‘रामकृष्ण मिशन’चा मानवता धर्म

4
33
_Ramakrishna_Mission_1.jpg

‘रामकृष्ण मिशन’ ही एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस बंगालमध्ये स्थापन झालेली आध्यात्मिक क्षेत्रातील सेवाभावी संस्था आहे. स्वामी विवेकानंद यांनी त्या संस्थेची उभारणी केली. रामकृष्ण परमहंस हे आयुष्याच्या अखेरीस कर्करोगाने आजारी असताना, त्यांच्या आठ-दहा तरुण शिष्यांना व विशेषकरून स्वामी विवेकानंदांना (म्हणजे त्यावेळच्या नरेंद्राला) संवादांतून मार्गदर्शन करत असत. रामकृष्ण मिशनच्या स्थापनेचे बीज त्या संवादांत आहे. पुढे काही दिवसांनंतर, रामकृष्णांनी त्यांच्या अंतरंगशिष्यांपैकी नरेंद्र राखाल आदी अकरा जणांना भगवी वस्त्रे व रुद्राक्षाच्या माळा दिल्या, एक छोटासा विधी करून संन्यास दीक्षा दिली आणि एके दिवशी, भिक्षा मागून आणण्यास सांगितले. रामकृष्णांनी दिलेला तो संन्यास म्हणजे ‘रामकृष्ण मिशन’चा आरंभ होय अशी त्यांच्या शिष्यांची धारणा आहे. रामकृष्ण अखेरीस निरवानिरव करताना नरेंद्रास म्हणाले, ‘माझ्या मागे सर्व मुलांची नीट काळजी घे, त्यांतील कोणी संसाराच्या पाशात अडकणार नाही ते पाहा.’ त्यांनी त्यांची पत्नी शारदादेवी यांनाही, ‘तुम्हाला त्यासाठी काही कार्य यापुढे करावे लागेल’ असे सांगितले होते. शारदामातेचे वात्सल्यपूर्ण मार्गदर्शन त्या अंतरंगशिष्यांना १९२० पर्यंत मिळत होते.

श्री रामकृष्णांनी महासमाधी पंधरा ऑगस्ट १८८६ रोजी घेतल्यानंतर त्यांचे सारे अंतरंगशिष्य कोलकात्याच्या वराहनगर भागातील एका पडक्या घरात राहत असत. तोच पहिला ‘रामकृष्ण मठ’! रामकृष्णांचे काही गृहस्थाश्रमी शिष्य त्यासाठी आर्थिक साहाय्य करत. शिष्यांचा जीवनक्रम आध्यात्मिक साधना, धर्मग्रंथांचा अभ्यास व अधूनमधून तीर्थयात्रा असा होता. त्यांनी विधिपूर्वक संन्यासदीक्षा १८८७ च्या आरंभी ‘विरजा’ होम करून घेतली व नवी नावे धारण केली. त्यांची नावे स्वामी विवेकानंद, सर्वस्वामी ब्रह्मानंद, शारदानंद, प्रेमानंद, शिवानंद, अभेदानंद, तुरीयानंद, रामकृष्णानंद, त्रिगुणातीतानंद, योगानंद, निरजानंद, अद्वैतानंद आणि अद्भुतानंद अशी झाली. त्या सर्वांच्या सहकार्यातून ‘रामकृष्ण मिशन’ पंथ व संघटना आकारास आले.

मात्र ते प्रत्यक्षात उतरण्यापूर्वी, स्वामी विवेकानंदांनी भारतभ्रमण केले होते, शिकागो येथील सर्व धर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधीत्व करून अपूर्व यश मिळवले होते. त्यांनी इंग्लंड-अमेरिकेत संचार सुमारे साडेतीन वर्षें करून ‘वेदान्त सोसायटी’ची स्थापना केली. विवेकानंदांनी त्यांचे गुरूबंधू व रामकृष्णांचे प्रमुख अनुयायी यांची खास सभा १ मे १८९७ या दिवशी कोलकात्याला बागबझार भागात बलराम बसू यांच्या घरी घेऊन ‘रामकृष्ण मिशन’ची रीतसर स्थापना केली.

त्या संस्थेचे सर्वपरिचित नाव ‘रामकृष्ण मिशन’ हे असले, तरी मूळ शब्द आहे ‘रामकृष्ण संघ’. त्याचे दोन स्वतंत्र भाग ‘रामकृष्ण मठ’ आणि ‘रामकृष्ण मिशन’ असे सोयीसाठी करण्यात आले. मठाच्या शाखांतून धार्मिक कार्य, तर मिशनच्या शाखांद्वारा शिक्षण, दवाखाने व आपत्कालीन साहाय्य-सेवाकार्य अशी विभागणी करण्यात आली. ‘रामकृष्ण संघ’ हा रामकृष्णांच्या जीवनात आविष्कृत झालेल्या आध्यात्मिक सत्यांचा आचार व प्रचार करणे, पाश्चात्य जगात वेदान्त धर्माचा संदेश पोचवणे, भारतात आधुनिक विद्येचा प्रसार करण्यासाठी शिक्षणसंस्था चालवणे अशी ध्येये समोर ठेवून स्थापन केला गेला. ‘रामकृष्ण संघ’ १८९९ मध्ये बेलूरला स्वत:च्या मालकीच्या जागेत आला. त्यांचे केंद्रीय कार्यालय बेलूर येथे आहे. संन्यासी व ब्रह्मचारी मिळून हजारो कार्यकर्ते तेथे कार्यरत आहेत. नवागत ब्रह्मचार्‍यांसाठी बेलूर मठात शिक्षणकेंद्र असून तेथे दोन वर्षांचा पदव्युत्तर पातळीचा अभ्यासक्रम आहे.

स्वामी विवेकानंदांनी संघासाठी बोधचिन्ह बनवले. त्या बोधचिन्हातील लाटा हे कर्माचे प्रतीक, कमळ हे भक्तीचे प्रतीक व उगवता सूर्य हे ज्ञानाचे प्रतीक आहे. चित्राभोवती असलेले सापाचे वेटोळे हे योगाचे व जागृत कुंडलिनी शक्तीचे प्रतीक आहे तर हंस हे परमात्म्याचे प्रतीक आहे. ते बोधचिन्ह असे सुचवते, की कर्म, ज्ञान, भक्ती व योग यांच्या समन्वयी साधनेतून परमात्म्याचे दर्शन घडते.

रामकृष्ण मठ – श्रीरामकृष्णांच्या दिव्य जीवनातून प्रेरणा घेऊन, पावित्र्य आणि वैराग्य यांनी युक्त असे आध्यात्मिक जीवन व्यतीत करणार्‍या साधूंचा संघ अस्तित्वात आणणे आणि त्या संन्यासी साधूंपैकी काहींना शिक्षकाच्या किंवा कार्यकर्त्याच्या भूमिकेने सिद्ध करून जगाच्या कोणत्याही भागात सेवाकार्यास पाठवणे ही ‘रामकृष्ण मठा’च्या कार्याची दिशा आहे, तर रामकृष्ण मिशन – सर्वसाधारण कार्यकर्त्यांचा सहकार साधून त्यांच्या करवी जाती, वर्ण, पंथ आणि देश यांचा भेद न मानता, सर्व मानवांना ईश्वराची रूपे मानून त्यांच्या सेवेची कामे करणे ही ‘रामकृष्ण मिशन’च्या कार्याची दिशा आहे. मठाच्या सर्व शाखांमधून रामकृष्णांची पूजाआरती होते, तर रामकृष्ण, शारदामाता व विवेकानंद यांचे जन्मदिनोत्सव प्रतिवर्षी साजरे होतात. जातिभेद, धर्मभेद वा उच्चनिचभाव तेथे मानला जात नाही.

स्वामी विवेकानंद समाधिस्थ १९०२ मध्ये झाले. मठाचा कार्यभार ब्रह्मानंद, शिवानंद, अखंडानंद आदी गुरूबंधूंनी १९३९ पर्यंत सांभाळला.

मठाच्या ग्रंथप्रकाशन विभागातर्फे भारतीय संस्कृती व रामकृष्ण-विवेकानंदांची विचारधारा यांवरील शेकडो पुस्तके अनेक भाषांमधून प्रसिद्ध झाली आहेत आणि होत आहेत. ‘रामकृष्ण संघा’चे कार्य सर्वस्वी आध्यात्मिक व सांस्कृतिक आहे. संस्था तत्त्वे व ध्येय यांपासून, शंभर वर्षें उलटून गेली तरीही दूर गेलेली नाही. स्वदेशातील गोरगरिबांची सेवा आणि भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीतील शाश्वत मूल्यांचा सार्‍या जगात प्रसार असे कार्य करणारी ती अग्रगण्य संस्था आहे. ‘रामकृष्ण संघा’ने स्त्रीशिक्षणाच्या आणि स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराच्या विषयात केलेले कार्य बहुमोल स्वरूपाचे आहे. हजारो विद्यार्थिनी ‘रामकृष्ण संघा’च्या विविध शिक्षणसंस्थांतून शिकत आहेत. भगिनी निवेदिता यांनी स्थापन केलेली आणि पुढे, त्यांच्याच नावाने प्रसिद्धीस आलेली ‘रामकृष्ण मिशन निवेदिता कन्याशाळा’ ही कोलकात्याच्या बागबाजारातील शिक्षणसंस्था आदर्श समजली जाते. त्या शाळेशी संलग्न ‘शारदा मंदिरा’त व्रतस्थ ब्रह्मचारिणीच्या निवासाची व शिक्षणाची व्यवस्था केली जाते. त्या संस्थेत स्त्री-शिक्षणाचे बीजारोपण झाले आणि पुढे, भारतात ‘रामकृष्ण संघा’ने असंख्य स्त्री-शिक्षणसंस्था उभारल्या. शारदामाता यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने दक्षिणेश्वराच्या काली मंदिराजवळ गंगेच्या किनारी ‘शारदामठा’ची स्थापना १९५४ मध्ये झाली. शारदामठ स्त्रियांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रव्राजिका स्त्रियांनी चालवलेला आहे. कोलकात्यातील शिशुमंगल प्रतिष्ठान आणि मातृभवन (जलपैगुडी) येथील सूतिका सेवामंदिर, काशी व रंगून येथील इस्पितळातील स्त्री-विभाग, काशीचे अपंग स्त्रियांसाठी असलेले निवासगृह, चेन्नईचे शारदा विद्यालय, त्रिचूरचे मातृमंदिर, चोवीस परगण्यातील सारिशा येथील शारदा मंदिर इत्यादी स्त्रियांच्या उन्नतीसाठी चालवलेल्या संस्था म्हणजे ‘रामकृष्ण संघा’च्या स्त्रीविषयक कार्याची प्रतीके होत. त्याशिवाय श्रीरामकृष्ण-शारदा मिशन ही वेगळी संस्थाही कार्यरत आहेच.

रामकृष्ण, शारदामाता, विवेकानंद, निवेदिता यांची चरित्रे आणि उपदेश, रामकृष्णांच्या परंपरेतील सत्पुरुषांची व जगातील थोर धर्मसंस्थापक, साधू व संत यांची चरित्रे व उपदेश यांविषयीची हजारो पुस्तके मिशनमार्फत प्रसृत केली जातात; उपनिषदे आणि अन्य अनेक संस्कृत वेदान्तग्रंथ यांच्या सार्थ व सटीप आवृत्त्या प्रकाशित केल्या जातात. ‘प्रबुद्ध भारत’ हे हिमालयातील मायावती आश्रमातून आणि ‘वेदान्त केसरी’ हे रामकृष्णमठ मयलापूर, चेन्नई येथून अशी दोन इंग्रजी नियतकालिके रामकृष्ण संघाकडून प्रसिद्ध होतात.

बेलूर मठ गंगा नदीच्या काठावर आहे. त्या मठाची राखाडी रंगाच्या दगडांची इमारत भव्य व सुंदर आहे. त्या इमारतीत अनेक प्रकारच्या स्थापत्य पद्धतीचा संगम आहे. लांबून पाहिले असता, ते मंदिर राजपुतांच्या शैलीमध्ये आहे असे वाटते. बाजूने पाहिले तर राजपूत व बंगाली शैली यांचा समन्वय वाटतो. पश्चिमेकडून तो राजपूत राजवाडा असल्याचा भास होतो. त्याचे शिखर बंगाली पद्धतीचे आहे. मठातील सभागृहात अनेक स्तंभ असून तेथे गुहा मंदिरात आल्यासारखे वाटते. तेथील खांबांवर सुंदर कोरीव काम आहे. तेथे आतील दालनात प्रवेश केल्यावर चर्चमध्ये असल्याचा भास होतो. आतील खिडक्या, कमानी, सज्जे हे सर्व मुस्लिम पद्धतीने नटवले आहेत असे जाणवते.

मठातील प्रमुख मंदिर हवेशीर असून स्वच्छ प्रकाश व मोकळी हवा हे त्याचे वैशिष्ट्य आहे. मुख्य मंदिर स्वतंत्र असून प्रदक्षिणेचा मार्ग सुंदर आहे. मुख्य मंदिर एकशेबारा फूट उंच असून वर देखणा घुमट आहे. मुख्य घुमटाभोवती इतर घुमट व मंडप असून मुख्य मंदिर व स्तंभ यांवरील सभागृह यामध्ये अर्धमंडप आहे. ओरिसातील मंदिरांप्रमाणेच दिक्पाल, नवग्रह यांच्या आकृती तेथे कोरलेल्या आहेत. मंदिराभोवती त्यांचे दर्शन घडते.

मठाचे बांधकाम १० मार्च १९३६ रोजी सुरू झाले. कोलकाताचे प्रसिद्ध शिल्पकार नंदलाल बोस यांनी रामकृष्णांची समाधी अवस्थेतील मूर्ती घडवली. त्यांनी चौकोनी संगमरवरी बैठक मध्यावर थोडे वळण देऊन डमरूसारखी बनवली आहे. पूर्ण उमललेल्या कमळाची आकृती वरील बाजूला असून प्रदक्षिणा मार्गावरही दगडात खोदलेल्या नवग्रहांच्या मूर्ती आहेत. प्रार्थना सभागृह सुमारे दीडशे फूट लांब आहे. मठाजवळ गंगेच्या काठी स्वामी ब्रह्मानंद, स्वामी विवेकानंद, माताजी अशी तीन मंदिरे आहेत.

मठ व मिशन यांच्या भारताच्या सर्व भागांत मिळून नव्वदपर्यंत; तर फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका, अर्जेंटिना, स्वित्झर्लंड, सिंगापूर, मॉरिशस, फिजी बेटे, श्रीलंका व बांगलादेश या इतर देशांत तीसहून अधिक शाखा आहेत. भारतात मिशनतर्फे सर्वसामान्य नागरिकांसाठी सुसज्ज रुग्णालये बांधली गेली आहेत. सुमारे शंभर वसतिगृहांतून हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनींची सोय केली जाते. रोगराई, दुष्काळ, भूकंप, महापूर अशा आपत्कालीन संकटप्रसंगी कार्यकर्त्यांची फौज मदतीला धावून जाते. ‘रामकृष्ण मिशन’ हे आदर्श सेवाभावी केंद्र असून तेथे ‘मानवता’ धर्माचे पालन केले जाते, सांस्कृतिक वारसा जपला जातो आणि नीतिमूल्यांचे जतन केले जाते.

– स्मिता भागवत

९८८१२९९५९२

About Post Author

4 COMMENTS

 1. सर्वानी वाचावी अशी उपयुक्त…
  सर्वानी वाचावी अशी उपयुक्त माहिती

 2. फारच छान माहिती दिली आहे…
  फारच छान माहिती दिली आहे. महाराष्ट्रात असे काही प्रकल्प आहेत का उदा: संस्थेतर्फे चालवत असलेली वसतिगृहे ई. ?
  धन्यवाद,
  Mukund Chaaskar
  7066591007

 3. खूप उपयुक्त माहिती आहे,…
  खूप उपयुक्त माहिती आहे, thank you.

Comments are closed.