भातखाचरे

0
29
_Bhatkhachare_1.jpg

भातखाचरे म्हणजे पिकाच्या लागवडीसाठी छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये विभागलेली जमीन. भातखाचरांची शेतरचना पायऱ्यापायऱ्यांची असते. ज्या विभागात पावसाचे प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी डोंगरावरील कमी उताराच्या भागात भातखाचरे काढली जातात. महाराष्ट्रात कोकण व घाट विभागांत भातखाचरयुक्त जमीन मोठ्या प्रमाणात आढळते. भातखाचरांसाठी पाण्याची सोय उपलब्ध व्हावी म्हणून त्यांच्या जवळून पाण्याचा नाला किंवा ओहोळ गेलेला असतो; शेततळे असते. मुख्यत: भातपिकाची लागवड भातखाचरांमध्ये केली जाते. कोकणात भातखाचरांना ‘कोपरे’ किंवा ‘कुणगा’ असेही म्हणतात. भातखाचरांमधून भाताच्या जोडीला वरी, ज्वारी, भुईमूग, सोयाबीन यांसारखी आंतरपिके घेतली जातात. शिवाय, भातखाचरांच्या कडेने तीळ, सूर्यफूल, झेंडूची फुले, झिनीया यांची लागवड करून उत्पादन घेतले जाते.

पिकांच्या निकोप व उत्तम वाढीसाठी भातखाचरे मशागत करून लागवडीयोग्य करणे गरजेचे असते. भातखाचरांच्या वरील थरात पीक वाढते. त्या खाचरांच्या भाजणीसाठी वरच्या थरावर भाताचा कुंडा किंवा झाडाचा सुका पालापाचोळा पसरवून तो जाळतात. त्यामुळे खाचरातील तणांचे बी जळून जाते व पिकात उगवणाऱ्या तणांचे प्रमाण कमी होते. शिवाय, जळाऊ राख कीटकनाशकाचे काम करते. त्यामुळे पिकाचे किडीपासून काही प्रमाणात संरक्षण होते. तसेच, पालापाचोळ्यातील कंपोस्ट घटक पिकासाठी उपयुक्त ठरतात. खाचराचा वरचा थर नांगरून भुसभुशीत करणे, त्यातील ढेकळे फोडणे, खाचरातील तण काढून टाकणे अशा पेरणीयोग्य खाचरांत बी पेरणे, रुजून आलेल्या पिकांत आंतर मशागत करून पिकाच्या वाढीला पोषक वातावरण तयार करणे इत्यादी कामे योग्य प्रकारे केली तर पीक जोमदार येऊन उत्पादनदेखील वाढते. भातपिकासाठी शेणखताचा वापर केल्यामुळे भातखाचरांची उत्पादकता टिकून राहते. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे भात खाचरे नापीक होतात.

भातखाचरांची सुपिकता टिकवण्यासाठी तीन वर्षांतून एकदा पीकपालट करावा. पीकपालटामुळे भातखाचरातील नत्र वाढण्यास मदत होते.

राज्यातील भातशेती करणारे सुमारे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. त्यांची भातशेती विखुरलेली आहे. शेतकऱ्यांची भातखाचरे तुकड्यातुकड्यांमध्ये विभागलेली असल्याने यांत्रिकीकरणाच्या वापरावर मर्यादा येतात. त्यामुळे शेतकरी भातखाचरांत बैलांच्या साहाय्याने कुळव (नांगर) जोडून भातशेती करतात. पावसाळ्यात पहिला पाऊस पडला, की धूळवाफेवर भाताचे बी पेरले जाते. त्या बियाण्याचे पाऊण महिन्यात लावणीयोग्य रोप तयार होते. भातखाचरे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरली, की भातलावणीसाठी चिखल तयार केला जातो. त्या चिखलात चार-चार तरव्याच्या काड्यांचे तिरक्या पद्धतीने रोपण करतात. रोपासाठी पाणी टिकून राहवे म्हणून भात-खाचरांच्या बाजूने बांध घातला जातो. त्या बांधावर नारळ, सुपारी वा काजूची रोपेदेखील लावता येतात.

– वृंदा राकेश परब

About Post Author

Previous articleमराठीप्रेमी पालक महासंमेलन : नव्या युगाची नांदी?
Next articleधुंधुरमास
वृंदा राणे-परब मुंबईत गोरेगाव येथे राहतात. या दहा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्‍यांनी मराठी विषयातून एम ए पदवी मिळवली आहे. त्‍यांनी ‘दै. वृत्तमानस’, 'पुढारी', 'मुंबई तरुण भारत', 'मी मराठी' या वर्तमानपत्रात मुद्रितशोधक पदावर काम केले. त्यांनी 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'मध्‍ये काही काळ उपसंपादक पदावर काम केले. सध्या त्या 'थिंक महाराष्ट्र'सोबत मुक्त पत्रकार म्हणून जोडलेल्या आहेत. 7506995754