भागवत नखाते – हाडाचे शेतकरी

0
35
carasole

सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील अकोला हे गाव पेरूंसाठी  प्रसिद्ध  आहे. तेथील वैशिष्ट्यपूर्ण पेरूच्या शोधात भेटले ते भागवत नखाते. फाटक्या अंगाची धुवट कपड्यातील व्यक्ती. त्यांनी आव आणला, ते अडाणी गावंढळ माणूस आहेत असा. म्हणाले, ‘मला काही फारसं समजत नाही’. पण त्यांच्या तोंडून सगळ्या सोलापूर जिल्ह्याचा इतिहास-भूगोल उलगडला जाऊ लागला. त्यांना त्या परिसराची माहिती तर आहेच, पण त्याहून अधिक त्यांना त्या परिसराची प्रगती व्हावी याची तळमळ आहे. त्यांची आस्था त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती.

त्यांनी सगळ्या अकोला गावात फिरून पेरू बागायतदारांची भेट घडवून दिली. पेरू, बोरे व डाळिंबे या फळांमुळे, दुष्काळात होरपळणाऱ्या त्या गावाला जीवदान मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

भागवतांनी तीस वर्षांपूर्वी अकोले गावात राहुरी कृषी विद्यापीठातून गणेश जातीच्या डाळिंबाचे कलम आणून डाळिंबाची प्रथम लागवड केली. गणेश डाळिंबाची साल पातळ असल्याने फळ लवकर सुकते व बाजारात फार काळ टिकत नाही हे लक्षात आल्यावर, त्यांनी भगवा डाळिंबाची जात अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथून आणली. त्याची साल जाड असल्याने तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. आता, अकोला हे सगळे गाव भगवे झाल्याचे व डाळिंब पिकाचा गावाच्या आर्थिक उलाढालीत मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांची स्वत:ची नर्सरी होती, परंतु सरकारी खात्यातील भ्रष्टाचारामुळे व दुष्काळामुळे ती बंद करावी लागल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची स्वत:ची डाळिंबांची एक हजार झाडे असून अॅपल, बोर  व पेरू ही पिकेही ते घेतात. नीरा कालव्याचे उदघाटन १९७८ मध्ये होऊनदेखील अद्याप तो अपूर्णावस्थेत असल्याने व झालेल्या कालव्यातूनही पाणी सोडले जात नसल्याने पिकांना पाणी मिळत नसल्याची व टँकरने पाणी आणून पिके जगवावी लागत असल्याची खंत त्यानी व्यक्त केली.

नैसर्गिक व राजकीय परिस्थितीमुळे तो परिसर दुष्काळात होरपळतो, पण तरीही तेथील शेतकरी निराश होत नाहीत, तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रगती करून घेतात असे त्यांनी आग्रहाने प्रतिपादन केले.

भागवत हाडाचे शेतकरी तर खरेच, पण त्याचबरोबर त्यांना समाजकारण, राजकारण याचेही उत्तम भान असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. ते कबड्डी खेळाचे प्रशिक्षकही आहेत.

अकोला व शेजारचे वाखूर या दोन गावांत पूर्वापार खेळांच्या स्पर्धा होत असत. त्या स्पर्धांमध्ये भाग घेणारे खेळाडू आता ऐंशी वर्षे वयाचे आहेत. लहानपणापासून खेळांच्या स्पर्धा पाहत असल्याने व कबड्डी खेळाला साधनसामग्री लागत नसल्याने भागवतांनी कबड्डी खेळाकडे अधिक लक्ष दिले व नंतर त्यांनी स्वत: कबड्डी खेळाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.

त्यांनी तयार केलेले खेळाडू पुढे राष्ट्रीय पातळीवरही खेळले. त्यांनी तीस मुली व चाळीस मुले एवढ्यांना प्रशिक्षण देऊन तयार केले. वाटंबरे गावची सुषमा पवार ही त्यांची विद्यार्थिनी दोन वर्षे राज्य पातळीवर कर्णधार होती व तिला सुवर्णपदक मिळाले होते. फेडरेशन सोलापूरला असल्याने स्पर्धाना संधी कमी मिळत असे, पण ती उणीव ग्रामीण राखीव मध्ये खेळाडू उतरवून ते भरून काढत. त्यांनी कबड्डी प्रशिक्षणाच्या निमित्ताने बराच प्रवास केला आहे व त्यातून त्यांच्या अनेक ओळखी झाल्या.

त्यांना वाचनाची आवड आहे. त्यानी मार्क्सवाद, समाजवाद  वाचून  समजावून घेतला. विनोबाजी, सानेगुरुजी, महात्मा गांधी इत्यादी थोर व्यक्तींच्या चरित्रांचे; तसेच, धार्मिक-पौराणिक ग्रंथांचे, प्रख्यात साहित्यिकांच्या साहित्याचे वाचन केले आहे.

रोजच्या जागतिक घडामोडी कळण्यासाठी रोज दोन्ही वेळा बी.बी.सी. ऐकण्याचा त्यांचा परिपाठ आहे. हिंदी बरोबर उर्दू बातम्याही व पाकिस्तान, इराण, इराक व अरबस्तान यांच्या बातम्याही ते आवडीने ऐकतात. गेली दहा वर्षे दृष्टी अधू झाल्याने सगळी मदार रेडिओवर आहे.

त्यांनी मुलांचेही उत्तम संगोपन केले आहे. त्यांचा मुलगा डॉक्टर असून मुलगी एम.एससी. झाली आहे. डॉक्टर मुलाचा स्वत:चा दोन हजार पुस्तकांचा खाजगी ग्रंथसंग्रह आहे. सातारा, सोलापूर व सांगली जिल्ह्यांतील दुष्काळी तालुके एकत्र करून त्यांचा एक स्वतंत्र जिल्हा बनवावा व त्याच्या विकासासाठी विशेष वेगळे नियोजन करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

माणूस कुठे राहतो हे महत्वाचे नसून त्याला त्याच्या जगण्यातून नक्की काय साध्य करायचे आहे याचे भान असणे व त्यासाठी उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य उपयोग करून घेणे महत्वाचे आहे. त्यावरच त्याचे मोठेपण ठरते. ‘ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा’ याची प्रचीती भागवत नखाते यांनी दिली असे म्हणणे योग्य होईल.

भागवत नखाते 9822900565

-अनुराधा काळे

About Post Author