मराठी माणसाचे मराठीपण हरवत चालले आहे का?

मराठी भाषकांचे राज्य स्वतंत्र भारतात स्थापन करण्यासाठी ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’ हा लढा उभारला गेला. महाराष्ट्र राज्य 1 मे 1960 रोजी अस्तित्वात आले. तेव्हापासून 1 मे हा ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा होऊ लागला. योगायोग असा, की त्याच दिवशी जगभर ‘कामगार दिन’ही साजरा होतो. संयुक्त महाराष्ट्र चळवळ यशस्वी झाली ती मुख्यत: कामगार वर्गाच्या पाठिंब्यामुळे !

मराठी माणसाची आर्थिक सत्ता महाराष्ट्रात सतत कमजोर राहिली आहे. त्यामुळे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी होऊनसुद्धा मराठी सत्ताधारी वर्गाची मुंबईवरील व त्या अनुषंगाने महाराष्ट्रावरील पकड ढिली होत गेली आहे. परिणामत: मुंबईतील व महाराष्ट्रातील मराठी माणूस सत्त्वहीन झाला आहे, मराठी माणसाची ओळख हरवली गेली आहे, मराठी माणूस सामाजिक बांधिलकी विसरून आत्ममग्न झाला आहे.

महात्मा फुले यांचे शेती व बांधकाम या क्षेत्रांतील योगदान, लोकमान्य टिळकांची स्वदेशी चळवळ यामुळे मराठी माणसात उद्योजकीय वृत्ती वाढेल अशी अपेक्षा होती. किंबहुना टिळकांनी पैसाफंड त्याच दृष्टीने उभारला होता. पुढे धनंजयराव गाडगीळ, विखे पाटील यांनी सहकारी चळवळीच्या माध्यमातून उद्योगास अग्रस्थान दिले. परंतु मराठी माणूस वाढला तो कारखाने, कापड गिरण्या, बांधकाम, सहकारी उद्योग, सहकारी बँका, व्यापार इत्यादी क्षेत्रांत कारकून व कामगार म्हणून. सध्याची मुंबई कशी आहे? मुंबईतील ब्रिटिश बांधकामशैलीचे वैशिष्ट्य टिकून आहे. पारशी समाजाची छापही मुंबईवर ठळक दिसते. गुजराथी (व्यापारी) समाजाचे आर्थिक क्षेत्रात प्राबल्य दिसून येते. उत्तर भारतीय कष्टकरी समाजाच्या संस्कृतीची छाप मुंबईवर नव्याने उमटली आहे.

मुंबईत व महाराष्ट्रात 1980 पर्यंत कम्युनिस्ट/डावे, समाजवादी, आंबेडकरी चळवळ पाय रोवून होती. त्या चळवळींची दखल राज्यकर्त्यांना व अर्थसत्तेला घ्यावी लागत असे. त्या चळवळींमुळे मराठी माणूस संघटित होता. त्याचे अस्तित्व, त्याचे सांस्कृतिक भान- त्याच्या अस्मिता, त्याचे सत्त्व यांची दखल घेतली जात होती. परिणामत: मुंबईत व महाराष्ट्रात मराठीपण टिकून होते. कोणत्याही प्रदेशाची अस्मिता ही तो समाज किती संघटित आहे व तो करत असलेल्या अस्तित्वाच्या, मुक्तीच्या लढाईचे परिणाम साहित्य-कला-शास्त्र, संगीत, काव्य, चित्रकला यांवर ते अवलंबून असते. मुंबईत व महाराष्ट्रात आदिवासी, वंचित, स्त्रिया, शेतकरी-शेतमजूर, कामगार, पांढरपेशा यांच्या चळवळी जोरात होत्या तेव्हा ग्रामीण जीवनापासून शहरी जीवनापर्यंत मराठी संस्कृतीची छाप सर्वत्र होती. भूमिहीन लोकांच्या आंदोलनाचा परिणाम होऊन विनोबा भावे यांनीसुद्धा ‘भूदान चळवळ’ उभी केली. विनोबांमुळे मराठी माणसाचे आध्यात्मिक विचारविश्व समृद्ध झाले. देवधर्म, कर्मकांड, पाप, परलोक यांत अडकलेल्या धर्माची सुटका होऊन अध्यात्म हे नैतिक पायावर उभे राहिले. अध्यात्माची मानवतेशी सांगड घातली गेली. परिणामी मराठी माणसाच्या धर्म संकल्पना मानवतावादी झाल्या. गांधीजींच्या व विनोबांच्या शिक्षणविषयक विचारांचा प्रभाव शिक्षण चळवळीत काम करणार्‍या कार्यकर्त्यांवर पडला व महाराष्ट्रात विविध भागांत शिक्षणाचे प्रयोग सुरू झाले.

डाव्या चळवळीचा आधार हा मुख्यत: मुंबईतील गिरणी कामगार हा होता. तेथे कम्युनिस्टांचा प्रभाव होता. तो बहुसंख्येने मराठी होता. तसेच, तो महाराष्ट्राच्या विदर्भ, मराठवाडा, खानदेश, नगर, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा भागांतून आला होता. तो त्याच्या भागातील खाद्यपदार्थ, त्यांची लोकसंस्कृती, उत्सव, सण-समारंभ, चालीरीती, वेशभूषा यांचे वैशिष्ट्य जपून व टिकवून होता. स्थानिक संस्कृती जोपासत होता. त्यामुळे मुंबईत मराठी माणसाचा सांस्कृतिक संगम झाल्याचे पाहण्यास मिळत होते. त्यामुळेच मुंबईमध्ये मराठी संस्कृती, अस्मिता, स्वतःचे अस्तित्व ठळकपणे जाणवून देई.

मराठी भाषा समृद्ध करण्याचा पाया महाराष्ट्रातील संत चळवळीने घातला. मराठी माणसाच्या मराठीपणाची जडणघडण ही संत विचारांनी घडली आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, नामदेव, जनाबाई, रामदास स्वामी यांच्या संस्कारांत मराठी माणूस घडत गेला. धर्म हा मानवतेसाठी, समतेसाठी ही विचारधारा वारकरी चळवळीने मराठी मनात रुजवली आणि सारे आध्यात्मिक ज्ञान मराठीत/प्राकृतात आणले. छ्त्रपती शिवाजी महाराजांनी प्रशासनाचे काम मराठी भाषेत करण्याचे योजले. मराठी भाषा पुनरुज्जीवित केली. त्यामुळे सामान्य, वंचितातील अज्ञान दूर होण्यास मदत झाली.

विविध विषयांच्या अंगाने सुरू असलेल्या चळवळींमुळे मानवता आणि मानवतेपुढील आव्हाने यावर साहित्यिक, नाटककार, चित्रकार, कलावंत यांचे लक्ष केंद्रित झाले. त्यामुळे सुधीर पटवर्धन यांच्यासारख्या अनेक चित्रकारांनी मानवकेंद्री विषय निवडले. चित्रकलेच्या माध्यमातून मानवाच्या पीडा व्यक्त होऊ लागल्या. मानवतेचे संवर्धन, जतन हा कलेचा प्रमुख विषय झाला. मर्ढेकरांपासून नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे यांच्यापर्यंत सर्वांच्या काव्यावर डाव्यांच्या चळवळीचा प्रभाव दिसून येतो. त्यातील सर्व लोकांना मार्क्सवाद मान्य होता, कम्युनिस्ट मान्य होते असे नव्हे, पण विविध क्षेत्रांतील चळवळींमुळे सर्वसामान्य जनता राजकारणाच्या, समाजकारणाच्या, साहित्याच्या आणि इतिहासाच्या केंद्रस्थानी राहिली. विज्ञानावरही कम्युनिस्ट/डावी चळवळीचा प्रभाव पडला आणि अण्वस्त्र नकोत, पुन्हा ‘हिरोशिमा’ नको अशी आंदोलने उभी राहिली. त्यातून लोकांसाठी विज्ञान ही भूमिका मांडणारी ‘लोकविज्ञान संघटना’ जन्माला आली.

महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी साहित्यिकांना कथा, कादंबरी, कविता, नाटक, शाहिरी, वग, जलसे, पथनाट्य, चित्रपट, चित्रकला या माध्यमांकरता विषय कम्युनिस्ट, समाजवादी, आंबेडकरी, आदिवासी, स्त्रीमुक्ती या चळवळींमुळे मिळाले. समाजाशी निगडित व्यक्तींच्या, स्त्रियांच्या, आदिवासींच्या भावविश्वाशी संबंध असलेल्या विषयांना चालना मिळाली. दखल घेण्यास भाग पाडणारे दलित साहित्य निर्माण झाले. ‘महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळा’ची स्थापना झाली – ‘कामगार नाट्य स्पर्धा’ जन्माला आली. त्यामुळे मराठी व्यक्ती हा त्याच्या स्वत:च्या विकासाबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासत गेला. चित्रपटांमध्ये सामान्य जनतेचे विषय घेऊन त्याचे प्रतिबिंब उमटले. मराठी चित्रपटात ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘उंबरठा’ असे चित्रपट निर्माण होत गेले. मराठी साहित्यामधील विषयसुद्धा माणूसकेंद्री झाले. अशा विविध चळवळींमुळे मराठी संस्कृती समृद्ध, सकस झाली. तिचा परिणाम हिंदी साहित्य, बॉलीवूड चित्रपट यांच्यावरसुद्धा झाला.

सद्यकाळात महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक नाडी असलेल्या मुंबईतील मराठी संस्कृतीची छाप, मराठीपण, मराठी अस्मिता हे सर्व निष्प्रभ होत गेले आहे. विविध चळवळी हरवल्यामुळे मराठी माणूस सत्त्वहीन झाला आहे. मराठी माणसातील मराठीपण निमाले-विझले गेले आहे. मुंबईतीलच नव्हे तर सार्‍या महाराष्ट्रातील मराठी अस्मिता, मराठी संस्कृतीचे वैशिष्ट्य, मराठीपण हे लयास गेले आहे. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानामुळे एकूणच मानवता धोक्यात आली आहे. एकूण माणूस आत्मकेंद्री होत आहे. गेल्या तीस वर्षांत कष्टकरी पालकांपासून अनेकांची पाल्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत आहेत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे भाषावार प्रांतरचनेनुसार महाराष्ट्र स्थापन झाला खरा आणि महाराष्ट्र राज्याची मराठी ही राज्यभाषा झाली खरी, पण ती अर्थव्यवहाराची, रोजगाराची, बँकव्यवहाराची, उच्च शिक्षणाची, विज्ञान-तंत्रज्ञानाची भाषा होऊ शकली नाही. ही स्थिती मुंबईपुरती नसून गावपातळीवरसुद्धा आहे. उच्च शिक्षण इंग्रजी भाषेतच मिळते. त्यामुळे आपोआपच मुलांचा मराठी भाषेशी संबंध तुटतो. फक्त घरात बोलण्याची भाषा म्हणून मराठीचे अस्तित्व आहे.

आम्ही आजी-आजोबा म्हणून आमच्या नातवांचा अनुभव घेत आहोत. साधे घरात बोलताना, त्यांना सोपे मराठी शब्द जड वाटतात. त्यांचा अर्थ काय म्हणून ते विचारतात. भावी पिढीकडून मराठी माणसाचे सत्त्व, मराठी माणसाचे मराठीपण, मराठी माणसाची ओळख याविषयी अपेक्षा बाळगणे हे मृगजळाच्या मागे धावण्यासारखे आहे ! ‘हास्यजत्रे’तील शक्तिमान, सुपर पॉवर असलेला दत्तू हा आजच्या पिढीचा प्रतिनिधी आहे. 

– राजेंद्र गाडगीळ 8999809416 gadgilrd@gmail.com

About Post Author

4 COMMENTS

  1. मराठी माणसाला लहानपणापासून शिकवण मिळते ती दारिद्र्यात सुख मानण्याची. ठेविले अनंते तैसेचि राहावे हे मनावर बिंबवलं जातं. परंतु तसं राहता येत नाही हे मोठेपणी उमगतं. पैसा मिळवणं म्हणजे पाप अशी दुसरी शिकवण. मराठी माणूस नेहमी दुकानदार, व्यापारी, कारखानदार यांना ‘लबाड’ समजत आला. मोटारीतून फिरणाऱ्याचा द्वेष करत आला. यांचा दुटप्पीपणा असा की पैसा हे सर्वस्व नव्हे असा इतरांना उपदेश करायचा आणि स्वतः मात्र जास्तीत जास्त वेतनाची नोकरी शोधायची. दुसरा अवगुण म्हणजे प्रचंड न्यूनगंड. स्वतःची भाषा, स्वतःच्या गावाचा वारसा, स्वतःचा नोकरी धंदा याबद्दल बोलताना मराठी माणूस नेहमी अकारण अपराधी बनतो. तिसरा अवगुण म्हणजे हा पुढारी आणि बुवांच्या मागे लागतो. मराठी भूमीत सर्वाधिक संत आणि सर्वाधिक संत वाङमय निर्माण झालं. पण तुकारामांचा अभिमान फक्त दुसऱ्याच्या अंगावर धावून जाण्यापूरता. एरवी किती जणांना अभंग पाठ येतात? इतकी मोठी संत मालिका असताना भोंदू सद्गुरु, बापू, बुवा नि महाराज यांच्याकडे जाण्याची गरज काय? चौथे, एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला साथ/ पाठबळ देण्यास कायम कचरतो. आता स्वतःच्या जातीला चिकटून राहण्याचा नवा दुर्गुण मराठी माणसात वाढलाय. यामुळे जिकडेतिकडे पीछेहाट! याला दुसरा कुणी कारणीभूत नाही. इतरांनी या वृत्तीचा पुरेपूर लाभ उठवला इतकंच!

  2. सर्वसामान्य मराठी माणूसच नव्हे देशभरातील सर्वसामान्य माणूस आत्ममग्न नव्हे तर आत्मचिंतित आहे.
    सततच्या ‘रॅट रेस’मुळे त्याला आत्ममग्न होण्याइतपत फुरसत कुठे मिळते?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here