मंदिर प्रवेशाचे महाभारत – संजयाच्या भूमिकेत

  0
  160

  साने गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीतील अखेरचा आणि निर्णायक लढा पंढरपूरमध्ये लढला गेला. देवतांची मंदिरे म्हणजे सनातन्यांचे बालेकिल्ले. त्या चळवळीत ते बालेकिल्ले काबीज करून, त्यांचे दरवाजे अस्पृश्यांना खुले करण्यास महत्त्वाचे स्थान मिळाले. साने गुरुजी यांनी त्यासाठी प्राणांतिक उपोषण केले. त्यातून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर प्रवेशाचे महाभारत घडले व त्याची परिणती हरिजनांना मंदिर प्रवेश मिळण्यात झाली…

  साने गुरुजी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात, समाजवादी विचाराच्या सेवादलाचे कलापथक त्यांच्या बरोबर होते व प्रत्यक्ष उपोषणाच्या स्थळीही गुरुजींभोवती समाजवाद्यांचा गराडा होता. त्यामुळे, मंदिर प्रवेशाचे श्रेय समाजवाद्यांना जाईल, या भीतीपोटी महाराष्ट्र काँग्रेसमधील सत्ताधारी गांधीवादी मंडळी साने गुरुजींच्या विरोधात उभी राहिली!

  महाराष्ट्रामधल्या समाजसुधारकांची यादी सुरू झाली, की महात्मा फुलेडॉ. आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, छत्रपती शाहू महाराज अशा नावांवरच ती थांबते ! ती यादी फारच एकांगी वाटली तर, लोकहितवादी, आगरकर, अशी नावे पासंगासाठी वापरली जातात ! पण, समाजसुधारक म्हणून आचार्य विनोबा भावे किंवा साने गुरुजी यांची नावे कोणाच्या स्वप्नातही येणार नाहीत. पुणेमुंबई, कोल्हापूर ही मोजकी गावे सोडून पंढरपूरसारख्या जुन्या तीर्थक्षेत्राचा उल्लेखही कोणी सामाजिक सुधारणांचे कुरुक्षेत्र म्हणून करणार नाही ! पण, हिंदू धर्मापुरते पहावयाचे तर, त्यावरचा खरा कलंक, अस्पृश्यता हाच होता. त्यामुळे धर्म सुधारणेच्या उव्यात अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीला सर्वाधिक महत्त्व, बहुतेक सर्व समाजसुधारकांनी दिलेले आढळते.

  या लढ्यात महाडच्या चवदार तळ्याच्या संग्रामाला डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वामुळे तीर्थक्षेत्राचे महत्त्व आहे. पण, अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीतील अखेरचा आणि निर्णायक लढा, पंढरपूरसारख्या जुन्यापुराण्या क्षेत्रातच लढला गेला आणि त्या लढ्याचे नेतृत्व साने गुरुजी यांनी केले. देवतांची मंदिरे म्हणजे सनातन्यांचे बालेकिल्ले. तेव्हा इतर बाबतींतील किंवा ठिकाणांची अस्पृश्यता नष्ट करण्यापेक्षा मंदिरांचे बालेकिल्ले काबीज करून, त्यांचे दरवाजे अस्पृश्यांना खुले करणे या गोष्टीला अस्पृश्यता निवारण्याच्या चळवळीत सर्वात महत्त्वाचे स्थान मिळाले. पंढरपूर हे महाराष्ट्राचे हृदय व वारकरीपंथाचे आद्यपीठ. पंढरीच्या चंद्रभागेच्या वाळवंटात अठरापगड जातींना समानता मिळवून देण्याचे कार्य, वारकरीपंथाने केले.

  तुका वाणी, नामा शिंपी, नरहरी सोनार, सावता माळी, गोरा कुंभार, चोखा मेळा, सजन कसाई, जनाबाई, कान्होपात्रा अशा सर्व जाती-जमातींतील, थरांतील स्त्री-पुरुष संत वाळवंटात एकत्र नाचले. पण चोखा मेळ्याला मंदिरात जाऊन, विठोबाला भेटता आले नाही ! मंदिराबाहेर नामदेवाच्या पायरीसमोर, त्याची पायरी सांभाळूनच त्याला विठ्ठलाची आळवणी व भक्ती करावी लागली ! महात्मा गांधी यांच्या विधायक कार्यक्रमात, अस्पृश्यता निवारणाला फार मोठे महत्त्व होते. साने गुरुजींचे मातृह्रद्य अस्पृश्यांसाठी सदैव तळमळत होते. विठ्ठलाच्या त्या लेकरांना, त्याच्या पायाशी जाता आले पाहिजे, असा ध्यास साने गुरुजींनी घेतला. पंढरपूरच्या विठ्ठलाची कवाडे हरिजनांना खुली व्हावी यासाठी त्यांनी उपोषण करून प्राणत्याग करण्याची घोषणा केली ! तेव्हा सेनापती बापटांनी त्यांना आदेश दिला, की आपण प्रथम महाराष्ट्रात दौरा करा. ठिकठिकाणी सभा घेऊन, जनतेत जागृती करा. लोकांचा कौल घ्या व नंतर उपोषणास प्रारंभ करा. सेनापतींचा हा आदेश शिरोधार्य मानून, साने गुरुजींनी सेवादलाचे कलापथक बरोबर घेऊन, उभा महाराष्ट्र ढवळून काढला. जनतेचा कौल घेतला व नंतर 1 मे 1947 रोजी पंढरीत येऊन, विठ्ठलाच्या दाराशी धरणे धरून, उपोषणासाठी ठाण मांडले ! समाजसुधारणेचा लढा हा साधारणतः एकाच आघाडीवर लढला जातो. सनातनी विरुद्ध समाजसुधारक. पण साने गुरुजींना एकाच वेळी, चारपाच आघाड्यांवर हा लढा लढावा लागला !

  साने गुरुजी विरुद्ध सनातनी, साने गुरुजी विरुद्ध बडवे, साने गुरुजी विरुद्ध काँग्रेसचे सरकार, साने गुरुजी विरुद्ध मुंबई प्रदेश काँग्रेस, साने गुरुजी विरुद्ध गांधीवादी आणि सर्वात दुःखदायक म्हणजे, साने गुरुजी विरुद्ध महात्मा गांधी !

  पैकी, साने गुरुजींना सनातन्यांविरुद्ध लढावे लागले, यात काहीच आश्चर्य नव्हते. साने गुरुजींच्या मंदिर प्रवेश चळवळीच्या निमित्ताने, पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात एक कुरुक्षेत्रच उभे राहिले ! सनातनी व समाजसुधारक यांच्या एकमेकांविरुद्ध प्रचंड सभा दररोज पंढरपुरात होत. आप्पासाहेब पटवर्धन, रावसाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन, आचार्य अत्रे, नानासाहेब गोरे, क्रांतिसिंह नाना पाटील वगैरे मुलुख मैदान तोफा साने गुरुजींच्या बाजूने धडाडत ! तर सनातन्यांच्या बाजूने शंकराचार्य, प्रभावती राजे, देवनायकाचार्य वगैरे तेवढ्याच तोलाचे अतिरथी लढा देत असत. नाना पाटलांनी त्यांच्या पत्रीसरकारच्या फौजा पागोटे घोंगडी घेऊन आणि हातात भाले-बर्च्या घेऊन, पंढरपूरच्या रस्त्या रस्त्यांतून फिरवल्या.

  आचार्य अत्रे म्हणत, साने गुरुजींच्या पाठीमागे डोंगराएवढाली माणसे उभी आहेत. गुरुजींच्या प्राणाला अपाय झाला तर, हे सारे डोंगर पंढरपुरावर कोसळतील ! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे ट्रस्टी त्या वेळी बडवे हे होते आणि त्या वेळच्या कायद्याप्रमाणे विठ्ठल मंदिराची कवाडे, हरिजनांना उघडी होण्यासाठी, त्यांची संमती आवश्यक होती. त्या वेळचे बहुतेक सर्व बडवे, हिंदुत्वनिष्ठ होते. पण, त्यांची हिंदुत्वनिष्ठा ही स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणे, समाजसुधारणेस अनुकूल नव्हती. ते स्वतःला हिंदुत्वनिष्ठ म्हणवत असले तरी, आतून खरे सनातनीच होते. त्यामुळे, “देवळात म्हारं घुसवायला” त्यांचा सक्त विरोध होता ! पण बडव्यांची संमती मिळाल्याखेरीज मंदिर प्रवेश होणे, कायद्याने अशक्य असल्यामुळे, पंढरपूरचे काँग्रेस नेते बाबूराव जोशी, बबनराव बडवे, शंकरराव बडवे पाटील वगैरे आम्ही सर्वांनी बडव्यांच्या घरोघरी हिंडून, त्यांची विनवणी करून, मंदिर प्रवेशासाठी सह्या गोळा करण्याची मोहीम सुरू केली.

  मोठ्या मेटाकुटीने, बडव्यांच्या शंभर घरांपैकी 51 सह्या आम्ही गोळा केल्या पण, त्यानंतर ध्यानीमनी नसलेली एक आपत्ती कोसळली. शंकराचार्य हे बडव्यांच्या बैठकीत अचानक घुसले ! त्यांनी तो सह्यांचा कागद पाहण्यासाठी मागून घेतला आणि तुम्ही ‘बडवे नसून धर्म बुडवे आहात’ असे म्हणून त्या कागदाच्या फाडून चिंध्या केल्या. अनेक दिवस हिंडून, मोठ्या मिनतवारीने गोळा केलेल्या सह्या, पण एका क्षणात सारे नष्ट झाले, मंदिर प्रवेशाचा हा मार्ग खुंटला ! त्यामुळे साने गुरुजींचे प्राण आता जाणार अशी भीती निर्माण झाली ! काँग्रेस, काँग्रेस सरकार, गांधीवादी आणि महात्मा गांधी, हे खरोखरी अस्पृश्यता निवारणाच्या बाजूचे. त्या सर्वांनी साने गुरुजींच्या पाठीमागे शक्ती उभी करणे जरुरी होते. पण, तेथे वेगळाच तिढा निर्माण झाला ! त्या वेळच्या काँग्रेस सरकारने, राज्यातील सर्वच मंदिरे हरिजनांना खुली करण्याचे बील तयार केले होते. ते पास होऊन त्याचा कायदा होण्यास, बराच अवधी लागणार होता. त्या आधी, साने गुरुजींच्या उपोषणाने पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांना खुले झाले तर, सरकारच्या कायद्याला काहीच अर्थ उरणार नव्हता !

  त्यामुळे सरकार काँग्रेसचे असूनही त्यांचा साने गुरुजींच्या उपोषणास विरोध होता ! क्रांतिसिंह नाना पाटलांनी जेव्हा त्यांच्या पत्रीसरकारच्या फौजा, पंढरपुरातून फिरवल्या आणि बडव्यांना वाटले, की या फौजा त्यांची घरे, दारे जाळून टाकणार ! तेव्हा काँग्रेसविरोधी असलेल्या बडव्यांनी, त्या वेळचे काँग्रेसचे गृहमंत्री मोरारजी देसाई यांच्याकडे धाव घेतली ! तेव्हा मोरारजी यांनी बडव्यांच्या संरक्षणासाठी सरकारी फौजा पाठवण्याचे आश्वासन दिले ! नाना पाटलांच्या सैनिकांनी तुमच्या घरांवर हल्ला केला तर, माझ्या फौजा त्यांच्यावर गोळ्या झाडण्यासही कमी करणार नाहीत, असे आश्वासन घेऊन बडवे पंढरपुरी परतले. त्या वेळच्या महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गांधीवादी विरुद्ध समाजवादी असा झगडा चालू होता. गांधीवाद्यांना आपण दक्ष राहिलो नाही तर, समाजवादी मंडळी महाराष्ट्र काँग्रेसचा कब्जा घेतील, अशी भीती वाटत होती.

  साने गुरुजींच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यात, समाजवादी विचाराच्या सेवादलाचे कलापथक त्यांच्या बरोबर होते. प्रत्यक्ष उपोषणाच्या स्थळीही गुरुजींभोवती समाजवाद्यांचा गराडा होता. त्यामुळे मंदिर प्रवेशाचे श्रेय समाजवाद्यांना जाईल, या भीतीपोटी, महाराष्ट्र काँग्रेसमधील सत्ताधारी गांधीवादी मंडळी साने गुरुजींच्या विरोधात उभी राहिली ! महाराष्ट्राचे त्या वेळचे काँग्रेसचे अध्यक्ष केशवराव जेधे, ते तर सत्यशोधक व ब्राह्मणेतर चळवळीचे प्रमुख समाजसुधारक. पण, त्यांनीही साने गुरुजींच्या उपोषणाच्या विरोधात जाहीर पत्रक काढले ! एकीकडून सनातन्यांचे सुप्रीम कोर्ट शंकराचार्य व दुसरीकडून काँग्रेसचे सुप्रीम कोर्ट महात्मा गांधी या दोन्ही कोर्टांनी साने गुरुजींच्या विरुद्ध निकाल दिल्यामुळे, साने गुरुजींना देहत्याग करावा लागणार हे निश्चित झाले !

  दादासाहेब मावळणकर हे त्या वेळी लोकसभेचे सभापती होते. ते सहज विठ्ठलाच्या दर्शनासाठी त्यांच्या पत्नीला घेऊन, पंढरीला आले. त्यांना तेथे गेल्यावर, गुरुजींच्या उपोषणाची हकीगत समजली आणि त्यांनी पांडुरंगाचे दर्शन घेण्याचे नाकारले. त्यांना सर्व हकीगत समजली, तेव्हा त्यांनी कायद्याचे सूक्ष्म अवलोकन करून बडव्यांच्या 51 सह्या लागत नाहीत, बडव्यांची कमिटी पाच जणांची असल्यामुळे त्यांच्यापैकी तिघांच्या सह्यांवर काम भागेल असा निर्णय दिला. त्यांनी महात्मा गांधी यांना गुजराथी भाषेत पाचशे शब्दांची तार करून सत्य परिस्थितीची कल्पना दिली, त्यांचा विरोध नाहीसा करून पाठिंबा मिळवला.

  फक्त तीन सह्यांचाच प्रश्न असल्यामुळे बबनराव बडवे यांच्या नेतृत्वाखाली नवी पंचकमिटी स्थापन झाली. त्या कमिटीचे डिक्लेरेशन मिळवले. त्या वेळच्या कायद्याप्रमाणे पंचकमिटीचे डिक्लेरेशन डिस्ट्रीक्ट कोर्टात दाखल करावे लागत असे. त्यानंतर सहा महिन्यांत हरिजनांसाठी मंदिर खुले होत असे. गुरुजींना तर तत्काळ मंदिराची कवाडे उघडली जावीत, असे वाटत होते. तेव्हा मावळणकर यांनी गुरुजींची गाठ घेऊन, त्यांना ही सर्व प्रक्रिया समजावून सांगितली. त्यांनी ट्रस्टींनी मंदिर प्रवेशासाठी कोर्टात डिक्लेरेशन दिले असल्याने, गुरुजींनी उपोषण सोडावे अशी त्यांना विनंती केली. त्याप्रमाणे गुरुजींचे उपोषण 10 मे 1947 रोजी सुटले व मंत्री नामदार गणपतराव तपासे यांच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीने हरिजनांना मंदिर प्रवेश मिळून ते उपोषण पर्व यशस्वीरीत्या समाप्त झाले.

  पांडुरंग डिंगरे

  (साधना, 10 मे 1997 अंकावरून उद्धृत)

  ————————————————————————————————————————————-

  About Post Author

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here