्युनिकेशनची परीक्षासुद्धा त्याच वास्तव्यात दिली. त्यांनी लंडनला डॉक्टरेट तर मिळवलीच; शिवाय, त्यांना इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटिश इंजिनीयर्स आणि इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (लंडन) ह्या संस्थांनी सन्मान्य सभासदत्व देऊन गौरवले.

ते 1939 साली लंडनहून परत आले. त्यांनी स्वत:च्या देशात शास्त्रीय काचमालाची निर्मिती करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली. ती जुळवाजुळव होत असताना, साहित्यसम्राट न.चिं. केळकर ह्यांच्या मध्यस्थीने त्यांचे लग्न झाले. खरे तर, आई व बाबा या दोघांचे बालपण अगदी विभिन्न वातावरणात गेले होते. आई पुण्याच्या सुविद्य आणि सुखवस्तू कुटुंबातील होती. ती पूर्वाश्रमीची गीता द्याहाडी. तिला अनेक धनवान स्थळे सांगून आली होती, तरीही तिच्या घरी बाबांचे शिक्षणाचे पारडे जड ठरले आणि दोघांनी रजिस्टर्ड लग्न केले.

बाबांकडे स्वतंत्र व्यवसाय करण्याची मनीषा आणि साथीला शिक्षण व अंगभूत धमक असली, तरी त्यांच्या जवळ धंद्यासाठी लागणारे भांडवल नव्हते. कर्ज मिळवणेही सोपे नव्हते, पण आईला बाबांची क्षमता आणि पात्रता माहीत होती. आईने तिचे स्त्रीधन त्यांच्या स्वाधीन केले. त्या आधारावर, बाबांनी 1942 मध्ये मुंबईतील अंधेरी येथे कंपनीसाठी जागा घेतली आणि त्यांचा काच व्यवसाय सुरू झाला. कंपनीचे नाव होते ‘इंडस्ट्रियल अँड इंजिनीयरिंग ॲपॅरॅटस्‌ कंपनी प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘प्रॉडक्ट’ होते बोरोसिल – अत्यंत प्रखर उष्णतेला टिकणारी आणि कोणत्याही रसायनांचा परिणाम न होणारी आगळीवेगळी बोरोसिलिकेट ग्लास !

आई संस्कृतमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेली होती. ती लग्नानंतर सुरूवातीला बाबांना त्यांच्या कामात मदत करत असे. पण माझ्या लहान भावाच्या जन्मानंतर लगेच तिला तब्येतीची काही गुंतागुंत होऊन वयाच्या तिशीतच हार्ट ॲटॅक आला. तेव्हापासून ती घरी असायची; तरीही आम्हाला घडवत असताना, तिने बाबांनाही उद्योग उभारणीसाठी संपूर्ण पाठिंबा दिला. दोघांनाही जम बसेपर्यंत खडतर परिस्थितीचा सामना करावा लागला, परंतु त्यांनी जे समोर येईल त्यास खंबीरपणे तोंड देण्याचा गुरूमंत्र अंगिकारला होता !

बाबांनी देशाला स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने काचक्षेत्राचा विकास कसा होईल याकडे लक्ष पुरवले. कुशल तंत्रज्ञ आणि कामगार, योग्य भांडवल पुरवठा आणि जोडीला उत्तम व्यवस्थापन असेल, तर जागतिक बाजारपेठेतही त्यांच्या उत्पादनाचा ठसा उमटू शकेल असा विश्वास त्यांना होता. परंतु दुसऱ्या महायुद्धाचे ढग जमू लागले होते. सर्वत्र असहकार, संप, मोर्चे,  टाळेबंदी असे वातावरण होते. औद्योगिक क्षेत्रात तर ते फारच जाणवत होते. त्यामुळे बाबांच्या कामाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आणि त्यांनी तत्कालीन सरकारला संशोधनाची झलक दाखवून त्याचे महत्त्व पटवून दिले.

एक धडाडीचा व्यावसायिक व एक संशोधक अशा दोन्ही पातळ्यांवर बाबांनी झोकून देऊन काम केले. काचनिर्मिती करताना त्यांनी आधुनिक संशोधनाच्या अभ्यासाबरोबर भारतीय वेदग्रंथांचाही धांडोळा घेतला होता. बाबा इंडियन सिरॅमिक्स सोसायटीच्या अध्यक्षपदावरून केलेल्या भाषणात 1967 मध्ये म्हणाले होते, की ‘ख्रिस्तपूर्व 3000 वर्षे, मण्यांच्या रूपात काचेचा उपयोग झाल्याचा दाखला आढळतो आणि ख्रिस्तपूर्व 500 वर्षे, काचेची भांडी आणि बांगड्या बनवण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर काही काळाने, रासायनिक कामांसाठी काचेचा वापर होऊ लागला, परंतु ती काच तापमानातील तीव्र बदलाने तडकत असे. नंतर ‘सँड बाथ हिटिंग प्रोसेस’चा शोध लागला. स्वातंत्र्योत्तर वीसेक वर्षांत भारताने काच व सिरॅमिक्स या क्षेत्रात स्वावलंबनाच्या दृष्टीने पाऊल टाकले आणि मॉलेक्युलर इंजिनीयरिंग ऑफ ग्लास अँड ग्लास सिरॅमिक्स यांमधील शोधांमुळे भारताने नवीन तंत्रज्ञानदेखील आत्मसात केले आहे. त्यामुळे भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे.’

बाबांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करताना, कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या नीतिमूल्यांना कधी धक्का लागू दिला नाही. उत्पादनात कधी कमी प्रतीचा माल निर्माण झाला, तर बाबा स्वतः त्यांच्या देखरेखीखाली तो संपूर्ण साठा नष्ट करत. कामगारांना फॅक्टरीत अतिउष्ण फर्नेसच्या सान्निध्यात काम करावे लागते, म्हणून तेही अनेकदा त्यांच्याबरोबर तेथे बसून काम करत !

बाबांना चांगल्या सहकाऱ्यांची साथ लाभली. सगळ्या थरांतील साथीदारांना त्यांच्याविषयी आपुलकी वाटे. त्याचा प्रत्यय म्हणजे, व्यवसायाचे बस्तान बसल्यावर, भारतातील कामगार चळवळीचे अध्वर्यू नेते कै.ना.म. जोशी ह्यांच्या अध्यक्षतेखाली बाबांचा सत्कार त्यांच्या कामगार बंधूंनी केला होता आणि त्यांना मानपत्र अर्पण केले होते. बाबांच्या वयाला पन्नास वर्ष पूर्ण झाली तेव्हादेखील सर्व कामगारांनी त्यांचा सत्कार केला होता.

शास्त्रीय काचमाल ह्या विषयातील बाबांचा अभ्यास आणि ध्यास पाहून, अनेक नामवंत संस्थांनी त्यांना त्यांचे सदस्यत्व दिले. बाबांनी सोसायटी ऑफ ग्लास टेक्नॉलॉजीच्या (शेफील्ड) भारतीय विभागाचे अध्यक्षपद 1957 ते 62 ह्या दरम्यान भूषवले. ते भारताच्या डेव्हलपमेंट कौन्सील फॉर ग्लास अँड सिरॅमिक्स या संस्थेचे चेअरमन तर होतेच; शिवाय, त्यांनी ऑल इंडिया ग्लास मॅन्युफॅक्चरर्स फेडरेशन या संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारीदेखील स्वीकारली होती. त्याखेरीज ते सेंट्रल ग्लास अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (कोलकाता) या संस्थेचे सदस्य होते.

त्यांच्या अजोड कार्याचा परिपाक म्हणजे,1962 मध्ये ‘बोरोसिल ग्लास वर्क्स’ ही कंपनी आणि ‘कॉर्निंग ग्लास वर्क्स’ ही अमेरिकन कंपनी ह्यांचा मिलाफ झाला. बाबांचा हेतू त्यांची कंपनी भारतीयांची उद्यमशीलता आणि अमेरिकेचा आर्थिक पाठिंबा ह्यांद्वारे भरभराटीला यावी हा होता. परंतु पुढे, त्यांचे त्या परकीय भागीदारांशी मतभेद झाले. तेव्हा ते तेथून बाहेर पडले आणि त्यांनी 1968 मध्ये मुंबईजवळ ठाण्याला ‘सिलिकावेअर प्रायव्हेट लिमिटेड’ नावाची नवीन कंपनी स्थापन केली. त्यांनीच शेवटपर्यंत त्या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरपदाची धुरा वाहिली.

बाबा ‘सुट्टी’ हा शब्द शिवीप्रमाणे निषिद्ध मानत. त्यांचे त्यांच्या बाह्य दर्शनाकडे मात्र लक्ष नसे. बाबा मुंबईत सुटाबुटात वावरत. गावी गेले, की चक्क धोतर, सदरा हा खास तेथील वेष परिधान करत. त्यांना तसे साधे राहणे जास्त आवडे. बाबा गरीब ग्रामीण जनतेशी संवाद साधताना त्यांचे नाव, हुद्दा, मान, सगळे बाजूला ठेवून, धोतर खोचून, त्यांच्यासोबत जमिनीवरच ठाण मांडत. ते स्वतः गणेशभक्त होते. कोठल्याही नवीन योजनेपूर्वी ते गावच्या गणेशाचा आशीर्वाद घेत. त्यांनी तेथील देवळातील पूजेचीसुद्धा नीट सोय लावून दिली होती.  बाबांनी आंब्याची काही कलमे मुटाटला लावली होती, त्यामुळे गावी गेले, की तिकडे त्यांची रोजची फेरी असे. त्यांना कलमांचे निरनिराळे प्रयोग करण्याचा छंद होता. बाबांना त्यांच्या गावाविषयी खूप जिव्हाळा होता. गावाला ऊर्जितावस्था यावी म्हणून बाबा भरघोस आर्थिक मदत करत. शिवाय, ते स्वतः तेथील नळयोजना, विहिरी खोदणे, रस्ते बांधणे अशा समस्या सोडवण्यातही सहभागी होत.

बाबा आप्तस्वकीय व इतरही अनेकांना आधार देत होते, व्यावसायिकांना मार्गदर्शन करत होते. त्यांनी मुटाटमधील अनेक होतकरू मुलांना त्यांच्या कारखान्यात काम दिले होते. बाबांनी त्यांचे योगदान शैक्षणिक संस्थांच्या कार्यातही दिले. त्यांनी ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या सुविधांपासून वंचित राहवे लागू नये, म्हणून समविचारी लोकांच्या साथीने ‘मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ’ ही संस्था स्थापन केली. त्यांनी ह्या प्रकल्पासाठी निधी संकलन केले; प्रसंगी ते स्वतः संस्थेच्या इमारत बांधकामावर देखरेख करत, त्यामुळे आसपासच्या पाचसहा मैल परिसरातील मुलांची खूप मोठी अडचण दूर झाली. मुटाटच्या शाळेला त्यांचेच नाव देण्यात आले आहे. बाबांनी देवगड आणि राजापूर येथील शैक्षणिक संस्थांनाही मार्गदर्शन आणि सहाय्य केले.

आईबाबा, दोघेही एकमेकांना अगदी पूरक होते. त्यांचा परस्परांवर गाढ विश्वास होता. त्यांनी एकमेकांच्या क्षेत्रांत कधीही ढवळाढवळ केली नाही. आमच्या करिअरबाबतचा निर्णय बाबांचा असे, तर शिस्त व संस्कार ही आईची जबाबदारी होती, पण दोघांच्याही दृष्टीने शिक्षण फार महत्त्वाचे होते आणि पैसा हा कायमच दुय्यम. पैसा चोरीला जाऊ शकतो, पण माणसाचे शिक्षण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही हे आमच्या मनावर बिंबावे असे त्यांचे प्रयत्न असायचे. आम्ही सगळ्यांनी रोज रात्री एकत्र जेवावे, असा घरचा नियम होता. बाबा तो पाळायचे. ते आम्हाला गणित वगैरे शिकवत, आईबाबा, दोघेही वाचनवेडे होते. लोक आमच्या घराला लायब्ररीच म्हणत !

बाबांची विनोदबुद्धी जागरूक असे. त्यांचा शिरस्ता नर्म विनोदाने वातावरण हलके-फुलके ठेवण्याचा होता. त्यांना मुक्या जनावरांचा लळा होता. पाळीव कुत्रे तर त्यांच्या शब्दाशब्दाला प्रतिसाद देत. ते त्यांच्या त्या ‘मित्रां’साठी रोज फिरून येताना, बिस्किटाचा पुडा आणण्यास विसरत नसत आणि त्यांना काही जखम वगैरे झाली तर त्यांची मलमपट्टीही स्वतः करत.

बाबांचे विचार उदारमतवादी होते. आमच्या घरी पाणी भरणारा सेवक दलित होता. घरचे व दारचे, सारे एकत्र भोजन करत. आम्ही प्रसंगी त्यांच्या ऑफिसमधील गुरख्यांबरोबरही जेवण केलेले आहे. आईबाबा, दोघांनीही सहज आचरणातून दाखवून देऊन, सगळ्यांशी जुळवून घेण्याचेच संस्कार आमच्यावर केले. कोठल्याच प्रकारचा उच्चनीच भाव आमच्या मनात निर्माण होऊ दिला नाही. बाबांचा मृत्यू, वयाच्या साठाव्या वर्षी अकस्मात आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने 20 एप्रिल 1969 रोजी झाला.

माझा भाऊ आनंद लेले ह्याने, बाबांच्या पश्चात लहान वयात कंपनीचा कारभार सांभाळला. आनंदच्या मुलांनीदेखील त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावत कंपनीचे कार्य जोमाने सुरू ठेवले आहे. मीदेखील बाबांसारखे परदेशी जाऊन, माझ्या आवडीच्या जनुकशास्त्रातील उच्च शिक्षण घेतले. मीसुद्धा आमच्या गावच्या समस्यांकडे लक्ष पुरवते. माझ्या मुलींनी परदेशात जनुकशास्त्रासोबतच स्त्रीरोग आणि बालरोग ह्या विषयातील उच्च शिक्षणात प्रावीण्य मिळवले आहे. त्या तेथेच रूग्णसेवा व विद्यादान असे कार्य करत आहेत.

बाबांच्या अफाट बुद्धिमत्तेचा आणि समाजसेवेचा वारसा पुढील पिढ्यांतदेखील झिरपला आहे. बाबा नेहमी एका आवडत्या कवितेच्या चार ओळी गुणगुणत असत. त्यातून व्यक्त होणारा भावार्थ, हाच त्यांचा जीवनप्रवास होता !

रमत गमत कोळी भिंतीवर चढे, भिजत पावसाने खाली तो पडे

सूर्याचे किरण ते पळवी पावसा, जाणे वर सहज आता हाच भरवसा

कोवळया उन्हामधे वाट सापडे, डौलदार कोळी तो उन्हावर चढे

– हेमा पुरंदरे 98200 64801 hema.purandarey@gmail.com

——————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here