रोपवाटिकांची प्रयोगशीलता व कृषिविस्तार

ropvatika

बदलत्या हवामानाचे मोठे संकट शेतीसमोर उभे आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या तडाख्यांची तीव्रता गेल्या दोन वर्षांत अधिक जाणवत आहे. त्यामुळे शेती पीकपद्धत पार बदलून गेली आहे. शेती व्यवसायाच्या विस्ताराचे काम करणाऱ्या रोपवाटिका-नर्सरीज यांच्यासारखे अनुषंगिक उद्योगही त्यात भरडले जात आहेत. अनियमित पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेला दुष्काळाचा मोठा फेरा या चक्रातून त्या व्यवसायाला जावे लागत आहे. पाणीटंचाईच्या झळा जानेवारीपासूनच सुरू होतात. पुढे मार्च-एप्रिल-मे हे तीन महिने रोपवाटिकांतील रोपे जगवावी कशी याची चिंता वाटिकाउद्योजकांना लागते.

पाच-दहा वर्षांतील अनुभव बघा. ऊसाखालील क्षेत्र दोन-तीन वर्षें अचानक वाढले. परिणामी, भाजीपाला-केळी यांखालील क्षेत्रात मोठी घट झाली. त्यामुळे केळी आणि भाजीपाला अशा नगदी पिकांच्या रोपवाटिकांना मोठा फटका बसला. मात्र, त्याच वेळी ऊस रोपवाटिकांची चलती सुरू झाली व त्यांचे पेव फुटले, पण २०१९च्या उन्हाळ्यात पुन्हा तीव्र स्वरूपाच्या पाणीटंचाईमुळे शिवारात पाणीच राहिले नाही. त्यामुळे नवीन लागणी होताना दिसली नाही. असलेला ऊस जनावरांच्या चारा छावण्यांसाठी आणि वैरणीसाठी तुटू लागला. त्यामुळे रोपवाटिकांसाठी मंदीचे नवे चक्र पुन्हा तयार झाले. शेतकरी कमी पाण्यावर येणारी भाजीपाला, फुलझाडे आणि इतर छोटीमोठी पिके घेण्यावर भर देऊ लागला. भाजीपाल्याच्या रोपवाटिका त्यामुळे पुन्हा फॉर्मात येऊ लागल्या, पण एकूण उलाढाल मंदावलेलीच राहिली. 

शेतकरी बेभरवशी पावसाच्या दुष्काळाला गेली दोन वर्षें सामोरा जात आहे. शेतीवर आधारित अनेक व्यवसाय मोडकळीस आले आहेत; तोट्यातील व्यवहार बंद केले गेले आहेत. शेतीतील सृजनशीलतेला मोठी खीळ -manthanबसलेली आहे. शेतकरी स्वतःला मात्र पदरमोड करून प्रतिवर्षीप्रमाणे जमेल तेवढा शेतीत गुंतवून घेत आहे. अशा बिकट अवस्थेत शेतकऱ्यांना आधार वाटतो तो रोपवाटिका, नर्सरीज, टिश्युकल्चर लॅब आणि कृषी सेवा केंद्रे अशा नव्या स्वरूपातील शेतीसंस्थांचा. शेतीत जे काही प्रयोग होतात, त्यात या रोपवाटिकांचा वाटा मोलाचा आहे. त्यांना प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे. रोपवाटिका, नर्सरी नव्या व्यवसायवृद्धीसाठी सज्ज झाल्या आहेत, पण पुरेशा सोयीसुविधांविना राज्यातील भाजीपाला, ऊस, फळबागा, टिश्युकल्चर रोपवाटिका व्यवसाय आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर सतत असतात. रोपवाटिका व्यवसायाचे स्वरूप बदलले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, धाडस, मोठी गुंतवणूक आणि व्यवसायाची वाढती जोखीम यांमुळे नवे प्रयोग करण्यास कोणी तयार नाही. आहे तो व्यवसाय, पूर्वीचे विश्वासाचे गिऱ्हाईक टिकवण्यावर भर दिला जात आहे. 

काळ बदलला आहे, शेतीतील उत्पादनाची शाश्वती राहिलेली नाही. शेतीमध्ये मजुरांची मोठी वानवा आहे. त्यासाठी मोठी यातायात करावी लागत आहे. येणाऱ्या मजुरांच्या प्रशिक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. मजुरांच्या पळवापळवीचे प्रकार शेती व्यवसायात सुरू झालेले आहेत. मजुरांच्या मानाने त्यांच्याकडून काम होत नाही. अशा अनेक समस्यांनी मंडळी त्रस्त आहेत. रोपांच्या उत्पादनाचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे आणि भागा-भागांत रोपवाटिका सुरू झाल्याने स्पर्धा बरीच आहे, गिऱ्हाईक कमी झालेले आहे. व्यवसायाला एजंटांनी घेरले आहे. नवख्या भागात त्या एजंटांशिवाय कोणी व्यवसायिक धंदा करू शकत नाही. त्यातून गंमत म्हणजे ज्यांची जागेवर एका कांडीची रोपवाटिका, नर्सरी नाही, असे अनेक लोक त्या व्यवसायात मोठी उलाढाल करताना दिसतात. रोज नवा सोयरा शोधला जातो. त्यामुळे फसवणुकीचे प्रकार पुढे मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यावर मात करण्यासाठी संघटित प्रयत्न झाले. मात्र, त्यांच्यातील फाटाफुटीने ते असफल ठरले. 

-ropvatika-रोपवाटिकांचे पट्टे महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये तयार झालेले आहेत. विशिष्ट भागांमध्ये भाजीपाल्याच्या रोपवाटिका दिसतात. ऊसाच्या, फळबागांच्या रोपवाटिका, नर्सरी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. रोपवाटिकांमुळे त्या त्या परिसराचा विकास होण्याला मोठी चालना मिळालेली आहे. किंबहुना, अशा रोपवाटिका, नर्सरी यांनी त्या त्या गावाला नवी ओळख लाभली आहे. ती नवी ओळख शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीची आहे. ती मंडळी नवनवीन कृषिसंशोधन, नवीन वाण, प्रभावी तंत्रज्ञानाचा वापर, शेतकऱ्यांशी उत्तम संवाद आणि थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषिविस्ताराचे महत्त्वाचे काम करत असतात. त्यांच्या व्यावसायिक दृष्टिकोनामुळे कोट्यवधीची उलाढाल रोज होते. रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. कृषिपूरक अनेक व्यवसायांना नर्सरी धंद्याने तेजीचे दिवस दिले आहेत.

हे ही लेख वाचा – 
जलतज्ज्ञ राजेंद्रसिंग यांची काही उद्घोषिते
लामकानी : भरदुष्काळात चराईचे कुरण

विश्वासार्हता ही त्या व्यवसायाची पहिली पायरी मानली जाते. जी मंडळी वर्षानुवर्षें या व्यवसायात स्थिरस्थावर झाली आहेत, त्यांच्या पाठीशी त्याच एका मुद्याचा मोठा आधार आहे. ती मंडळी विश्वासार्हतेच्या जोरावर प्रांताबाहेरील शेतकरी त्यांच्याकडे आकर्षित करून घेत आहेत. कोणी भाजीपाल्याच्या रोपांची निर्मिती नावीन्यपूर्ण करतो, कोठे ऊसाच्या विविध व्हरायटीची आणि अनेक संकटांवर सहज मात करतील अशा रोपांची निर्मिती केली जात आहे. टिश्यूकल्चर रोपांच्या निर्मितीत लक्ष गुंतले आहे, त्याच वेळी निवड पद्धतीने चांगल्या दर्ज्याच्या रोपांचीही निर्मिती केली जात आहे. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार व मागणीनुसार त्याला विविध रोपांचा पुरवठा केला जात आहे. रोपवाटिकांकडून विक्रीपश्चात विविध सोयी आणि सुविधा दिल्या गेल्याने शेतकऱ्यांना त्याच्या बांधावर आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होऊ लागले आहे. त्याचा लाभ त्यांना सहजपणे होत आहे. अनेक व्यावसायिक ऑटोमायझेशनच्या टप्प्यावर आले आहेत. त्यातून वेळ, श्रम, पैसा यांची बचत केली जात आहे. किंबहुना, बचत हीच मोठी कमाई आहे, हे या व्यवसायिकांच्याही लक्षात आलेले आहे. 

खासगी कंपन्यांना त्यांच्या कार्यविस्तारासाठी रोपवाटिकांचाच भरवसा वाटतो. अनेक उद्योजक त्यांचे कौशल्य घेऊन छोट्या-मोठ्या गावांतील रोपवाटिका, नर्सरीधारक यांच्या दिमतीला उभे आहेत. मात्र, शासन अजूनही विद्यापीठाच्या संशोधनावर आणि ‘डिपार्टमेंट’च्या कृषी विस्तारावर अवलंबून आहे. त्यामुळे चांगले निर्णय, नवीन संशोधन आणि चांगले वाण शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही. रोपवाटिका क्षेत्रातील छोट्या व्यवसायिकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. शासनाने त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे.

ropशासनाचे कृषी खाते सतरा हजार कर्मचारी आणि अधिकारी यांचे पाठबळ असूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर समाधानकारक काम करू शकत नाही. कृषिविस्ताराचे नेटवर्क पुरते मोडून पडलेले आहे. राज्यात चार कृषी विद्यापीठे, एक पशुसंवर्धन विद्यापीठ असतानाही कृषी संशोधनाचा लाभ शेतकऱ्यांना होत नाही. त्या संस्थांत कुंपणाच्या आत संशोधन खूप होत असेल, पण ते शेतकऱ्यांच्या उपयोगाला येत नाही. कृषिविस्ताराशिवाय कृषिविकासाला अर्थ नाही!  

रोपवाटिका, नर्सरी या व्यवसायाचे पारंपरिक स्वरूप केव्हाच बदलेले आहे. मार्केटिंगचे नवे फंडे आत्मसात करून राज्याबाहेरील व्यवसाय कसा खेचून आणावा याचे धडे ही मंडळी एकमेकांना देत व घेतही आहेत.

– रावसाहेब पुजारी 9881747325
sheti.pragati@gmail.com
संपादक, शेतीप्रगती मासिक, कोल्हापूर

About Post Author