मनुष्यजीवनाला आकार देणारा संस्कार – मौंजिबंधन

    1
    74

    पुण्याच्या ‘पाटणकर इव्हेंट्स’ने मौंजिबंधन म्हणजेच उपनयन संस्कार सार्वजनिक करण्याचे आणि तो सर्व जातींतील मुलामुलींना उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेतले आहे. ती एक मोठीच मोहीम होऊ शकते. योगायोग असा, की सकाळ वृत्तपत्र समूहानेदेखील सर्व जातिधर्मांसाठी मुंजविधी करण्याची चळवळ त्याच सुमारास जाहीर केली. पाटणकर इव्हेंट्सने, या संभाव्य मोहिमेचा आरंभ म्हणून ‘व्रतबंध- एक विद्याव्रत’ या नावाचे प्रदर्शन पुण्यात नोव्हेंबर 2022 मध्ये भरवले होते. त्याचे उद्‍घाटन अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे यांच्या हस्ते झाले होते. त्यांनी त्यांच्या उद्घाटनपर भाषणात ठासून हेच सांगितले, की मुंज हा विधी धार्मिक व काही जातींपुरता मर्यादित नाही. तो सर्व मुलांसाठी संस्कार म्हणून आवश्यक आहे. त्या म्हणाल्या, की त्या जातीने ब्राह्मण आहेत व त्यांचे पती प्रवीण तरडे हे मराठा आहेत. त्यांचा प्रेमविवाह झाला आहे. त्यांचा मुलगा आठ वर्षांचा झाल्यावर त्याची मुंज करण्याचे ठरले. प्रवीणचे नातेवाईक म्हणाले, की आपल्यात (मराठा समाजात) मुंज करत नाहीत. त्यावर कुटुंबात वादप्रतिवाद झाले. ऐतिहासिक दाखले निघाले, पण ते सारे क्षणिक ठरले. अर्थात, मुलाची मुंज नंतर व्यवस्थित पार पडली !

    पाटणकर यांनी मुंजीचा संस्कार हा केवळ समारंभ न राहता संस्कार सोहळा होण्यास हवा याकरता पुण्याजवळील नारायणगाव येथे सामुदायिक व्रतबंध सोहळा 7 जुलै 2023 रोजी पार पाडला. त्या सोहळ्यास त्यांना ‘सकाळ वृत्तपत्र समूहा’ची साथ मिळाली होती; किंबहुना ‘सकाळ’ वृत्तपत्राने सर्व जातींमधील मुला-मुलींनी व्रतबंध संस्कार स्वीकारावा अशी भूमिका घेऊन प्रसारकार्य सुरू केले आहे. नारायणगावच्या सोहळ्यात विविध जातींतील पंधरा मुले आणि दहा मुली यांच्यावर पारंपरिक पद्धतीने, पण आवश्यक तेथे आधुनिकतेची जोड देत मौंजिबंधन संस्कार करण्यात आले. प्रत्यक्ष सोहळ्याआधी नारायणगावी पालकांचा मेळावा घेण्यात आला होता. तेथे आर्या जोशी यांनी मौंजिबंधन विधीची आणि त्यामधील संस्कारांची माहिती दिली. आर्या जोशी या ‘ज्ञान प्रबोधिनी’ या पुण्याच्या प्रतिष्ठित शिक्षण संशोधन संस्थेच्या धर्मविधी संशोधन विभागाच्या प्रमुख आहेत. सभेमधून हे पालक त्यांच्या पाल्यांच्या मुंजविधीस प्रवृत्त झाले. रमेश पाटणकर म्हणाले, की नारायणगावच्या पालक सभेमधील ऐंशी टक्के पालकांना त्यापूर्वी मुंजविधीची काहीच माहिती नव्हती असे आमच्या ध्यानी आले. त्यांना या विद्याव्रताची माहिती दिल्यावर अनेक जाती धर्माच्या पालकांनी हा संस्कार त्यांच्या मुलांवर घडावा अशी इच्छा व्यक्त केली.

    ‘ज्ञान प्रबोधिनी’ने त्यांच्या वेदिक संशोधन कार्यक्रमामधून त्या व्रतास कालानुरूप असे वळण दिलेले आहे. ते त्यास ‘विद्याव्रत संस्कार’ किंवा ‘दीक्षाग्रहण विधी’ असे म्हणतात. ते सनातन धर्मीय उपनयन संस्काराचे आधुनिक रूप होय असा त्यांचा दावा आहे. तो संस्कार इयत्ता आठवीतील सर्व मुलामुलींसाठी शिक्षक आणि पालक यांच्या उपस्थितीत केला जातो. त्यात व्यक्तिमत्त्व विकास, शारीरिक-मानसिक-बौद्धिक-आत्मिक-सामाजिक जाणीव विकसन आणि राष्ट्रीय अर्चना हे तीन मुख्य विभाग अभिप्रेत आहे. ‘ज्ञान प्रबोधिनी’ने एकूणच धार्मिक विधींचे आधुनिकीकरण शास्त्रीय पद्धतीने चालवले आहे. संस्थेत तसा संशोधन विभाग आहे. संस्थेने सुरुवातीपासून आठशे पुरोहितांना धार्मिक विधींचे प्रशिक्षण दिले आहे. त्यांपैकी एकोणपन्नास पुरोहित सध्या संस्थेच्या वतीने पौरोहित्य करतात. ते विविध जातींतील आहेत. त्यांनी अनेक मुलींच्यादेखील मुंजी लावल्या आहेत. ते पुरोहित सनातन धर्माच्या सोळा संस्कारांपैकी नामकरण, उपनयन, विवाह, अंत्येष्टी हे विधी करतात. त्याशिवाय वास्तुशांत, सत्यनारायण पूजा हे विधीसुद्धा करतात. या कामासाठी पुण्यात व पुण्याबाहेर अंतराप्रमाणे ‘ज्ञान प्रबोधिनी’चे पुरोहित चारशे ते अडीच हजार रुपयांपर्यंत दक्षिणा घेतात. प्रत्येक विधीसाठी संस्काराच्या प्रकारानुसार अडीचशे ते पंधराशे रुपयांपर्यंत ऐच्छिक देणगी ‘ज्ञान प्रबोधिनी’साठी अपेक्षित असते. ‘ज्ञान प्रबोधिनी’च्या उपनयन संस्कारात चूडाकर्म किंवा चौलकर्म (बटूचे शेंडी ठेवून केस कापणे), मातृभोजन आणि भिक्षावळ हे विधी केले जात नाहीत; अर्थात ज्या पालकांना ते विधी करायचे आहेत ते तसे करू शकतात.

    रमेश पाटणकर हे ‘पाटणकर इव्हेंट्स मॅनेजमेंट कंपनी’चे संस्थापक आणि संचालक आहेत. त्यांचा पिढीजात व्यवसाय ‘खाऊ’विक्रीचा. ‘खाऊवाले पाटणकर’ म्हणून त्यांचे शनिपाराजवळचे दुकान अनेक दशकांपासून प्रसिद्ध आहे. रमेश यांचे वडील वसंतराव पाटणकर यांना संगीताची आवड आणि जाणही होती. त्यामुळे ‘सवाई गंधर्व’पासून इतर गायन-वादनाच्या अनेक कार्यक्रमांची व्यवस्था आणि तिकिट विक्रीही त्यांच्या दुकानात होत असे. त्यांचे स्वत:चे खाऊच्या जाहिरातींचे व अन्य संस्थांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे फलक दुकानाबाहेर लावलेले असत. रमेश म्हणाले, “या कार्यक्रमांच्या निमित्ताने व्यवसायाबरोबरच आमचे दुकान म्हणजे सांस्कृतिक देवाणघेवाणीचे केंद्र होते. दुकानात दिग्दर्शक-कलावंत येत. तेथे अनेक दिग्गज कलाकारांची उठबस असे. राम मराठे, भीमसेन जोशी, जितेंद्र अभिषेकी, कॅप्टन शिवरामपंत दामले, गोविंदस्वामी आफळे यांच्यापासून ते अगदी सुधीर गाडगीळ यांच्यापर्यंत अनेक दिग्दर्शक/कलाकार व मीडिया व्यक्ती यांना ‘दुकानातली बैठक’ खुणावत असे. या सांस्कृतिक वातावरणामुळे माझे बालपण समृद्ध झाले असे मी समजतो.”

    रमेश पुढे म्हणाले, की “आम्ही ‘इव्हेण्ट कंपनी’ म्हणून मुंजी लावू लागलो तेव्हा ध्यानी आले, की हे तर मुंजीचे नुसते धार्मिक विधी उरकले जातात. कार्यक्रमामध्ये विधी आणि त्यांचे महत्त्व बटूला कळत नाही. एवढेच काय पण आलेल्या पाहुण्यांपर्यंतसुद्धा त्यांचा अर्थ पोचत नाही. आलेले पाहुणे जेवतात, बटूला भिक्षावळ देतात आणि निघून जातात. सरतेशेवटी अशा कार्यक्रमांचे महत्त्व निव्वळ नातेवाईक आणि मित्रमंडळी यांचा एक मेळावा इतपतच मर्यादित राहते.  

    “वास्तवात, पूर्वी विद्यार्थी मौंजीबंधनानंतर गुरूच्या घरी राहून शिक्षण घेत असे. त्यातून त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अर्थ येत असे. म्हणून तो मनुष्यजीवनाला आकार देणारा संस्कार मानला जातो. आम्ही त्या व्रताचे गांभीर्य विधिवत कळावे म्हणून आमच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीद्वारे विचारपूर्वक आणि संस्कारक्षम मुंजी लावू लागलो. मुंज या संस्काराचा अभ्यास करून, त्याची नाट्यपूर्ण रीतीने आखणी व मांडणी केली. सर्व आप्तेष्टांचा सहभाग वाढवला. त्यासाठी संदर्भ ग्रंथ तपासून, त्या संस्कारामध्ये नाट्य आणले. विधीचा आमचा तो प्रयत्न देशात आणि परदेशात यशस्वी ठरला. भारतीय संस्कारांचेसुद्धा ब्रॅण्डिंग करण्याची आणि रंगारंग करून समजावून सांगण्याची आवश्यकता उत्पन्न झाली आहे.”

    पाटणकर यांच्यामार्फत मुंज खरोखरीच नाटक असल्यासारखी घडते. त्यामध्ये यजमान आणि पाहुणे अशा सर्वांचा सहभाग असतो. योग्य ठिकाणी यजमानाला ‘स्वाऽ हाऽऽ’ वगैरे म्हणावे लागते; तर पाहुण्यांना ‘तथास्तु’ म्हणून आशीर्वाद द्यावे लागतात. अशा प्रत्येक विधीमधून मुलांना, त्यांच्या पालकांना आणि पाहुण्यांनाही काही तरी नवीन कळत व मिळत जाते. रमेश पाटणकर म्हणाले, की हा विधी आखत असताना आम्ही चंद्रगुप्त मौर्य ते शिवाजी महाराज यांच्यापर्यंतच्या सर्व काळातील मुंजविधींचा अभ्यास केला. आवश्यक वाटले तेथे शंकराचार्यांचा सल्लाही घेतला. त्यातून आधुनिक काळाला अनुरूप असा आमचा मुंजविधी तयार झाला आहे. त्याला, विशेषत: मुलींच्या व्रतबंधाला सनातन्यांनी आरंभी आक्षेप घेतले. परंतु त्या संबंधातील योग्य दाखले त्यांना दाखवल्यावर त्यांचे शंकानिरसन झाले.

    रमेश पाटणकर यांनी सांगितले, की त्यांचा मानस मुंजीचा ब्राह्मण पुरुषवर्गापुरता मर्यादित राहिलेला  संस्कार सामाजिक जबाबदारी म्हणून सर्व जातींपर्यंत आणि महिलांपर्यंत पोचवण्याचा आहे. ते तो संस्कार सार्वजनिक मुंजी आयोजित करून सुरुवातीला पूर्ण महाराष्ट्रभर आणि पुढे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. आम्ही आतापर्यंत परदेशामधील अनिवासी भारतीयांच्या हजारांहून अधिक मुंजी लावल्या आहेत. ‘सकाळ’ने तो विधी सार्वत्रिक व्हावा अशी भूमिका घेतल्याने त्याला नवे परिमाण प्राप्त झाले आहे. त्यातून खरोखरीच नवी शैक्षणिक चळवळ सुरू होईलदेखील !

    पारंपरिक मुंजविधीची पार्श्वभूमी अशी आहे : सनातन परंपरेनुसार, मनुष्याचा जन्म दोनदा होतो – एकदा मातेच्या उदरातून होणारा शारीरिक जन्म आणि दुसरा बौद्धिक जन्म. तो गुरूच्या साक्षीने उपनयन विधीद्वारे चिन्हांकित केला जातो. बालकाने गुरूच्या जवळ राहून, ब्रह्मचारी म्हणून चांगल्या प्रकारे, एकाग्र चित्ताने अभ्यास करण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक असते. त्या नियमांनी व व्रतांनी स्वतःला बांधून घेणे म्हणजेच व्रतबंध होय ! तो संस्कार ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीन वर्णांत जन्मलेल्या पुरुषांसाठी मर्यादित केला गेला होता. व्रतबंधाने संस्कारित झालेला मुलगा-मुलगी त्याच्या-तिच्या पालकांपासून दूर राहून, स्वतःच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करत असे. त्या संस्काराद्वारे ब्रह्मचर्य व्रताचे पालन कसे करावे हे शिकवले जाई. व्यक्तीची उत्तम व निकोप शारीरिक व मानसिक वाढ होण्यासाठी काही बंधने अत्यावश्यक असतात. तीच बंधने विशिष्ट संस्कारांच्या माध्यमातून मनावर प्रभावीपणे ठसतात.

    मुंज हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी तेरावा संस्कार होय. तो मुलामुलीच्या जीवनाला आकार देतो. गुरूंच्या जवळ जाणे म्हणजे उपनयन. त्याला व्रतबंध किंवा मौंजिबंधन असेही म्हणतात. उपनयन संस्कार सामान्यत: वयाच्या आठव्या वर्षी ब्राह्मणांमध्ये, वयाच्या अकराव्या वर्षी क्षत्रियांमध्ये आणि वयाच्या बाराव्या वर्षी वैश्यांमध्ये केला जावा अशी धारणा होती. सध्या ब्राह्मण, गुरव, सुतार, वाणी अशा मोजक्या जातींतील तेही मोजक्या घरांत मुलांचे उपनयन करण्याची प्रथा शिल्लक आहे. मुलाच्या मुंजवेळेच्या वयोमानातील फरक हे समाजातील आणि कुटुंबांमधील विविधतेला सामावून घेण्यासाठी केले असावेत. ‘आपस्तंब गृह्यसूत्र’ ग्रंथानुसार उपनयन संस्कार आणि औपचारिक शिक्षण सुरू करण्यासाठी कमाल वयोमर्यादा चोवीस वर्षे एवढी आहे. (श्रौतसूत्रे, शल्बसूत्रे, गृह्यसूत्रे आणि धर्मसूत्रे ह्या सर्वांना मिळून ‘कल्पसूत्रे’ ही संज्ञा वापरली जाते. कल्पसूत्रे प्राचीन उपनिषदांच्या काळी निर्माण होऊ लागली होती. मुंडकोपनिषदात शिक्षा कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद व ज्योतिष ह्या सहा वेदांगांचा निर्देश केला आहे. कल्प म्हणजे कर्मकांड किंवा धार्मिक क्रियाकलाप होत.) गृह्यसूत्रे हा कल्पसूत्रांचा दुसरा भाग आहे. त्यात अग्नित्रयसाध्य नसलेली व एकाग्निसाध्य किंवा गृह्याग्निसाध्य धार्मिक कर्मे सांगितलेली आहेत. उपनयन, समावर्तन, विवाह, गर्भाधान, जातकर्म, विविध श्राद्धे व अन्य आश्रमकर्मेही सांगितलेली आहेत. विवाहादी संस्कार हा गृह्यसूत्रांचा मुख्य विषय आहे. गृह्यसूत्रातील बरीचशी कर्मे मूळ वेदांत सांगितलेली नाहीत.

    ‘सुश्रुत सूत्रस्थान’ यांसारख्या काही ग्रंथांमध्ये दुर्लक्षित असलेल्या चतुर्थवर्णियांना म्हणजे तथाकथित शूद्रांनाही शाळांमध्ये प्रवेश आणि औपचारिक शिक्षणप्रक्रिया यांचा समावेश आहे. म्हणजेच उपनयन विधी महिलांसहित प्रत्येकासाठी खुला होता- निदान असावा असा तर्क बांधला जातो.

    शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस या बाबतीतील एक पेच निर्माण झाला होता. तो कसा सुटला याचा किस्सा उद्बोधक आहे. तो स्नेहल तरडे यांनी व्रतबंध प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगीही वर्णन करून सांगितला होता. शिवरायांच्या भोसले घराण्याशी सामाजिक दृष्ट्या बरोबरीच्या असलेल्या अनेक मराठा सरदारांमध्ये त्या काळी राज्याभिषेकाबद्दल मत्सराची भावना निर्माण झाल्याने तसे सरदार स्वतःला शिवाजीराजांचे सेवक म्हणवून घेण्यास नकार देत. आश्चर्य म्हणजे त्यांना ते आदिलशहाचे एकनिष्ठ सेवक आहेत असे म्हणण्यात कमीपणा वाटत नव्हता ! त्यांच्या दृष्टीने, शिवाजी महाराज हे बंडखोर आणि स्वामिद्रोही होते. शिवाजीराजांचा राज्याभिषेक त्यांचा तो दृष्टिकोन बदलण्यासाठीही गरजेचा होता. पण हिंदवी राज्याभिषेक सोहळा मुघल राजवटीमुळे शेकडो वर्षांपासून झालेला नव्हता व ते विधी माहीत असलेले पुरोहितही शिल्लक राहिले नव्हते. शिवाय, त्यावेळी राज्याभिषेक करवून घेण्याचा अधिकार फक्त क्षत्रिया़ंना होता. शिवाजी महाराज शेतकरी कुटुंबातून आलेले असल्याने व त्यांची मुंज झालेली नसल्याने ते क्षत्रिय नाहीत असे दरबारातील काही ब्राह्मणांचे मत होते.

    राज्याभिषेकाची तयारी सुरू होऊनही अशा काही वादग्रस्त अडचणींमुळे प्रत्यक्ष विधीला जवळपास एक वर्ष उशीर झाला. तेव्हा गागाभट्टांनी सांगितले, की त्यांना शिवाजीराजे हे सिसोदियांचे (राजपूत क्षत्रिय) वंशज असल्याचे सिद्ध करणारी वंशावळ सापडली आहे आणि अशा प्रकारे, खरोखरीच, ते एक क्षत्रिय आहेत ! गागाभट्टांनी शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी विधी कसा करावा, कोणकोणते धार्मिक संस्कार आणि समारंभ करावे याची माहिती तपशीलवार अभ्यासली आणि स्वतः ‘राज्याभिषेक प्रयोग’ हा एक लहानसा ग्रंथच लिहून तयार केला ! पण राज्याभिषेकापूर्वी महत्त्वाचा विधी होता, तो म्हणजे महाराजांचे मौंजिबंधन. महाराजांची मुंज होण्याची राहिली होती. मुंजीचे महत्त्व जसे ब्राह्मणांमध्ये; तसे आणि तेवढेच ते क्षत्रियांमध्येही होते. म्हणून महाराजांची मुंज राज्याभिषेकापूर्वी, म्हणजे 29 मे 1674 रोजी रीतसर करण्यात आली. त्या मुंजीलादेखील साडेतीनशे वर्षे झाली आहेत. महाराजांचे वय मुंजीच्या वेळी चव्वेचाळीस वर्षे होते. शिवरायांना तेव्हा आठ मुले – सहा मुली आणि दोन मुलगे – होती. विवाह मुंजीनंतर करण्याचा असतो. त्यामुळे गागाभट्टांनी शास्त्राप्रमाणे शिवरायांना लग्न करण्याचे सुचवले. त्यानंतर सोयराबाई यांचा महाराजांशी पुन्हा विधिवत विवाह मुंजीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 मे 1674 रोजी पार पडला. त्यानंतर सकवारबाई आणि पुतळाबाई यांचीही लग्ने महाराजांशी पुन्हा लावण्यात आली.

    रमेश पाटणकर यांनी पुढील काळात महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात मुंजविधीचा सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले असून कमी खर्चात मुंजी लावण्यात येतील असे म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी 9226259625 या क्रमांकावर नावनोंदणी अथवा चौकशी करण्याचे आवाहन केले आहे.

    – विलास पंढरी 9860613872 vilas_pandhari@yahoo.com

    About Post Author

    1 COMMENT

    1. खुप छान आणि सुंदर लेख..!!
      मुंज बद्दल खुपचं आगळा वेगळा आणि कौतुकास्पद प्रकल्प आणि तुम्ही खुप चांगल्या पद्धतीने सादर केले आहे या लेखात..!
      तुमचे अभिनंदन…
      आणि पाटणकर यांचे पण खुप अभिनंदन..!
      👏👏

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here