राजकुमार तांगडे – पारंपरिक संकेतांपलिकडचा शिवाजी राजा मांडणारा नाटककार

1
121
carasole
महाराजांची गडतोरणे आणि धोरणे!
राजकुमार तांगडे याने मांडले वास्तव!

नाटक शिवाजी राजांवर पण त्यात भरजरी पोशाख नाहीत. कृत्रिम दरबारी पल्लेदार भाषेचा फुलोरा नाही, तलवारबाजीचा खणखणाट नाही आणि ‘हरहर महादेव’’च्या घोषणांनी दुमदुमलेला शौर्याचा आवही नाही. नाटक आहे लेखक राजकुमार तांगडे यांचे -‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला!’ ते पारंपरिकतेचे संकेत नावापासूनच झुगारून प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडते. तांगडे हा मराठवाड्यातील जांब समर्थ या छोट्या खेडेगावात शेतकरी कुटुंबाचे, वारकरी संप्रदायाचे, शेतीनिष्ठेचे, लोककला-लोकसंस्कृतीचे संस्कार घेऊन नाट्यलेखनातून प्रकटला आहे. संयुक्त कुटुंब. घरात फक्त मोठे बंधू ग्रॅज्युएट. आई अशिक्षित तरीही ती पोरांना इंग्रजी शिकताना पाहून इंग्र‘जी वाचायला शिकलेली. राजकुमार सांगतो, “खोटं बोललं तर तोंडात मारून घेण्याचा नियम होता आमच्याकडे. तो लिहिण्याच्या कामात कामी आला. आमच्या घरी शिव्यादेखील दिलेल्या चालत नसत. त्यामुळे नाटकात विनोद निर्मितीसाठी अश्लीआलता, शिव्या यांच्या कुबड्या वापरणं मला शक्य नव्हतं.” आमच्या आख्या कुटुंबात कोणीच व्यसनी नाही.

राजकुमारच्या जांब गावाला नाटकाची परंपरा आहे. गावात नाटककलेविषयी आस्था आहे. त्यामुळे राजकुमारला लहानपणापासून नाटके बघण्यास मिळाली. ती नाटके पारंपरिक असत. राजकुमार सांगतो, “नंतर जुन्याला नवी करत जाणारी काही नाटकंही पाहिली. म्हणजे चौकट तीच, फॉर्म तोच, पण आशयविषय मात्र आजचा. असं मुक्त नाट्य! त्याच फॉर्ममध्ये आजचं जगणं मांडलेलं.”

राजकुमार बोलत होता, “मी पहिलीत असताना मास्तरांनी मला नाटकात घेतलं होतं. नाटकाशी पहिल्यांदा नाळ जुळली ती तेव्हा. नंतर सातवीत असताना, गावात पाण्याच्या टाकीचं बांधकाम चाललं होतं. ते रोज पाहत होतो. त्यातील भ्रष्टाचार, लबाड्या, चो-या हे जवळून पाहिलं, की अस्वस्थ व्हायचो. माणसं हे असं का करतात असं वाटून त्रास व्हायचा. विचार करत बसायचो. मी नववीत असताना त्यावर एकांकिका लिहिली. भ्रष्टाचारात गावातलीच मंडळी गुंतलेली. तर त्यांच्या ख-या नावासकट लिहिलं नाटक. नंतर कळलं, की अशी खरी नावं लिहायची नसतात.”

“शेजारी राहणा-या मुलीला हुंड्यावरून सासू सासरे त्रास द्यायचे. तेव्हा मी दहावीला होतो. ती रडायची. मोकळेपणानं बोलायची. त्यावर दोन अंकी संपूर्ण नाटक लिहिलं – ‘‘बहीण माझी प्रीतीची’.’ त्याच्या पहिल्या प्रयोगाला पाच हजार माणसं आली होती. मित्रमंडळींना सोबत घेऊन केलेल्या त्या नाटकाचे पंचवीस प्रयोग झाले. त्यानंतर मी शेतक-याच्या आत्महत्येवर ‘काय दिलं स्वातंत्र्यानं’’ हे नाटक केलं. त्या नाटकाचा प्रयोग पोलिस संरक्षणात झाला! कारण पुन्हा नाटकात ज्यांच्यावर टिका केली होती ती गावातलीच माणसं होती.”

राजकुमार म्हणाला, “गावातलीच मित्रमंडळी होती. नाटकासाठी थिएटर, लेव्हल्स -त्याचं भाडं, लाईटस्, नेपथ्य असं काही लागतं हेच माहीत नव्हतं. दोन-तीन ट्रॉल्या, बांबू असं लागायचं, ते गावात कोणीही द्यायचं, ‘साबळे साऊंड सर्व्हिस’चे मालक तेव्हा फक्त अडीचशे रुपये घ्यायचे, आजही तेवढेच घेतात. मुळात, गावात नाटकाचं वातावरण होतं, गावात नाटकाची आवड होती, म्हणूनच हे शक्य झालं.”

राजकुमारला नाटकाची प्रेरणा गावाने दिली तर लिहिण्याची प्रेरणा त्याच्या मनातील संतापाने, धगीने पुरवली अशी त्याची भावना आहे. त्याने ‘आकडा’’ नावाचे नाटक २००३ मध्ये लिहिले. ते शेतक-यांच्या प्रश्नांशी निगडित आहे, शेतक-यांसमोरचे प्रश्न कोणते, शेतकरी वीजचोरी करतात त्यास खरे जबाबदार कोण आहे – शासन, प्रशासन की शेतकरी स्वतः या प्रश्नावर ते नाटक आहे. राजकुमारने त्या नाटकाचे पावणेदोनशे प्रयोग करताना वीज न वापरता अंधारात नाटक केले होते! त्यानंतर त्याने नंदू माधव यांच्याबरोबर ‘श्वेेत अंगार’ ही कापसाच्या प्रश्नाखवरील शॉर्ट फिल्म केली. राजकुमार तांगडेचा तो सगळा प्रवास त्याच्या मनातील समाजव्यवस्थेविषयीची अस्वस्थता दर्शवतो. नंदू माधव यांनी राजकुमार तांगडे याला नाटकाच्या मु‘ख्य धारेमध्ये आणले.

दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चे शिबिर कणकवलीत २००३ च्या सुमारास झाले होते. नंदू माधव यांनी राजकुमार आणि त्याचे सहकारी यांची शिफारस त्या शिबिरासाठी केली. तेथे राजकुमारची भेट अतुल पेठे यांच्याशी झाली. अतुल पेठे यांनी त्याचे ‘दलपतसिंग येती गावा’’ हे नाटक पुण्यामुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी केले आणि राजकुमार तांगडे हे नाव मराठी माणसांच्या लक्षात आले. राजकुमार सांगतो, “अतुल पेठे यांच्याबरोबर काम करताना त्यांच्यातले काटेकोरपणा, शिस्त, मेहनत हे गुण अनुभवण्यास मिळाले. त्यांनी ‘दलपतसिंग’’साठी ऐंशी दिवस निवासी तालमी केल्या! मी संपूर्ण दिवसरात्र नाटक, नाटकाचे वाचन, चर्चा, तालमी यांतच असे.”

‘शिवाजी’’च्या निर्मितीची कहाणीही आगळीवेगळी आहे. राजकुमार याने ‘शिवाजी’’साठी दीडशे दिवस निवासी तालमी केल्या. राजकुमार तांगडे याने या नाटकाचे लेखन केले आहे, परंतु त्यापाठीमागील संकल्पना ही शाहीर संभाजी भगत यांची आहे. संभाजी भगत म्हणजे फुले-आंबेडकर-मार्क्स यांच्या विचारसरणीतून, परिवर्तनाच्या चळवळीतून घडलेला कलावंत, कवी, कार्यकर्ता. तो त्याच्या गळ्यातून, शाहिरीतून समाजातील उपेक्षित, वंचित, कष्टकरी वर्गाचा आवाज टिपेला पोचवतो. संभाजी भगत यांच्या मनात आंबेडकरी जलशाच्या धर्तीवर ‘शिवजलसा’’ करण्याचे होते. भगत यांनी कॉम्रेड पानसरे यांनी मांडलेला शिवाजी वाचला होता, तो शिवाजी लोकांसमोर यावा अशी त्यांची इच्छा होती. राजकुमार ते करू शकेल असे संभाजी यांच्या मनाने घेतले आणि दोघांत संवाद सुरू झाला. संभाजी यांनी त्यांची कल्पना राजकुमारला ऐकवली. राजकुमार झपाटून गेला. म्हणाला, “मला तर यात नाटक दिसतंय!”’ आणि राजकुमारने त्या शिवाजीचे नाटक लिहिले.

शिवराय म्हणजे बहुजनांचा नायक. रयतेसाठी राबणारा, त्यांच्या कल्याणासाठी झिजणारा बहुजन प्रिय राजा. बहुजनांचा राजा असलेल्या शिवाजी राजांना ‘हिंदूचा राजा’’ बनवले गेले. ‘ब्राह्मणी व्यवस्थेचा ‘प्रतिपालक’ राजा’ बनवले गेले! ज्या शिवाजीने कष्टकरी मावळ्यांना घेऊन राज्य उभे केले त्यांना ‘शिवाजीराजे’ बनवून कष्टकरी समाजातील माणसांपासून दूर केले गेले.

प्रथम जोतिबा फुले यांनी इतिहासाला लागलेले विद्रूप वळण उखडून काढले. त्यानंतरही अनेकांनी त्यावरील भगवा रंग खरवडून काढला. संभाजी भगत यांना भावला, पटला तो तोच शिवाजी. त्याच शिवाजीने राजकुमार तांगडे नावाच्या तरुण नाटककारालाही नवा ध्यास पुरवला. ‘नवा’ शिवाजी बहुजन, अभिजन दोन्ही समाजांसमोर आणण्याची गरज ही त्या नाटकाच्या निर्मितीची प्रेरणा ठरली. राजकुमारने त्या विषयाचा अभ्यास केला. त्यासाठी जालन्यात शिबिरे घेतली, काही अभ्यासकांशी चर्चा झाल्या, संदर्भ-पुरावे-निष्कर्ष यांचा शोध घेतला.

राजकुमारचा ‘रंगमळा’’ नावाचा नाटकाचा ग्रूप आहे. तो ग्रूप त्या प्रकि‘येत आला. नंदू माधव यांचा ‘रंगमळा’’चा समर्थ आधार. त्यांच्या मदतीने फोकस नीट ठरवला गेला. संभाजी भगत यांच्या कल्पनेतून नाटकाची निर्मिती झाली. त्यांनी लोकसंगीतातील पोवाडा, भेदिक, सवालजवाब असे एकसे एक प्रकार निवडून नाटकात चपखल बसवले. शाहीर भगत, नंदू माधव, तांगडे आणि ‘रंगमळा’’चे कलाकार अशा संगळ्यांनी मिळून  ‘नाट्य-कलाकृती’ निर्माण केली! सर्वांची भावना – हे नाटक म्हणजे परिवर्तनाच्या लढाईचे हत्यार आहे! जांब समर्थ या राजकुमारच्या गावचे, उपेक्षित-वंचित समाजाचे घटक असलेले, त्याचे पहिल्यापासूनचे जिवाभावाचे सवंगडी. त्यांचा जीवच या नाटकात अडकलेला. त्यामुळे नाटकाचा प्रत्येक प्रयोग हा ताजा, रसरशीत होई. कलावंत अभिनय करतच नाहीत – तर मनातले, हृदयातले बोलत असतात. शंभराव्या प्रयोगाला ‘सकाळ’चे मुख्य संपादक उत्तम कांबळे आले होते. ते म्हणाले, “बाबांनो, हे ‘नाटक’ नाही, हे तर वास्तव आहे.” राजकुमार आणि त्याचे मित्र यांचे तेच सांगणे आहे – ‘आम्ही एवढं धडपडून एक राजकीय कृती म्हणून काहीतरी करू बघतोय त्याला ‘नाटक’ म्हणून लांब फेकू नका’.’

राजकुमार प्रतिसादाबद्दल म्हणतो, “वीस वर्षांपूर्वी हे नाटक आलं असतं, तर पहिल्या प्रयोगातच ते अर्ध्यावर बंद पडलं असतं. पण आज शिक्षण तळागाळापर्यंत पोचलंय. लोकांनाही बरंवाईट कळू लागलंय आणि गेली अनेक वर्षं पुरोगामी विचारसरणीनं इथल्या मनांची मशागत चांगली केलीय. त्यांनी ‘ग्राऊंड’ तयार केलं म्हणूनच आम्ही उभे राहू शकलो”

‘शिवाजी’’मधील पुरोगामी विचारसरणीने भारलेला शाहीर जुन्या ‘खोट्या’, पारंपरिक पद्धतीने रंगवलेल्या शिवप्रतिमेवर बोलताना म्हणतो, “आता महाराजांच्या गडतोरण्यावर बोलण्यापेक्षा त्यांच्या धोरणावर या. महाराजांचं शेतक-यांविषयी, पर्यावरणाविषयी, स्त्रियांविषयी, स्वधर्म आणि इतर धर्म यांविषयी, अगदी त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयीसुद्धा समजावून घ्या. म्हणजे महाराज काळालाही कसे सुसंगत होते ते समजेल.”

मराठी ऐतिहासिक नाटकांच्या इतिहासात, इतिहासाचे एवढे सुंदर, वास्तववादी आणि मानवतावादी आकलन किती वेळा आले असेल?

राजकुमार तांगडे – ९४३०३१०२९१

– अंजली कुलकर्णी

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.