‘वंदे मातरम्’ या गीताला भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 1876 मध्ये लिहिलेल्या ‘आनंद मठ’ या कादंबरीतील आहे. ते रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम देशापुढे आणले. त्या गीताला प्रसिद्ध संगीतकार पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांनी स्वरबद्ध केले आणि ते गीत अजरामर ठरले ! ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हणून राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात वाराणसी येथे 1905 साली स्वीकारले गेले. त्या गीताचे सादरीकरण स्वातंत्र्यलढ्याच्या काळात श्रोत्यांच्या हृदयाशी थेट भिडत असे. त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची तीव्र भावना जागृत होई. खुदिराम बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अशा अनेक क्रांतिवीरांनी त्यांचे प्राण ‘वंदे मातरम्’चा उद्घोष करून सोडले.
हैदराबाद संस्थानाच्या स्वातंत्र्यलढ्याची सुरुवातदेखील ‘वंदे मातरम्’ गीतावर आधारित चळवळीने झाली. हैदराबाद संस्थानात निजामाच्या दडपशाही विरूद्ध अनेक संघटनांनी 1938 साली एकाच वेळी आंदोलन छेडले. हैदराबाद स्टेट काँग्रेस, आर्य समाज, हिंदू महासभा यांचे सत्याग्रह आणि विद्यार्थ्यांची ‘वंदे मातरम्’ चळवळ अशा चोहो बाजूंनी रयतेने निजाम सरकारला घेरले. त्यात ‘वंदे मातरम्’ चळवळ कोणत्याही पक्षाची अथवा संघटनेची नव्हती. ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त आंदोलन होते. ‘वंदे मातरम्’ चळवळीने हैदराबाद संस्थानाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम केले आहेत.
संस्थानातील सर्व महाविद्यालयांत हिंदू आणि मुसलमान विद्यार्थ्यांना, प्रार्थना ‘दो अल में रिया सबे’ म्हणजे ‘निजाम दीर्घायुषी होऊ दे’ ही म्हणावी लागत असे. ‘वंदे मातरम्’ चळवळीची पहिली ठिणगी औरंगाबाद महाविद्यालयात पडली. गोविंदभाई श्रॉफ औरंगाबाद महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करत होते. त्यांच्या प्रेरणेने विद्यालयातील सर्व हिंदू विद्यार्थ्यांनी निजामाचे गौरव गीत गाण्याऐवजी ‘वंदे मातरम’ हे गीत गाण्याची प्रथा सुरू केली. विद्यापीठाच्या प्रशासनाने त्याला विरोध केला, ‘वंदे मातरम्’ हे गीत म्हणण्यास बंदी केली. औरंगाबाद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंदोलन 16 नोव्हेंबर 1938 रोजी पुकारले. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर, ते प्रकरण घेऊन प्राचार्य हैदराबाद येथे कुलगुरू आणि शिक्षणमंत्री नवाब मेहंदी नवाज यांच्याकडे गेले. शिक्षणमंत्र्यांनी ‘वंदे मातरम्’वर बंदी आणून औरंगाबादच्या कलेक्टरला योग्य ती कारवाई करण्यास कळवले. तरीही विद्यार्थ्यांनी त्यांचा संप चालू ठेवला !
औरंगाबाद महाविद्यालयातील आंदोलनाची बातमी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांपर्यंत पोचली. त्याला पार्श्वभूमी ठरली ती हैदराबाद स्टेट काँग्रेसचे नेते रामानंद तीर्थ यांनी उस्मानिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसमोर केलेले प्रभावी असे भाषण. त्यांनी ते जन्माष्टमीच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी केले होते. विद्यापीठातील विद्यार्थी राष्ट्रीय भावनेने प्रेरित झाले होते. त्यांनीही औरंगाबाद येथील आंदोलनाची बातमी कळताच ‘वंदे मातरम्’ आंदोलन छेडले. निजाम सरकारने पूर्ण संस्थानात ‘वंदे मातरम्’ म्हणण्यास बंदी आणली. उलट, आंदोलन संपूर्ण संस्थानभर पाहता पाहता पसरले. संस्थानातील महाविद्यालये ओस पडली. निजाम सरकारने एका पत्रकाद्वारे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाणीचा संदेश 13 डिसेंबर 1938 रोजी दिला. तो आदेश विद्यार्थ्यांना झाल्या प्रकाराची माफी मागून महाविद्यालयांतून परत रुजू होण्याचा होता, परंतु विद्यार्थ्यांनी निजामाच्या आदेशाला भीक घातली नाही. राज्यव्यापी आंदोलन चालूच राहिले. अखेर, निजाम सरकारने कठोर भूमिका घेऊन राज्यभरात बाराशेहून अधिक विद्यार्थ्यांना निलंबित केले. त्यात मराठवाड्याच्या औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद, बीड आणि नांदेड या पाच जिल्ह्यांतील अनेक विद्यार्थ्यांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबण्याची वेळ आली होती. परंतु विद्यार्थ्यांना परिणामांची पर्वा नव्हती. ते ध्येयाने प्रेरित झाले होते. अखेर गांधीजी, सुभाषचंद्र बोस यांनी मध्यस्थी करून त्या विद्यार्थ्यांना ब्रिटिश अधिपत्याखालील भारतात असलेल्या विद्यापीठांत प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न केले. त्यांना यश येऊन नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू टी.जे. केदार यांनी त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे कबूल केले. त्याचबरोबर जबलपूर विद्यापीठाने देखील काही विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. हैदराबाद संस्थानात शिक्षणाचे माध्यम उर्दू होते तर नागपूर आणि जबलपूर येथे अभ्यासक्रम इंग्रजी माध्यमातून होता. विद्यार्थ्यांना पदवी मिळवण्यासाठी अर्थात परिश्रम करावे लागले, परंतु विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याचा प्रश्न अखेर सुटला.
‘वंदे मातरम्’ चळवळ आणि इतर सत्याग्रह यांचा परिणाम म्हणून निजाम सरकारने नमते घेतले आणि धार्मिक व नागरी स्वातंत्र्याबाबत अनेक सुधारणा 1939 मध्ये घोषित केल्या. ‘वंदे मातरम्’ चळवळीचे त्याहीपेक्षा मोठे यश म्हणजे त्या चळवळीने अनेक स्वातंत्र्य सैनिक देशाला मिळवून दिले. जेमतेम एकवीस वर्षांच्या रामचंद्रराव या तरुणाला 7 फेब्रुवारी 1939 रोजी उस्मानिया विद्यापीठाच्या आवारात पोलिसांनी अटक केली. ताकीद देऊनही रामचंद्रने ‘वंदे मातरम्’ हे गीत विद्यापीठाच्या आवारात गायले. त्याला चंचलगुडा जेलमध्ये बंदिवान करण्यात आले. रामचंद्र जेलमध्ये गेल्यावरही ‘वंदे मातरम’च्या घोषणा देत राहिला. सत्याग्रहातील इतर कैदीदेखील त्या घोषणांत सामील झाले. त्यावर जेलरने रामचंद्रला चोवीस कोड्यांची शिक्षा सुनावली. प्रत्येक कोड्यामागे रामचंद्र ‘वंदे मातरम्’ अशी घोषणा करत राहिला. शरीरावरील जखमांतून रक्त वाहू लागले. अखेर, रामचंद्र रक्तस्रावाने मूर्च्छित झाला. तरीही जेलरने त्याला शिक्षा पूर्ण होईपर्यंत कोडे मारले.
स्वामी रामानंद तीर्थ त्याच जेलमध्ये बंदिवान होते. त्यांनी त्या घटनेचा उल्लेख त्यांच्या आत्मचरित्रात केला आहे. रामचंद्र जेलमधून सुटल्यानंतर वीर सावरकर यांनी रामचंद्रचा ‘वंदे मातरम् रामचंद्रराव’ असा उल्लेख सन्मानाने केला आणि रामचंद्रराव ‘वंदे मातरम् रामचंद्रराव’ म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे, 1948 मध्ये ‘वंदे मातरम् रामचंद्रराव’ यांनी ‘वकील समिती’त भाग घेऊन रझाकारांच्या अत्याचाराची माहिती भारत सरकारला पुरवली. भारत सरकारला ‘ऑपरेशन पोलो’ अमलात आणण्यासाठी तो पुरावा उपयोगी पडला. रामचंद्रराव आंध्र प्रदेश विधानसभेचे सदस्य म्हणून स्वातंत्र्योत्तर काळातही निवडून आले.
देशाचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव हे देखील ‘वंदे मातरम्’ चळवळीचे एक प्रमुख उदाहरण आहेत. ते वारंगल येथील महाविद्यालयात 1938 साली शिकत होते. ते रामानंद तीर्थ यांना गुरू मानत. त्यांनी वयाच्या सतराव्या वर्षी ‘वंदे मातरम्’ चळवळीत उडी घेतली. नरसिंहराव यांनादेखील इतर विद्यार्थ्यांप्रमाणे विद्यापीठातून निलंबित करण्यात आले. नरसिंहराव यांनी पुढे नागपूर विद्यापीठात प्रवेश घेऊन पदवी शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नरसिंहराव यांनी स्वातंत्र्यलढ्यात पूर्ण वेळ भाग घेतला. ते स्वातंत्र्योत्तर काळात राजकारणात सक्रिय भाग घेऊन हैदराबाद राज्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान झाले.
–गिरीश घाटे 9820146432 ghategp@gmail.com
खूप सुंदर लेख…माहितीपूर्ण..