शिक्षकांचे व्यासपीठ अाणि कार्यकर्त्यांची बैठक

0
27

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’

शिक्षकांचे व्यासपीठ

शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांची बैठक

शनिवार, १९ मे २०१८ रोजी सायंकाळी ४:०० ते ६:००

स्थळ – व्यासपीठाच्या संयोजक शिल्पा जितेंद्र खेर (निवासस्थान)

१३०३, वास्तू टॉवर, रेसिडेन्सी कॉलनी, वुडमॉल पाठीमागे, तीन हात नाका, ठाणे (पश्चिम) – ४०० ६०२

सप्रेम नमस्कार.

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’तर्फे ‘शिक्षकांचे व्यासपीठ’ या सदराखाली दर आठवड्याला दोन याप्रमाणे गेल्या तीन महिन्यांत काही लेख प्रसिद्ध झाले. त्यांना प्रतिसाद उबदार मिळाला. ‘थिंक महाराष्ट्र’ व्यासपीठाचे स्वरूप कसे असावे याबद्दल व्यापक विचार करत आहे. तत्संबंधीचे टिपण सोबत जोडले आहे. त्या अनुषंगाने अधिक विचार करून वर्षभराच्या कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात काम करू इच्छिणार्‍या कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी, १९ मे २०१८ रोजी योजली अाहे. बैठकीची वेळ सायंकाळी ४:०० ते ६:०० अशी असून ती व्यासपीठाच्या संयोजक शिल्पा यांच्या निवासस्थानी योजली आहे. अवश्य यावे. तुम्ही येत असल्याचे पुढील नंबरवर कळवावे.

(०२२) २४१८३७१०, ९८९२६११७६७
आपले
दिनकर गांगल / जितेंद्र खेर / शिल्पा खेर

टिपण

‘शिक्षकांचे व्यासपीठ’ हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वरील पहिले दालन. त्याचे नाव शिक्षकसंबंधित म्हणून एका विशिष्ट पेशापुरते मर्यादित असले तरी त्यामधून शिक्षणविषयक समस्त घडामोडींची, उपक्रमांची, हकिगतींची कहाणी व्यक्त व्हावी, तत्संबंधी मनन-चिंतन घडावे; शिक्षणविषयक नव्या दिशेचा शोध चालू राहवा असे बरेच काही अभिप्रेत आहे. त्याला पार्श्वभूमी प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ लीला पाटील यांच्या एका विधानाची आहे. त्या म्हणाल्या होत्या, की ‘मला शंभर निष्ठावंत शिक्षक द्या. मी महाराष्ट्रातील शिक्षणविषयक चित्र बदलून टाकीन!’

ती गोष्ट वीस वर्षांपूर्वीची. शिक्षणाचे चित्र त्यानंतर अधिकच बकाल झाले आहे. मुख्य म्हणजे, शाळांत भरती नव्याने होणाऱ्या मुलांना शिक्षण कोणते व कसे द्यावे याबद्दल स्पष्टता नाही. सरकारी शिक्षणखात्याची सूत्रे मान्यवर शिक्षणतज्ज्ञांना दिली तरी त्यांच्याकडूनही अर्थपूर्ण काही घडेल अशी शक्यता नाही. याला सरकार जसे जबाबदार आहे तसा समाज, विशेषत: शिक्षणक्षेत्रात काम करणारी मंडळीही जबाबदार आहेत.

तरीसुद्धा समाजातील व विशेषत: शिक्षणक्षेत्रातील काही मंडळी विचारचिंतन निष्ठेने करत आहेत, तर काही जण शिक्षणातील उपक्रम. तशा मंडळींना जोडून घेऊन शिक्षणविषयक नव्या विचारास चालना द्यावी हा ‘शिक्षकांचे व्यासपीठ’ या ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वरील दालनाचा मुख्य हेतू आहे. तेथे शिक्षणविषयक जे जे काही विधायक ते ते व्यक्त होईल, त्यावर उलटसुलट चर्चा झडेल अथवा त्याचे अनुसरण तरी होईल; पुन्हा त्या गोष्टीकडे कौतुकाने पाहिले जाईल.

‘शिक्षकांचे व्यासपीठ’ या दालनाचे संयोजन शिल्पा खेर करत आहेत. त्या उच्चशिक्षित आहेत. त्या त्यांच्या ‘भाग्यश्री फाउंडेशन’मार्फत गेली काही वर्षें शिक्षणविषयक काही उपक्रम करत आहेत. त्यांचे समाजभानही जागे आहे.

‘शिक्षकांचे व्यासपीठ’ या दालनाचा आरंभ शिक्षकांच्या उपक्रमांच्या कथा सादर करून झाला आहे. त्यात अधुनमधून आवाहन, विचारप्रगटन असेही घडून गेले आहेत. तथापी दालनाचा रोख शिक्षकांच्या उपक्रमशीलतेवर राहिला आहे. शिक्षकांच्या विद्यार्थी घडवण्याच्या प्रयोगांमधूनच शिक्षणविषयक नवी सूत्रे हाती लागतील असा भरवसा त्यामागे आहे. खुल्या वातावरणातील आनंददायी शिक्षण आणि शिक्षणाची विद्यार्थीकेंद्री रचना ही सूत्रे सर्वमान्य आहेत. मात्र प्रत्यक्षात शिक्षण जुन्या पठडीनुसार शिक्षकांच्या कलानेच दिले जात असते. त्यात पुन्हा तंत्रवैज्ञानिक नवनवीन सुविधांमुळे शाळा व विद्यार्थी आणि शिक्षक व विद्यार्थी हे नाते मुळात बदलून जाण्याची शक्यता तयार झाली आहे. तो चिंतनाचा (की चिंतेचा) नवा अत्याधुनिक मुद्दा आहे. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर शिक्षणविषयक दालन चालवत असताना, अशा अनेक मुद्यांची खळबळ मनात असते.

‘व्यासपीठा’वर पहिले तीन महिने शिक्षकांच्या उपक्रमांच्या कथा मुख्यत: प्रसिद्ध झाल्या. तथापी, दालन विविध अंगांनी समृद्ध व्हावे अशी इच्छा आहे. त्यामुळे त्याच दालनात वेगवेगळे विभाग सुरू व्हावे असा यापुढील प्रयास आहे. त्यात समाविष्ट होऊ शकतील असे काही विभाग सुचतात. त्या विभागांतील मजकुरालाही या दालनात स्थान मिळावे अशी रचना करत आहोत. विभाग पुढीलप्रमाणे –

१.  प्रयोगशील शाळा. २. शाळांतील शिक्षणाचे माध्यम. ३. शिक्षणसंस्थांची अभिनव विचारक्षमता. ४. व्यवसायशाळांची शक्यत. ५. शिक्षणसमस्येची सैद्धांतिक चर्चा

असे आणखीही नवनवीन विभाग करणे शक्य आहे. परंतु त्या कोणत्याही विभागात मजकूर/कथा/लेख लिहीत असताना काही पथ्ये पाळणे गरजेचे आहे. इंटरनेटवरील वाचक जगभर पसरलेला असू शकतो. त्याचा शिक्षणाशी प्रत्यक्षाप्रत्यक्ष संबंध असेलच असे नाही. मात्र त्याला शिक्षण या विषयाबद्दल आस्था असण्याची शक्यता असते. त्यामुळे ‘शिक्षकांचे व्यासपीठ’ या दालनासाठी लिहीत असताना सुगम लिहावे, सरळ लिहावे; पूर्ण तपशीलांनिशी लिहावे; हकिगत शंभर टक्के सत्य आहे अशी खात्री करून घ्यावी – तसे फोटो/व्हिडिओ ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर प्रसिद्ध होत असताना, लेखन करताना अहवाल सादर करत असल्याचा अॅप्रोच नसावा. तशी खबरदारी घेतल्याने लेखनातील प्रतिपादनावर अधिक चर्चा संभवते.

About Post Author