भूतदयेचा अतिरेक!

heading


वसई शहरात
कबूतरांचा उपद्रव वाढीस लागल्याने श्वसनाचे विकार, दमा यांसारख्या आजारांपासून काही रुग्ण त्रस्त आहेत. कबूतरांच्या विष्ठेपासून ‘हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनिया’ हा आजार होत असल्याचे पालिकेच्या वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे वसई-विरार महापालिकेने त्या रोगाची माहिती नागरिकांना देणारे फलक शहरात सर्वत्र लावून कबूतरांपासून सावधानतेचा इशारा दिला आहे. कबूतरांना खाद्यपदार्थ घातल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही दिला आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही जबाबदारी पालिकेची असल्याने पालिकेची ही कारवाई उचितच आहे. परंतु, प्राणिमित्रांनी पालिकेच्या त्या इशाऱ्याला आक्षेप घेतला आहे.

भारतामध्ये मानवी जीवापेक्षा पशुपक्ष्यांच्या जीवाला अधिक मूल्य प्राप्त झाले आहे. मानव पशुपक्ष्यांची शिकार करून स्वतःचा उदरनिर्वाह प्राचीन काळी करत असे. नंतर मनुष्य सुसंस्कृत झाल्यानंतर केवळ पशुपक्ष्यांची, वन्य प्राण्यांची शिकार होऊ लागली. शिकारीचा छंद अनेक सम्राट, त्यांचे सरदार, सरंजामदार या सारख्यांना होता. ते त्यात मनमुराद आनंद घेत असण्याची उदाहरणे इतिहासाच्या पानांपानांमधून वाचण्यास मिळतात. 

पशुपक्ष्यांची व वन्य प्राण्यांची अनिर्बंध हत्या झाल्यामुळे काही पशुपक्ष्यांची, वन्यप्राण्यांची संख्या अतिशय कमी झाली, तर काहींच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्या कटू वास्तवाची नोंद वेळीच घेऊन पशुपक्ष्यांच्या व वन्य प्राण्यांच्या शिकारीवर शासनाने बंदी घातली. अॅनिमल वेल्फेअर असोसिएशन यांसारख्या प्राणिमित्र संघटना पशुपक्ष्यांच्या व वन्य प्राण्यांच्या जीविताच्या रक्षणाकडे व त्यांच्या संवर्धनाकडे लक्ष पुरवत आहेत. पशुपक्षी-वन्यप्राणी यांच्या संरक्षणासंबंधीच्या शासकीय कायद्यांची अंमलबजावणी काटेकोर होण्याच्या दृष्टीने या प्राणिमित्र संघटनांचे कार्य पूरक आहे. परंतु, कधी कधी, त्या संघटनांच्या कार्याचा अतिरेक होतो. तशा संघटनांनी भूतदयेचे कार्य करत असताना मानवी जीवदेखील महत्त्वाचा आहे या वास्तवाकडे दुर्लक्ष करू नये. गोरक्षकांनी अलीकडील काळात मानवी हत्या केल्याची उदाहरणे आहेत!

प्राणिमित्रांनी त्यांची भूतदया शहराबाहेर कबूतरांसाठी खाद्यपदार्थ देण्याची व्यवस्था करून जोपासण्यास काही हरकत नाही. परंतु, त्यांनी त्यांचे पशुपक्षी प्रेम मानवी जीवाला अपाय करून जोपासणे मानवतेच्या विरुद्ध ठरेल. अनेक शहरांत असंख्य भटक्या कुत्र्यांपासून अनेकांना उपद्रव होत आहे व श्वानदंशापासून काहींना प्राण गमावावे लागत आहेत. अशा वेळी प्राणिमित्रांनी पालिकेला भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यास मदत करणे हेच महान मानवतावादी कार्य ठरेल. महाराष्ट्राच्या काही ग्रामीण भागात बिबट्यासारखे हिंस्त्र पशू, लहान मुले, महिला यांचे हरण करत असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांत अनेक वेळा वाचण्यास मिळतात. अशा वेळी प्राणिमित्र संघटनेचे कार्यकर्ते त्या वन्य पशूंना नियंत्रणात आणण्याचे कार्य करताना दिसत नाहीत. पशुपक्ष्यांचे व वन्य जीवांचे संरक्षण व्हायला हवे, परंतु प्रथम मानवी जीव वाचवणे महत्त्वाचे नाही का?

– (‘जनपरिवार’ संपादकीयावरून उद्धृत)

About Post Author