शिवाजीदादा कागणीकर – बेळगावचा सर्वोदयी

शिवाजीदादा कागणीकर महाराष्ट्र, कर्नाटक व दक्षिण भारताचा काही भाग येथे सर्वांना परिचित आहेत. खादीची हाफ पँट, खादीचाच हाफ बाह्यांचा खिसेवाला शर्ट, गांधी टोपी आणि खांद्यावर शबनम अशी त्यांची वेशभूषा. त्यांनी रचनात्मक ग्राम विकासाचे काम बेळगावच्या ग्रामीण भागात उभे केले आहे. मात्र दादांचा ठावठिकाणा कोणाला सांगता येणार नाही, कारण ते आज या गावात, तर उद्या पुढील गावात. त्यांच्याजवळ मोबाईल फोनपण नाही. दादांनी त्यांचे आयुष्य देशसेवेला देण्याची प्रतिज्ञा सानेगुरुजी, गांधीजी व विनोबा यांच्यापासून प्रेरणा घेऊन, 1972 मध्ये केली. त्यांनी बी एससीच्या शेवटच्या वर्षाला असताना कॉलेज सोडून देऊन खेड्यात कामाला सुरुवात केली. त्याच वेळी ते अभ्यासगटात सहभागी झाल्यामुळे विश्लेषण करण्यास शिकले व सामाजिक प्रश्नांकडे डोळसपणे पाहू लागले. ते त्यांच्या घरात एकटेच शाळेचे पायरी चढले होते. त्यांना ते सामाजिक कामात पडले म्हणून गावातून प्रचंड विरोध झाला; माथेफिरू म्हणून हिणवले गेले.

त्यांनी दारिद्र्य, कुपोषण, निरक्षरता, पाण्याचे दुर्भीक्ष्य, आरोग्य सुविधांचा अभाव या मुख्य समस्या आहेत हे जाणले. त्यांनी कामाची खरी गरज मागासलेल्या, बहुजन समाजातील, डोंगरभागातील मुलांसाठी आहे हेही ओळखले. मग त्यांनी त्यांच्याकरता खेड्यातील शाळा पुनरुज्जीवित केल्या, तर काही ठिकाणी त्या नव्याने सुरू केल्या. दादांनी असंघटित क्षेत्रांतील कामगारांना संघटित केले. दिलीप कामत यांनी अभ्यासगट सुरू केले होते. तेथे झालेल्या चर्चांमुळे 1977 साली एक हजार यंत्रमाग कामगारांनी त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत सत्याहत्तर दिवस संप केला. ते त्यांना लाभलेले पहिले मोठे यश होते. दादांना सहकारी मित्रांबरोबर तुरुंगात जावे लागले. त्यांनी फादर जो यांच्याबरोबर 1978 मध्ये सुरू केलेली ‘जनजागरण’ संस्था नावारूपाला आली आहे. त्यांनी संस्थेच्या माध्यमातून रात्रशाळा, बालवाड्या, आरोग्यसेविका, बचत गट, जलसंधारण, दारूबंदी, वृक्षलागवड व संवर्धन, पाणलोटक्षेत्र व्यवस्थापन, गोबर गॅस असे विविध प्रकल्प यशस्वी करून दाखवले आहेत.

दादांनी गोबर गॅसचे तंत्र व कौशल्य शिकून घेतले आणि दीडशे गवंडी तयार केले. त्यांनी ‘जनजागरण’द्वारे तीन हजार गोबर गॅस प्लाण्ट बसवले, जे कुशल बांधकाम, उत्कृष्ट बांधकामसाहित्य व जनजागृती यांमुळे उत्तम प्रकारे वापरात आहेत. दादा गॅस प्लाण्ट दलित वस्तीत आधी बसवले जातील याची काळजी घ्यायचे. ‘जनजागरण’ ही संपूर्ण भारतात सर्वाधिक गोबर गॅस बांधणारी प्रथम संस्था ठरली. दादांनी शौचालय गोबरगॅसला जोडण्याचा आग्रह धरला. लोक संडासचा वापर करू लागले, गॅस सहजपणे उपलब्ध झाला, स्त्रियांची गैरसोय दूर झाली, जळणासाठी होणारी वृक्षतोड वाचली, चुलीच्या धुरापासून मुक्ती मिळाली आणि गावात स्वच्छता नांदू लागली. सामाजिक वनीकरण, चराईबंदी, ग्राम अरण्य समिती, जलसंवर्धन ही सगळी कामे हातात हात घालून झाली. पंधरा-वीस वर्षांत दुष्काळी परिसराचा कायापालट झाला. त्यांनी गावात उपलब्ध असणाऱ्या जलस्रोतांचा व नैसर्गिक संसाधनांचा लोकांबरोबर राहून अभ्यास केला व त्यानुसार कार्यक्रम आखले. त्यामुळे ते दीर्घकाळ टिकून आहेत.

सभोवतालचे डोंगर कट्टणभावी व परिसरातील खेडी यांमधील पाणलोटाच्या कामामुळे हिरवेगार झाले आहेत. भूगर्भातील पाणी वाढून गावांना नैसर्गिक रीत्या वर्षभर मिळू लागले आहे. वृक्षारोपणामुळे जंगलक्षेत्र वाढले. गुरांना चारा मिळू लागला. परिणामी, दुग्धव्यवसाय पशुधनात वाढ होऊन बहरला. शेतकऱ्यांनी भाजीपाला घेण्यास सुरुवात केली. कुपोषण घटले. गुरांमागे जाणारी मुले शाळेत शिकू लागली. रात्रशाळांनी खेडोपाडी शिक्षणाची रुजवात घालण्याचे लक्षणीय काम पंधरा वर्षांच्या कालावधीत केले. बैठकांत होणाऱ्या चर्चांद्वारे लोकांचे प्रबोधन होत राहिले. लोकसहभागातून सामूहिक काम केल्यामुळे गावकऱ्यांमध्ये समूहभावना व स्वयंसेवा वृत्ती निर्माण झाली! रूढी-परंपरांचा काच कमी झाला. आंबा व काजू यांच्या लागवडीमुळे लोकांना उत्पन्नाचे साधन मिळाले. महिला त्यांच्यात ‘नरेगा’मुळे आत्मविश्वास निर्माण होऊन जागृत व संघटित झाल्या आहेत.

सर्वांगीण विकासाचे प्रारूपच कडोलीच्या आसपास उभे राहिले आहे! दादांच्या मार्गदर्शनामुळे तयार झालेले दहा कार्यकर्ते आहेत. ते ‘जनजागरण’ संस्थेद्वारे वेगवेगळ्या गावांत कार्यरत आहेत. राम आपटे, दिलीप कामत, अशोक देशपांडे, फादर जोचनकला, जागृत महिला ओक्कुट, जीवन विवेक प्रतिष्ठान हे सर्वजण त्यांचे परिवर्तनाच्या वाटेवरील सहप्रवासी आहेत. भारती भांदुर्गेसारखी कार्यकर्ती हिंमतीने व्यवस्थेशी झगडत लोकांचे प्रबोधन करत आहे. त्यांच्या कामाला वैचारिक अधिष्ठान देण्याचे काम सदाशिवराव भोसले, वसंत पळशीकर व राम आपटे यांनी केले. शिवाजीदादा ‘आपटेदादांकडून मी नीती शिकलो’ असे सांगतात. कर्नाटक राज्याला सर्वोदय चळवळीची परंपरा मोठी आहे. बेळगावच्या इतिहासात गंगाधरराव देशपांडे, पुंडलिक कातगडे, मुरलीधर घाटे गुरुजी व त्यानंतर सदाशिवराव भोसले, श्रीरंग कामत, आपटेदादा व शिवाजीदादा अशी गांधीविचाराची व सर्वोदयाची साखळी आहे.

त्यांनी खेड्यातील जमिनी सरकारने लघुउद्योगासाठी घेऊ नयेत म्हणून गावकऱ्यांना बरोबर घेऊन तीन वर्षें लढा दिला. त्यांच्या प्रेरणेने पंचवीस शेतकरी पूर्णपणे सेंद्रीय शेती करत आहेत तर शंभर शेतकरी थोडी रासायनिक व थोडी सेंद्रीय शेती असा प्रयोग करत आहेत. दादा बीजामृत, जीवामृत, शेणखत, गांडूळ खत, जैविक कीड नियंत्रण या सगळ्या गोष्टी सप्रात्यक्षिक करून दाखवतात. ते सांगतात, की निसर्गाचे चक्र, त्यातील परस्परावलंबित्व व त्यातील गुंतागुंत समजावून घेतली तर शेतीतील अवघड वाटणारे प्रश्न सहज सोडवता येतात. त्यांनी अनेक महिलांना परसबाग करण्यासाठी प्रशिक्षित व उद्युक्त केले आहे. दादांचे संघटनकौशल्य, त्यांचा लोकांशी असलेला सततचा संपर्क व संवाद, प्रेरणादायी व सहनशील स्वभाव, कार्यकर्त्यांवर घेतलेली मेहनत यांमुळे त्या सर्व प्रकल्पांचा पाया घातला गेला. दादांच्या संकल्पनेतून साकारलेले ते प्रकल्प रोलमॉडेल ठरले व नंतर सरकारने ते उचलून धरले. सध्या दादा ग्राकुस- ग्रामीण कुली कर्मिकार संघटनेमार्फत मनरेगा कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये गर्क आहेत. लोकांच्या शंकांचे निरसन करणे, त्यांना बळ देणे, योजनेचा पाठपुरावा करणे, त्यावर देखरेख ठेवणे, योजनेत भ्रष्टाचार होऊ न देणे, भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध आवाज उठवणे – हे ते जवळजवळ पंचवीस गावांतून करत आहेत. बेळगाव जिल्ह्याचा रोजगार हमी योजना राबवण्यात भारतात प्रथम क्रमांक गेल्या वर्षी आला. त्यात सर्वात जास्त काम बेळगाव, हुक्केरी व खानापूर तालुक्यांत झाले. दादा व त्यांचे सहकारी रोजगार लोकांपर्यंत पोचवण्याचे काम करत आहेत. दादा त्या योजनेचे यथार्थ वर्णन ‘कुळकायद्याने गरिबांना भाकरी मिळाली आणि मनरेगाने भाजी दिली’ असे करतात. शिवाजीदादाच भ्रष्टाचाराविरोधात ग्राकुस संघटनेच्या कार्यकर्त्यांबरोबर सरकारी कार्यालयावर आठशे लोकांचा मोर्चा नेऊन ‘आमचे गांधी आम्हाला परत द्या’ असे सांगून गांधीजींची तसबीर परत मागण्याचे धाडस दाखवू शकतात! ते ‘माझा भारत देश’ असा उल्लेख करत मराठी-कानडी वादात न पडता सर्वांसाठी झटतात. ते गावात जाऊन मुलांना सहजपणे गणित शिकवतात. ते मुलांनी जीवनकौशल्ये आत्मसात करावीत यावर भर देतात. कलिका केंद्रांद्वारे पर्यायी शिक्षणाचे त्यातील काही प्रयोग खेड्यात राबवतात, दर रविवारी झाडे लावतात व ती जगवतात. त्यांनी अंदाजे तीन लाखांपेक्षा जास्त झाडे लावली आहेत.

ते जागृत कुरबर संघटना, परिवर्तन, भ्रष्टाचार निर्मूलन आणि सामाजिक काम, नरेगा संघर्ष मोर्चा, गोविंदधाम शिक्षण साधना ट्रस्ट, जीवन शिक्षण प्रतिष्ठान, Alternative Education Network या संस्थांद्वारे कार्यरत आहेत. दादा हा विलक्षण सर्वोदयी कार्यकर्ता ‘हे विश्वचि माझे घर’ असे समजून रोज वेगवेगळ्या खेड्यांत हिंडत असतो. अफाट लोकसंग्रह हीच त्यांची खरी मालमत्ता आहे. महाराष्ट्र फाउंडेशन व देवराज अर्स यांसारखे मानाचे काही पुरस्कार मिळूनदेखील खेड्यात गेल्यावर एखादा मुलगा त्याच्याच घरी त्यांना जेवण्यास येण्याचा आग्रह धरतो, तेव्हा त्यांना तो त्यांचा सर्वोच्च पुरस्कार वाटतो. ते सरकारकडून पुरस्कार स्वीकारला तरी त्याच वेळी सरकारला चार खडे बोल सुनावण्यास मागेपुढे बघत नाहीत.
ते वयाच्या एकाहत्तरीत प्रवेश करत आहेत. पण त्यांचा मधुमेह बाजूला ठेवून प्रवास, आंदोलने, उपोषणे, मोर्चे, पदयात्रा, सततच्या बैठका हे चालू आहे. ते मी दमलो असे कधीही म्हणत नाहीत. ते

साने गुरुजींची भूतदया व संवेदनशीलता, गांधी व विनोबांची साधी राहणी, लोकांबद्दल प्रेम व तत्त्वनिष्ठ वृत्ती खऱ्या अर्थाने जगत प्रबोधनाचे दान देत अविरत फिरत आहेत.

(‘साधना’वरून उद्धृत, संपादित – संस्कारित)

अमिता नायगांवकर, बेळगाव,9975190402 amitachk@gmail.com

 

 

About Post Author