मुंबई ON Sale

0
32


मंत्रालयावर फडकणारा तिरंगा आपल्याला दुरून दिसतो. पण तिरंग्याचा आकार मंत्रालय वास्तूच्या
पसा-याची साक्ष देतो. एकवीस फूट लांबी व चौदा फूट रुंदी असलेला असा हा तिरंगा आहे. असे एकूण दीडशेपेक्षा अधिक ध्वज या वास्तूत आहेत. आज वापरलेला तिरंगा साफसूफ केल्याशिवाय दुस-या दिवशी पुन्हा फडकावण्यात येत नाही. ध्वजारोहणाच्या कामासाठी मंत्रालयात आठ कर्मचा-यांचा ताफा काम करत असतो.


मुंबई ON Sale

– अरुण मोकाशी

प्रकाश अकोलकरने ‘मुंबई ON SALE’ या पुस्तकाची सुरुवात संथपणे केली. गोलंदाज चेंडू टाकण्यापूर्वी तंबूच्या दिशेनं सावकाश पावलं टाकत जातो, तशी. पहिलं निवेदन ‘यह है बाँम्बे मेरी जान’ तब्बल बारा पानांचं झालं. पण यामध्ये फक्त घटनांचा निर्देश. त्याचे स्वत:चे किरकोळ अनुभव आले. ते मनाला भिडत नाहीत. त्यात त्याची स्वत:ची परखड मतं नाहीत. ‘ प्रेस क्लब’ ही तर केवढी अद्भुत चावडी, पण तिचा केवळ धावता उल्लेख. मात्र नंतर, पहिल्या प्रकरणापासून तो एकदा का खरी बोलिंग करायला लागला तेव्हा तो थेट ‘ दत्तू फडकर’ ब्रेबॉर्नवर आल्यासारखा वाटला! या मुंबई-कथनाचा आवेश भडाभडा गप्पा मारणा-या दोस्ताचा आहे.

अरुण साधू व प्रकाश अकोलकर व इतर मान्यवर..मुंबईकरांची वेगळी जिद्द : मुंबई महानगरानं गरिबाला श्रीमंत केले. त्यात आले मुकेश-अनिल अंबानी ( वडील गुजरातच्या खेड्यात मास्तर व मग एडनच्या पेट्रोल पंपावर कारकून), अमिताभ-शाहरूख (फुटपाथवर झोपले व कामासाठी प्रोड्यूसरकडे खेटे घालू लागले), मुरली देवरा (वडील स्टॉक ब्रोकर पण टी टी कृष्णम्माचारी स्कॅम झाल्यावर कुटुंब पार कोलमडले आणि मुरलीभाई पासष्ट रुपये पगारावर कापड गिरणीत लागले), मनोहर जोशी
( बहिणीच्या सास-यांच्या गॅलरीत राहिले व महापालिकेत कारकुनी करू लागले आणि वेळ काढून शिकवण्याही), सचिन तेंडुलकर (मध्यमवर्गीय प्राध्यापकाच्या घरात जन्मला), हर्षद मेहता (मुंबईत आल्यावर पोट भरण्यासाठी प्रथम शाळकरी मुलांसाठी वाचनालय उघडलं), महंमद रफी (भेंडी बाजारात फूटपाथवर राहिले)… मुंबईनं यांना धनवंत केलं. या कथा वाचताना मुंबईकराची छाती अभिमानानं फुगते.

मुंबई ON Sale पुस्तकांचे लेखक : प्रकाश अकोलकरमुंबई अर्थव्यवस्था : १८४० साली ‘मुंबई बॅंक’ स्थापन झाली. मग ओरिएंटल-कार्पोरेशन-कमर्शिअल-मर्कंटाईल-चार्टर्ड या बॅंका स्थापन झाल्या. तेव्हा इंग्लंडला लागणा-या कापसापैकी वीस टक्के कापूस इंडियाकडून जात असे. पण मग १८६० मध्ये अमेरिकेत ‘सिव्हिल वॉर’ सुरू झाल्यावर मुंबईचे भाग्य फळफळले. इंग्रजांची मुंबई ही एकमेव बाजारपेठ झाली. पहिल्याच वर्षी, मुंबईला सात लक्ष कोटी रूपयांची जादा रक्कम मिळाली. ‘ओपियम सिटी: द मेकिंग ऑफ अर्ली व्हिक्टोरियन बॉम्बे’ या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, अफू (२००६) व्यापारामुळे मुंबई श्रीमंत कशी झाली याचा थरार वृत्तांत प्रकाशनं सांगितला. मुंबईतील पारशी, मारवाडी, गुजराती, बनिया आणि कोकणी मुस्लिम १८२० सालापासून अफू व्यापारात उतरले. त्यामुळे अ-मराठी धनिकांकडे मुंबई-विकास करण्याचे काम गेले. चीनला जाणारी अफू कोलकाता बंदराऐवजी मुंबईतून धाडणे सोयीचे ठरले. १८०३ ते १८३० या काळात मुंबईतील युरोपीयन आर्मेनियम आणि इंडो-पोर्तुगीज पेढ्या वगळल्यावर एतद्देशीय उर्वरित एकशेवीस पेढ्यांपैकी एकोणपन्नास केवळ पारश्यांच्या होत्या. मुंबईत सतराव्या आणि अठराव्या शतकांपासून अठरापगड जाती-धर्मांचे लोक कसे एकत्रितपणे राहत होते, ही बाब यामुळे अधोरेखित होते.


मुंबईची जडणघडण : मुंबईत पैसा अफूच्या माध्यमातून येवो की कापसाच्या, त्या काळातही खरे मोल हे जमिनींनाच होते. त्यामुळे मुंबईकरांच्या हातात पैसा खुळखुळू लागल्यावर बॅक-बेवर समुद्रात भर घालून नव्याने जमीन निर्माण करण्याची कल्पना पुढे आली होती. ती तेव्हा प्रत्यक्षात आली नाही; पण नंतर शंभर वर्षांच्या आतच या राज्याची सूत्रे हातात आलेल्या मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी ती कल्पना जशीच्या तशी अंमलात आणली. सात बेटांच्या छोटेखानी शहराचे रूपांतर ‘मुंबई मेट्रो’त अलिकडे झाले. पण जागतिकीकरणानंतरच्या दोन दशकांत हे महानगर फायनान्शियल सर्व्हिसेस, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी आणि एंटरटेनमेण्ट इंडस्ट्री या क्षेत्रांतील जगातले मोठे शहर बनले. इथली पैशांची आवकजावक वाढती राहिली आणि ‘एक स्वर्ग आहे नरकाच्या बाहुपाशात’… या अली सरदार जाफरींच्या पंक्तीची प्रचीती येत गेली.

डान्स बार :  १९९० च्या दशकात हजाराच्या वर डान्स बार या महानगरात होते. त्यांचे प्रकार होते, देशी बार, ताडी-माडीचे बार, फॅमिली बार, पब, कॅसिनो, डान्सिंग बार, लेडिज सर्व्हिस बार, स्ट्रिप्टीज बार, सेक्स बार. मुंबापुरीतील एक कोटी जनतेला दारू पाजण्याच्या या उद्योगात किमान दोन लाख लोक गुंतलेले होते. याखेरीज अनधिकृत चालणारे धंदे वेगळे. जी मुलगी अधिक बेभान नृत्य करेल आणि गि-हाईकाला जास्तीत जास्त धुंद करून सोडेल, तिची किंमत मोठी आणि तिच्यावर उधळणा-या नोटांची किंमतही एका बैठकीला काही हजारांच्या घरात जाऊन पोचणारी. पुढे, १९९९ नंतर ‘तेलगी स्कॅम’ झाले तेव्हा या अब्दुल करीमने एका बैठकीत डान्स बारमधल्या नृत्यांगनेवर म्हणे एक कोटीच्या नोटांची उधळण केली होती! एका संघटनेच्या माहितीनुसार या व्यवहारात संपूर्ण महाराष्ट्रात पंचाहत्तर हजार मुली होत्या आणि त्यांपैकी निम्याहून अधिक मुंबईत होत्या! त्यांचे मासिक उत्पन्न दहा ते पंचवीस हजारांच्या आसपास जायचे.

राज्यकारभार आणि प्रशासन विषयक
  : राज्यपाल हरेकृष्ण मेहताब यांनी २४ एप्रिल १९५५ च्या संध्याकाळी ‘मंत्रालया’चं उद्घाटन केले. मोरारजीभाईंसारखा करडा, यशवंतराव चव्हाणांसारखा रसिक अन् लोकसंग्रहात रमणारा, वसंतराव नाईकांसारखा शेतीत रस घेणारा, वसंतदादा पाटलांसारखा समाजाच्या शेवटच्या पातळीवरील माणसाच्या जवळ बसणारा रांगडा मराठा, अंतुल्यांसारखा हाय-प्रोफाइल बॅरिस्टर, शंकरराव चव्हाणांसारखा करडा-शिस्तप्रिय हेडमास्तर, शरद पवारांसारखा वर्तमान आणि भविष्याचे भान असणारा… असे मुख्यमंत्री मंत्रालयाने पाहिले. यातल्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांचे एक-ओळ वर्णन भावून जाते. आणि शेवटी, हा कट्टर पत्रकार अचूक निरीक्षण नोंदवतो. “वास्तूचं नाव ‘मंत्रालय’ पण इथं राज्य चालतं ते सचिवांचं,” लेखक एक झकास गंमत रंगवून सांगतो. मोरारजींना ‘मंत्रालय-उद्घाटन मुहुर्त शुभ नाही’ असे समजले होते. म्हणून ते औपचारिक उद्घाटनाच्या दोन तास अगोदर मंत्रालयात आले. त्यांनी एक फाईल मागवली. त्यावर आपल्या वळणदार अक्षरांच्या झोकात ‘ओके’ करून सही ठोकली आणि उद्गारले, “चला! झालं की उद्घाटन या वास्तूचं”

सचिवांना कुर्निसात
: मो.ग.पिंपुटकर हे कुशल प्रशासक. अनेक महत्त्वाच्या कामांत एक काम त्यांनी अगदी निष्ठेने केले. ते म्हणजे, ओल्ड सेक्रेटरिएटमधून नव्या वास्तूत दप्तर हलवण्याचे. स.शं. तिनईकरांचा सणसणीत किस्सा सांगताना प्रकाश सांगतो – अंतुल्यांना फटकेबाज पद्धतीने कोटयवधी रूपयांच्या योजना जाहीर करण्याची सवय होती. ते या जिल्ह्यासाठी अमुक इतके कोटी… त्या योजनेसाठी तमुक कोटी.. असा सपाटा लावत. त्यामुळे सनदी अधिकारी अस्वस्थ होत. अशा वेळी धैर्य दाखवले ते तिनईकरांनी. त्यांनी एका बैठकीत उठून सांगितले, “ अशा पद्धतीनं पैशांची उधळण सुरू ठेवणं योग्य नव्हे”. अंतुल्यांचा पारा चढला. त्यांनी सुनावले, “ मिस्टर तिनईकर, यू स्टॅंड ट्रान्सफर्ड”. तितक्याच शांतपणे तिनईकरांनी तिथल्या तिथे अंतुल्यांना ऐकवले, “माझी बदली या क्षणीच काय केव्हाही होऊ शकते हे मी सरकारी नोकरीत प्रवेश केला, तेव्हाच मला ठाऊक होतं. त्यामुळे मला बदलीचं काहीच वाटत नाही”.  मंत्र्यांचा उध्दटपणा लेखकाने काय सफाईने आधोरेखित केला!

अधिकार मंत्रालयातल्या नोकरशहांकडेच राहिले! अधिकार खालच्या पातळीवरील माणसाकडे कधी दिले गेलेच नाहीत ही प्रशासन-नीतीतली खंत प्रगट झाली. आपल्या कामाची फाइल धूळ खाण्यासाठी कोणत्या कोप-यात जाईल ते सांगता येत नाही. विलासराव देशमुखांनी “तुम्ही स्वत:च फॉलो-अप करत राहा, तरच ते प्रकरण निकालात निघू शकेल” हे स्पष्टपणे सांगितले. लेखकाने टिपलेल्या प्रशासनातल्या या बाबी दिसतात क्षुल्लक, पण बरेच काही सांगून जातात!

मंत्रालयातील कार्याचा पसारा :  मंत्रालयावर फडकणारा तिरंगा आपल्याला दुरून दिसतो. पण तिरंग्याचा आकार मंत्रालय वास्तूच्या पसा-याची साक्ष देतो. एकवीस फूट लांबी व चौदा फूट रूंदी असलेला असा हा तिरंगा आहे. असे एकूण दीडशेपेक्षा अधिक ध्वज या वास्तूत आहेत. आज वापरलेला तिरंगा साफसूफ केल्याशिवाय दुस-या दिवशी पुन्हा फडकावण्यात येत नाही. ध्वजारोहणाच्या कामासाठी मंत्रालयात आठ कर्मचा-यांचा ताफा काम करत असतो.

मंत्रलयातील भूत : रात्रीच्या वेळी काम करून जिन्याकडे जाणा-या एका कर्मचा-याला अॅनेक्स इमारतीच्या कॉरिडोरमधे भुतासारखी आकृती दिसली. तो किंचाळून बेशुद्धच पडला! कर्मचा-याची किंकाळी ऐकून ड्यूटीवर असलेले दोन कर्मचारी धावून आले. त्यांनी
कर्मचा-यावर उपचार करून त्याला घरी पाठवले. पण पुढे, प्रकरण कर्मचा-यांच्या युनियनकडे गेले आणि मग जी.ए.डी.कडे. या वास्तूतले आणखी एक गूढ म्हणजे, मंत्रालयाच्या एका विशिष्ट भागातील दिवे म्हणे, अमावस्या व पौर्णिमेला अचानक लागत. कारण हा भाग बांधला जात असताना तिथे दोन-चार कामगार मृत्यूमुखी पडले होते. रात्रभर त्या परिसरात राहून याची खातरजमा करून घेतलेला माणूस मात्र सापडत नाही.

‘वर्षा’वरचे भूतही नाईक सह्याद्रीवर का राहायला गेले नाहीत, या बाबतीतली दंतकथा. कन्नमवारांच्या आकस्मिक निधनानंतर सह्याद्रीवर भूत असल्याची चर्चा सुरू झाली. ती अर्थातच आचार्य अत्र्यांनी पिकवलेली असणार. कारण ‘प्रल्हाद केशव’ हात धुऊन ‘मारोत’रावांच्या पाठीशी लागले होते. त्यांचे आकस्मिक निधन होताच अत्र्यांनी चर्चा पुढे सुरू ठेवली, असे सांगितले जाते. नाईकांनी तिथे न जाण्याच्या निर्णयामागे भुताची ‘अंदरकी बात’ होती. मात्र तेव्हापासून ‘वर्षा’ला महाराष्ट्राच्या राजकारणात ‘न भूतो न भविष्यति’ असं महत्त्व प्राप्त झालं. नाईकांनी तेथून बारा वर्षें राज्याचा गाडा हाकला होता. भुताशी निगडित या दोन्ही कथा लेखकाने खुलवून सांगितल्यामुळे वाचताना मजा येते.

विधानसभा वास्तूचा अवमान : शरद पवार १९७८ साली पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना एका सभासदाने त्यांच्यावर चप्पल फेकून मारली. २५ जुलै २००० रोजी विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना विधानसभेत रणकंदन सुरू झाले. कारण होते, एके काळी शिवसेनेचे छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी सरकारात गृहखात्याची सूत्रे हाती आल्यावर बाळासाहेब ठाक-यांना अटक करण्याचा चंग बांधला. भडकलेल्या सदस्यांनी राज्याच्या सर्वोच्च सभागृहाच्या फर्निचरची पुरती मोडतोड केली. माईकचा शस्त्र म्हणून वापर झाला. निवडून आलेले सदस्य अध्यक्षांच्या अंगावर धावून गेले. त्यांच्यासमोरील राजदंड पळवून नेला. सभागृहाचे उध्वस्त रूप कोणत्याही सुजाण नागरिकाची मान शरमेने खाली घालायला लावणारे होते. या प्रसंगाचा साक्षीदार असल्याने प्रकाशने चोख शब्दांत वृत्तांत सांगितला.

एक हृद्य प्रसंग
:  विलासरावांच्या कारकिर्दीत वर्षा बंगल्यावरच्या हिरवळीवर रंगलेल्या एका मैफिलीच्या प्रसंगाची हकिगत प्रकाशने आपल्याला हळूच कानात सांगितली आहे. पंडित जसराजांची मैफल होती. मजा आली त्या रात्री. पण त्याहीपेक्षा तिथे उपस्थित असलेल्या हिंदुजा बंधूचे चित्र ध्यानात राहिले. विलासरांवानी का बोलावले होते त्यांना तिथे? बोफोर्स खटला अगदी रंगात आलेला असताना त्या पार्श्वभूमीवर बंधुद्वयाची चाललेली लगबग डोळ्यांत भरणारी होती!

आणखी चित्तवेधक कहाण्या : लोकसभेच्या १९६७ साली झालेल्या निवडणुकीची धामधूम. एका साप्ताहिकाने मुखपृष्ठावर अफलातून व्यंगचित्र प्रसिद्ध केले. निवडणुकीत मुंबईतून फर्नांडिस आणि डांगे विजयी झाले. पण कृष्ण मेनन, आचार्य अत्रे, एच.आर.गोखले या दिग्गजांचा पराभव झाला. व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यातून उतरलेली ‘लुंगी’ ही अर्थातच मेनन यांची होती, चष्मा गोखले यांचा होता आणि मरून पडलेलं ‘वरळीचं डुक्कर’ म्हणजे साक्षात् आचार्य अत्रे. त्या व्यंगचित्रकाराचे नाव होते ‘बाळ केशव ठाकरे’ आणि साप्ताहिकाचे नाव ‘मार्मिक’.

१९६१ च्या केंद्र सरकारी कर्मचा-यांच्या संपाचे नेते जॉर्ज फर्नांडिस नव्हते, पण रस्त्यावर उतरलेल्या कामगारांमध्ये ते अग्रभागी असत. एका रात्री झालेल्या मारहाणीत फर्नांडिस मृत्यू पावल्याचे वृत्त आले. परिस्थिती चिघळली. पण फर्नांडिस आडनावाचा हा माणूस किती ‘मराठी’ आहे याची लवकरच प्रचीती आली! १९६४ साली, त्यांनी ‘मुंबई महापालिकेचे काम मराठीतूनच झाले पाहिजे’ हा ठराव मांडला मृणाल गोरे यांच्याबरोबर. निवडणुकीत विजयी झाल्यावर, मुंबईकरांनी त्यांचा जिवंतपणी पुतळा उभारला. चर्नीरोड रेल्वे स्थानकाजवळच्या त्यांच्याच नावाच्या उद्यानात.

दुर्गा भागवतांची एक आठवण
: त्या एकदा फर्स्टक्लासमधून प्रवास करत होत्या. नऊवारी लुगडे आणि कपाळावर मोठे कुंकू असा नेहमीचा थाट. डब्यातल्या बाकीच्या कचकडी बाहुल्यांना दुर्गाबाई म्हणजे परग्रहावरून आल्यासारख्या. एका आंग्लाळलेल्या महिलेने म्हटले, ‘ये फर्स्टक्लास है’! दुर्गाबाईंनी आपला फर्स्टक्लास पास दाखवला. यावर दुर्गाबाईंचे भाष्य होते, ‘फर्स्ट क्लासमध्ये तुमची ओळख तुमच्या कपड्यांवरून पटणारी आणि त्यासाठी वर्षाचे तीनशेपासष्ट दिवस प्रयास’.

अयोध्येतील बाबरीकांडानंतर मुंबईत रस्तोरस्ती आगी भडकल्या, पण त्याहीपेक्षा मुंबईकरांच्या मनात भडकलेल्या सुडाच्या ज्वाळा अधिक धोकादायक होत्या. ‘आम्ही’ आणि ‘ते’ अशी उभी फूट पडली ती तेव्हापासून. त्याच्यापोटी बाळासाहेब उद्गारले, ‘तुमच्याकडे दाऊद असेल तर आमच्याकडे गवळी आहे’! यापेक्षा अधिक विनाशकारी विधान शोधूनही सापडणार नाही.

खरा मुंबईकर
: एखाद्या वेळी पर-माणसांनी केलेल्या अघोर कृत्यांनी मुंबईकर खवळला असेल पण त्याचा आणखी एक चेहरा दिसला, २६ जुलै २००५ रोजी, मुंबईवर वरुणराजाची अवकृपा झाल्यावर. अर्धी मुंबई वाहून गेली होती. बारा तासांनी पाऊस थांबला. पण पाणी उतरायला तयार नव्हते. तेव्हा. ‘अवघी मुंबई एकचि’ झाली. स्वत:भोवती स्वत: उभ्या केलेल्या भिंती जमीनदोस्त करून माणूस म्हणून मुंबईकर अडचणीत सापडलेल्या सर्वांच्या मदतीला धावला. प्रकाशने सादर केलेला असाही ‘मुंबईकर’ वाचताना आपल्याला चक्क भडभडून येते.

निराशेची मरगळ : राजकर्त्यांनी मुंबईकरांना पायाभूत सेवांचे स्वप्न दाखवले. एकविसाव्या शतकातला तो नवा मंत्र आहे, पण त्यामुळे खरेच गर्दी कमी होणार आहे? हा प्रश्न विचारताना या पत्रकार लेखकाने ‘ ‘रोजच्या रोज नव्याने येणा-यांची गर्दी थांबवा’ या जुन्या आदेशाची आठवण देऊन ती न ऐकल्याने ‘मुंबई विकायला काढणे शक्य झाले’ असा निष्कर्ष सादर केला. मात्र मुंबईत होणा-या सध्याच्या काही नव्या परिवहन योजनांना अर्थ नाही असे ध्वनित केले, हे अवलोकन खटकणारे आहे. अखेरच्या दोन-तीन परिच्छेदांत प्रकाशने सध्या चालू असलेल्या आणि रखडलेल्या विकास योजना मांडताना बॅक-बे रेक्लमेशनला तीव्र विरोध व्यक्त केला. पूर्व-पश्चिम उपनगरांना रेल्वेमार्गांनी जोडणा-या अद्याप अधु-या योजनेचा निर्देश केला. कोंडी हलकी करण्यासाठी बांधलेल्या पण ते उद्दिष्ट साधू न शकलेल्या फ्लाय-ओव्हर्सच्या जाळ्याची आठवण करून दिली. निराशेच्या भरात तर लेखकाने स्कायवॉकना चटकन ‘अडाणी प्रकल्प’ म्हटले. हे सुद्धा खटकले. खरे तर, पत्रकार प्रकाश अकोलकर मुंबईच्या ‘धर्मक्षेत्र कुरूक्षेत्रे’ होणा-या संग्रामाची कहाणी साक्षात् ‘ संजय उवाच’च्या आवेशात सांगत होता, पण तो त्या भूमिकेतून अचानक सटकून गेला, सर्वसामान्य मुंबईकर. म्हणजे कधी कधी नैराश्याने मरगळ येऊन दुःखाने स्वत:च व्याकूळ झालेला. पण मुंबईबद्दल एवढे नकारात्मक कशाला व्हायचे? दररोज पेपर रकान्यातून भेटणारा त्या्च्यासारखा सखा असे काहीच्या बाहीच बोलू लागला, की मुंबईकरांनी सकाळी कोणाचे रकाने वाचायचे? त्याला वाटणा-या या योजना बांधणे चुकीच्या आहेत हे मानले तर कसली वाट पाहायची? येणा-या लोंढ्यांची? वाहतूक कोंड्यांची? स्कायवॉकऐवजी रस्त्यावरून चाललेला मित्र किंवा मेहुणा चिरडून ठार मेल्याचे पाहायची? हे महानगर विकल्याची? का कोलमडलेले पाहायची?

या पुस्तकाचे प्रकाशन २१ जुलै २०१० रोजी झाले. प्रकाशन सोहळ्याच्या आरंभी आयुक्त रत्नाकर गायकवाडांनी मुंबईत चालू असलेल्या विकास प्रकल्पांचा धावता आढावा घेतला. ‘यामुळे मुंबईच्या समस्या सुटणार नाहीत पण मुंबईकरांचे जीवन सुसह्य करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न’ असल्याचे प्रांजळपणे स्पष्ट केले. त्यांच्या सारख्यांकडून असे कानावर आले की मुंबईकरांना केवढा दिलासा वाटतो! त्याच दिवशी बोलताना अरुण साधू यांनी तर चक्क वर्मावर बोट ठेवले. त्यांचे म्हणणे होते, ‘मुंबईतल्या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी सैल होईल कदाचित. पण मुंबईला येणा-या लोकांचे लोंढे निश्चित वाढतील. याला राजकीय आणि फक्त राजकीय तोडगा आहे.’

पण प्रकाशनेच भूतकाळात किती जणांनी मुंबई विकायला काढली ते सांगितले. भविष्यात पण काही वेगळे घडणार नाही. मात्र हे शहर कधीच कुणाला विकता येणार नाही. कारण या महानगरात दिनू रणदिवे, प. बा. सामंत, जॉर्ज फर्नांडिस, मृणाल  गोरे असतील. सरकारदरबारी मो. ल पिंपुटकर, भालचंद्र देशमुख, द. म.सुकथनकर, तिनईकर, रत्नाकर गायकवाड असे निस्पृह सनदी अधिकारी असतील. या सर्वांचे कर्तृत्व मुंबईकरांच्या मनात आशेची मशाल पेटवून जातील.

‘मुंबई ON Sale’ हे पुस्तक म्हणजे बलदंड प्रतिभेच्या एका मुंबईकर पत्रकाराने आपल्याशी केलेले मस्त गप्पाष्टक आहे.

– अरुण मोकाशी

भ्रमणध्वनी : 9820601531
दूरध्वनी : (022) 25211712
arunpmokashi@hotmail.com


देशस्थिती ! – काही वात्रटिका

– भाऊसाहेब कणसे

प्रासंगिक : १५ ऑगस्टच्या निमित्ताने


डॉ. भाऊसाहेब कणसे हे साता-याला प्रॅक्टिस करतात. ते लेखक-कवी-व्याख्याते आहेत. त्यांच्या वात्रटिका साता-याच्या स्थानिक दैनिकात रोज प्रसिद्ध होतात. येथे त्यांपैकी चार प्रसृत करत आहोत, त्या स्वातंत्र्यदिनाचे निमित्त करून. त्यांचे ‘बेवड’ हे आत्मकथन गाजले. त्यांची किस्से सांगण्याची हातोटी विलक्षण आहे. त्यांच्या वात्रटिकांचा संग्रह लवकरच प्रसिद्ध होत आहे.

निवडक वात्रटिका

१. मंत्री पाहिजेत

खालील मंत्रीपदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत :

वयाची, जातीची, धर्माची, शिक्षणाची अट नाही.

निर्ढावलेल्या गोटाक् मंत्र्याच्या शिफारशी

अजिबात चालणार नाही.

रिक्तपदे
भूखंड मंत्री-१, गडबडघोटाळा मंत्री-१,
प्रदूषण मंत्री-१, भ्रष्टाचार मंत्री-१,
बिनखात्याचा मंत्री-१

कार्यानुभव

नापास झाल्याचे सर्टिफिकेट.
मारामा-या, बलात्त्कार, गुंडगिरी, खाबुगिरीचे सर्टिफिकेट.बॅंका,

पतसंस्था, दूध पुरवठा संघ मातीत घातल्याचे सर्टिफिकेट.

भूखंड गिळल्याचे सोनोग्राफीसहित डॉक्टरचे सर्टिफिकेट.
चांगल्या वर्तणुकीचे तुरुंग अधिका-याचे शिफारसपत्र

सूचना

कोणत्याही परिस्थितीत लाच स्वीकारली जाणार नाही.

फॉर्म फी

किंमत फक्त दोन कोट रुपये
पद न मिळाल्यास पैसे परत मिळणार नाहीत

विशेष सूचना

येताना चप्पल, बूट, सुरा, कात्री, काठी,
पिस्तूल, बंदूक बरोबर न घेता एकटेच या!
खुर्चीच्या गैरवापरामुळे बसायला खुर्ची

मिळणार नाही.
गरजूनी त्वरित भेटावे.

 

२. महान देश

गडबडघोटाळे, गोंधळ, दंगेधोपे,
मारामा-या, खून-बलात्कार, आरोप-प्रत्यारोप,

लाचलुचपत, भ्रष्टाचार, खोटेनाटे, साटेलोटे,

आत्महत्या, उपोषणे, मोर्चे, लैंगिक शोषण,
बुवाबाजी, ढोंगबाजी, वशिलेबाजी, थापेबाजी,
घोषणाबाजी, अहंभाव, उदोउदो, वैयक्तिक स्तोम,

गंडवागंडवी, लफडी, लाचारी, लाळघोटेपणा
या
सा-या गोष्टी एकाच देशात होतात.

त्या देशाचं नाव काय?मला माहीत नाही.
लेका, चाळणीत पाणी घे अन् जीव दे.

 

३. कसायदान

जो जे आम्ही खाओ | तो ते उजेडी न येवो |
ते तसेच, आमचेच राहो |

अशीच आमची उत्तरोत्तर प्रगती होवो |

विरोधकांना कायम अपयश येवो |

त्यांची कायम अधोगती होवो |

जनता अशीच भोळीभाबडी राहो |

आम्ही त्यांच्या टाळूवरचे लोणी खावो |

पैसा, सत्ता, मानमरातब आमच्या

पायाशी लोळण घेवो |

पुढच्या आषाढी एकादशीला

मीच तुझ्या पूजेला येवो |

भ्रष्टधर्म वाढत राहो

करकटेवरी ठेवुनी तू
असाच उभा राहो |

 

४. चमचेगिरी ते चमकोगिरी

मला वाटायचं, महाराष्ट्र हे
स्वाभिमान्यांचं राज्य आहे
पण,
कुठलं काय अन् कुठलं काय
महाराष्ट्र हे चमच्यांचं राज्य झालंय
छोटा चमचा, मोठा चमचा
स्टीलचा
चमचा, प्लॅस्टिकचा चमचा
चांदीचा चमचा,
सोन्याचा चमचासारे चमचेच चमचे

काही वगराळी आहेत तर काही आहेत

पळ्याखोटं सांगत नाही खुळ्या

तुम्ही राहा उपाशी, ते चोखताहेत

नळ्यानेत्याच्या वाढदिवसाच्या दिवशी

हे चमचे फ्लेक्सवर झळकतात

मोठाले हार घेऊन दारी हजर होतात

मान मोडलेली ही जमात चांगलीच चेकाळलीय
चमचेगिरीची ही पद्धत महाराष्ट्रभर बोकाळलीय


– भाऊसाहेब कणसे

भ्रमणध्वनी : 9423866160

About Post Author

Previous articleसाईबाबांमधील संस्कृतिसंकर
Next articleजात म्हणे जात नाही!
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.