वामन पंडितांची कोरेगावची समाधी (Marathi Poet Vaman Pandit of Seventeenth Century)

वामन पंडित यांची समाधी

          वामन पंडित यांची ख्याती श्लोकांबद्दल विशेष आहे. त्यांची सुश्लोक वामनाचाअशी प्रसिद्धी आहे. यमक, अनुप्रास, स्वभावोक्ती हे त्यांचे आवडते अलंकार होते. त्यांनी त्यांचा हव्यास अधिक केल्याने त्यांना यमक्या-वामनअसेही म्हणत. वामन यांनी समश्लोकी टीका लिहिल्यानंतर जगदुपयोगीअशी टीका लिहावी अशा आशयाची सूचना वामन यांना त्यांचे अनेक शिष्य, संत, भक्तयोगी यांनी केली. त्या सूचनेतून यथार्थदीपिकेचा जन्म झाला. वामन यांनी त्यांच्या टीकेला भावार्थदीपिकेच्या पार्श्वभूमीवर यथार्थदीपिकाअसे नाव दिले आहे. वामन पंडित यांचे  मराठी व संस्कृत या दोन्ही भाषांवर समान प्रभुत्व होते.

            अभ्यासकांनी तर वामन पंडित एक की अनेक याविषयी वेगवेगळी मते व्यक्त केली आहेत. बाळकृष्ण अनंत भिडे यांनी वामन पंडित पाच असल्याचे मत मांडलेले आहे. ते पाच असे -1. यथार्थदीपिका हा गीतेवरील भाष्यग्रंथ लिहिणारा, 2. स्वतःला वासिष्ठगोत्री म्हणवणारा, 3. शांडिल्यगोत्री, 4. शृंगारप्रिय, 5. यमक्या वामन. संतचरित्रकार न.र. आजगावकर यांच्या मते वामन दोनच आहेत.

           

समाधी स्थळावरील फलक

           वामन पंडित यांच्या नावे एक समाधी वारणा नदीकाठी कोरेगाव (जि. सांगली) येथे आहे, या वामन पंडित यांचा जन्म विजापूर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई, त्यांच्या घराण्याचे नाव शेष. ते घराणे मूळ नांदेडचे. त्यांचे वास्तव्य विजापुरी होते. ते बुध्दिमान आणि विद्याव्यासंगी म्हणून प्रसिध्द होते. त्यांचा फार्सी भाषेचादेखील अभ्यास होता. ते विजापूरच्या आदिलशाही दरबारात काही दिवस होते. त्यांना त्यांच्यावर अन्याय होईल अशी रास्त भीती वाटली. म्हणून त्यांनी त्यांच्या पत्नीसह विजापूर सोडून काशी क्षेत्र गाठले. तेथे त्यांनी वेद आणि शास्त्रे यांचा अभ्यास केला आणि वादविवादात श्रेष्ठत्व सिध्द केले.

नारायण मंदिर

           वामन पंडित हे रामदासकालीनकवी होत. मात्र वामन पंडितांच्या काळाबाबतही अनिश्‍चितता आहे. परंतु कोरेगाव व सांगली येथील माहितीवरून त्यांचा काळ इसवी सन 1607-1695 असा निष्पन्न होतो. वामन पंडितांची समाधी ज्या नारायण मंदिराच्या स्थानी आहे त्या ठिकाणी पूर्वी वडाचे मोठे झाड होते. ते नूतनीकरणाच्या वेळी काढून टाकले गेले. तेथून जवळून वारणा नदी वाहते. काठावर वामन पंडितांची समाधी आहे. नारायण मंदिर पुरातन असून अलिकडे त्याचा जीर्णोध्दार केला. पूर्वी तेथे गाव होते पण नंतर ते कोरेगावजवळ हलवण्यात आले. त्यामुळे नारायणाचे मंदिर आणि वामन पंडितांची समाधी गावाबाहेर पडली. वामन पंडित यांचे निधन कोरेगाव येथे झाल्यावर त्यांची समाधी 19 एप्रिल 1695 (वैशाख शुध्द 6, शके 1637) बांधली गेली. तशी नोंद समाधीवर आहे. वामन पंडित यांच्या जन्म-मृत्यूचे तपशील पुढीलप्रमाणे सांगितले जातात. जन्म इसवी सन 1607 (शके 1539) – समाधी इसवी सन 1695 (वैशाख शुध्द 6, शके 1617). वामन पंडितांची आणखी एक समाधी वाई तालुक्‍यातील भोगाव येथेही दाखवली जाते. ती त्यांच्या एका शिष्याने बांधली आहे. तिला प्रसाद-समाधी वा प्रतीक-समाधी असे मानतात.

            वामन पंडित हे प्राचीन मराठी पंडिती काव्याचे प्रमुख प्रतिनिधी होत. त्यांनी यथार्थदीपिकाहा ग्रंथ कोरेगाव (सांगली) येथे लिहिला. त्यांनी जवळजवळ बारा लाख श्लोक व पन्नास हजार कविता (काव्य) लिहिल्या आहेत. त्यांच्या नावावर निगमसार, समश्लोकी, चित्सुधा, तत्त्वमाला, श्रुतीसार कर्मतत्त्व, राजयोग, गीतार्णव सुधा इत्यादी ग्रंथ, काही छोटी प्रकरणे असे लेखन आहे. वामन यांनी रामजन्म, अहिल्योद्धार, सीतास्वयंवर, भरतभाव, लोपामुद्रासंवाद, कृष्णजन्म, बालक्रीडा, वनसुधा, वेणुसुधा, मृतिकाभक्षण, कंसवध, भामाविलास, राधाविलास, कात्यायनीवृत्त, गजेंद्रमोक्ष अशी आख्याने रचली आहेत. त्यांच्या आख्यानात नाट्यपूर्णता, रूपकात्मकता, आकर्षकता, कल्पकता, रचनेचा सफाईदारपणा, शब्दरेखाटन अशी कौशल्य आढळतात.

हा ही लेख वाचा – मराठी पंडिती (आख्यानपर कविता) (Marathi Pandit Poet)

            कोरेगावच्या मंदिरातील नारायणाची मूर्ती गंडकी नदीतील शिलांमधील आहे. मूर्ती आकर्षक व प्रमाणबध्द दिसते. ती मूर्ती तेथे शेत नांगरताना सापडली असे सांगितले जाते. त्या मूर्तीच्या पायाचा अंगठा दुखावलेला असून, सापडलेली मूर्ती तशीच तेथील मंदिरात स्थापन केली आहे. छत्रपती राजाराम महाराज यांनी त्या देवस्थानाला जमीन दान दिली अशी नोंद आहे.

- प्रल्हाद कुलकर्णी 8830072503 drpakulk@yahoo.com

————————————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here