भारूड

_Bharud_1.jpg

संतांनी सर्वसामान्य लोकांना अध्यात्माची शिकवण सोप्या भाषेत देण्यासाठी ओवी, अभंग, भारूड अशा वेगवेगळ्या काव्यरचना केल्या. त्यांतील रूपकात्मक आणि जनसमुदायासमोर नाट्यमय रीतीने सादर केली जाणारी रचना म्हणजे भारूड. एकनाथपूर्व काळात ज्ञानेश्वर आणि नामदेव यांनी तर एकनाथांच्या पश्चात तुकाराम आणि रामदास यांनीही भारूडे रचली. असे असले तरी एकनाथांची भारूडे सर्वांत लोकप्रिय झाली. त्यामुळेच ‘ओवी ज्ञानेशाची’, ‘अभंग तुकयाचा’ तसे ‘भारूड नाथांचं’ असे म्हटले जाते.

‘बहुरूढ’ या शब्दापासून ‘भारूड’ शब्द तयार झाला असावा असे काहींचे मत आहे. भारूडांचे विषय जोशी, पिंगळा, सन्यासी, माळी, जंगम अशा विविध रूढींवर आधारलेले आहेत, म्हणून ते बहुरूढ समजले जाते. त्याशिवाय ‘भा’ म्हणजे तेजावर आरूढ झालेले ते भारूड किंवा भिरूंड नावाच्या द्विमुखी काल्पनिक पक्ष्याप्रमाणे एकाच वेळी दोन भिन्न अर्थ अभिव्यक्त करणारे म्हणून भारूड अशाही व्युत्पत्ती काहीजण मानतात. तसेच, भराडी जमातीत परंपरेने रूढ झालेले गीत म्हणजे भारूड असाही एक समज आहे.

एकनाथांच्या भारूडाचे वर्णन ‘आध्यात्मिक आणि नैतिक शिक्षण देणारे मराठीतील रूपकात्मक नाट्य – गीत’ असे केले जाते. नाथांच्या भारूडांची संख्या जशी विपुल आहे तसेच त्यांचे विषयही विविध आहेत. एकनाथ बायला, दादला, भुत्या, वाघ्या, विंचू, कुत्रा, एडका इत्यादी विविध विषयांचे जे अचूक वर्णन करतात त्यावरून त्यांच्या सूक्ष्म आणि चौफेर निरीक्षणाची कल्पना येते. ते या साध्या साध्या विषयांतून अध्यात्माचा गहन आशय व्यक्त करतात, त्यातून त्यांची अलौकिक कल्पनाशक्ती आणि बुद्धिमत्ता प्रकट होतात.

विंचू, दादला अशा बहुतेक भारूडांना विनोदाची झालर आहे. त्यामुळे भारूडाचे सादरीकरण लोकांना नेहमी मनोरंजक वाटते. पण त्यातील आध्यात्मिक आशय लोकांना उलगडतोच असे नाही. त्या दृष्टीने ‘कोडे’ हे भारूड बघा –

नाथाच्या घरची उलटी खूण |

पाण्याला मोठी लागली तहान||

आत घागर बाहेर पाणी|

पाण्याला पाणी आले मिळोनी ||

यातील ‘पाण्याला मोठी लागली तहान’ याचा ‘नाथांच्या आत्म्याला लागलेली परमात्म्याची ओढ’ हा अर्थ सर्वसामान्य जनांस सहज समजतोच असे नाही. तरीही एकंदरित नाथांची भारूडे रंजक आणि उद्बोधक झालेली आहेत यात शंका नाही. मात्र वक्ता जेव्हा एखाद्या विषयावर खूप वेळ कंटाळवाणे बोलू लागतो तेव्हा, ‘काय भारूड लावलंय’ असे म्हटले जाते. ‘भारूड लावणे’ हा वाक्प्रचार कसा रूढ झाला ते माहीत नाही.

उमेश करंबेळकर

About Post Author