राजापूरची गंगा – श्रद्धा आणि विज्ञान

3
647

मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेला राजापूर नावाचं रम्य गाववजा शहर आहे. राजापूरवरून गोव्याकडे जाताना अर्जुना नदीवरचा पूल आणि नंतरचा छोटा घाट ओलांडल्यावर शहरापासून तीन-साडेतीन किलोमीटरवर उन्हाळे नावाचं गाव लागतं. तिथे दर तीन वर्षांनी गंगा प्रकटते. गंगावतरण झाल्यावर महाराष्ट्र तसंच गोव्यातीलही दूरदूरच्या ठिकाणांवरून भाविक तिथं येतात. तिच्या अकस्मात येण्याजाण्याच्या निसर्गाच्या चमत्काराचे सर्वांनाच अप्रूप!

राजापूरची गंगाजिऑलॉजिकल सर्व्हे विभागातील इंग्रजकालीन अधिकारी सी. जे. विल्किन्सन याने कोकणातील भूगर्भरचनेबाबत अभ्यास केला होता. त्याच्या अभ्यासाधारे रत्नागिरीच्या गॅझेटमध्ये राजापूरच्या गंगेबाबत उल्लेख आढळतो. ते पाणी भूगर्भातील हालचालींमुळे सायफन प्रणालीने प्रवाहित होत असावे, असे त्यात म्हटले आहे. मेदिनी पुराणातही त्याचा उल्लेख आहे. स्थानिक दंतकथेनुसार, गंगाजी साळुंके नावाचा कुणबी दरवर्षी पंढरपूरला जात असे. वयोमानानुसार त्याला जाणे जमेनासे झाले, त्यावेळी शेतात काम करताना तो रडू लागला. तेव्हा त्याची आयुष्यभरची सेवा पाहून शेतातल्या एका वटवृक्षाजवळ प्रत्यक्ष गंगा प्रकटली. दंतकथेचा उल्लेखही गॅझेटियरमध्ये आहे.

गंगेचे झरे ३१५० चौरस यार्ड परिसरात आहेत. तेथे मुख्य काशिकुंडासह दगडाने बांधलेली एकूण चौदा कुंडे आहेत. सर्व कुंडांतून पाणी वाहू लागले, की ‘गंगा आली’ असे म्हणतात. गंगेच्या जवळ उन्हाळे येथे गरम पाण्याचे झरे आहेत. त्या ठिकाणी स्नान करून नंतर गंगास्नानाची परंपरा होती; तसेच, गंगास्नानानंतर तीन-साडेतीन मैलांवरच्या धूतपापेश्वराला गंगेच्या पाण्याने अभिषेक करण्याचाही प्रघात होता. गंगेचे पाणी नेऊन आपल्या देवघरात पूजण्याचीही पद्धत आहे.

कविवर्य मोरोपंत १७८९ मध्ये गंगास्नानासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी सव्वीस कडव्यांचे ‘गंगाप्रतिनिधीतीर्थ’ नावाचे गीती वृत्तातील काव्य लिहिले. डॉ. हेराल्ड एच. मान आणि एस.आर. परांजपे यांनी ‘इंटरमिटंट स्प्रिंग्ज अॅट राजापूर इन द बॉम्बे प्रेसिडेन्सी’ नावाचा प्रबंध तयार केला होता. ते दोन्ही उल्लेख ‘राजापूरची गंगा’ या पुस्तकात आहेत.

भाविक राजापूरच्‍या गंगेत स्‍नान करण्‍यासाठी भाविकांची गर्दीदेवस्थानचा रजिस्टर्ड धर्मादाय ट्रस्ट आहे. ‘संस्थान श्री गंगामाई उन्हाळे’ असे त्या ट्रस्टचे नाव. संस्थानचे ट्रस्टी श्रीकांत गोविंद घुगरे यांनी तेथील कार्यक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितले, ‘गंगेच्या आगमनानंतर ओटी भरून तिचं स्वागत केलं जातं. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी उदक शांत केली जाते. काही भाविक दान, लघुरुद आदी कार्यक्रम करतात. तीस किंवा पंचेचाळीस दिवसांनी तिचा उत्सव साजरा होतो. त्यावेळी तिची महापूजा केली जाते. कीर्तनादी धार्मिक कार्यक्रम होतात.’ ऐतिहासिक संदर्भांबाबत ते म्हणाले, की शिवाजी राजांच्या आधीच्या काळात प्रतापरुद नावाच्या राजाने एकवीस ब्राह्मण घराण्यांची गंगास्थानाच्या व्यवस्थेसाठी नेमणूक केली. त्यांना गंगापुत्र असे म्हणतात. देवस्थानच्या ट्रस्टमध्येही गंगापुत्रच आहेत. ट्रस्ट १९५२ मध्ये स्थापन झाला. गंगा येण्याची घटना १३९४ च्या सुमारास सुरू झाली असावी असा अंदाज आहे. मात्र तशा नोंदी आढळत नाहीत. शिवाजी महाराजांनी दोनदा गंगास्नान केल्याचा उल्लेख आहे. इंग्रजांची राजापूर येथील वखार १६६१ साली लुटल्यावर शिवाजी महाराजांनी गंगास्नान केले होते. तसेच, १६६४ मध्ये गागाभट्टांनी तेथे घेतलेल्या ब्राह्मण सभेच्या वेळीही महाराज गंगास्नानाला आले होते. गंगा उन्हाळ्यात आली तर पाऊस त्यावर्षी काहीसा पुढे जातो असा अनुभव आहे. मात्र पावसाळ्यात आली तर तसा काही परिणाम होत नाही. सध्या गंगेचे मंदिर उभारणीचे काम प्रस्तावित आहे.

रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर कॉलेजचे उपप्राचार्य आणि भूगोलाचे प्राध्यापक डॉ. सुरेंद चंद्रकांत ठाकूरदेसाई यांनी राजापूरच्या गंगेविषयी झालेल्या अभ्यासाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, ‘या विषयाचा पूर्ण अभ्यास झालेला नाही. जिऑलॉजी विषयातील दोन-तीन गटांनी केलेल्या थोड्याफार अभ्यासावरून त्याविषयी काही अंदाज बांधण्यात आले आहेत. एका मतानुसार, भूगर्भात घडणाऱ्या सायफनसारख्या यंत्रणेमुळे ती घटना घडते. अर्जुना नदीच्या वरच्या म्हणजेच सह्याद्रीच्या बाजूला भूपृष्ठाखाली पोकळी आहे. ती पोकळी पाण्याने भरली, की ओव्हरफ्लो होऊन पाणी गंगातीर्थातून बाहेर पडते. पोकळीतील पाणी पूर्ण संपेपर्यंत ते वाहत राहते. पोकळी दरवर्षी भरत नसल्याने गंगा येण्याचा कालावधी कमीजास्त होतो. भूमिअंतर्गत पाण्याच्या प्रवाहाचा तो परिणाम असल्याचा दुसरा एक मतप्रवाह आहे. काही ठरावीक काळाने त्या प्रवाहातील पाणी बाहेर पडते.

ते पुढे म्हणाले, की याविषयी शास्त्रीय काम झालेले नाही. आजुबाजूच्या प्रदेशात जमिनीवर छिद्रे घेऊन, खडकांचे नमुने तपासून संशोधन करावे लागेल. ते एखादी व्यक्ती किंवा कॉलेज यांच्या आवाक्याबाहेरचे काम आहे. संशोधनासाठी मोठी गुंतवणूक करायची, म्हणजे त्याची काहीतरी आर्थिक उपयुक्तताही दिसायला हवी. या प्रवाहाचे रहस्य भूपृष्ठाखालच्या भ्रंशाशी निगडित आहे असे म्हणता येईल. कारण एखाद्या ठिकाणचे गरम पाण्याचे झरे हे भूपृष्ठाखाली प्रस्तरभंग असल्याचे पुरावे मानले जातात. राजापूरच्या गंगेच्या जवळच गरम पाण्याचे झरे असल्याने त्या गोष्टीला पुष्टी मिळते. गरम पाण्याचे झरे हे गंधकयुक्त असतात. गंगेच्या ठिकाणी असलेल्या फक्त एक-दोन कुंडांमध्येच गंधकाचे काहीसे प्रमाण आढळते असेही ठाकूरदेसाई यांनी नमूद केलं.

(महाराष्ट्र टाईम्स, २० फेब्रुवारी २०११)

अनिकेत कोनकर
कुसुमसुधा, ६९७, रामचंद्रनगर,
खेडशी, रत्नागिरी – ४१५६३९
९८५०८८०११९
abkonkar@gmail.com

About Post Author

3 COMMENTS

  1. राजापुर ची गंगा आणि संबधित
    राजापूरची गंगा आणि संबधित माहिती अतिशय वेधक. असे भौगोलिक चमत्कार महाराष्टात अनेक ठिकाणी आढळतात.

Comments are closed.