मी माझ्या बारामती तालुक्यातील वाणेवाडी ह्या गावी ‘विवेकदिशा’ ही अभ्यासिका 2021 साली सुरू केली. माझ्या त्या संकल्पाची बीजे माझ्या कॉलेजजीवनात मी जात असलेल्या (2005) पुण्याच्या अभ्यासिकेत रोवली गेली होती. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्वत:च्या हक्केची शांत जागा अभ्यासासाठी असावी ह्याबाबत समाजमन त्याच काळात संवेदित झाले होते. त्यामुळे मी स्वत: सक्षम झाल्यावर स्वत:च्या गावी होतकरू आणि गरजू मुलांसाठी अभ्यासिका सुरू करावी असे मनोमन ठरवले होते.
आमची वडिलोपार्जित जागा वाणेवाडी ह्या गावी मुख्य चौकात आहे, तेथे वडिलांनी दुकाने बांधण्यास सुरुवात केली. पण ते बांधकाम कोरोनाच्या काळात बंद झाले, तथापी दुकानांचा सांगाडा तयार झाला होता, स्लॅब पडली होती. काम बंद पडलेल्या त्या इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या एका गाळ्यात गावातील चार-पाच तरुण मुले अभ्यासाला बसत. ती मुले आर्मी आणि पोलिस भरतीसाठी तयारी करत होती. मुले अभ्यास करून तेथेच झोपत असत. मी गावी आलो की त्यांना त्या गाळ्यांमध्ये पाहत असे. मी मुले तेथे अभ्यास करत असलेली सात-आठ महिने पाहत होतो. मुले धनगर, गोसावी, दलित समाजातील शेतमजुरी, रोजंदारी करणाऱ्यांची होती. ती गावातील वस्त्यांत राहत. घरांत, वस्त्यांत अभ्यासाचे वातावरण नव्हते. मुले रोज गाळ्यात जमत, अभ्यास करत, सकाळी उठून धावण्याचा सराव एकत्र करत. मला दुर्दम्य इच्छाशक्ती ठेवून परिस्थितीशी झुंज देण्याच्या त्यांच्यातील चिकाटीचे कौतुक वाटे. त्यांना संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही हे मनोमन उमगले होते.
गाळ्यांचे काम पूर्ण झाले, तेथून मुलांना निघावे लागले आणि त्याच काळात त्या चार-पाच जणांपैकी एकाच्या प्रयत्नांना यश आले, तो ‘सीआरपीएफ’च्या परीक्षेत उत्तीर्ण झाला ! त्याला केंद्र सरकारची स्थायी नोकरी मिळाली. तो मुलगा आमच्या शेतीत काम करणाऱ्या शेतमजुराचा होता. त्याची वाहऽ वा गावात झाली. त्यामुळे इतर मुलांचे मनोबल उंचावले. मग मी ठरवले, की त्या विद्यार्थ्यांनी अर्धवट गाळ्यामध्ये अभ्यासिका सुरू केली आहेच, तर त्याला आपण औपचारिक मूर्त स्वरूप द्यावे. मी घरी सर्वांशी बोलून मागील बाजूच्या दोन गाळ्यांमधील भिंत काढून ते एकत्र केले.
वाणेवाडी आणि सोमेश्वर परिसरात चार-पाच अभ्यासिका आधीपासून होत्या. मी वीस लोखंडी खुर्च्या प्याड लावून बनवून घेतल्या, मुलांची पुस्तके ठेवण्यासाठी लोखंडी कपाट घेतले. सर्व मिळून लाखभर रुपये खर्च झाला आणि वीस मुलांना एका वेळी वापरता येईल अशी छोटेखानी अभ्यासिका आकारास आली. अभ्यासिकेचे उद्घाटन 19 फेब्रुवारी 2021 रोजी केले. सेवानिवृत्त डी आय जी राजेंद्र धामणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. मी अभ्यासिकेचे नामकरण ‘विवेकदिशा’ असे केले आहे.
अभ्यासिकेची नियमावली सुरुवातीला आलेल्या चार मुलांसोबत बसून, चर्चा करून बनवली. एकाने चावीची जबाबदारी घ्यावी; तसेच, अभ्यासिका साफसफाईची जबाबदारी विद्यार्थी स्वत: आळीपाळीने घेतील असे ठरले. अभ्यासिका विनामूल्य असेल हे स्पष्ट होते, मात्र वीजभाडे आणि इतर लहानसहान खर्च भागवता यावेत म्हणून मुलांनी मासिक सव्वाशे रुपये द्यावे असे ठरवण्यात आले. व्यावसायिक पातळीवरील परिसरातील अभ्यासिकांचे मासिक शुल्क तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत आहे. गरजू गरीब विद्यार्थ्यांसाठी सहज उपलब्ध पर्याय म्हणून ‘विवेकदिशा’ पुढे आले. हळूहळू विद्यार्थी संख्या वाढली. मित्रपरिवारातील एकीच्या सहाय्याने सीसीटीव्ही कॅमेरा लावून घेतला. अभ्यासिकेचे स्वरूप विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांकडून कार्यरत असे निश्चित झाले.
‘विवेकदिशा’ अभ्यासिकेचा पहिला विद्यार्थी पोलिसात भरती दोन वर्षांनी झाला. त्यामुळे गावातील ह्या छोटेखानी आणि भरचौकात आत कोठेतरी दडून बसलेल्या अभ्यासिकेच्या अस्तित्वाची दाखल घेतली गेली ! तेथे येणाऱ्या तरुणांची कौटुंबिक, बौद्धिक क्षमता सीमित आहे. एमपीएससी, युपीएससी अशी त्यांची मोठी स्वप्ने नाहीत, प्रामुख्याने, ते आर्मी आणि पोलिसात भरती होण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांचा तो कल संयुक्तिकही वाटतो. ‘विवेकदिशा’ अभ्यासिका जवळपास साडेतीन वर्षे कार्यरत आहे. अभ्यासिकेत येणारे चार विद्यार्थी राज्य पोलिस दलात भरती झाले आहेत. शालेय विद्यार्थीदेखील परीक्षांच्या काळात अभ्यासिकेत येऊ लागले आहेत. मी स्वत: गावी स्थित नाही. अभ्यासिका चालवण्यात अडचणी येतात. पण विद्यार्थीच त्यातून मार्ग काढतात, ते वरचेवर माझ्याशी संवाद साधतात.
वाचनालये, अभ्यासिका ह्या सुविधा समाजात पायाभूत मानून ‘गाव तेथे अभ्यासिका’ असा प्रकल्प हाती घेण्याचे प्रयोजन डोक्यात आहे. अशा सकारात्मक केंद्रामुळे समाजात अभ्यासाचे, वाचनाचे वातावरण घडण्यास मदत होते. अभ्यासिकेचे कार्य सिद्धीस पोचल्याने माझा आत्मविश्वास वाढला व मी पत्नीस आणि कुटुंबीयांस सोबत घेऊन ‘सहजकर्ता’ प्रतिष्ठान स्थापित केले आहे. शिक्षण, आरोग्य, शेती ह्या महत्त्वाच्या विषयांत सरकारी धोरणे लक्षात घेऊन समाजाशी जोडून संघटनात्मक पातळीवर कार्य उभारण्याच्या कार्यात ‘कॅटॅलिस्ट’ म्हणजेच उत्प्रेरक म्हणून भूमिका निभावत आहोत. संस्थेची स्थापना 2022 मध्ये केली आहे. मी आरोग्य क्षेत्रातच कार्यरत असल्याने ‘सहजकर्ता’ प्रतिष्ठानमार्फत वाणेवाडी परिसरातील गरजू रुग्णांना मार्गदर्शन करणे, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे वगैरे लहान पण उपयुक्त कामे हाती घेण्यात आली आहेत. पुण्यातील ‘जागृती’ ट्रस्टसोबत जोडून घेऊन 2023 मध्ये वाणेवाडी आणि आसपासच्या परिसरात मानसिक आरोग्यासाठीचा पहिलावहिला उपक्रम – ‘मनोजागृती’, सुरू केला आहे. त्याद्वारे तीव्र मानसिक आजाराने त्रस्त पंचक्रोशीतील रुग्णांना गावातच उपचार मिळणे शक्य झाले आहे.
– संदीप चव्हाण 9890123787 drsandeep85@gmail.com