रमाबाई रानडे आणि करमाळ्याचा खोलेश्वर

न्यायमूर्ती रानडे यांच्या प्रकृतीसाठी त्यांच्या पत्नी रमाबाई यांनी करमाळा येथील खोलेश्वर देवास साकडे घातले. तेथे त्यांच्या बरोबर स्थानिक मुसलमान डॉक्टर होते आणि रानडे यांची अधिक काळजी घेण्यास पुण्याहून डॉक्टर आले ते विश्राम खोले. ते ज्योतिबांच्या संस्थेत काम करणारे. असे सामाजिक समन्वयाचे वातावरण महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकाअखेरीस होते. रमाबाईंच्या पुस्तकातील तो किस्सा जाणण्यासारखा आहे…

सोलापूरचे मराठा सरदार रावरंभा निंबाळकर यांनी साडेसतरा लाख रुपये खर्च करून करमाळ्यात अंबाबाईचे मंदिर अठराव्या शतकात बांधले. ते ‘कमलालय’ म्हणून प्रसिद्ध आहे. रावरंभा हे हैदराबादच्या निजामाच्या पदरी होते. त्यांनी महादेव व मारूती या दोन दैवतांची मंदिरेही करमाळ्याच्या किल्ल्यात बांधलेली आहेत. तो महादेव ‘खोलेश्वर’ या नावाने ओळखला जातो. तो किल्ल्याच्या तटबंदीलगत स्थानापन्न आहे. त्या महादेवाचा उल्लेख रमाबाई रानडे यांच्या ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ या आत्मकथनात आलेला आहे. रमाबाई या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी.

रमाबाई रानडे यांची ती आठवण 1891 सालातील आहे. त्यावेळी रानडे यांची नेमणूक शेतकी खात्याचे स्पेशल जज म्हणून झालेली होती. चार्ज त्यांच्याकडे पुणे, सातारा, नगर व सोलापूर अशा चार जिल्ह्यांचा होता. त्या दाम्पत्याची फिरती आठ महिने चालू होती. रानडे व रमाबाई ऑफिस स्टाफसह करमाळ्यास फेब्रुवारी 1891 च्या अखेरीस येऊन पोचले. त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था खोलेश्वर मंदिरातच केलेली होती! त्या दोघांनी त्यावेळी मेडोज टेलरचे ‘तारा’ हे पुस्तक वाचण्यास घेतले होते. त्याचा उल्लेख रमाबाई यांनी केलेला आहे. त्या वाचनानंतर दोघांत चर्चा होई.

रानडे यांनी त्यांना करमाळ्यामधील कोर्टाचे काम दोन दिवसांत आटोपायचे असल्याने, विश्रांती न घेता रात्री उशिरापर्यंत काम केले. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली. करमाळ्यातील सरकारी डॉक्टरांनी काही उपचार केले, पण काहीच फरक पडला नाही. त्यांची तब्येत खालावत गेली, बोलणे बंद झाले. रमाबाई घाबरल्या. त्यांनी पुण्यास डॉ. विश्राम घोले यांना तार केली, त्यावेळी रेल्वे हे प्रवासाचे एकमेव साधन होते. डॉक्टर पुण्याहून रेल्वेने आले तरी त्यांना येण्यास पहाट होणार आणि रेल्वे स्टेशन (जेऊर) करमाळ्याहून तेरा मैल अंतरावर! डॉक्टरांना आणण्यासाठी घोडागाडी पाठवली, तरी पूर्ण रात्र जायची होती. करमाळ्याचे डॉक्टर हे जातीने मुसलमान होते. ते रात्रभर रानडे यांच्याजवळ मंदिरात बसून होते. मध्यरात्र उलटत आली तरी रानडे यांची तब्येत सुधारलेली नव्हती. नाडी हवी तशी लागत नव्हती.

रमाबाई यांचा धीर सुटला. रात्रीचे तीन वाजले होते, रमाबाई यांना त्यांच्या हाती परमेश्वराची करुणा भाकण्याशिवाय काहीच नाही असे वाटून, डॉक्टरांची परवानगी घेऊन त्या खोलेश्वराच्या गाभाऱ्यात देवासमोर जाऊन बसल्या. त्यांनी देवळात निजलेल्या म्हाताऱ्या गुरवीणीला बाहेर जाण्यास सांगितले. देव व त्या यांच्याशिवाय तिसरे कोणी नको अशी त्यांच्या मनाची वृत्ती झालेली होती. खोलेश्वराच्या गाभाऱ्यात नंदादीप मंद जळत होता, तो प्रकाशसुद्धा नको असे रमाबाई यांना वाटू लागले. पण दिवा मालवण्यामधील अशुभ संकेत लक्षात आल्यावर तसे करण्यास त्यांचे मन धजेना. अशुभाच्या कल्पनेने भ्रमिष्टासारखी अवस्था झालेली. प्रार्थनेसाठी त्यांच्या तोंडातून शब्द फुटेना. देवापुढे डोके टेकून, त्या हळू आवाजात मन मोकळे होईपर्यंत रडल्या. मनावरील भार काहीसा कमी झाल्यावर, त्यांनी देवाची प्रार्थना केली आणि अखेरीस, काहीशा त्राग्याने त्यांनी खोलेश्वराला साकडे घातले. “आम्ही दीन तुझ्या दारी संकटात येऊन पडलो आहोत; तुला वाटेल त्या रीतीने आम्हाला बाहेर काढ; तू स्वत:ला अंतर्यामी म्हणवतोस त्या तुला माझी करुणा आली नाही तर ह्या बाहेरच्या मोठ्या विहिरीला तरी खचित करुणा येऊन ती मला पोटात घेईल.”

रमाबाई यांचे मन खोलेश्वराशी केलेल्या त्या संवादाने हलके झाले आणि त्या श्रांत अवस्थेतच त्यांचा डोळा लागला. त्यांना सूचक असे स्वप्न पडले! त्या स्वप्नात त्यांना कृष्णेच्या काठावरील एक वटवृक्ष उन्मळून पडत आहे असे दिसले. त्यांनी त्या वृक्षाला कवटाळून सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तो वृक्ष अंगात होते-नव्हते तेवढे त्राण लावून खेचून धरला आणि पडणारा तो वृक्ष सावरला! त्यांना आनंद वाटला. योगायोग असा, की तेवढ्यात शिरस्तेदाराने येऊन त्यांना हाक मारली. त्या देवळातून धावत रानडे होते त्या ओवरीकडे गेल्या. ती वेळ पहाटे पाच वाजण्याची होती. रानडे यांना शुद्ध आलेली होती. त्यांचे बोलणेही चालू झालेले होते, त्यानंतर रानडे यांना झोप लागली. डॉ. विश्राम सकाळी सात वाजता येऊन पोचले व रमाबाई यांना आणखी धीर आला. त्या संदर्भात रमाबाई लिहितात- ‘डॉ. विश्रामजी हे बिछान्याजवळ आल्याबरोबर ते जातीने मराठा आहेत, गवळी आहेत याचे भान बिलकुल न राहून मी एकदम पुढे जाऊन त्यांचे पाय धरले व पायावर डोके ठेवून म्हणाले, ‘आतापर्यंत या डॉक्टरांनी मेहरबानी करून प्रकृती सांभाळून तुमच्या हाती दिली आहे. आता तुम्ही सांभाळा. तुमच्या रूपाने देवच मला साह्य करण्यास आला आहे, असे मी समजते.’

डॉ. विश्राम रामजी घोले यांचा लौकिक त्या काळी साक्षात धन्वंतरी असाच होता. ते लोकमान्य टिळक, आगरकर, न्या.रानडे, ज्योतिबा फुले, विष्णुशास्त्री चिपळूणकर अशा नामवंतांच्या मांदियाळीतील होते. त्यांची मोठी कामगिरी केवळ वैद्यक नव्हे तर स्त्री शिक्षण, मागास जातीत सुधारणा, शेती, उद्योग या क्षेत्रांतही होती. त्यांना गव्हर्नरच्या दरबारात फर्स्ट क्लास सरदारांचा दर्जा होता. त्यांचा मोठा सहभाग सत्यशोधक समाजाच्या कार्यात असे. ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद पुण्यात त्या काळी विकोपाला गेलेला होता, ब्राह्मणांतही परंपरावादी व सुधारणावादी असे दोन तट पडले होते, परंतु विश्राम यांचा वावर मात्र सर्व पक्षांत सहजपणे होता. त्याचे कारण ते समन्वयवादी होते! ते रानडे यांचे जवळचे मित्र असल्याने रमाबाई यांच्या निरोपासरशी पुण्याहून धावत करमाळ्यासारख्या आडगावी पोचले.

एवढ्या संकटात असणाऱ्या व रानडे यांची अर्धांगिनी असणाऱ्या रमाबाई यांना त्या अवघड वेळेसही डॉक्टर विश्राम यांची जात आठवली हे पाहून मौज वाटते; पण रमाबाई प्रांजळपणाने लिहून जातात. त्या वेळच्या परिस्थितीत त्यात काही वावगेही वाटत नसावे. रमाबाई यांच्या लेखनात तो प्रांजळपणा ठिकठिकाणी आढळतो, त्यामुळेच त्यांचे ते आत्मकथन वाचनीय वाटते.

डॉ. विश्राम यांनी करमाळ्यास पोचताच रानडे यांच्यावर उपचार तातडीने सुरू केले, त्यांनीही त्या दिवशी खोलेश्वराच्या मंदिरातच मुक्काम केला. त्यांनी रानडे यांच्या हाताबाहेर गेलेल्या प्रकृतीत प्रवास करण्याइतपत सुधारणा एका दिवसात घडवून आणली. रानडे यांना जेऊर स्टेशनवर दुसऱ्या दिवशी सकाळी बैलगाडीतून गाद्या टाकून, अगदी धक्का न लागेल अशा संथ चालीने नेण्यात आले. डॉ. विश्राम रमाबाई यांच्याबरोबर बैलगाडीमागे पायी चालत जेऊरपर्यंत गेले. तोपर्यंत प्रिन्सिपॉल मोडक पुण्याहून जेऊरास येऊन थांबले होते, नंतर सर्वजण मिळून पुण्यास आले. पुण्याच्या स्टेशनवर मेणा आणलेला होता. त्यातून रानडे यांना घरी नेले गेले. विश्राम घोले यांनी रानडे यांच्यावर औषधोपचार त्यानंतर दोन महिने केले. रानडे यांची प्रकृती जागेवर आली. विश्राम यांनी रानडे यांच्यासाठी जे कष्ट घेतले, त्यावरून त्या दोघांमधील स्नेहाची कल्पना येते. रानडे यांची सुधारक वृत्ती असूनही त्यांच्या मनात परमेश्वराविषयी श्रद्धा होती. ते करमाळ्याच्या आजारात त्यांची शुद्ध हरपत असतानादेखील ‘भिऊ नकोस, देव आहे!’ असे रमाबाई यांना सांगत होते. ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती । चालविशी हाती धरूनीया’ हा अभंग न्या. रानडे यांचा आवडता होता व तीच त्यांची जीवनविषयक श्रद्धा होती. रमाबाई बालपणापासून धार्मिक वातावरणात वाढलेल्या होत्या. त्यांनी खोलेश्वरास साकडे घालावे यात नवल नव्हते.

– अनिरुद्ध बिडवे 9423333912 bidweanirudha@gmail.com

———————————————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here