शिरोभूषण सम्राट – अनंत जोशी

3
32
_Anant_Joshi_1.jpg

‘सर सलामत तो पगडी पचास’ अशी म्हण आहे खरी… पण कल्‍याणच्‍या अनंत जोशी यांच्या संग्रही एक ना – दोन ना – तीन … तर तब्बल दीड हजारांपेक्षा जास्त टोप्या आहेत! ‘शिरोभूषण’ अर्थात डोक्यावरील अलंकार… डोक्याची शोभा वाढवण्यासाठी आभूषणे!

शिरोभूषण संग्रहालय म्हणजे अनंत जोशी यांच्या आगळ्यावेगळ्या छंदाचे आणि वर्षानुवर्षें चिकाटीने घेतलेल्या परिश्रमाचे मूर्तिमंत प्रतिक होय. ते संग्रहालय म्हणजे वेगवेगळ्या आकारांच्या, रंगांच्या, प्रदेशांच्या, परंपरेच्या देशविदेशांच्या टोप्यांचा संग्रह…

अनंत जोशी यांचा जन्म कल्याण येथील एका व्यावसायिक कुटुंबात २० फेब्रुवारी १९६८ रोजी झाला. अनंत यांना लहानपणापासून टोप्यांचे आकर्षण होते. त्यांना त्यांच्या लहानपणी आईवडिलांनी अमेरिकेहून आणून दिलेली ‘काऊबॉय’ टोपी इतकी आवडली, की ते जेथे तेथे ती टोपी घालून मिरवत असत. त्यांनी टोप्या जमवण्याचा छंद वयाच्या आठव्या वर्षांपासून जोपासला आहे. लहानपणी टिव्हीवर रामायण-महाभारत बघत असताना राम, कृष्ण व त्या मालिकांतील योद्धे यांच्या टोप्या त्यांना स्वत:कडेही असाव्यात असे वाटायचे. ते त्यांचे शेजारी शरद ओक (जे नाणी गोळा करण्याचा छंद बाळगून आहेत) यांच्या सोबत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन निरनिराळ्या प्रकारच्या टोप्या संग्रहित करू लागले.

त्यांच्या संग्रहात कोल्हापुरी फेटा, पेशवाई पगडी, बोरी-मुस्लिम समाजाची टोपी, लहान मुलांची टोपरी, युद्धकाळात वापरली जाणारी शिरस्त्राणे, लाकूड, धातू, व्हेल्वेट, वेत, कापड, बांबू यांपासून बनवलेल्या टोप्या आहेत. तसेच, मोती, जरी, आरसे यांची सजावट असलेल्या टोप्या आहेत. त्या टोप्या दुर्मीळ, मौल्यवान आणि वैविध्यपूर्ण असल्याने आकर्षित करणाऱ्या आहेत. त्या टोप्यांच्या संग्रहातून वेगवेगळ्या देशांच्या, वेगवेगळ्या समाजांच्या वेगवेगळ्या काळाचे, सामजिक जडणघडणीचे दर्शन होते.

मध्यप्रदेशातील होळकरी पगडी, कर्नाटकची म्हैसूर पगडी, जयपूरचा लेहरिया पाग, गुजरातची अहमदाबादी पगडी, राजस्थानची जालीम शाही पगडी, पुण्याची पेशवाई पगडी, पाठारे प्रभू पगडी, तळेगावची सरदार दाभाडे पगडी, पटवर्धन घराण्याची पगडी, नवाली टोपी, ताडाच्या पानापासून तयार केलेली पगडी, ओरिसाची जगन्नाथ पगडी, लहान मुलांची कुंची, हिंदू नवरदेवाला घालण्यात येणारी टोपी, पश्चिम बंगालमध्ये नवरदेवासाठी वनस्पतीच्या खोडापासून बनवले जाणारे टोपरे इत्यादी पारंपरिक टोप्या तेथे पाहण्यासाठी मिळतात.

पारसी फेटा, सुती कापडावर जरीकाम केलेली पारसी मुलांची टोपी, सॅटिनवर व्हेल्वेटवर जर्दोसी काम केलेले बाळाचे टोपरे, शिंदेशाही पगडी, सुरती कापडावर जरीकाम असलेली बनिया पगडी अशा विविध प्रकारच्या टोप्यांचा संग्रहालयात समावेश आहे.

_Anant_Joshi_2.jpgभारताबरोबर अन्य देशांत वापरत असलेल्या टोप्यादेखील जोशी यांच्या संग्रही आहेत. विविध देशांतील युद्धात सैनिकांचे रक्षण करणारी शिरस्त्राणेदेखील आहेत. कठीण कवचापासून बनवलेले पर्शियन पिकेलहाऊस शिरस्त्राण, पोलादापासून बनवलेले लायाहा शिरस्त्राण, गुरखा रेजिमेंट वापरत असलेले दोन्ही बाजूंला शिंग असणारे अर्धवर्तुळाकार पोलादी शिरस्त्राण, बाराव्या शतकात युरोपमधील सैनिक वापरत होते ते गेरिओन शिरस्त्राण, डुकराच्या चेहऱ्याच्या आकाराचे शिरस्त्राण, शिखांचे शिरस्त्राण त्या संग्रहात समाविष्ट आहेत. त्यांनी मॉरिशस, बँकॉक, फ्रान्स, जर्मनी, मेक्सिको, स्वीडन, चीन, तिबेट या देश-प्रदेशांतील टोप्या संग्रहित करताना जवळपास तीनदा भारत फेरी केली आहे. त्याचबरोबर त्यांचे कुटुंब, नातेवाईक, मित्र-परिवार यांनीदेखील त्यांना छंद जोपासताना मदत केलेली आहे.

चीनची बांबू टोपी, लंडनची चॅपेल टोपी, अननस टोपी, आफ्रिकेची कापड व कवट्या यांच्यापासून बनवलेली टोपी, इस्तंबुलचा रेशीम व जरी यांचे काम असलेला फेटा, पाकिस्तानचा सॅटिन फेटा, अरेबियन लोकांचा डोक्याला बांधायचा पारंपरिक रुमाल-कुफिया, अमेरिकेची काऊ-बॉय टोपी, मलेशिया व सायबेरिया यांच्या पारंपरिक टोप्या, इंडोनिशियातील व्हेल्वेटची टोपी तेथे दिसून येते.

समुद्रात मिळणाऱ्या प्रवाळांच्या मण्यांपासून बनवलेल्या टोप्या, तसेच ब्रिटिश आमदनीतील अधिकारी वर्ग व पोलिस वापरत असलेल्या टोप्या तेथे बघू शकतो. अनंत जोशी यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा सूत्रधार ‘जनरल डायर’ वापरत असलेली Replica Cap मिळवली आहे. नौदल, भूदल, हवाईदल यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या caps जोशी यांच्याकडे आहेत. त्यांना टिपू सुलतानची पगडी कोल्हापुरातून मिळाली. त्यांना नाना फडणवीसांचे चक्री पागोटे मुंबईच्या चोर-बाजारातून मिळाले आहे. त्या पगडीचे वैशिष्ट्य असे, की जोशींकडे असणारी ती सगळ्यात मोठी पगडी असून ती शेणाची आहे.

अशा रीतीने शिरस्त्राणांपासून हाताच्या बोटांवरही राहतील अशा पगड्या जोशी यांच्या संग्रहालयात आहेत. जोशी यांनी त्यांच्या खास संग्रहालयासाठी म्हणून ‘सोलर कॅप’ही बनवून घेतली आहे. ती कॅप उन्हात ठेवली, की कपाळावर पुढच्या बाजूच्या भागावर असलेला पंखा गरगर फिरू लागतो.

असा तो दीड हजारांपेक्षा जास्त टोप्यांचा खजिना अनंत जोशी यांनी प्राणापलीकडे जपला असे ते म्हणतात. त्या संग्रहालयातील टोप्यांची प्रदर्शने ठाणे, नाशिक, पनवेल, पुणे येथे भरवण्यात आलेली आहेत. पस्तीस वर्षांपासून जपलेल्या त्या छंदाची नोंद ‘लिमका बुक’मध्ये गेली पंधरा-सोळा वर्षें घेतली जात आहे. ‘गिनीज बुक’ने देखील अनंत जोशी यांना स्तुतिपत्र पाठवले आहे. त्या संग्रहाविषयीचे अनंत जोशी यांचे पाच प्रबंध आर्किऑलॉजिकल कॉन्फरन्समध्ये वाचण्यात आले आहेत. अमेरिकेतील रोटरी इंटरनॅशनलचे एक शिष्टमंडळही त्यांच्या घरी येऊन गेले आहे. त्यांनी जोशी यांना अमेरिकेत प्रदर्शन मांडण्यासाठी सूचना देऊन आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन देखील दिलेले आहे. स्कूल प्रोजेक्ट पिकनिक; तसेच, कल्चरल स्टडीज एक्स्चेंज टीम त्यांच्याकडे भेटीसाठी येत असतात. मोहंजदडोच्या आधीच्या काळाच्या टोप्यांवरही अनंत जोशी संशोधन करत आहेत.

अनंत जोशी (कल्‍याण) – 9930500070

श्रुती शहा

About Post Author

3 COMMENTS

  1. खूपच छान संग्रह,…
    खूपच छान संग्रह,
    अनंत जोशी यांचे आभार

  2. Very near to Kalyan Railway…
    Very near to Kalyan Railway station. Everyone should visit to this Museum

    Great Joshi…

Comments are closed.