योगेंद्र बांगर यांची आजीबाईंची शाळा

_Aajibainchi_Shala_2.jpg

भारतातील पहिली आजीबाईंची शाळा फांगणे गावी ८ मार्च २०१६ रोजी मोठ्या उत्साहात आणि आनंदात सुरू झाली. ती शाळा म्हणजे ‘बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरू, झाडे, वेली, पशु-पाखरे यांशी दोस्ती करू’ या ग.दि.माडगूळकरांच्या गाण्याचा प्रत्यक्ष अनुभव! शाळा निसर्गाच्या सान्निध्यात वसली आहे. आंब्याच्या मोठ्या झाडाखाली बांबूच्या कळकांचे दोन भाग करून भिंत तयार करण्यात आली आहे. त्यावर गव्हाच्या कुडाचे छत आहे. वर्गाच्या समोर ठरावीक अंतरावर प्रत्येक आजीच्या नावाचे झाड आहे. टाकाऊ फरश्यांचा वापर करून त्यावर मुळाक्षरे लिहिलेली आहेत. वयाच्या साठीनंतर उत्साहाने पुस्तकातील धडे गिरवणार्‍या आजीबार्इंच्या शाळेचे ते चित्र मोहीत करून टाकणारे असते.

वर्गात शिरताच, समोरील फळ्यावर दिनांक-वार यांसह लिहिलेला ‘शिक्षणाला वयाचं बंधन नसतं’ हा सुविचार लक्ष वेधून घेतो. फळ्याच्या समोर सरळ रांगेमध्ये डोक्यावरील पदर सावरत मांडी घालून बसलेले ‘विद्यार्थी’ असतात. मांडीवर पाटी, समोर दप्तर, त्या दप्तरावर ‘बालमित्र’ची अंकलिपी, दप्तराच्या बाजूला पाटी पुसण्याचे फडके अन् हातात पेन्सील या सगळ्या साहित्यासह ते ‘विद्यार्थी’ अर्थात सर्व आजी मुळाक्षरे गिरवण्यात दंग असतात. वर्षभरापासून शिक्षण घेणाऱ्या आजी या शाळेत चांगल्या रमून गेल्या आहेत! त्यांच्यासाठी ती शाळा म्हणजे उतरत्या वयातील संवाद साधण्याचे, त्यांच्या मैत्रिणींना भेटण्याचे, खळखळून हसण्याचे, भरपूर गप्पा मारण्याचे हक्काचे ठिकाण होऊन गेले आहे. आजी दररोज दुपारी दोन ते चार शाळेतील अभ्यासानंतर अभंग, ओव्या अन पाढेही म्हणतात. तसे करताना एक आजी आधी म्हणतात. नंतर, बाकी सार्‍या पहिल्या आजीमागे शिस्तीत म्हणत असतात. वर्गासमोर लावण्यात आलेल्या झाडांमधील प्रत्येक झाडाचे पालकत्व एकेका आजीकडे देण्यात आले आहे. त्या त्या झाडासमोर आजीच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे. शाळेच्या नियमानुसार, आज्यांना त्या झाडांची पाणी, खत घालून जोपासना करण्याचे, झाडांची काळजी घेण्याचे काम करावे लागते. त्यांना त्यांच्या शिक्षिका मोरे मॅडम मदत करतात. आजींसाठी असलेल्या अभ्यासक्रमात वृक्ष संवर्धनाच्या उपक्रमाचाही समावेश आहे. आज्या एकूण एकोणतीस आहेत. कधी कधी, आज्यांना अभ्यासात मदत करण्यासाठी त्यांची नातवंडेदेखील येऊन बसतात. तीदेखील ‘असं नाही गं आजी…..असा काना दे’ असे सांगत असतात. गावात दर गुरुवारी भजनाचा कार्यक्रम असल्यामुळे शाळेला त्या दिवशी साप्ताहिक सुट्टी असते. सुनंदा केदार आजी म्हणतात, ‘या शाळेमुळं खरंतर आमचं एकमेकींना नियमानं भेटणं व्हतं, नाहीतर जी ती आपापल्या घरी असायची; भेटायचं म्हटलं, की स्वतःहून येळ काढून भेटायला जावं लागायचं. शाळेमुळे चार अक्षरं शिकायला बी मिळत्यात. या वयात तेवढाच काय तो इरंगुळा…’

_Aajibainchi_Shala_1.jpgफांगणे हे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात सत्तर घर असलेले तीनशेसाठ लोकसंख्येचे गाव. मोरोशी फाट्यापासून साधारण तीन किलोमीटर आतमध्ये फांगणे गाव वसलेले आहे. गावाच्या चारी बाजूंनी डोंगररांगा पसरलेल्या आहेत. गावाच्या सुरुवातीलाच कळकांचे कुंपण असलेली जिल्हा परिषदेची शाळा आहे. गावात रस्त्याने चालताना उघडी गटारे, अस्वच्छता, उघड्यावर पडलेला कचरा यांसारख्या गोष्टी दिसत नाहीत. उलट, घराच्या आजूबाजूला शिस्तबद्ध पद्धतीने लावलेली फुलझाडे दिसतात. त्यांच्याभोवती बांबूच्या काठ्यांचे कुंपण असते. गावचा मुख्य व्यवसाय शेती आहे. गावाच्या अवतीभवती दिसणारा तुटपुंजा विकास हा लोकसहभागातून झालेला आहे.

फांगणे गावात शिवचरित्र पारायणाचा सोहळा दरवर्षी उत्साहाने साजरा केला जातो. आज्यांना त्या लोकांचे पारायण मंदिरात ऐकत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. त्या वाचू शकत नसल्यामुळे आज्यांना केवळ श्रवणभक्ती करावी लागत होती. आज्यांना कागदावर कधी अंगठ्याचा धब्बा लावावा लागतो याची खंतही असायची. त्या ‘आम्ही शाळा शिकलो असतो तर आम्हाला पण सही आली असती, आम्हीपण पारायण वाचायला बसलो असतो’ असे बोलून दाखवायच्या. त्यांच्यातील ती इच्छाशक्ती जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करणारे बांगर गुरुजी यांनी हेरली. त्यांना त्यातूनच ‘आजींची शाळा’ सुरू करण्याची कल्पना सुचली. त्यांनी ती कल्पना गावकऱ्यांसमोर मांडली. गावकर्‍यांनीही गुरुजींना साथ दिली. ‘आजीबार्इंची शाळा’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी मदतीचा हात दिला तो अंबरनाथ येथे शिक्षणक्षेत्रात कार्यरत असलेले या ग्रूपचे संस्थापक दिलीप दलाल यांनी! त्यांनी ती संकल्पना समजून घेतली. दलाल ग्रूपने आजीबार्इंना गणवेश म्हणून साड्या आणि शैक्षणिक साहित्य पुरवले.

‘हिस्टरी वाहिनी’ने तयार केलेल्या चित्रफितीमुळे ‘आजीबाईंची शाळा’ आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचली आहे. फ्रान्स, जर्मनी, रशिया या देशांतील लघुपट निर्माते, पत्रकार यांनी शाळेला भेट दिली आहे. भारतातील अनेक शैक्षणिक संस्थांनीही शाळेला सदिच्छा भेट दिली आहे. या उपक्रमाची दखल ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली आहे. योगेंद्र बांगर यांनी ‘आजीबाईंची शाळा’ या उपक्रमाबद्दलची माहिती ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ला २०१७ साली पाठवली होती. योगेंद्र यांना ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये ‘आजीबाईंची शाळा’ या उपक्रमाची नोंद झाली असल्याचे प्रमाणपत्र पोस्टाने २१ फेब्रुवारी २०१८ रोजी मिळाले.

शिक्षिका शीतल मोरे सांगतात, ‘शालेय जीवनात शिक्षण घेणे आणि या वयात शिक्षण घेणे यांतील फरक मला जाणवतो. आज्या शिकण्यासाठी उत्साही असतात याचा प्रत्यय गेले वर्षभर मला येतोय. शाळेत न चुकता दररोज आले पाहिजे, असे त्यांना सांगावे लागत नाही. शाळेत येणाऱ्या सर्व आज्यांची वये ही साठ वर्षांच्या पुढे आहेत. वयाने सर्वात मोठी आजी सत्याऐंशी वर्षाची आहे. त्यांना वयानुसार ऐकायला कमी येणे, लक्षात न राहणे, मुळाक्षरांचे उच्चार न जमणे यांसारख्या अडचणी येतात. मात्र, त्या त्यांच्यावर मात करून शिकण्याचा प्रयत्न करतात, याचा मला अभिमान वाटतो. माझे स्वतःचे शिक्षण दहावीपर्यंतच झाले आहे. मी माझे घरातील काम आवरून दुपारी आजींच्या शाळेत शिकवते. माझ्या सासूबाईदेखील वर्गास येतात.’

त्या म्हणाल्या, ‘वृद्ध व्यक्तींना शिकवत असताना संयम बाळगावा लागतो. कारण, जिल्हा परिषदांच्या शाळांप्रमाणे तेथे एकदाच फळ्यावर लिहून चालत नाही. एकच अक्षर शंभर शंभर वेळादेखील रिपीट करावे लागते. आज्यांवर रागावतापण येत नाही. प्रत्येक आजीच्या जवळ जाऊन, कधी आजीच्या थरथरत्या बोटांना धरून अक्षर गिरवायला शिकवावे लागते.’ त्याबद्दलचा एक खास किस्सा त्यांनी सांगितला, ‘वर्गातील वयाने सर्वात मोठ्या असणाऱ्या ‘सीता आजी’ जेव्हा पहिल्यांदा शाळेत येऊ लागल्या, तेव्हा त्यांना अंकलिपी कशी धरायची तेच कळत नव्हते. त्या अंकलिपी बऱ्याचदा उलटी धरायच्या. त्यामुळे त्यांना मुळाक्षरेदेखील उलटी दिसायची, अन् त्यांना लिहायला जमायचे नाही. त्यात त्यांना ऐकू कमी येते, त्यामुळे अधिक पंचाईत व्हायची… त्या पाटीवर केवळ गोल गोलच खूप दिवस काढायच्या. त्यांना त्यांचा हात हातात घेऊन एकच अक्षर खूप दिवस गिरवल्यानंतर मुळाक्षरे लिहिणे जमू लागले आहे.’ ‘आजीबाईंच्या शाळे’ची सहलही लवकरच काढण्यात येणार आहे.

‘आजीची शाळा’ याबद्दल बोलताना योगेंद्र बांगर सर म्हणाले, की ‘शेजारील गावांमध्येदेखील अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यासाठी गावकरी उत्सुक आहेत. गावातील लोकांचे सहकार्य मिळाले तर सुंदर असे विविध उपक्रम राबवता येतात.’ गावातील जिल्हा परिषदेची शाळा डिजिटल आहे. बांगरसरांनी, ‘ई-लर्निंग’चे विविध प्रयोगदेखील राबवले आहेत.

– प्राजक्ता ढेकळे, prajaktadhekale1@gmail.com

पूर्व प्रसिद्धी – ‘सकाळ साप्‍ताहिक ‘, 11 मार्च 2017

Last Updated On 23rd Feb 2018

About Post Author

1 COMMENT

  1. अप्रतिम शाळा,आनंद,संवेदना…
    अप्रतिम शाळा,आनंद,संवेदना,पर्यावरण रक्षण ,संवर्धन,निसर्ग प्रेम,स्वच्छता,शिस्त,त्याग,समार्पण,प्रेरणा सर्वकाही.
    हिंदीत एक म्हण आहे,आमके आम[व्यावहारिक शिक्षण ]गुटलीके दाम[अन्य पूरक गोष्टी.डिधन्यवाद डिअर बांगर सर ,टीम व पायोनिअर मदत करणारे दानशूर.

Comments are closed.