श्रीगुरुदेव रानडे यांचा बुद्धिनिष्ठ साक्षात्कारवाद

1
19
_Gurudev_Ranade_2_0.jpg

श्रीगुरुदेव रानडे हे आंग्लविद्या विभूषित साक्षात्कारी महात्मे. ते बी.ए. झाल्यावर ‘दक्षिणा फेलो’ म्हणून डेक्कन कॉलेजात काम करू लागले. गुरुदेव संस्कृत नाटके शिकवत असत. ते पुढे फर्ग्युसन महाविद्यालयात तत्त्वज्ञान विषय शिकवू लागले. त्यांनी तोच विषय घेऊन एम.ए. झाल्यानंतर चॅन्सलरचे व न्या. तेलंग यांच्या नावाचे अशी दोन सुवर्णपदके मिळवली. परीक्षकांनी त्यांच्याविषयी शेरा लिहिला, की ‘हा विद्यार्थी या विषयात परीक्षकांपेक्षा अधिक जाणकार आहे.’ प्रा. दे.द. वाडेकर त्यांच्या अध्यापन कौशल्यासंबंधी लिहिताना म्हणतात – “प्रा. रानडे यांचे कार्य त्या कॉलेजातील तत्त्वज्ञानाच्या अध्यापनाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहे. प्रा. रानडे यांनी प्रि. आगरकर आणि प्रि. भाटे यांनी तत्पूर्वी तेथे रूढ केलेल्या प्रत्यक्षवाद आणि अज्ञेयवाद या दोन विचारसरणींच्या परंपरेला आदर्शवाद आणि साक्षात्कारवाद यांची जोड देण्याचे कार्य केले. परंतु त्यांची फर्ग्युसन कॉलेजातील खरी कामगिरी म्हणजे त्यांनी तत्त्वज्ञानाच्या अध्यापनात दाखवलेली व्यासंगाची गाढता आणि प्रज्ञेचे स्वातंत्र्य होय. त्यामुळे सिंध-वऱ्हाड यांसारख्या दूरदूरच्या प्रांतांतील विद्यार्थीही त्यांच्याकडे आकर्षले जात. त्यांची वर्गातील व्याख्याने अंत:स्फूर्तीने भरलेली व एखाद्या आत्मप्रत्ययी प्रेषिताप्रमाणे विद्यार्थ्यांना तात्त्विक चिंतनाकडे प्रवृत्त करणारी असत.”

गुरुदेवांनी निंबाळला गेल्यावर 1924 मध्ये ‘अॅकेडमी ऑफ फिलॉसॉफी अँड रिलिजन’ या संस्थेची स्थापना केली. त्या संस्थेचे ध्येय ईश्वरविषयक प्रश्नांचे तात्त्विक दृष्ट्या संशोधन करण्याची ज्यांना आस्था आहे अशा सर्वांना एकत्र आणणे हे होते. त्यांनी ‘कन्स्ट्रक्टिव्ह सर्व्हे ऑफ उपनिषदिक फिलॉसॉफी’ हा उपनिषदांवरील ग्रंथ तेथेच पुरा केला. त्यांना तो ग्रंथ पुरा झाल्यावर खूप कीर्ती मिळाली व ते जागतिक कीर्तीचे तत्त्वज्ञ ठरले. ‘अलाहाबाद विद्यापीठा’चे कुलगुरू सर गंगाधर झा यांनी तो वाचूनच गुरुदेवांची त्यांच्या विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली व ते तेथे अखेरीस कुलगुरूही झाले. त्या विद्यापीठाने सन्मान्य प्राध्यापक म्हणून त्यांचा गौरव तेथून निवृत्त झाल्यावर केला आणि त्यांना डी.लिट्. ही पदवीही दिली. पुढे सांगलीच्या राजेसाहेबांच्या स्थापन झालेल्या ‘अध्यात्मविद्यामंदिर संस्थे’च्या वतीने हिंदी संतांवरील ‘पाथ वे टु गॉड’ व ‘परमार्थ-सोपान’ ग्रंथ प्रकाशित केले. त्यांनी दिल्लीच्या डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली हिंदी भाषेतील संतवाङ्मयावर राष्ट्रपती भवनात व्याख्याने केली. डॉ. राधाकृष्णन ‘परमार्थ-सोपान’ या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या वेळी म्हणाले, की ‘गुरुदेव रानडे यांच्या बाबतीत तत्त्वज्ञान हा केवळ अभ्यासाचा विषय नसून, तो त्यांचा ज्ञानमार्ग आहे, ती त्यांची जीवननिष्ठा आहे.’

गुरुदेवांनी बुद्धिनिष्ठ साक्षात्कारवादाचा जन्मभर पुरस्कार केला. त्यांना संस्कृत, मराठी, हिंदी, कन्नड, इंग्रजी या भाषा येत होत्या. ते युरोपीय भाषांपैकी ग्रीक, लॅटिन, फ्रेंच व जर्मन या भाषाही शिकले होते. ते आदर्श संशोधक होते.

हरिभक्त परायण मामासाहेब दांडेकर हे त्यांचे विद्यार्थी होते.

(ज्ञानेश्वरी स्वर्णिमा (1 ते 16 जून) वरून उद्धृत)

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.