‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’तर्फे सद्भावना दिवस दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस साजरा केला जातो. यावर्षी देखील फाउंडेशनच्या संस्कृतिकारणाच्या उद्देशाला धरून परिसंवाद-मुलाखती असे कार्यक्रम शनिवार, 22 मार्च 2025 ला योजले आहेत. त्यात सतीश आळेकर, नीरजा, ‘अंतर्नाद’चे संपादक अनिल जोशी, मिलिंद बल्लाळ, कवी आदित्य दवणे अशा मान्यवरांचा समावेश आहे. तेवढ्याच महत्त्वाची आणखीही एक गोष्ट त्या मुहूर्तावर साधत आहोत. ती म्हणजे गिरीश घाटे रचित व्ही. शांताराम यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन. ते नाट्य व चित्रपट अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते होणार आहे. किरण शांताराम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.
त्यासोबत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वरील 2024 या वर्षातील निवडक साहित्य ‘महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित’ खंड चौथा या दिनकर गांगल व नितेश शिंदे संपादित पुस्तकाचे प्रकाशनही होणार आहे. सद्भावना दिवसाचा कार्यक्रम बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृह, तीन हात नाक्याजवळील, सर्व्हिस रोडजवळ, ठाणे (प.) येथे दुपारी चार ते रात्री आठ असा आहे.
‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’तर्फे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ नावाचे वेब पोर्टल चालवले जाते. त्यावर महाराष्ट्र संस्कृतीचे तालुकावार माहितीसंकलन होत असते. ‘महाभूषण’ या दुसऱ्या प्रकल्पात गेल्या शतकातील महाराष्ट्रातील तीनशे महानुभावांच्या/ जन्मशताब्दीवीरांच्या वेबसाईट बनवत आहोत. मराठी माणसाचे विचार व भावविश्व या मंडळींनी घडवले. त्यातील साने गुरुजी, स्वामी रामानंद तीर्थ, एस. एम. जोशी ही संकेतस्थळे तयार केली आहेत. व्ही. शांताराम यांचे तयार होत आहे. त्याशिवाय बा. सी. मर्ढेकर, इरावती कर्वे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, शंतनुराव किर्लोस्कर, मालती पांडे-बर्वे, सरोजिनी बाबर, खाशाबा जाधव… यांची संकेतस्थळे तयार होत आहेत. या व्यतिरिक्त काही मान्यवरांच्या वेबसाईट्स आधीच तयार आहेत. त्या बाह्यकडी लिंकद्वारे उपलब्ध करून देणार आहोत. उदाहरणार्थ – भा.रा. तांबे, विनोबा भावे, यशवंतराव चव्हाण, स. गं. मालशे, ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, रघुवीर सामंत…
– टीम थिंक महाराष्ट्र