मुख्याध्यापकांची थेट भरती केली तर?

0
21
‘व्यासपीठ’चा उद्देश...

– श्रीधर गांगल

शिक्षकीपेशा हा त्यांच्या रोजीरोटीचा मार्ग, पण ठाण्यातील काही शिक्षक नि शिक्षणप्रेमी महिन्यातून एक दिवस एकत्र जमतात. गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विचार करण्यासाठी. त्या उपक्रमाचे नाव आहे ‘व्यासपीठ’. शिक्षकांचे प्रबोधन व्हावे, त्यांना प्रेरणा मिळावी नि त्यासाठी प्रयत्न व्हावे या उद्देशाने शिक्षकांनी शिक्षकांसाठी चालवलेला तो उपक्रम आहे. त्यास पालक येऊ शकतात. त्यांनी तीन वर्षांत अनेक छोटेमोठे कार्यक्रम केले. ह्यावेळी ‘शिक्षकांचे प्रशिक्षण’ ह्या महत्त्वाच्या पण महत्त्व हरवलेल्या विषयावर चर्चा झाली.

ठाण्यामधली ‘व्यासपीठ’ नावाची  एक चळवळ. शिक्षक म्हणून नोकरी लागण्यासाठी शिक्षणशास्त्रातील पदवी किंवा पदविका ही आवश्यक आहेच, पंरतु ‘शिक्षक घडणे’ ही अव्याहत चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षण कसे असावे? तर जीवन समृध्द करणारे असावे. आपल्या व दुसर्‍याच्या श्रध्दा जपून समाजासाठी काही करण्याची प्रेरणा शिक्षणातून मिळायला हवी. तर मग दोषारोप करत बसण्यापेक्षा काही करून दाखवावे या विचाराने ठाणे व परिसरातील काही शिक्षक, प्राध्यापक, शिक्षणप्रेमी नागरिक असे सर्व एकत्र आले आणि ‘व्यासपीठ’ तयार झाले.

 

शिक्षकांनी ह्या पेशात येण्याअगोदर बी.एड. केलेले असते, त्यांना शिक्षक म्हणून बारा व चोवीस वर्षे नोकरी झाल्यावर सक्तीचे प्रशिक्षण घ्यायचे असते. शिवाय, अभ्यासक्रम बदलला, नवीन अध्यापनपद्धत आली की शिक्षणखाते संबंधित शिक्षकांना प्रशिक्षण देत असते. प्रशिक्षण म्हणजे Recharge होणे. नवीन शोध, नाविन्यपूर्ण बदल, बदलती जीवनशैली, नूतन सभोवताल ह्या बदलत्या परिस्थितीला अनुरूप बदल, आपण होऊन आपल्यात घडवणे -अनुभवी, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली.
बैठकीत प्रशिक्षण उपयुक्त, नाविन्यपूर्ण बदलयुक्त कसे करता येईल यावर चर्चा झाली. अठरा शिक्षक-शिक्षणप्रेमी हजर होते. एकाने मत/मुद्दा मांडला की दुसरा आपली प्रतिक्रिया त्या संदर्भात उत्स्फूर्तपणे नोंदवत होता, तिसरा आपला अनुभव सांगत होता, तर चौथा वेगळा दृष्टिकोन मांडत होता. त्यामुळे ही चर्चा वादविवाद, त्यातून निर्माण होणारी खडाजंगी, जिंकणे-हरणे-वरचढपणा दाखवणे ह्यात अडकली नाही.
चर्चासत्रात सुचवलेले पर्याय :

शिक्षकीपेशा आवडीपेक्षा रोजीरोटीचा मार्ग म्हणून स्वीकारणार्‍या शिक्षकाला प्रशिक्षण सक्तीचे वाटले तरी ते आवश्यक आहे. सक्तीचे, बाह्य प्रेरणा वाटणारे प्रशिक्षण अंत:प्रेरणेत प्रवर्तित होणे हा हेतू साध्य झाला पाहिजे. त्यासाठी त्यात बदल आवश्यक आहेत.
प्रशिक्षणाचा हेतू ‘सेवाअंतर्गत’ असा संकुचित न राहता ‘सरावाअंतर्गत’ असा मोठा घेतला गेला पाहिजे. शिक्षक ‘सर्व्हिस’ करतो, प्रोफेशनल (वकील, डॉक्टर) ‘प्रॅक्टिस’ करतो. शिक्षक जेव्हा प्रशिक्षणाला ‘सराव, प्रॅक्टिस’ असे समजेल; त्याची मानसिकता तशी बदलेल तेव्हा प्रशिक्षणाचा अर्थ व्यापक होईल.


प्रशिक्षणात शिक्षकाला त्याचा बदललेला ‘रोल’ सांगितला गेला पाहिजे. त्यासाठी समोरचा विद्यार्थी, त्याचा वयोगट, आर्थिक उत्पन्न गट, सामाजिक पार्श्वभूमी, पालकांची शैक्षणिक पार्श्वभूमी… या व अशांचा प्रशिक्षण अभ्यासक्रमात समावेश करणे, त्यावर विचार करणे अत्यावश्यक झाले पाहिजे व त्यानुसार शिकवण्याची पद्धत बदलली गेली पाहिजे.
मुख्य म्हणजे अपयश पचवण्यासाठी विद्यार्थ्यास तयार करणे व त्यातून त्याच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक विचार रुजवणे ह्यावर शिक्षकाच्या प्रशिक्षणात भर पाहिजे. पुलंच्या चितळेमास्तरांना आजचे प्रशिक्षण दिले गेले नसेल, पण त्यांना त्यांचा विद्यार्थी आतून-बाहेरून माहीत होता. त्यामुळे त्याला काय व कसे शिकवायचे हे त्यांना माहीत होते.
शास्त्राचे दोन प्रकार आहेत. 1.आदर्शवादी: तत्त्वज्ञान, मानसशास्त्र इत्यादी, 2. भौतिक शास्त्र: विज्ञान व त्याच्या शाखा.

शिक्षण हे शास्त्र आहे. प्रशिक्षण हे शास्त्राधारित पाहिजे, प्रशिक्षणात नैसर्गिक कल (Aptitude), कोणत्याही प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन (Attitude), संस्कार-संस्कृती-सुसंस्कृतपणा ह्यांचा विचार झाला नाही तर अपेक्षित फळ मिळत नाही. अशास्त्रीय शिक्षण-प्रशिक्षणाने अपयशाची शक्यता जास्त असते. उदाहरणार्थ इतिहास/भूगोल शिकवताना त्यांतील सनावळ्यांची माहिती महत्त्वाची नाही. त्या विषयातून नेमके काय शिकवायचे, दृष्टिकोन काय विकसित करायचा हे महत्त्वाचे व ते शिक्षकाला प्रशिक्षणातून माहीत झाले पाहिजे. त्यासाठी प्रसंगी प्रशिक्षण कार्यक्रमात लवचीकता आणता आली पाहिजे.
आपल्याकडे शिक्षणाचा प्रसार झाला आहे पण शिक्षणाचा दर्जा घसरत आहे, कारण आपले शिक्षण अशास्त्रीय आहे. त्यामुळे आंध्रचे दोनशे विद्यार्थी आयआयटीत असतात तेव्हा आपले पंचवीसच दिसतात. रिझर्व्ह बँक गव्हर्नर, परदेशस्थ उच्चशिक्षित या वर्गांत महाराष्ट्रीयांपेक्षा आंध्रवासीयांची संख्या जास्त आढळते, ती याच कारणाने.
शिक्षण म्हणजे जे माहीत नाही ते माहीत करून घेणे/देणे. अज्ञानातून ज्ञानाकडे जाणे. अनुकरणातून अनुभवाधारे स्वावलंबी होणे. निरीक्षण, संवाद, स्मरणशक्तीतील वाढ, स्वयंअनुभव, ज्ञान व त्याचे संवर्धन अशा साधनांद्वारे प्रगती साधणे. शिक्षणातून सर्वांगीण विकास साधता येतो पण ज्ञान आणि शिक्षण वेगवेगळे आहेत; तरी त्यात तफावत पडणे धोकादायक आहे. ज्ञान जीवनाभिमुख पाहिजे. विषय कोणता हे महत्त्वाचे नसून, त्यातून विद्यार्थी ‘घडणे’ हे महत्त्वाचे.
प्रशिक्षण हे एकतर्फी नको. एक धडा घेऊन, तो किती वेगवेगळ्या तर्‍हांनी शिकवता येतो हे शिक्षक- गटात प्रात्यक्षिकांसह दाखवले गेले पाहिजे. त्यावर चर्चा झाली पाहिजे. तो पाठ जुन्या पद्धतीने कसा घेतला गेला नि नव्या पद्धतीने घेतल्यास काय व कोणते अधिक लाभ संभवतात यावर शिक्षक-सहभागातून अंतिम नवीन पद्धत आखली केली गेली पाहिजे. उदाहरण म्हणून मराठी विषय घेतला, तर मराठी-प्रथम भाषा नि मराठी-दुय्यम भाषा, तसेच विद्यार्थ्यांची इयत्ता (जसे पहिली व दहावी) यासाठी वेगवेगळे शिक्षण नि तशी शिक्षणपद्धत अपेक्षित आहे, त्याचा प्रशिक्षणात समावेश झाला पाहिजे.
मुख्याध्यापक हा शाळेसंदर्भात नेता (Leader) असतो. Leader is he, who knows the path, shows the path असे म्हटले जाते. तो जितका प्रयोगशील, प्रेरणादायी नि उत्साही/चैतन्यदायी असेल तेवढे त्या शाळेतील प्रशिक्षण फलदायी ठरेल. पण त्यासाठी त्याची नेमणूक सेवाज्येष्ठतेनुसार हा निकष नसावा. इतर सरकारी अधिकार्‍यांप्रमाणे (I.A.S, मामलेदार इत्यादी) त्या जागेसाठी स्वतंत्र परीक्षा घेऊन, त्याची नेमणूक थेट केली जावी.
विशेषत: उत्तम नेतृत्वाचे गुण अंगी बाणण्यासाठी व बदलत्या परिस्थितीत ते अद्ययावत करण्यासाठी प्रशिक्षण असावे. त्यात व्यवस्थापन कौशल्यावर भर असावा.

प्रशिक्षण निरंतर म्हणजे पुन:पुन्हा किमान दर चार-पाच वर्षांनी सर्वांसाठी सक्तीचे असावे. ते Rotation ने घ्यावे म्हणजे एका वेळी, एकाच शाळेतील सर्व/बर्‍याच शिक्षकांना एकदम प्रशिक्षणासाठी बोलावू नये. त्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहवे लागते, तसे होऊ नये.
प्रशिक्षणानंतर सर्व संबंधितांच्या परीक्षा घेतल्या जाव्यात. त्यात त्यांची आवश्यक ती प्रगती न आढळल्यास, त्यांची पगारवाढ, सेवाज्येष्ठता रोखली जावी. त्यांनी पुन्हा परीक्षा देऊन, स्वत:ची प्रगती सिद्ध केल्यावर, ती पुन्हा दिली जावी/सुरू व्हावी. त्यासाठी खाजगी कंपन्यांत असते त्याप्रमाणे, त्यांचे शिक्षणविषयक ज्ञान, कौशल्य, शिक्षण व शिक्षणेतर उपक्रम/प्रयोग- त्यांची समज, सखोलता, आस्था ह्यांचे मूल्यमापन करणारे असावे, पण त्याचवेळी ते लवचीक, सहृदय नि Interactive असावे.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांचे मूल्यमापन करणे, शिक्षकांच्या पेशाला समृद्ध करू शकते.

दरवर्षी 1 ते 10 जूनच्या दरम्यान सर्वांसाठी प्रशिक्षण असावे. शिवाय प्रत्येक शिक्षकाने शाळेच्या तासा- व्यतिरिक्त किमान दोन तास, पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार, अगोदर किंवा नंतर शाळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे. त्या वेळात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी पुढील आठवड्याचे वेळापत्रक ठरवणे नि रोज दिवसभराचे/दुसर्‍या दिवसाचे वेळापत्रकानुसार नीट काम होत आहे हे सुपरवायझर/मुख्याध्यापक यांनी जाणून घेणे/देणे महत्त्वाचे.
प्रशिक्षणाला जाण्यापूर्वी संबंधित शिक्षकाला तो कोणते प्रशिक्षण घेणार आहे, त्याचा हेतू हे सांगितले गेले तर तो त्याकडे अधिक गंभीरपणे लक्ष देईल.
प्रशिक्षण घेऊन आलेल्या शिक्षकाचे प्रशिक्षणकाळातील अनुभव आणि प्राप्त झालेले नवीन ज्ञान त्याने इतर शिक्षकांबरोबर शेअर करणे, त्यावर चर्चा होणे, त्या नवज्ञानाची अंमलबजावणी सर्वांनी यथानुरूप करणे हे महत्त्वाचे.
सर्वांनी एकावेळी एका पुस्तकावर चर्चा केली तर त्यांच्या शाळेतील मुले व असलेले पाठ नजरेसमोर ठेवून, त्यांतील कोणते पाठ कसे शिकवायचे, त्यासाठी पाठाचे लेखक- त्याचे अन्य साहित्य, पाठातील वर्ण्य विषयावर अन्य लेखकांचे लिखाण यांचे शिक्षकांत आदानप्रदान  झाले तर पाठ शिकवणार्‍या शिक्षकाची तयारी आपोआप होईल. प्रशिक्षण झाल्यावर, तत्सम अन्य प्रशिक्षकांचे/तज्ज्ञांचे मार्गदर्शन पूरक म्हणून घ्यावे.
प्रशिक्षणकाळाचे वेळापत्रक पाळले जावे. त्यात वक्तशीरपणा असावा, सक्ती असावी, मार्गदर्शक गुणी नि ज्ञानी असावेत, Quiz, Games, Interactionयांद्वारा दिले गेलेले प्रशिक्षण जास्त प्रभावी आणि परिणामकारक होते. चांगले मानधन दिले गेले तर तज्ज्ञ मिळण्यात अडचण भासू नये.

प्रशिक्षणासाठी नव्या तंत्रसुविधांचा वापर व्हावा. उदाहरणार्थ Power Point Presentation. दोन प्रशिक्षण- काळात मोठा खंड पडल्यास, अशा शिक्षकाने त्याअगोदरच्या प्रशिक्षणासंबंधांत किंवा स्वत:च्या विषयासंबंधात, पूरक कोर्स केला तर त्याच्या ज्ञानात अद्ययावतपणा नि बहुश्रुतता, Versatality (अष्टपैलुत्व) येते. उदाहरणार्थ शरीरशास्त्रात ‘रक्त’ ह्या विषयावर अधिक माहिती देणारा कोर्स शिक्षकाने स्वखर्चाने केला तर असा शिक्षक त्याच्या विद्यार्थ्यांना त्या विषयात अधिक समृद्ध करू शकतो. त्याने आपणहून मुलांना नसलेली, नाविन्यपूर्ण माहिती दिल्याने, त्यांच्यात त्या विषयाविषयी आवड/ओढ/कुतूहल निर्माण करूही शकतो. ते दोघांनाही आनंददायी ठरते.
प्रशिक्षण शिक्षकाच्या दर्ज्याशी/हुद्याशी संबंधित असावे नि प्रशिक्षणधारकाचे त्यानंतरचे काम व योगदान यांवर त्याला दर्जा /हुद्दा/मोबदला/बक्षिस (Reward) देऊन त्याचा गौरव केला जावा. त्यामुळे त्यास उत्साह लाभेल व इतरांस त्यापासून प्रेरणा मिळेल,

प्रशिक्षणाचा काळ रविवार सोडून असावा. तसेच परीक्षा/रिझल्ट ह्यांना बाधक काळात ते नसावे.
मुलांना शिक्षणात आनंद वाटला तर मुले शिकतात. शिक्षकाने ते आनंददायी करायचे ठरवले तर स्वत: शिक्षकालाही वेगळा अनुपम आनंद लाभतो. त्यासाठी बालमानसशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा.
मुले Peer group मध्ये जास्त चांगली शिकतात. बाईंना घाबरणारी, ढ समजली जाणारी मुले, ह्यांना त्याच वर्गातील हुषार मुलांनी मार्गदर्शन केले तर ती लवकर शिकतात. ‘अ’ तुकडीतील मुलांनी ‘फ’ तुकडीतील मुलांचा प्रेमाने, आपलेपणाने अभ्यास घेतला तर अशी मुले लवकर शिकतात, अभ्यासू बनू शकतात. त्यामुळे Co-operative Learning यशस्वी ठरू शकते.

शिक्षकांसाठी

‘व्‍यासपीठ’च्‍या चर्चेतून आलेले मुद्दे कार्यान्वित करण्‍यासाठी व्‍यासपीठीयांकडून हालचाल सुरू झाली आहे. त्या संदर्भातील सूचना शिक्षण खात्‍याला सादर केल्‍या जाणार आहेत. त्यासाठीचा आराखडा तयार केला जात असल्‍याचे ‘व्‍यासपीठ’चे संस्‍थापक सुरेश जंगले यांनी सांगितले.

प्रोजेक्ट/प्रकल्प हा पृष्ठसंख्या- शब्दसंख्येपेक्षा त्यातील आशय नि Innovation यांना महत्त्व देणारा असावा.

वर्गात फलक-लेखन अत्यावश्यक समजावे.
प्रत्येक व्यक्तीला अधिकृत मान्यतेची (Recognition)गरज, ओढ असते. तिची त्यासाठी काहीही करायची तयारी असते. पण नेमके काय करायचे हे तिला माहीत नसते. त्यासाठी शिक्षकाचा व्यक्तिमत्त्वविकास होणे नि तो Performer असणे गरजेचे आहे. त्यासाठीही तज्ज्ञांमार्फत शिक्षण उपयुक्त ठरू शकते. शिवाय, तोही स्वत: काही प्रयोग करून, स्वत:स सिद्ध करू शकतो.
उदाहरण- 1.एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या यशासाठी वेगळा उपक्रम केला नि तो पालकांना आवडला तर शिक्षक नि पालक मुख्याध्यापकांना पटवून देऊन/दबाव टाकून तो उपक्रम चालू ठेवू शकतात. असा उपक्रम शिक्षकाच्या लोकप्रियतेत वाढ करतो.

2.विज्ञानातील एखाद्या प्रयोग सीडीद्वारे वर्गात दाखवणे. सीडी इंग्रजीत असल्यास, आवाज मूक (Mute) ठेवून, मराठीत तो प्रयोग समजावून सांगितला तर मुलांना चांगल्या रीतीने समजू शकतो. जास्त परिणामकारक ठरतो.

3.पाणी हा विषय शिकवताना पाण्याचे उपयोग, त्याची गरज, त्याचे जतन, जागतिक साठा, दूषित पाण्यापासून होणारे रोग, पाण्याचे महत्त्व अशा निरनिराळ्या कोनांतून तो शिकवला तर ते खर्‍या अर्थाने शिक्षण होईल.

4.मुले शिक्षकांपेक्षा जास्त बहुश्रुत असू शकतात. तेव्हा त्यांची मदत घेतल्याने, मुलांना आपोआप मोठेपणा मिळतो. जो त्यांना सुखावतो नि त्याचवेळी शिक्षकाच्या माहितीत भर पडते, जी त्याला अद्ययावत करते.

‘व्यासपीठ’- संपर्क :

श्रीधर गांगल – 022- 5471795, : shreedhargangal@gmail.com 

सुरेश जंगले –9869610403, 022-25453996,

वीणा आंबेकर– 02225410685

About Post Author