वृक्षमित्र शेखर गायकवाड

4
60
carasole

शेखर गायकवाड यांनी सामुहिक वृक्षारोपणाची संकल्पना नाशिकमध्ये रूजवली. तो अवलिया माणूस व्यवसायाने साधा वेल्डर आहे. शेखर वेल्डिंग केलेल्या साहित्याची हातगाडीवर डिलिव्हरी करत असत. त्याच वेळी, ते झाडे लावत आणि झाडांना पाणीदेखील घालत. त्यांनी एकट्याने शहराच्या छोट्याशा कोपऱ्यात झाडे लावण्याचे काम 1994 पासून चालू केले होते. गायकवाड यांनी झाडे लावण्यासोबत जखमी पक्ष्यांना वाचवणे आणि पक्ष्यांसाठी घरटी वाटणे ही कामे गायकवाड यांनी केली आहेत. त्यांनी पक्ष्यांसाठी तेरा हजार घरटी वाटली आहेत. ती घरटी प्लायवुडपासून बनवली जातात. त्याशिवाय, शहरात कोठे जखमी पक्षी आढळला, की त्याची सुटका करून त्यावर उपचार करण्यातदेखील गायकवाड आघाडीवर असतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे एक हजार पक्ष्यांना जीवदान मिळाले आहे. उपचारासाठी येणाऱ्या पक्ष्यांमध्ये पतंगांच्या मांज्यामध्ये अडकून जखमी होणाऱ्या पक्ष्यांची संख्या जास्त असते असे त्यांचे निरीक्षण आहे.

शेखर गायकवाड स्वतःच्या कामाबद्दल म्हणतात, “सुसाट शहरीकरणामुळे माझा निसर्ग, माझी झाडे, माझे पक्षी-लता-वेली ओरबाडून काढली जात आहेत. निसर्गाची लूट करता करता माणूस त्याच्याच शेवटच्या घटकेकडे निघाल्याचे मला सतत जाणवते. म्हणून मी म्हणतो, की आता नागरिकांनी निसर्गाकडून घेणं थांबवावं आणि देणं सुरू करावं. म्हणून मी हे काम सुरू केलंय!”

गायकवाड यांचे पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल चिंतन सुरू असते. ते म्हंणतात, “पैसा हा जीवनाचे ध्येय कधीच नसावे. आनंदी जीवन हेच मानवी ध्येय आहे आणि तो आनंद केवळ निसर्गात आहे. त्यामुळेच, मी सामान्य रिक्षाचालकापासून ते उद्योजकालादेखील पर्यावरणाचं महत्व कळावं म्हणून नाशकात दहा हजार नागरिकांकडून दहा हजार झाडं लावण्याची संकल्पना मांडली आणि ती यशस्वीदेखील झाली!”

गायकवाड यांच्याकडे पर्यावरणजत्राच भरत असते. त्यांच्या सोबतीला दोनशे तरूण-तरुणी आले आहेत. आजी-आजोबांपासून ते प्राथमिक शाळेत शिकणारे विद्यार्थीदेखील गायकवाड यांच्या पर्यावरणविषयक उपक्रमात सहभागी झाले आहेत. शेखर गायकवाड यांचा ग्रूप ‘आपलं पर्यावरण’ या नावाने काम करतो. त्या- ग्रूपने गेल्या दशकभरात एक लाख झाडे ग्रामीण भागात लावली आहेत. गायकवाड केवळ झाडे लावत नाहीत. तर, अनेक भागांतील झाडांना पाणी घालण्यासाठीदेखील जातात. त्यांचा स्व्तःच्याग कार्यातून हेतू झाडांना जगवताना मानवी मनाला निसर्गाकडे नेण्याचा आहे.

गायकवाड वेल्डिंगचे दुकान चालवतात. त्यांना वृक्षारोपण, पशू-पक्ष्यांची सेवा करताना अनेक वेळा आर्थिक अडचणींना सामना करावा लागतो. कामाचा पैसा घरात न देता पर्यावरणसेवेला वापरल्यामुळे संसारदेखील अडचणीत येतो. मात्र, गायकवाड डगमगले नाहीत. त्यांची निसर्गसेवा पाहून सुजाता काळे नावाच्या शिक्षिका नाशिकमध्ये ट्युशनची सर्व मिळकत दर महिन्याला गायकवाड यांच्याकडे आणून देऊ लागल्या आहेत. गायकवाड यांनी वन महोत्सवासाठी आवाहन केल्यानंतर लोकांमधून सहा लाख रुपयांची वर्गणी जमा झाली! पुणेकरांनी वनमहोत्सवाला दहा हजार झाडांची भेट दिली. पुण्यातील पर्यावरणमित्र धनंजय शेडबाळे यांचे त्यात सहकार्य लाभले. गायकवाड यांची नोंदणीकृत स्वयंसेवी संघटना नाही. त्यांच्या शब्दाखातर लोक निधी उभारतात.

नाशिक हे पूर्वी दाट झाडांसाठी ओळखले जात असे. मात्र, राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीत हजारो झाडे कापली गेली. गायकवाड यांनी जून 2013 पासून महामार्गांवर झाडे लावण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

नाशिकचा वन महोत्सव गायकवाड यांनी यशस्वी केला. त्यासाठी ते दोन महिने सतत परिश्रम घेत होते. दहा हजार खड्डे खोदणे, त्यांत शेणखत टाकणे आणि झाडांसाठी पाण्याची व्यवस्था करणे या कामात गायकवाड कधी-कधी जेवणदेखील विसरून जात ! नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांच्या ‘क्रेडाई’ संघटनेने वन महोत्सवासाठी सहा लाख रुपयांचे कुंपण तयार करून दिले.

गायकवाड यांच्या मदतनिसांच्या यादीत तुषार गांगुर्डे, राहुल आयरेकर, निलेश रोजेकर, अक्षय भोगले, सुरज मोरे, राजू भालेराव, शरद गायकवाड, सागर दळे यांचा उल्लेख प्राधान्याने होतो. मात्र त्यांच्या सगळ्यात महत्वाच्या सहकारी म्हणजे त्यांच्या पत्नी गौरी गायकवाड होत. त्यांनी शेखर गायकवाड यांच्या निसर्गप्रेमासाठी संसार पणाला लावला!

गौरी म्हवणतात, “शेखर हा आदर्श मित्र म्हणून आयुष्यात आला. त्याच्याव ठायी प्रामाणिक माणूस सदैव जागा असतो. त्यामुळे आमची आयुष्यभराची मैत्री झाली. आम्ही सकाळी फिरायला जात असताना रस्त्यालगतची मरणासन्न झाडं पाहून शेखर हळहळत असे. काही दिवसांनंतर त्याने फिरता-फिरता थेट लोकांच्या दारात जाऊन बादलीभर पाणी मागणे सुरू केले. तो प्रकार मला धक्कादायक वाटे. शेखरने बादलीत पाणी घेऊन ते झाडांना टाकण्याचा सपाटा लावला. हा माणूस असा का वागू लागला याचे मला त्यावेळी कोडे पडले. लोक बादलीभर पाणी मागणाऱ्या शेखरचा अपमान करत. काही जण नाक मुरडत पाणी देत. काही जण दारदेखील उघडत नसत. मी शेखरला विरोध केला. त्याने काहीच ऐकले नाही. ही गोष्ट १९९४ मधील असेल. मात्र, काही दिवसांत त्याला कॉलनीतील दोन मुले झाडांना पाणी देण्यासाठी मिळाली. शेखर पाच लिटरचे रिकामे ऑईलकॅन झाडांना पाणी देण्यासाठी वापरू लागले. शेखरच्या हातून एक लाख झाडे लावली गेली आहेत. माझ्यासाठी तो निसर्गदेव आहे.”

गौरी बी.कॉम. शिकलेल्या आहेत. त्यांचा प्रेमविवाह झाला. त्या शेखर गायकवाड यांच्या बऱ्याच कार्यक्रमांचे नियोजन करतात. मग आंदोलन असो, की दहा हजार झाडांची लागवड. कार्यकत्यांना जेवण देण्यापासून ते त्यांच्या व्यक्तिगत मदतीपर्यंत गौरी यांची मदत असते. त्यातून शेखर गायकवाड यांची कार्यशक्ती वाढत जाते. गायकवाड यांचा मुलगा सुशांत हा विज्ञान शाखेच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. वडिलांच्या पर्यावरण कार्यात सुशांतचादेखील वाटा असतो.

शेखर गायकवाड यांना इतर जिल्ह्यांमधून पर्यावरण उपक्रमांसाठी बोलावणी येऊ लागली आहेत. सॅमसोनाईट कंपनीने दोन हजार झाडे लावण्यासाठी गायकवाड यांना निमंत्रण दिले आहे. नाशिकच्या  जिल्हाधिकाऱ्यांनी दोन लाख झाडे लावण्यासाठी त्यांची मदत घेण्याचे ठरवले आहे.

शेखर गायकवाड – 9422267801, shekhargaikwad.tnc@gmail.com

– मनोज कापडे

About Post Author

Previous articleगंधर्व परंपरा
Next articleगाडगेबाबांची कीर्तनाभाषा
कृषिविषयक पत्रकारितेत गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत. देशातील पहिले शेतीविषयक दैनिक ‘अॅग्रोवन’मध्ये तीन वर्षे वार्ताहरपदी काम. सध्या गेल्या सात वर्षांपासून ‘रॉयटर्स मार्केट लाईट’ या शेतीविषयक माहितीसेवेत महाराष्ट्राच्या बुलेटिन कक्षाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. नाशिकमध्ये ‘हरियाल नेचर क्लब’ची स्थापना आणि त्या नेचर क्लबच्या माध्यमातून वृक्षारोपण, पशुपक्षीविषयक जनजागृतीचे काम चालू. लेखकाचा दूरध्वनी 988113059

4 COMMENTS

 1. खूपच छान माहिती दिली
  खूपच छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

 2. या कार्यास~शतशः प्रणाम ,

  या कार्यास शतशः प्रणाम ,
  ” वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, वनचरे,”
  याची प्रचीती निसर्ग मित्र श्री. गायकवाडजी यांचे कार्यामुळे येते , आम्हाला हे अत्यंत प्रेरणादायक आहे, आपल्या कार्यास अनंत शुभेच्छा!

 3. Amazing spirit. Hats off to
  Amazing spirit. Hats off to both of you husband and wife teamwork.
  Nothing can stop a visionary. Very inspiring.

 4. निसर्गप्रेमी माणुस….
  निसर्गप्रेमी माणुस….

Comments are closed.