शोध आडवाटांचा

0
35

‘डिस्कव्हरी महाराष्ट्र’मध्ये मिलिंद गुणाजी यांनी निर्देश केल्यामुळे लोहगड किल्ला प्रकाशझोतात आला, सध्या अनेक तरुण-तरुणी लोहगडाकडे आकर्षले जात आहेत. लोहगड बघण्यासाठी आठवड्याच्या गुरुवारी व रविवारी हमखास मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, कारण गुरुवार या दिवशी पुणे येथील कंपन्यांना सुट्टी असते तर रविवारी मुंबई येथील कंपन्यांना सुट्टी असते. लोहगडाच्या इतिहासाविषयी थोडेसे…

 

मळवली हे रेल्वेस्टेशन पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर लोणावळ्याजवळ आहे. मळवली रेल्वे स्थानकापासून दक्षिणेला नऊ किलोमीटर अंतरावर लोहगड आहे. सुमारे दोन हजार फूट उंच, अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय असा हा किल्ला. गडाचे क्षेत्रफळ एकशेचौदा एकर असून गडावर एकवीस कुंड विहिरी आहेत. किल्ल्याजवळच भाजे आणि बेडसे ही अडीच हजार वर्षांपूर्वीची बौद्धकालीन लेणी आहेत. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या राजवटी या किल्ल्याने पाहिल्या आहेत.

मलिक अहमदने १४८९ मध्ये निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यांपैकीच लोहगड. अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुर्‍हाण निजाम १५६४ मध्ये या किल्ल्यावर कैदेत होता.

किल्ला आदिलशाहीत १६३० मध्ये आला. शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर १६५७ मध्ये जिंकून घेतला आणि लोहगड – विसापूर हा सर्व परिसरसुद्धा स्वराज्यात सामील झाला. किल्ला पुरंदरच्या तहात (१६६५) मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे, १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला.

पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस नेताजी पालकरने आणलेली संपत्ती लोहगडावर ठेवली होती असे बोलले जाते. शाहुमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड १७१३ मध्ये कान्होजी आंग्रे यांस दिला. आंग्रे यांकडून तो १७२० मध्ये पेशव्यांकडे आला. नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात १७७० मध्ये घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. नानांनी किल्ल्याचे बांधकाम १७८९ मध्ये आणखी मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा-शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू – नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली.

नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुर्‍यांच्या निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सु-यांचा कैलासवास झाला. १८०२ मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या.

गणेश दरवाजाइंग्रजांनी १८०३ मध्ये किल्ला घेतला. पण नंतर दुसर्‍या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्वप्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्‍याच दिवशी मराठे लोहगड सोडून निघून गेले.

कसे पोचाल?

लोहगडावर पोचण्यासाठी पुण्यावरून अथवा मुंबईवरून लोणावळ्याच्या पुढे असणा-या मळवली स्थानकावर उतरावे. तेथून एक्स्प्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणारी वाट पकडावी. तिथून दीड ते दोन तासांच्या चालीनंतर लोहगडावर येऊन पोचतो. येथे एसटी महामंडळाच्या बसची सोय नाही. स्वतःचे वाहन असल्यास उत्तम अथवा लोणवळ्याहून ट्रॅक्सने जाता येते.

काय बघाल?

लोहगड़ावर चढण्यासाठी सुरूवात करतो तेव्हा समोर दृष्टीस पडतो तो गणेश दरवाजा. गणेश दरवाजातून आत गेल्यावर तटाला लागूनच गोलाकार वाट आहे. तेथून पुढे नारायण आणि हनुमान दरवाजे आहेत. या दरवाजामधील भुयारामध्ये पूर्वी धान्य साठवून ठेवले जात असे. सर्वात वरच्या महाद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर तेथे घुमट आहे. त्यात कबर आहे. ती औरंगजेबाच्या मुलीची आहे असे सांगितले जाते, पण त्याला ऐतिहासिक पुरावा नाही. पुढे थोडे उजवीकडे गेल्यास उंचवट्याचा भाग आहे , तिथे एक सुंदर शिवमंदिर आढळते. पुढे, सरळ चालत गेल्यावर छोटेसे तळे आहे. ते अष्टकोनी आहे. त्याच्या बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाकेदेखील आहे. ती गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. तसेच, पुढे गेल्यावर पठार आहे. या पठारावर हाजी उमरशहा बाबा दर्गा आहे. या दर्ग्याचा सालाना संदल व ऊरूस पौष पौर्णिमेपासून (उर्दू ता. १३) तीन दिवस चालतो. उत्सवात तीन दिवसांमध्ये तीस – पस्तीस हजार भाविक दर्शनास येतात.

विंचुकाटा गडाच्या पश्चिमेकडून पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास मोठे तळे आढळते. नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली आहे. हे तळे सोळा कोनी आहे. मोठ्या तळ्याच्या पुढे विंचुकाटा आहे. विंचुकाट्याकडे जाताना वाड्यांचे अवशेष दिसतात. विंचुकाटा बघून आठवण येते ती म्हणजे राजगडाच्या संजीवनी माचीची. पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचुकाट्यावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यांस विंचुकाटा असे म्हणतात. विंचुकाट्याच्या टोकाला काही जण कडेलोट असेही म्हणतात. तेथून आपणास विसापूर नजरेस पडतो.

लोहगडाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे कड्यांच्या टोकावर बांधलेली चिरेबंदी वाट. अशी रेखीव वाट फार कमी दुर्गांवर पाहण्यास मिळते. या वाटेवरून कोणी येत असेल तर तो माणूस गडावर येईपर्यंत
पहारेक-यांच्या नजरेतून सुटत नाही! तो व्यवस्थित हेरला जातो.

लोहगड उतरून खाली आल्यावर काही स्थानिक रहिवाशांनी जेवणाची सोय केलेली आहे. तेथे झुणका-भाकर मिळू शकते. मांसाहारी जेवण अगोदर सांगितल्यावर तयार करून देण्याची सोय आहे.

हुसेन शेख

लोहगड पाहण्यासाठी गडावर पुरातत्त्व विभागाचे तुलशीदास दळवी, तसेच किल्याच्या अधिक माहितीसाठी स्थानिक असलेले हुसेन शेख (बाबा) यांची मदत घेऊ शकता.

लोहगड पाहण्यासाठी गडावर पोचलो त्यावेळी हुसेन शेख (बाबा) यांची ओळख झाली. हुसेन बाबा शेख यांचा जन्म १९५६ साली शेतकरी कुटुंबात झाला. सध्या ते रेल्वे कामगार आहेत. ते १९८० पासून लोहगड गावातील लोहगड किल्याची – हाजी हजरत उमरशावली बाबा दर्ग्याची – महादेव मंदिराची देखभाल, सेवा व जोपासना करतात. त्यामधून आवर्जून सांगायचे तर पर्यटकांना व भाविकांना गडावर जाण्यासाठी अत्यंत झाडी-झुडूपातून मार्ग काढावा लागत असे. त्यांनी ही अडचण दूर करण्यासाठी १९९८ च्या सुरूवातीला गावच्या मुख्य रस्त्यापासून गडावर जाण्यासाठी कच्च्या रस्त्यांचे व पाय-यांचे काम करण्यास सुरूवात केली. त्यावेळी गावातील प्रमुख गावक-यांनी कामगार उपलब्ध करुन दिले व पाय-यांच्या कामास सुरूवात केली. प्रत्येक पुरूष कामगारांना ५० रु. मानधन व स्त्रीला ३० रु देऊन १९९९ ला अंदाजे गणेश दरवाज्यापर्यंत व मध्यभागी कुठेकुठे २५५ कच्च्या पाय-या मातीमध्ये बांधून व वाळू-सीमेंटने पक्क्या करून घेतल्या असे हुसेन शेख सागंत होते. गडावर येणा-या पर्यटकांना मार्गदर्शन करणे असे काम ते वेळेनुसार करत असतात.
 

विश्वनाथ खांदारे

भ्रमणध्वनी : 9987642793

इमेल : vkhandare@gmail.com

 

About Post Author

Previous articleमराठीतून शिकू द्या
Next articleतंत्रज्ञानाने नागरिकांचे बंध तुटतील!
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.