रघुनाथ ढोले यांचे हृदय झाडांचे…

0
507

रघुनाथ ढोले यांची झाडांशी घट्ट नाळ जुळलेली आहे. झाडांशी हितगुज करणाऱ्या या मितभाषी माणसाने मानवनिर्मित देवराया निर्माण करण्याचा ध्यास घेतला. आतापर्यंत त्यांनी पंच्याण्णव देवराया आणि बत्तीस घनदाट वने महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या तीन राज्यांत निर्माण केली आहेत. शुष्क डोंगरांवर हिरवळ फुलवणारा हा अवलिया देवराई ही भारतातील आगळीवेगळी परंपरा जिव्हाळ्याने जपतोय…

रघुनाथ ढोले पुणे येथे राहतात. ते झाडांचा मनुष्य रूपातील वृक्षकोशच आहेत! त्यांच्या स्पर्शाची भाषा झाडांना समजत असावी आणि झाडांची त्यांना. त्यांच्या झाडांकडे बघण्याच्या नजरेतून, त्या झाडांना हाताळण्यातून त्यांच्या सहवासात आलेल्या कोणालाही झाडांबद्दल प्रेम वाटण्यास सुरुवात होते. ते नर्सरीमधून फिरताना झाडांकडे बघून सांगत होते, “माझी मनापासून वाट बघणारी माझी झाडे आहेत. मी दिल्याशिवाय ती पाणीसुद्धा पीत नाहीत!” त्यांना कोणत्याही पानाचे, फुलाचे शब्दांतून वर्णन केले, की झाडाचे नाव माहीत असते!

वास्तविक ढोले हे रसायनशास्त्र विषयात एम एस्सी करून सरकारी खात्यात फोरेन्सिक विभागात कामास लागले. त्यांनी तेथून ऐच्छिक निवृत्ती घेतली. ते व्यवसाय म्हणून कंपन्यांसाठी बागांचे आराखडे तयार करून देत आणि त्यानुसार बागाही बनवून देत. त्यांचे पहिले प्रेम देशी वृक्षांबद्दल. ते कंपनीला पाहिजे असलेल्या, दिसण्यास सुंदर असणाऱ्या झाडांबरोबर कोठेतरी देशी वृक्ष हळूच लावून टाकत! त्यांनी फक्त देशी वृक्षांची स्वतःची नर्सरी थेऊरजवळ उभी केली आहे. आता तर, त्यांनी देशी झाडांच्या प्रचारासाठी आयुष्य वाहून घेतले आहे. त्यांनी लहानपणची आठवण सांगितली, “मला वडिलांनी नव्याने लग्न झालेल्या एका जोडप्यासाठी भेटवस्तू आणण्याकरता माझ्याकडे पाच रुपये दिले होते. मी त्या पाच रुपयांची दोन झाडे आणली आणि त्यांच्या हस्ते ती लावली. त्यांचे मोठे वृक्ष झाले आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने आज त्यांचे मूल्य एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.” त्या हिशोबाने रघुनाथ ढोले यांची गुंतवणूक कोट्यवधी रुपयांची आहे असे म्हणता येईल.

“तुमच्या सगळ्यांसाठी येथे झाडे ठेवली आहेत. तुम्हाला आवडतील ती घेऊन जा. मात्र, काळजी घ्या त्यांची.” असे रांगेत ठेवलेल्या हजारो रसरशीत झाडांकडे प्रेमाने बघत ढोले सांगत होते. प्रसंग होता त्यांच्या मुलाच्या लग्नाचा. त्यांचे अर्ध्याहून अधिक लक्ष लग्नातील विधींपेक्षा झाडांकडे होते! त्यांच्या हाताला, शर्टाला लागलेल्या मातीकडे त्यांचे ध्यानही नव्हते.

झाडांशी बोलणारा हा माणूस एरवी मितभाषी आहे; ते स्वतःबद्दल तर कधीच काही बोलत नाहीत. ढोले यांची एक सवय आहे. ते पावसाळा येण्याच्या आधी बिया गोळा करू लागतात आणि पहिला पाऊस पडला, की आजूबाजूच्या डोंगरांवर जाऊन बियांची पखरण करतात. मुळशीचा अहिवळेचा डोंगर, ताम्हिणी घाटात, संगमनेर जवळ कोळवडे येथे असलेल्या डोंगरांवर त्यांनी बियांची पखरण करून जंगले तयार केली आहेत. ते सांगतात, ‘आदिवासी वस्ती असलेल्या कोळवडे भागात पाण्याची टंचाई होती. तेथे एक लाख झाडे लावली, त्यातली साधारण सत्तर हजार जगली. या वृक्ष लागवडीमुळे तेथील विहिरींचे पाणी दहा फूटांवर आले आहे.’ त्यांनी तळेगाव शेजारच्या भंडारा डोंगरावर अनेक देशी वृक्षांची लागवड केली आहे. त्यांच्या अशा प्रयत्नांतून शुष्क डोंगर हिरवेगार झाले आहेत! त्यांना वृक्ष सेंद्रीय खतांनी पालनपोषण करून वाढवणे जिव्हाळ्याचे वाटते. ते कीड पडली तर गोमूत्र, कडूलिंबाचा रस पाण्यात घालून फवारणे, तंबाखूचे पाणी पाण्यात मिसळून त्याचा फवारा, असे झाडांना इजा न होता बरे करणारे उपाय सांगतात. त्यांनी ‘जीवामृता’बद्दल अनेकांच्या मनात आस्था निर्माण केली आहे. ‘गायीचे शेण, गोमूत्र, त्यात थोडे दही, गूळ आणि बेसन पीठ घालून मिश्रण तयार करा. ते दररोज चांगले ढवळून, सातआठ दिवसांत झाडांचे उत्तम दर्जेदार पोषण करणारे पेय तयार होते. ते झाडांची काळजी घेणारे पेय झाडांना द्या,’ असे ते सांगत होते, तेव्हा मला आजी छोट्या बाळांना घरगुती साजूक औषधांचा आग्रह धरते त्याची आठवण झाली.

त्यांच्या घरी गच्चीवर, अंगणात, घराच्या आजूबाजूला, जेथे ऊन आहे, सावली आहे तेथे सगळीकडे झाडांच्या बिया वाळण्यास ठेवलेल्या असतात. मात्र, त्यात पसारा नसतो, नेटकेपणा असतो. बियांची अनेक पोती त्यांच्याकडे भरून ठेवलेली असतात, त्यापैकी कोणत्या पोत्यात कोणते बी आहे हे ते अचूकपणे सांगतात. पोत्यांतील बियांची लेबल लावून पाकिटे करणे, त्यांची नर्सरीमध्ये जाऊन रोपे तयार करणे, त्यांची प्रेमाने देखभाल करणे असा त्यांचा दिनक्रम असतो. त्यांनी त्यांची बियाणे तयार करण्याची स्वतंत्र पद्धत शोधून काढली आहे. त्यामुळे बिया रुजण्याची खात्री नव्वद टक्के असते. ते बियाणे कसे तयार करावे हे शिकवतातदेखील.

त्यांनी एक लाख रोपे 2012 साली तयार करून ठिकठिकाणी वाटण्याचा संकल्प सोडला होता. शिवाय, त्यांनी लाखभरापेक्षा अधिक झाडे वृक्षप्रेमींना विनामूल्य वाटली. त्यांचे आर्जवी सांगणे, ‘धरणीमातेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी सगळ्यांनी झाडे लावणे एवढेच करू या’ असे असते. त्यांच्या पत्नी वीणा ढोले यांनीही टेरेसवर मातीविरहित बाग केली आहे. त्या ‘वाळलेली पाने जाळू नका, ते खरे सोने आहे’ असे सांगून पर्यावरणाची हानी कमी करण्याचा प्रसार करत असतात. मी ढोले यांच्याकडे एकदा झाडे आणण्यास गेले असताना, जांभळाची दोन झाडे घेतली. त्यांनी त्यात आणखी तीन टाकली. मी म्हणाले, ‘एवढी कशाला?’ त्यावर ते म्हणाले, ‘एक तुम्हाला, बाकी चार पक्ष्यांना !’ मला त्यांच्या त्या उत्तराने झाडांकडे बघण्याची नवी दृष्टी मिळाली.

त्यांना कृषी प्रदर्शनांमध्ये शेतकरी लोकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो. त्यांचे स्वयंसेवक झाडे वाढवण्यासाठी कामे करत असतात. देवराई हा त्यांच्या जिव्हाळ्याचा आणि काळजीचा विषय आहे. ते सांगतात, की देवराई ही भारतातील आगळीवेगळी परंपरा आहे. पूर्वीच्या काळी माणसाने जंगल संरक्षणासाठी तेथील एखाद्या दगडाला शेंदूर फासून देवाचे स्थान निर्माण केले. भक्तीच्या पावित्र्याने कोणी तेथे झाड तोडत नसे. त्यामुळे तेथील परिसरात वृक्ष संरक्षण व संवर्धनही झाले. त्यातून पक्षी, प्राणी, फुलपाखरे, किडा, मुंगी या सगळ्यांची सक्षम परिसंस्था निर्माण होई. ती नैसर्गिक परिसंस्था सध्या धोक्यात आली आहे. झाडांच्या प्रजाती नष्ट होऊ लागल्या आहेत. म्हणून रघुनाथ ढोले यांनी मानवनिर्मित देवराया निर्माण करण्याचा ध्यास घेतला आहे. ते म्हणतात, ‘मला एक एकर जागा द्या. बाकी सगळे मी बघतो.’ त्यांच्याशी बोलल्यावर माणसांच्या मनात आधी देवराई फुलते आणि मग प्रत्यक्षात जमिनीवर! ते जेथे जागा असेल तेथे, ज्यांची जागा द्यायची इच्छा असेल त्यांच्यासाठी देवराई तयार करून देतात. खाजगी, सरकारी, नगरपालिका, कॅण्टोन्मेंट यांच्यासाठी अशा देवराया उभ्या राहिल्या आहेत. त्यासाठी सरकारी मदतही मिळू लागली आहे. देवराईच्या अस्तित्वामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हा अनुभव ते साऱ्यांना सांगतात.

त्यांनी देवरायांसाठी शास्त्रीय पद्धतीचा आराखडा तयार केला आहे – एक एकर जागेत, 10 ×10 फूट अंतरावर सुमारे चारशे ग्रीड म्हणजे चौरस आकाराची जागा तयार केली. मधोमध 20 × 20 फूटांचे बांबूचे झोपडे बांधले. त्याच्या शेजारी 20 × 20 फूटांचा तलाव केला. एकमेकांशेजारील चौकोनांमध्ये सारख्या प्रकारांची चार रोपे लावली. त्यांचे म्हणणे असे, की गटात लावलेली झाडे एकमेकांना वाढण्यास मदत करतात. ढोले एकशेएकोणीस प्रजातींची स्थानिक, देशी लहानमोठी झाडे-वेली-झुडुपे लावून, सुमारे पाचशेपंधरा रोपटी लावून त्यांना वाढवावे कसे याचे मार्गदर्शन करतात. त्यांनी पंच्याण्णव देवराया आणि बत्तीस घनदाट वने महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या तीन राज्यांत निर्माण केली आहेत!

रघुनाथ ढोले 9822245645 rmdhole@gmail.com

अपर्णा महाजन 9822059678 aparnavm@gmail.com

———————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here