मृदूंग-तबल्याची साथ – अपंगत्वावर मात

0
61
_Motiram_Bajage_1.jpg

अपंगत्वावर मात करत मृदुंग आणि तबला यांमध्ये पारंगत असलेले मोतीराम बजागे.

मोतीराम बजागे हे भिवंडी तालुक्यातील किरवली या छोट्याशा खेडेगावात राहतात. ते जन्मापासून अंध असल्यामुळे शिक्षण घेऊ शकले नाहीत. त्यामुळे ते घरातच असत. ते घरातील डबे वाजवायचे, ते त्यांना आवडायचे. ती सवय त्यांच्या इतकी अंगवळणी पडली, की डबे वाजवताना ते वेगळी धून पकडू लागले. त्यांचा जन्म १९७४ चा. त्यांचे वय फक्त बेचाळीस आहे. त्यांना डबे वाजवण्याचा छंद वयाच्या सातव्या वर्षांपासून जडला. ते डबे वाजवत असताना त्यांच्या घराशेजारची मुले त्यांच्या जवळ बसू लागली. मुले त्यात रमून जात. मुले म्हणत, “दादा, तू खूप चांगला वाजवतोस.”

त्यांनी मंदिरात हरिपाठ चालू असताना एकदा मृदुंग वाजवायला घेतले, त्यांनी ते बऱ्यापैकी वाजवले आणि तेव्हापासून ते हरिपाठाच्या वेळी दररोज मंदिरात जाऊ लागले व मृदुंग वाजवू लागले. मोतीराम यांची मृदुंगवादनातील गोडी वाढतच गेली. त्यांनी मृदुंगाचे ताल शिकण्यासाठी डोंबिवलीचे गजानन म्हात्रे ह्यांच्याकडे शिकवणी लावली. त्यांनी तेथे सात महिने प्रशिक्षण घेतले. त्यांनी तेथेच पखवाज आणि हार्मोनियम यांचेही धडे घेतले. हरिपाठ, गजल, कीर्तन अशा कार्यक्रमांमध्ये पखवाज रीतसर वाजवू लागले. ते मृदुंग, पखवाज वाजवत असताना तबला, ढोलकी, कॅसिओ आणि त्यासोबतच गायनामध्येसुद्धा पिछाडीवर राहिले नाहीत. त्यांनी ते सर्व शिकण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते उत्तम रीतीने यशस्वी झाले. त्यांनी कीर्तनाच्या एका कार्यक्रमात गायन करत असताना अनेक प्रकारचे आवाज काढून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले, त्यात त्यांनी कोकिळेचा आवाज काढूनही गायन केले. त्या आवाजाला लोकांनी पसंती दिली. तसेच, ते मृदुंग वाजवताना देखील वेगळ्या पद्धतीने वेगवेगळी धून श्रोत्यांना ऐकवत असत, त्यामुळे त्यांना लोकांकडून शाबासकीही मिळत असे. अमृतदास महाराज जोशी(बीड), चैतन्य महाराज देगलूरकर, बंडातात्या कराडकर, महादेव महाराज जगताप, रामकृष्ण महाराज लहवीतकर (नाशिक), काशिनाथ महाराज पाटील(जांभिवली, भिवंडी) असे उत्कृष्ट कीर्तनकार; तसेच, मृदुंगवादक यांनीसुद्धा बजागे यांची पाठ थोपटली आहे. मोतीराम हे त्या किर्तनकारांबरोबर महाराष्ट्रभर फिरले आहेत. त्यांनी संगीत भजनांच्या सामन्यातसुद्धा भाग घेऊन त्यांची जागा सिद्ध केली आहे. त्यांचे वडीलच मृदुंग वाजवण्यासाठी त्यांचे गुरू होते. ह.भ.प. रामदास महाराज शेलार ह्यांच्या हस्ते मोतीराम ह्यांना तुळशीमाळ घालण्यात आली आणि ते वारकरी झाले. मोतीराम यांचा प्रवास तेथेच थांबत नाही. ते रामायण आणि महाभारत शिकण्यासाठी ह.भ.प. रमाकांत महाराज शास्त्री ह्यांच्याकडे गेले. मोतीराम यांनी स्वत:ही पंधरा कीर्तने रचली आहेत. मोतीराम ह्यांच्या ह्या कार्यामुळे त्यांचा अनेक ठिकाणी सत्कार व सन्मान झाला आहे. त्यांना ‘ठाणे जिल्हा वारकरी संप्रदाय’ यांच्याकडून ‘ठाणे जिल्हा मृदुंगसम्राट’ हा पुरस्कार मिळाला आहे. ते आमणे-लोनाड परिसर, श्री क्षेत्र आळंदी पायी सोहळा, श्री क्षेत्र पंढरपूर, त्र्यंबकेश्वर पायी पालखी सोहळा; तसेच, शिर्डीचा पायी पालखी सोहळा अशा उपक्रमांत स्वेच्छेने सहभागी होऊन, भजन-कीर्तन करून, वारकऱ्यांना; तसेच, साईभक्तांना त्यांच्या वादनाने व गायनाने मंत्रमुग्ध करत असतात. त्यांचे कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यात बरेच होत असतात.

महाराष्ट्राचे नंबर एकचे उत्कृष्ट मृदुंगवादक प्रताप पाटील यांनी आणि आळंदीचे उत्कृष्ट मृदुंगवादक दासोपंत स्वामी यांनीसुद्धा मोतीराम यांना शाबासकी दिली आहे.

मोतीराम यांच्या पत्नी घरीच असतात व गृहिणीपद निभावतात. मोतीराम म्हणाले, की त्यांचे उत्पन्न अनियमित असते. तरी पंधरा ते पंचवीस हजाराच्या दरम्यान महिन्याला मिळतात, पण ते मानधनापोटी. त्यामुळे त्याची शाश्वती नसते. देणार्‍याची मर्जी. मुळात इकडे दूर खेड्यात कार्यक्रम मिळण्यासाठीच मारामार असते. त्यामुळे असुरक्षित वाटते. मोतीराम ह्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. मुलगी नववीमध्ये शिकत आहे.

मोतीराम बजागे – ७५५८३५८५०१, मुक्काम किरवली, पोस्ट आमणे, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे

– किशोर बजागे (गोवेली महाविद्यालय)

About Post Author