वेधचे पाथेय देवेंद्र ताम्हणे

_Devendra_Tamhane_1.jpg

तिरंदाजी करतेवेळी, झाडावर बसलेल्या पक्ष्याच्या डोळ्याचा ‘वेध’ फक्त अर्जुनाला का साधता आला? धनुर्विद्येचे प्रशिक्षण तर सर्वांना समान मिळाले, पण मग एकटा अर्जुन धनुर्धारी का? कारण त्याला तेव्हा बाकी कोणत्याही गोष्टी दिसल्या नाहीत. त्याने त्यावेळी फक्त एका ध्येयाचे ‘चिंतन’ केले… माझा तीर आणि पक्ष्याचा डोळा! ‘चिंतन’ आणि ‘वेध’ हे वेगवेगळ्या संदर्भात येणारे शब्द ! पण देवेंद्र ताम्हणेसरांशी गप्पा मारताना मात्र त्या दोन शब्दांची सांगड आपोआप साधली जाते.

मनोविकारतज्ज्ञ लेखक डॉ. आनंद नाडकर्णी ह्यांचा ‘वेध’ नावाचा बहुआयामी कार्यक्रम गेली पंचवीस वर्षें ठाण्यामध्ये आयोजला जातो. त्यामध्ये मूल्ये, संस्कार, शिक्षण, व्यवसायप्रबोधन; तसेच, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा व गंमतजंमत अशा गोष्टींचा समावेश असतो. आनंद नाडकर्णी ‘वेध’ला Edutainment म्हणतात. ठाण्यातील ‘वेध’ कल्याणमध्येच नव्हे, तर महाराष्ट्राच्या आणखी काही शहरी पोचले आहे. ते कल्याणला कसे आले हे जाणून घेण्यासाठी कल्याणच्या ताम्हणेसरांना भेटलो.

देवेंद्र हे अनंत व अनुपमा ताम्हणे ह्यांचे पुत्र. त्यांनी जोगेश्वरी येथील इस्माईल युसुफ कॉलेजमधून MSC -Electronics ची पदवी घेतली. देवेंद्र यांना क़ॉलेज वयापासूनच व्यवसायाची आवड होती. त्यांनी मालाडला मामाकडे राहत असताना छोट्या व्यवसायांना सुरुवात केली. दिवाळीत फटाके विकणे, इतर वेळी कपबश्या विकणे इत्यादी. ते त्या अनुभवातून मंत्र शिकले. तो म्हणजे ‘Do Hard Work With Proper Management’ आणि पैशाने पैसा वाढलाच पाहिजे! ताम्हणेसर म्हणतात, की माणसाने कायम ह्याच तत्त्वाने चालले पाहिजे म्हणजे यश त्याच्या पाठीशी येतेच येते. त्यांनी स्वत:च्या घरातच दहावीच्या चार विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान शिकवण्यास 1998 साली सुरुवात केली. चाराचे बावीस विद्यार्थी झाले. तेव्हा जागेची अडचण आणि इतर विषयांच्या शिक्षकांची चणचण भासू लागली. सरांनी 2000 साली ‘कल्याण गायन समाजा’समोरील ‘माधवगणेश’मध्ये काही जागा भाड्याने घेतल्या. ‘चिंतन’ हे नाव आधीपासून डोक्यात होते. सर म्हणतात, की शिक्षणसंस्थेचा आधी खालचे वर्ग मग चढती मांडणी असा क्रम असतो. पण माझ्याकडे आधी दहावी वर्ग सुरू झाला व मग लोकप्रियतेमुळे उतरती मांडणी म्हणजेच नववी, आठवी, सातवी, सहावी आणि पाचवी असे शिकवणी वर्ग सुरू झाले.

देवेंद्रसरांनी शिक्षण कसे रंजक आणि सोपे करता येईल; विशेषत: गणित हा विषय आवडीचा कसा वाटू शकेल इत्यादी गोष्टींवर अभ्यास केला. सर म्हणतात, की ‘चिंतन’ क्लासमध्ये आम्ही गणित व विज्ञान हे विषयही भाषेप्रमाणे शिकवतो. विज्ञानातील एखादी संकल्पना, सूत्र शिकवताना त्यावर आधारित कथांचे दाखले देतो. गणितातील आकारमान वगैरे शिकवताना चहाचा चमचा, खाण्याचा चमचा, वाढण्याचा डाव, उलथणे इत्यादी रोजच्या वापरातील गोष्टींची उदाहरणे घेतो.

देवेंद्रसर म्हणतात, की 2001 हे आनंद नाडकर्णी ह्यांच्या ठाण्यातील ‘वेध’चे तपपूर्ती वर्ष होते. देवेंद्रसरांनी त्यांच्या ‘चिंतन’ क्लासच्या सर्व विद्यार्थ्यांना, सहकार्‍यांना आणि इच्छुक पालकांना घेऊन ‘वेध’ गाठले. ‘वेध’तर्फे विद्यार्थ्यांसाठी बारा विविध स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या. विशेष कौतुकाची बाब म्हणजे बारापैकी नऊ स्पर्धांवर ‘चिंतन’ क्लासच्या विद्यार्थ्यांनी मोहोर उठवली. ‘वेध’च्या नियोजनाप्रमाणे ‘चिंतन’ क्लासला ट्रॉफी तर मिळाली, त्यानंतर ‘चिंतन’ क्लास व ‘वेध’ आणि डॉ. आनंद व देवेंद्रसर ह्यांची अतूट अशी गट्ठी व भट्टीही जमत गेली!

_Devendra_Tamhane_2.jpgदेवेंद्रसर ‘चिंतन’ क्लासच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवत असतच. जसे, की दरवर्षीच्या ‘नववर्ष’ स्वागत यात्रेत क्लासच्या मुलांचे गाणे व नृत्य बसवणे, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्ष्रर सुधारणा वर्ग चालवणे, वर्षातून एकदा मामणोली येथे विद्यार्थ्यांना ‘आकाशदर्शन’ घडवणे, शिस्तबद्ध तरीही वैचारिक मोकळीक देणार्‍या सहलींचे आयोजन करणे, शालाबाह्य इतर उपक्रम राबवणे, ‘सृजन मंचा’च्या माध्यमातून सावध व साहस अशी बिरूदावली ठरवून ‘सायकल रॅली’ काढणे, ज्ञानदिंडी काढून मराठी भाषेचे जतन व संवर्धन करणे.

नाडकर्णी यांचा परीस स्पर्श होता. ठाण्याच्या ‘वेध’चे 2011 साली विसावे वर्ष होते. ताम्हणेसरांनी पक्क ठरवले, की समस्त कल्याणकरांसाठी ‘वेध’लाच कल्याणात आणायचे! सरांनी ‘पाथेय’ ही नोंदणीकृत संस्था स्थापन केली. त्यामधील सभासद व्यक्ती म्हणजे मृदुला मेहेर, कल्पना लिमये, कल्पना भोर, किरण कारखानीस, प्रभाकर गोखले, हेमंत मोने व स्वत: देवेंद्र ताम्हणे… त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कल्याणातील मोठ्या व्यक्ती. मग सूत्र ठरले, ‘Me to we’. बालकवी म्हणतात तसे, ‘मी माझे या वृथा कल्पना तू कोणाचा कोण ?’… त्याप्रमाणे मी जेव्हा We होतो तेव्हा ते संघटन होऊन त्यातून काहीतरी चांगले घडते. त्या संपूर्ण We चा शोध घेण्यासाठी, देण्यासाठी म्हणून हे सूत्र ठरले गेले, ठरवले गेले. कल्याणमधील पहिली ‘वेध’ परिषद 1 जानेवारी 2017 रोजी यशस्वी झाली. पहिल्यावहिल्या कल्याण ‘वेध’मधील आमंत्रित व्यक्ती म्हणजे दिलीप कुलकर्णी आणि विनय महाजन व चारूल भादवडा ह्या आणि अशा लोकसंगीतातून सामाजिक कार्य करणार्‍या पेशाने डॉक्टर व समाजसेवक असणार्‍या, गणितज्ज्ञ व पर्यावरण तज्ज्ञ, पथनाट्य, लेखक व महिला प्रश्न/समस्या चळवळीच्या प्रणेत्या आणि संगणक, अर्थतज्ज्ञ व सनदी लेखापाल ह्या होत्या.

देवेंद्रसरांना ‘पाथेय’च्या माध्यमातून भरपूर कार्य करायचे आहे. विविध प्रकारच्या योजना राबवायच्या आहेत. ‘चिंतन’ क्लास आणि ‘वेध’ ह्यांतून त्यांची स्वत:ची विचारधारा काय झाली आणि होत आहे? त्यावर ते म्हणतात, की “स्वावलंबन आणि परावलंबन ह्यांपैकी एकाची निवड करणे चुकीचे असते. म्हणून सुवर्णमध्य साधण्यासाठी ‘परस्परावलंबन’ साधता आले तर आजचा ‘S’ असलेला मी Triple – X’ होण्यास वेळ लागणार नाही.”

सरांचे वय सेहेचाळीस वर्षें आहे.

सरांच्या आई अनुपमा ताम्हणे ह्या डोंबिवलीच्या ‘पाटकर ट्रस्ट’मध्ये जाऊन अंधांसाठी समाजसेवा म्हणून ब्रेललिपी शिकवत असतात.

देवेंद्र ताम्हणे – tdchintan@gmail.com, 91671 18385

– रिमा देसाई

Last Updateed on 20th August 2017

About Post Author

2 COMMENTS

Comments are closed.